दिवाळी अंक २००९

लेणी संस्कृत साहित्याची

प्रा. डॉ. मंजूषा गोखले

अलंकार हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. अगदी आदिम काळापासून माणूस स्वतःला सजवण्यासाठी अलंकार वापरत आला आणि आजतागायत त्याची अलंकारांची हौस फिटलेली नाही. स्त्री असो वा पुरुष, राव असो की रंक, सुशिक्षित असो की अशिक्षित, आसक्त असो की विरक्त, अलंकारांची मोहिनी कुणालाही चुकवता आलेली नाही. अलंकारांच्या बाबतीत 'काळ अनंत आहे आणि पृथ्वी अमर्याद' (कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी।) असे भवभूतीच्या भाषेत म्हणावे लागेल. अलंकारांनी स्थलकालाच्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत. माणसाच्या प्रगतीबरोबर अलंकारांमध्ये सतत भर पडत गेली, प्रकार वाढत गेले, जुने मागे पडले, नवे आले, जुनेही पुन्हा नवीन रूप घेऊन मिरवू लागले.

अगदी आरंभीच्या काळात माणूस पानाफुलांचे अलंकार वापरत होता. मग हळूहळू शंख-शिंपले, हस्तिदंत, रंगीबेरंगी दगड, शिंगे, पिसे ह्यांची अलंकारांमध्ये भर पडत गेली. धातूंचा शोध लागला तेव्हा तांबे, चांदी, सोने यांचे अलंकार प्रचारात आले. समुद्रातून मोती, प्रवाळ काढले जाऊ लागले. मौल्यवान दगडांना पैलू पाडण्याची कला माणसाला अवगत झाली. त्यामुळे अलंकारांची संख्या, स्वरूप आणि प्रकार सतत वाढतेच राहिले. आजच्या काळात तर कृत्रिम खडे, मोती, प्लॅस्टिक, हलक्या वजनाचे धातू, प्लॅटिनमसारखे अतिमौल्यवान धातू अशा नवनवीन घटकपदार्थांपासून अलंकार बनवले जातात, अहमहमिकेने वापरलेही जातात. आपल्या संस्कृतीत माणसाच्या जन्मापासून सगळ्या जीवनभर अलंकारांचे महत्त्व आहे. नुकत्याच जन्मलेल्या मुलाला सोन्याच्या अंगठीने मध चाटविण्याची जुनी पद्धत अजूनही कुठे कुठे दिसते. बाळाचे बारसे इवल्या बाळलेण्यांशिवाय पूर्णच होत नाही. मुंजीतली 'मुंजमेखला' हाही त्या बाळब्रह्मचाऱ्याचा अलंकारच. लग्नामध्ये मुलीचे 'सालंकृत कन्यादान' करावे अशी सगळ्याच आईवडिलांची इच्छा असते. शिवाय, वसंतपंचमीला द्राक्षांच्या माळा, गुढी पाडव्याला गाठीचे हार, संक्रांतीला हलव्याचे दागिने आणि डोहाळजेवणाला फुलांची वाडी असे सगळे जीवनच अलंकारमय आहे. अलंकारांनी फक्त माणसालाच नव्हे तर सगळ्या जीवनाला, सणा-उत्सवांना, रूढी-परंपरांना सुंदर करून टाकले आहे.

पण फक्त सौंदर्य वाढवणे हा काही अलंकारांचा एकमेव हेतू नव्हे. 'अलं करोति इति अलंकार:|' अशी अलंकार या शब्दाची व्युत्पत्ती आहे. अमरकोशात 'अलं भूषण-पर्याप्ति-शक्ति-वारणवाचकम्।' असे अलम् शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. त्यांनुसार अलंकारांचा 'भूषण' म्हणजे शोभा वाढवणे हा एक हेतू झाला. त्रैलोक्यसुंदरी झाली, तरी तिचे सौंदर्य अलंकारावाचून खुलत नाही; कविताकामिनीचे सौंदर्य सुद्धा उपमा-उत्प्रेक्षा यांसारख्या अलंकारांनीच खुलते. फार काय, काळ्याकभिन्न पहाडांची शोभा वाढते ती त्यांच्या अंगावर खोदलेल्या 'लेण्यांमुळेच.

'पर्याप्ति' म्हणजे परिपूर्णता. आरोग्य, ऐश्वर्य, संतती यांनी परिपूर्ण असलेले दीर्घायुष्य लाभावे म्हणून अलंकारांची योजना प्राचीन परंपरेने केलेली आहे. सुवर्ण हा धातू हे सगळे दान माणसाच्या पदरात घालतो. वेदांमध्ये सुवर्णाचे गुण सांगितले आहेत. सोने सृजनशील, आरोग्यवर्धक, दीर्घायुष्याचे कारक आणि वैभवाचे प्रतीक आहे. म्हणून तर सुवर्णालंकारांना एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे.

