रात्र !
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची

त्या दिवशी अचानक दिवे गेले आणि संतोषने सुषमाला वर बोलावले, घराच्या पत्र्यावर.
तिने खालूनच विचारले, "काय आहे? रात्र झालीये, पोर झोपलंय खाली. आवाजानं उठंल."
त्यावर संतोषने प्रेमळ धाकाने डोळे मोठे केले, "ये म्हनतो ना!"
"बरं, आले."
सुषमा दार लोटून वर येईपर्यंत संतोष आठवणीत हरवून गेला होता. आपण गावाकडे कसे जगत होतो? मग सुषमाशी ओळख कशी झाली? आपल्यापेक्षा दोन यत्ता जास्त शिकली असूनही तिच्याशी आपले लग्न कसे झाले? गावातल्या सज्जन पाटलाने, सुषमाच्या शिक्षणाला योग्य नोकरी मिळेल म्हणून त्या दोघांची पुण्यात यायची सोय कशी केली. पुन्हा त्याच पाटलाने, पुण्यात संतोषलाही काम कसे मिळवून दिले इ. इ. त्या आठवणींमुळे तो थोडासा हळवा झाला होता.
त्याची तंद्री भंगली, ती सुषमाच्या कुजबुजल्या आवाजातल्या हाकेने. "अहो, काय झालं? कुठं हरवलात?"
तो तिच्याकडे बघून नुसता हसला, आणि तिचा हात हातात घेऊन त्याने तिला जवळ ओढले. मग आकाशाकडे बोट दाखवीत तो म्हणाला. "आज चांदनं बघ किती छान दिसतंय, अगदी तुझ्यागत."
तिने लाजून खाली पाहिले तसा तो म्हणाला, "अगं चांदनं काय खाली दिसतंय व्हय? वर बघ."
तिनेही आकाशाकडे पाहिले. चांदणे खरेच खूप सुंदर दिसत होते. दिवे गेल्यामुळे आज चांदणे लक्ष वेधून घेते आहे, नाही तर एरवी कोण लक्ष देतो त्याच्याकडे? असा एक विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला.
एवढ्यात त्याने तिला अजूनच जवळ ओढले, तिच्या कपाळावर आलेली बट फुंकर मारून उडवली आणि हलकेच तिच्या गालाचे चुंबन घेतले.
'आज दांडगाई नाही?' हे तिच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्य त्याने अचूक टिपले आणि म्हणाला, "हम्म... कधी कधी दांडगाई सोडावी मानसानं असं तूच तर म्हनायचीस की."
ती खूप छान हसली आणि त्याच्या छातीवर डोके टेकून त्याला बिलगली. स्पर्श आणखीनच घट्ट होत गेले. जवळपास अर्धी रात्र उलटून गेली तरीही दिवे आलेच नव्हते, पण वातावरणाची नशाच अशी होती, की ते दोघेही, त्यांच्याही नकळत बराच वेळ एकमेकांना घट्ट बिलगून बसून राहिले होते... तृप्त !
त्याच वेळी, त्या चाळीशेजारच्या अपार्टमेंटच्या टॉप फ्लोअरवर राहणारा कुणी तरी, बायकोशी झालेल्या वादानंतर झोपी जायचा प्रयत्न करीत होता. त्याला राहून राहून वाटत होते, 'हीच का ती बाई, की जिच्यासाठी आपण आपल्या आई-वडिलांना सोडून वेगळे झालो. केवळ हिच्या सुखासाठी परवडत नसतानाही हे मोठं घर घेतलं कर्ज काढून.. कर्जाचे हप्ते नीट भरता यावेत म्हणून ओव्हरटाईम करून पैसे वाचवतोय, आणि ही ते पैसे खर्च करते, कसलाही विचार न करता. वर माझ्या उशिरा येण्याबद्दल हिला संशय? मी कधी विचारलं आहे हिला, की मी घरी नसताना ही काय करते, कुणाला भेटते?' हा विचार आला खरा त्याच्या मनात, पण त्यालाच स्वतःची लाज वाटली. गेल्या काही दिवसात ऑफिसमधल्या सीमाबरोबरचे आपले बोलणे वाढले असल्याचे त्यालाही जाणवले होतेच. पण त्याच्या लेखी ती केवळ त्याची सहकारी होती. त्यामुळे तिच्याशी ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्त बोलायला काय हरकत आहे, असा त्याचा प्रश्न होता.
त्याच्याच शेजारी झोपलेल्या, खरे तर झोपू न शकलेल्या त्याच्या बायकोच्या मनात मात्र काही तरी वेगळेच चालू होते. कारण तिने आज सीमाला आणि त्याला एका बागेच्या गेटजवळ पाहिले होते. आणि तिचा संशय संशय उरला नव्हता.
'झाली असेल भेळ खाऊन, एकाच डिशमध्ये. या असल्या मुलींना लग्न झालेलेच पुरुष कसे आवडतात कोण जाणे. पण टाळी काही एका हाताने वाजत नाही. नाही तर माझी तिची एकदाच ओळख करून दिल्यानंतर, यानं किमान एकदा तरी तिला घरी बोलावलं असतं. नुसतं बोलायला काय जातंय, माझं तुझ्यावरच प्रेम आहे वगैरे...'
दोन्ही बाजूने विरोधी स्वगते चालू होती. स्वतःशीच स्वतःची बाजू बरोबर मांडली जात होती. तो वैतागला होता. त्यात दिवे गेल्याने पंखा बंद पडला आणि त्याची अजूनच चिडचिड झाली. गादीवर जोरात हात मारून त्याने आपला राग व्यक्त केला आणि मग झोपेचे सगळेच उपाय संपल्यावर तो गच्चीत आला आणि त्याने एक सिगरेट शिलगावली. भांडण करून शांतपणे झोपलेल्या बायकोचा त्याला कमालीचा राग आला होता. सिगरेटच्या धुरापेक्षाही जास्त धूर त्याच्या डोक्यात साचला असल्याने, बाहेर पडलेले ते टिपूर चांदणे त्याच्या नजरेत येणे केवळ अशक्य होते. त्याच्यासाठी ती रात्र एक भयाण रात्र होती, बाकी काही नाही. एकामागून एक सिगरेट पेटत होती आणि मनातला धूर बाहेर पडत होता.... बराच वेळ !
ती रात्र मात्र, तृप्त-अतृप्ततेच्या सगळ्याच निकषांच्या पार असलेल्या आपल्या आरशासारख्या तटस्थपणाने तशीच सरत गेली. कुठे श्वास जुळत होते, कुठे श्वास जळत होते, इतकेच.