दिवाळी अंक २००९

कार्निवालची जत्रा

स्वाती पळसुले-देसाई

वसंताला जरी ऋतुराज म्हटलेले असले तरी रंगांचा उत्सव मात्र शिशिर करतो. रस्त्यांच्या दोबाजूला असणारे मेपल्स, आयशं, बिर्क आदी वृक्ष आपापले हिरवे एकसारखे गणवेश टाकून देऊन लाल, केशरी, पिवळे असे रंगीबेरंगी पोषाख चढवून शिशिराच्या स्वागताची तयारी करू लागतात. नखरेल तरुणीइतकाच वेळ यांनाही साजशृंगाराला लागतो बरे. एकदम नाही काही पोषाख बदलत ही मंडळी. हळूहळू नखरेलपणे एकेक साज चढवत केशरट, लालीलाल, सोनेरीपिवळे पोषाख चढवतात आणि स्वागतसमारंभ झाला रे झाला की मात्र लहान मुलाच्या अवखळपणे आपापले पोषाख फेकून देऊन वनवासातली जीर्ण वल्कले धारण करतात. सूर्यही मग कमीकमी रेंगाळतो आणि घाईघाईने निघून जातो. उदास, करड्या संध्याकाळी सोबतीला लांब लांब रात्री आणि बोचरे वारे घेऊन येतात. एक उदासी सगळीकडे दाटायला सुरुवात होते आणि ती उदासी हटवायलाच जणू ही कार्निवालची जत्रा येते. दरवर्षी ११नोव्हेंबर ला सकाळी बरोब्बर ११ वाजून ११ मिनिटांच्या मुहूर्तावर कार्निवालचे शिंग फुंकले जाते.

सगळ्या जर्मनीभर स्टेशनांमधल्या फलाटांवर, पायर्‍यांवर,जिन्यांच्या मोकळ्या जागांमध्ये, चौकाचौकांतून, मैदानांमध्ये ह्या मुहूर्तावर कार्निवालचे विशिष्ट संगीत लावून नृत्ये केली जातात. आपल्याकडे जशी गोविंदामंडळे,गणेशोत्सव मंडळे असतात ना, तशी ह्यांची कार्निवाल मंडळे असतात, त्यांचे विशिष्ट गणवेश असतात, त्यांचा बँड असतो. ते गणवेश घालून बँडपथक कार्निवालसंगीत वाजवते आणि नृत्यपथक त्यावर नाच करते. हा क्षण अनुभवायला सारे जण तेथे आपापली कामे बाजूला ठेवून जमायचे हा अलिखित नियमच आहे. साधारण अर्धा ते पाऊण तास त्यांचे हे नृत्य-संगीत चालते आणि मग मात्र परत सारे आपापल्या कामांना जातात आणि ही पथकेही आपापले गणवेश बदलून साध्या कपड्यांमध्ये येतात. त्या दिवशीचा सोहळा संपतो पण पथके आता मिरवणूकांच्या तयारीला एकीकडे सुरुवात करू लागतात आणि इकडे सार्‍यांना नाताळचे वेध लागतात. ६ डिसेंबरला निकोलाऊस टाग म्हणजे निकोलस डे येतो आणि नाताळचे बाजार सजू लागतात. हिरवीकंच मयूरपंखीची झुडुपे म्हणजेच नाताळची झाडे सजतात. दीपोत्सव सुरू होतो तो थेट नववर्षापर्यंत!

नवीन वर्ष सुरू झाले तरी थंडीचा मुक्काम असतोच. हिमवृष्टी, बोचरे वारे सुद्धा असतातच. तेच वारे कार्निवालच्या मिरवणूकीची खबर घेऊन येतात. कार्निवालच्या गाण्यांची धून जिकडेतिकडे गुंजायला लागते. नाच, गाणी, चुटकुले, तत्कालीन राजकारणावर टिप्पणी करणारी नाटुकली, प्रहसने ठिकठिकाणी सुरू होतात. टी. व्ही. वर तर एक वाहिनीच ह्या कार्यक्रमांसाठी तैनात केली जाते आणि ठिकठिकाणी चालणार्‍या अशा कार्यक्रमांचे प्रक्षेपणही केले जाते. खास कार्निवालसाठीचे चित्रविचित्र विदूषकी पोषाख करून प्रेक्षक त्या कार्यक्रमाची शान वाढवतात आणि चुणचुणीत निवेदक त्या प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांना गमतीदार प्रश्न विचारून त्या कार्यक्रमांमध्ये जान आणतात. घराघरातूनही कार्निवालचे संगीत ऐकू येते. प्रत्येकाच्या डेकवर, लॅपटॉपवर, टीव्हीवर, गाडीमध्ये फक्त कार्निवालचीच गाणी वाजू लागतात आणि हळूहळू आसमंत कार्निवालमय होऊ लागते.

