अतुल अलवानी---एक नक्षत्र
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
अतुल अलवानी हे आमच्या बँकेतील अत्रंग व्यक्तिमत्त्व. अतुल हा मूळचा मराठमोळा अळवणी. पण आमच्याकडे एक लालवानी होता. आमच्या अमराठी चीफ मॅनेजरांसाठी तो जसा लालवानी तसा अतुल अलवानी. सुरवातीला मस्करीत इतरही त्याला अलवानी म्हणू लागले आणि तो कायमचा अलवानी झाला. अतुल अतिशय डोकेबाज पण कुठे काय बोलेल याचा नेम नाही.
एकदा दुपारी जेवताना कुणाच्या तरी डोक्यातून सहलीला जायची कल्पना निघाली. त्यावर कदम म्हणाला, " खरंच, मस्त सहलीचे दिवस आहेत. आपणपण जाऊ या. पण सुतरफेणी बरोबर नको. इथे पिडतोय तेवढं पुरे आहे."
सुतरफेणी म्हणजे आमचे सी. एम. पराकोटीचे आत्मकेंद्रित. बोलण्याचे विषयही मी, मी आणि मीच. त्यामुळे सगळे त्यांना टाळत. पण बँकेची सहल आणि त्यांना कसे डावलायचे? तेवढ्यात कुणीतरी उपयुक्त माहिती पुरवली, " सी. एम.ची मुलगी माहेरपणासाठी आली आहे आणि तिला सासरी पोहोचवायला ते शनिवारी दिल्लीला चालले आहेत. एकदम मंगळवारीच परत येणार आहेत. आपण या रविवारीच जाऊ या".
गीता म्हणाली, "आजचा बुधवार गेल्यातच जमा आहे. तीन दिवसात कशी तयारी होणार?"
सानेने विचारले, "वसईला माझ्या घरी येता का? मी सगळी व्यवस्था करतो." सगळे लगेच तयार झाले.
दुसरे दिवशी सानेने सी. एम. ना त्याच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. सी. एम. म्हणाले, " कब पांच तारीखको? पांच तारीखको तो..."
त्यांना मध्येच थांबवत साने म्हणाला, "बारह तारीख को शादीका मुहुरत है. उन्नीस को मुझे बाहर जाना है. छब्बीस को भी ऐसाही कुछ प्रॉब्लम है. तो हमने तय कर लिया है की पांच तारीख को जितने भी लोग आयेंगे उन्हीके साथ पिकनिक मनायेंगे"
इतके बोलल्यावर सी, एम. काय बोलणार? त्यांनी पाच तारीख सोयीची नाही म्हटल्यावर चेहरा पाडून "आप आते तो बहार आती" असे काहीतरी म्हणून साने सटकला. सहल पुढे ढकलण्याबाबत सी. एम. नी इतर दोघातिघांकडे बोलून बघितले पण त्यांना कुणी दाद दिली नाही.
दुसर्या दिवशी सी. एम. बँकेत आले ते अतिशय खराब मूडमध्ये. आल्या आल्या त्यांनी आरडाओरडा सुरू केला. बँकेची वेळ साडे आठची. आठ पस्तिसलाच मस्टर केबिनमध्ये मागविले. पोरांच्या मते ते खुन्नस काढत होते. लेट लतिफ अतुल त्याच्या नेहमीच्या वेळेला म्हणजे आठ पन्नासला आला. त्यावेळी मी सी. एम.च्या केबिनमध्ये होते. ते काचेतून रागारागाने अतुलकडे पाहत होते. त्यांचा रागरंग पाहून माझी खात्री झाली की आज अतुलला ते नक्की घरी पाठवणार. अतुल केबिनमध्ये शिरला ते भले मोठे प्रश्नचिन्ह घेऊन. आत येताच त्याने सी. एम.ना म्हटले, "साब, ये मैं क्या सुन रहा हूं? आप पिकनिक पे नहीं आ रहे हैं?"
आतापर्यंत कुणीच भाव न दिल्यामुळे सी. एम. लगेच पाघळले. ते म्हणाले, " पांच को मैं नहीं हूं. मैं..."
त्यांना अडवत अतुल म्हणाल, "तब तो बडा प्रॉब्लम होगा. हम जब स्विमिंग करेंगे तो हमारे कपडे कौन सम्भालेगा?"