अंगात शक्ती यावी म्हणून अलंकार वापरण्याची प्रथाही फार जुनी. बाळाच्या पायात वाळे, कमरेला करदोटा किंवा साखळी घालायची ती त्या त्या अवयवाला शक्ती यावी म्हणून. अशुभ-अमंगळाचे निवारण हेही अलंकारांचे मोठेच फळ सांगितले आहे. काळ्या मण्यांच्या बिंदल्या-मनगट्या, मंगळसूत्र, गंडे, ताईत, वाघनखे, रुद्राक्ष असे सगळे अलंकार इडा-पिडा टाळतात अशी श्रद्धा असते.

माणसांनाच काय, देवांनाही अलंकारांनी 'बरवे' केले आहे. मोरपिसे ल्यालेला बाळकृष्ण, सर्पकंकण बाळगणारा शिव, 'कंठी झळके माळ मुक्ताफळाची' असा गणराया, सौभाग्यालंकार ल्यालेली गौर आणि अष्टमीची महालक्ष्मी, नरमुंडमाळा धारण करणारी काली, मकरकुंडले आणि वैजयंतीमाळा यांनी शोभणारा विठू----किती म्हणून आठवावे!

असे सगळे जीवनच मुळी अलंकारांनी रसरसलेले; आणि वाङ्मय हा तर जीवनाचा आरसाच. त्यामुळे संस्कृत वाङ्मयात अलंकारांची वर्णने जागोजाग भेटतात यात नवल काय? पण ही वर्णने केवळ एखाद्या नायकाचे वा नायिकेचे सौंदर्य आणि ऐश्वर्य मिरवण्यासाठी नाहीत. कधी एखाद्या अलंकारामुळे कथेच्या प्रवासात मोलाची भर पडते; तर कधी कथाप्रवाहाला वेगळेच वळण मिळते. कधी एखाद्या पात्राच्या व्यक्तिमत्त्वाचा आगळा पैलू अलंकाराच्या उल्लेखामुळे उजळून निघतो; तर कधी एखाद्या प्रसंगाला वा घटनेला अलंकाराच्या संदर्भामुळे वेगळे परिमाण लाभते. म्हणजे अमरकोशात दिलेल्या आणि परंपरेने मानलेल्या प्रयोजनांपेक्षा किती वेगळ्या प्रकारची प्रयोजने साहित्यातल्या अलंकारांनी साधली आहेत. कविप्रतिभेचे नानारंगी उन्मेष या अलंकारवर्णनांनी दाखवून दिले आहेत.

साहित्यातले अलंकार म्हटले म्हणजे आधी आठवते रामायणातली सीता. वल्कले नेसून वनात निघालेल्या आपल्या निष्पाप, गोजिरवाण्या सुनेला पाहून दशरथाला भडभडून आले; आणि त्याने आपल्या खजिन्यातले सगळ्यात सुंदर वस्त्रालंकार तिला देववले. ते लेऊनच वनात जाण्याचा प्रेमळ आग्रहही धरला. पुढे वनामध्ये लोपामुद्रेनेही तिला आईच्या प्रेमाने अलंकार ल्यायला लावले. या अलंकारांचा पुढच्या अवघड परिस्थितीत सीतेने किती चतुराईने उपयोग करून घेतला! रावण तिला आकाशमार्गाने लंकेला नेत होता. खाली एका पर्वतशिखरावर काही वानर बसलेले तिला दिसले. आपली काही खूण त्यांच्याकडे द्यावी म्हणजे कधीतरी रामाला आपला शोध करताना उपयोग येईल असा स्त्रीसुलभ शहाणपणाचा विचार तिने केला. अंगावरचे अलंकार उत्तरीयात गुंडाळून खाली टाकले. पुढे वानरांनी रामाची भेट झाल्यावर हेच अलंकार त्याला दाखवले. ते पाहून रामाचा तर आवेग अनावरच झाला. पण खात्री करून घेण्यासाठी रामाने लक्ष्मणाला विचारले. तेव्हा लक्ष्मणाने जे उत्तर दिले ते काळजाला भिडणारे तर आहेच; पण लक्ष्मणाच्या व्यक्तिमत्त्वाला आभाळाइतके उंच करणारे आहे. तो म्हणाला, " ही कुंडले किंवा बाजूबंद मी ओळखत नाही. कारण मी कधी मान वर करून सीतेकडे पाहिलेलेच नाही. ही नूपुरे तेवढी माझ्या ओळखीची आहेत, कारण सीतेच्या चरणांना स्पर्श करताना ती नेहमीच माझ्या दृष्टीस पडायची!" लक्ष्मणाच्या या शब्दांवरून सारे रामायण ओवाळून टाकावे असे वाटते.