बॉन, माइंझ येथील कार्निवाल जत्रा अगदी प्रसिद्ध आहेत आणि तेथील मिरवणूका पाहायला हजारोंच्या संख्येने लोक जमतात. इस्टरच्या साधारण ४० दिवस आधीच्या गुरुवारला schmutzig Donnerstag म्हणजे dirty thursday म्हणतात आणि ह्या दिवशीपासून मिरवणूकांना सुरुवात होते. ह्या गुरुवारी अनेक कचेर्‍यांमधून पुरुषांचे टाय बायका कापतात आणि काही कचेर्‍यांमध्ये तर अशा कापलेल्या टायचे लहानसे प्रदर्शनच कॉनफरन्स हॉलमध्ये भरवले जाते. ह्या गुरुवारपासून येणार्‍या बुधवारपर्यंत कार्निवालच्या मिरवणूका काढल्या जातात. ह्या बुधवारला ashe Mittwoche म्हणजे भस्म बुधवार म्हणतात. कोणत्या गावची मिरवणूक कधी निघणार हे सुद्धा ठरलेले असते. आपले कसे मानाचे गणपती निघतात तसे यांच्या मिरवणूक मंडळांचेही क्रम ठरलेले असतात.

निरनिराळी मंडळे वेगवेगळ्या थीम्स घेतात. त्याप्रमाणे पोषाख, त्याला अनुरुप, साजेशी अशी आपापल्या ट्रकची सजावट करतात. आपल्याकडे जसे अनंत चतुर्दशीला रस्ते ब्लॉक केले जातात तसे येथेही मिरवणूकीच्या रस्त्यांवरच्या ट्राम, बसचे मार्ग बदलले जातात. लोक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करतात. वाजत गाजत, नाचत गात मिरवणूक पुढे सरकू लागते. त्यात मोठमोठे सजवलेले ट्रक, घोडे, मोटारी संथ गतीने चाललेले असतात. त्यातून गोळ्या, चॉकलेटे, बिस्किटे, टॉफ्यांची उधळण होत असते आणि आबालवृद्ध सारेच ते वेचायला पिशव्या घेऊन तयारच असतात. काही मंडळे आपल्या मोटारीतून गाजरे, सफरचंदे, बिअर, वाईन वाटतात तर काही शांपू, साबण, हेअरजेल अशी प्रसाधने वाटतात. सगळेच सानथोर तो खाऊ, त्या वस्तू लुटण्याची गंमत अनुभवतात. आठवडाभर नुसती धमाल चाललेली असते. ह्या आठवड्यात बरीच मंडळे आपापली कार्निवाल साजरी करून जत्रेची मजा घेतात. आमच्या आजीआजोबांचे चर्चही त्याला अपवाद कसे असेल? आजीच्या चर्चात ज्येष्ठ नागरिकांसाठी दर बुधवारी त्यांना झेपतील असे व्यायाम प्रकार करून घेतले जातात. दर बुधवारी सकाळी आजी आणि तिच्या मैतरणी चर्चातल्या एका हॉलात जमतात आणि ग्रेटा, त्यांची शिक्षिका, त्यांच्याकडून वेगवेगळे व्यायाम करून घेते. असाच दर मंगळवारी पुरुषांचा व्यायाम मार्क करवून घेतो. हे ग्रेटा आणि मार्कही साठीचे आहेत बरे, तरी सगळ्या आजीआजोबांमध्ये तसे लहानच म्हणायला हवेत. बहुदा म्हणूनच शरीराने आणि मनानेही हे लोक टवटवीत राहत असावेत.

तर आजीच्या ह्या चर्चातल्या कार्निवालमध्ये सारे ज्येष्ठ नाच, गाणी, चुटकुले, प्रहसने, कविता असे करमणुकीचे कार्यक्रम सादर करणार होते आणि त्यांची मुलेनातवंडे ते पहायला येणार होती. हे आमंत्रण आम्ही ताबडतोब स्वीकारले. आजीही नाचात भाग घेणार होती त्यामुळे ती आधीच तिथे गेलेली होती. दुपारी २ च्या सुमाराला मी आणि आजोबा चर्चात पोहोचलो. सगळेजण तेथे विदुषकी पोषाखात आलेले होते. पिपाण्या, पिटपिटी, फुगे सगळीकडे नुसता दंगा होता. आपापली वये विसरून सारे आजीआजोबा मस्त शाळकरी झाले होते. अगदी चर्चाचा फादर सुद्धा विदुषकाच्या पोषाखात होता, आधी तर मी त्याला त्या वेशात ओळखलाच नाही. फ्राऊ ग्रेटाने चुटकुल्यांनी सुरुवात केली तर हेर स्टेफानची मिष्किल कविता सार्‍यांना हसवून गेली. फ्राऊ नोझच्या विनोदी नाट्यछटेने त्यावर कडी केली तर ख्रिस्टिना आणि बार्बराने रॉक एन रोल नाच केला‌. एव्हाना शिट्ट्या, टाळ्यांनी सभागृह दणाणून गेले. फ्राऊ स्टेफानीचे खुसखुशीत निवेदन खसखशीचे मळे पिकवित होते. सादर करणारे सारे कलावंत सत्तरीच्या आसपासचे होते. पण संध्याछाया येथे भिववत नव्हत्या तर शीतल सावली देत होत्या.

आमच्या आजीचे नृत्यनाट्य होते. नाटिकेचे नाव होते 'वाइन क्योनिगीन!' म्हणजे 'वारुणीची राणी'! सगळ्या ७०/७५च्या आज्या ठुमकत मंचावर आल्या. त्यांच्या नृत्य आणि अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली आणि झु गाबं म्हणजे वन्स मोअर ने परिसर दणाणला‌. सगळ्या आज्यांनी अभिवादन करत टेचात वन्स मोअर घेतला. कार्यक्रम संपल्यावर सर्वांना कॉफी, केक, वुर्ष्ट असा अल्पोपाहार होता. आमच्या आजीच्या मैतरणी मात्र त्या वन्स मोअरच्या धुंदीतच होत्या. खाणेपिणे झाल्यावरही त्यांच्या गप्पा संपायचे काही लक्षण दिसेना. आजीआजोबांनी सगळ्यांना घरी चलण्याचा आग्रह केला. मग काय त्या ७/८ जणींची टोळी घरी आली. डेकवर परत कार्निवालचे संगीत लागले. हॉलमधले फर्निचर बाजूला करून मध्ये मोकळी जागा केली आणि सगळ्या आज्यांनी ठेका धरत नाचायला सुरुवात केली की. एकीकडे वाइनबरोबर चीज, ऑलिव्हज, चिप्स इ. चा समाचार घेणे चालू होते आणि पाय थिरकत होते. त्यातली बिरगिट आजी मला म्हणाली सुद्धा, "तुला वाटेल की काय हिरवट म्हाताऱ्या आहेत, पण अग आज कार्निवाल आहे ना.. आज सगळी दुःख, दुखणीखुपणी, चिंता बाजूला सारून सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदाचे कण वेचायचे आणि ह्या टॉनिकवर पुढचे काही महिने मजेत घालवायचे."

मध्यरात्रीपर्यंत ही मैफल चालू होती. शेवटी दिनेश आणि आकिम आजोबा सगळ्या आज्यांना त्यांच्या घरी पोहोचवून आले. सगळ्या आज्या आमच्या घराजवळपासच राहणार्‍या आहेत म्हणून बरें.. त्यानंतर पुढे रात्रभर आमची चौघांची मैफल रंगली. आनंदाचे झाड तिथे बहरले होते.