शूद्रकाच्या 'मृच्छकटिक' नाटकाचे कथानक तर वसंतसेनेच्या अलंकारांभोवतीच फिरते. शकाराने केलेल्या पाठलागामुळे घाबरलेली वसंतसेना चारुदत्ताच्या घरात शिरते आणि त्याला पाहून त्याच्या प्रेमातच पडते. पुन्हा भेट होण्यासाठी काहीतरी निमित्त हवे म्हणून आपले अलंकार ठेव म्हणून त्याच्याकडे ठेवते. नेमके तेच अलंकार शर्विलक चोरतो, आणि कशासाठी - तर आपल्या प्रेयसीला म्हणजे वसंतसेनेच्याच दासीला दास्यातून सोडवण्यासाठी!

अशा प्रकारे अलंकार पुन्हा परततात वसंतसेनेकडे. पुढे सोन्याची गाडी हवी म्हणून हट्ट करून रडणाऱ्या चारुदत्ताच्या मुलाला वसंतसेना आपले दागिने देऊन टाकते. म्हणजे पुन्हा अलंकार चारुदत्ताकडे येतात; पण यावेळी हे अलंकार भलताच प्रताप दाखवतात. वसंतसेना मरण पावल्याची बातमी येते आणि खुनाचा आळ येतो चारुदत्तावर. भर न्यायालयात वसंतसेनेचे अलंकार चारुदत्ताकडे असल्याचे उघड होते आणि त्या अलंकारांचा पुरावा ग्राह्य धरून चारुदत्तावर आरोप सिद्ध होतो. अर्थातच या अलंकार-पुराणाचा शेवट गोड होतो हे वेगळे सांगायला नको!

तशीच ती 'अभिज्ञानशाकुन्तल' नाटकातली दुष्यंताची अंगठी. शकुंतलेशी गांधर्वविवाह करून राजधानीला परत निघालेला दुष्यंत तिच्या बोटात अंगठी घालतो आणि 'रोज या अंगठीवर कोरलेले एकेक अक्षर मोज. सगळी अक्षरे संपण्यापूर्वीच तुला न्यायला लवाजमा पाठवतो' असे सांगून तिचा निरोप घेतो. पण हा दोन प्रेमी जीवांमधला गोड संकेत नियतीला मंजूर होत नाही. दुर्वासाच्या शापामुळे दुष्यंत शकुंतलेला विसरून जातो. इकडे दुष्यंताकडे निघालेल्या शकुंतलेच्या हातून अंगठी हरवते. आता अंगठी दुष्यंताच्या मापाची. शकुंतलेच्या बोटात ती सैलच बसणार! त्यातून अंगठी जमिनीवर पडती तर खणकन वाजली असती. नेमकी ती गळून पडते पाण्यात; आणि गर्भभाराने जडावलेल्या, मनाने बावरलेल्या शकुंतलेच्या ते लक्षातही येत नाही. ऐन वेळेला खूण म्हणून उपयोगी पडायला अंगठीच जागेवर राहत नाही आणि शकुंतलेची फरफट टळत नाही. एका कोळ्याकरवी राजाला अंगठी मिळते तेव्हा शकुंतलेची आठवण जागी होऊन राजा दुःखाने होरपळून निघतो. पण आता वेळ निघून गेलेली असते. पुढे राजाला त्याच्या पुत्राची- सर्वदमनाची ओळख पटते तीही त्याच्या मनगटावर बांधलेल्या रक्षाकरंडकामुळेच. हा रक्षाकरंडक म्हणजे ताईत बाळाच्या रक्षणासाठी आहे खरा. पण नाटकाच्या गोड अखेरीसाठी त्याचा केवढा चतुर वापर केला आहे कालिदासाने!

याच शाकुंतलाच्या चौथ्या अंकात अलकारांचा आणखी एक हृद्य संदर्भ आहे. शकुंतला सासरी जाणार आहे. मुलीला सासरी पाठवताना 'सालंकृत' पाठवावे असे कोणत्या मातापित्यांना वाटणार नाही? पण काश्यप (कण्व) ऋषींच्या आश्रमात कुठले सोने आणि हिरेमाणके? पण शकुंतलेचे माहेर गरीब नाही, लाचार नाही. निसर्गाचे अपार वैभव आहे ना तिथे! निसर्गच हिर्‍यामोत्यांचे अलंकार शकुंतलेला 'घरचा अहेर' म्हणून बहाल करतो!

तरुण माणसांना फुलांचे आकर्षण फार. त्यामुळे युवती आपल्या सौंदर्यावर फुलांच्या अलंकारांचा साज चढवतात. शेवटी सोनेचांदी काय किंवा पाचूमाणके काय, निर्जीव धातू किंवा दगडच ते! फुलांच्या रसरशीत रंगांची, ताजेपणाची आणि सुगंधाची सर त्यांना कशी येणार? मेघदूतातल्या अलकानगरीत स्त्रियांची वेगळी हौसमौज पुरवायला कल्पवृक्ष सेवेसी तत्पर आहे. पण तिथल्या सुंदरींना भावतो पुष्पशृंगारच! केसांत माळलेले कुंदाचे (कोरांटीचे) गजरे, कानात नाजूकसे शिरीषाचे फूल, भांगात कदंबपुष्पाचा झुलता लोलक आणि हातात कमळ एवढे अलंकार असल्यावर आणखी दुसरे काय हवे? तशी ती कुमारसंभवातली पार्वती. चालली आहे तपस्वी शंकराला प्रणाम करण्यासाठी. पण मनात आहे ईर्ष्या शंकराला मोहित करण्याची. तीही असा चोखंदळपणे साज ल्याली आहे फुलांचाच. लाल रंगाचा अशोक, पिवळाधमक कर्णिकार आणि शुभ्र सिंधुवार अशी तरुण मनाला मोहवणारी मादक रंगसंगती साधली आहे त्या पुष्पालंकारांमध्ये. पण एवढे सगळे करून पार्वती प्रेमात पडली आहे ती सापा-नागांची आभूषणे घालणाऱ्या स्मशानबैराग्याच्या! पार्वतीची परीक्षा पाहायला आलेला ब्रह्मचारी तर शब्दचित्रच उभे करतो या विजोड जोडप्याचे! पाणिग्रहणाच्या विधीच्या वेळी पाचूंचा हिरवा चुडा भरलेला गोंडस हात सर्पवलय ल्यालेल्या शिवाच्या हाती कसा शोभेल? नूपुरांनी रुणझुणणारी तिची नाजूक पाउले कशी विसावणार स्मशानातल्या अस्थिमाळांवर? कुठे उमेच्या कंठी रुळणाऱ्या मोत्यांच्या माळा आणि कुठे रुद्राच्या गळ्यातल्या नरमुंडमाळा? अलंकारांमधल्या विरोधाभासाने शिवपार्वतीच्या चित्राला केवढा उठाव आणला आहे आणि सगळ्या प्रसंगात केवढी परिणामकारकता आणली आहे!

अलंकारांचा मोह माणसाला - विशेषतः स्त्रियांना सोडवत नाही हे खरे. पण रात्रीच्या अंधारात लपून छपून प्रियकराकडे निघालेल्या अभिसारिका मात्र याला अपवाद आहेत. आपले जाणे कोणाला कळू नये म्हणून त्या पायांत पैंजण घालणार नाहीत की हातांत कांकणेही घालणार नाहीत. केसांत गजराही नको. त्याच्या वासाने घात केला तर? मात्र घाईगर्दीने जाताना त्यांच्या गळ्यातले मोत्यांचे सर तुटतात आणि रस्ताभर विखुरलेले मोती बिचाऱ्यांचे गुपित उघड करतात!

अलंकारांच्या सोसामुळे कवींना उपमा देताना अलंकारांची आठवण होणार नाही असे कसे शक्य आहे? प्रासादाच्या सौधावरून उन्हामध्ये झळाळणाऱ्या यमुनेच्या सावळ्या प्रवाहाकडे पाहताना रामायणातल्या शत्रुघ्नाला आठवते, ती काळ्याभोर केसांच्या वेणीवर माळलेली सोन्याची 'प्रवेणी'. मेघदूतात मेघाच्या घननीळ कायेवर इंद्रधनुष्य उमटते तेव्हा यक्षाला आठव येतो कृष्णाने खोवलेल्या मोरपिसाचा! मेघ जेव्हा चर्मण्वती नदीच्या शुभ्र प्रवाहावर ओठंगून राहतो तेव्हा स्वर्गातून पाहणार्‍या देवांना दिसतो पृथ्वीने ल्यालेला मोत्यांचा सर, मधोमध टपोर्‍या इंद्रनील रत्नाचे पदक असलेला!

असे नाना परीचे अलंकार आणि त्यांची नाना परींची वर्णने. संस्कृतसाहित्यसुंदरीला त्यांनी 'अलंकृत' केले आहे आणि तिच्या सौंदर्याला अपूर्व खुलावट आणली आहे हेच खरे!