हे ऐकताच सी. एम. रागाने लाल लाल झाले. " तुम्हारे कपडे सम्भालने के लिये मुझे बुला रहे हो? कैसी बातें करते हो? नॉन्सेन्स."
अतुल हसत हसत म्हणाला, "अरे अरे साब, आप इतना गरम क्यूं हो रहे हो? मैं तो मजाक कर रहा था."
"ऐसा बेहुदा मजाक? मजाक की भी कोई हद होती है." असं बरंच काही सी. एम. बोलत राहिले. तेवढ्यात अतुलने त्यांच्या पुढ्यातले मस्टर ओढले आणि त्यावर तो सही करून निघून गेला.
बाहेर आल्यावर मी अतुलला म्हणाले, "हे पोहोण्याचं कुठून काढलंस? सान्यांच्या विहिरीत उतरणार आहेस का? आणि सी. एम.ना कपडे सांभाळायला काय सांगतोस? खुर्चीचा तरी मान राखावा रे."
तो म्हणाला, "मला सांगा, त्यांच्या खुर्चीचा मान राखला असता तर माझ्या खुर्चीवर मला आज बसायला मिळालं असतं का? उशीरा येण्याबद्दल एक शब्द तरी बोलले का मला?"
"त्यांनी तुला सहल पुढे ढकलण्याविषयी गळ घातली असती म्हणजे?"
"काय? कपडे सांभाळायची गोष्ट केल्यावर? शक्यच नाही."
अतुलपुढे हात जोडून मी निघून गेले.
ऑक्टोबरचा पहिला आठवडा होता. भरपूर डिविडंड वॉरंट जमा झाली होती. त्यामुळे चिक्कार काम होते. त्यातच एस. बी. ला डेली ट्रँझॅक्शनमध्ये पन्नास पैशांचा डिफरन्स लागला. तो शोधण्यास एस. बी. च्या लोकांना दीड दिवस माथेफोड करावी लागली. शेवटी डिफरन्स सापडला तेव्हा ती अतुलची चूक होती हे लक्षात आले. बीना तडकून म्हणाली, "अतुल के शॉर्टकट की वजहसे हमारा कितना समय बरबाद हुआ. अभी जाकर उसे फायर करती हूं!"
बीना म्हणजे तोफखाना. मी अतुलला म्हणाले, "पन्नास पैशांचा घोळ तुझाच निघाला. ती बघ बीना तुझ्या समाचाराला येते आहे. देव तुझं रक्षण करो."
माझे बोलणे पुरे होईपर्यंत बीना अतुलच्या टेबलाजवळ येऊन पोहोचली होती. तिने तोंड उघडण्यापूर्वीच अतुलने तिला विचारले, "बीना, इलू इलू का मतलब क्या है?"
त्यावेळी सुभाष घईंचा सौदागर नुकताच प्रदर्शित झाला होता. प्रश्न ऐकून बीना एकदम थबकलीच. रागाने म्हणाली, "जा. तेरी वाईफसे पूछ" आणि घूम जाव करून निघून गेली.
जयाची मातृभाषा सिंधी. जन्मापासून मुंबईत असल्यामुळे तिला बर्यापैकी मराठी येत होते. एकदा ती लंगडत लंगडत बँकेत आली तेव्हा अतुलने तिला विचारले, "लंगडायला काय झालं? पाय घसरला की पाऊल वाकडं पडलं? "
जया भोळेपणाने म्हणाली, "दोनी. पहिले पाय घसरला. बॅलन्स सम्हालायला गेली तो वाकडा जाला."
नंतर कुणीतरी जयाच्या ज्ञानात भर घालण्याचे पुण्यकर्म केले असावे कारण थोड्या वेळाने ती लंगडत येऊन अतुलला झापून गेली.
बँकेत सत्यनारायणाची पूजा होती. बर्याचशा कर्मचाऱ्यांची मुले आली होती. अतुलच्या दोन्ही मुली आल्या होत्या. मालाड शाखेतली शारदा जेव्हा तीर्थप्रसादाला आली तेव्हा अतुल धाकटीला घेऊन तिच्याकडे गेला आणि म्हणाला, "शारदा मॅडम, हा तुमचा शाप."
शारदा म्हणाली, "मी तुला आधीच बजावलं होतं. का नाही ऐकलस माझं तेव्हा?"
नंतर मला शारदाने सांगितले की अतुलने तिच्याबरोबर आधी मालाड शाखेत काम केले होते. कॅशमध्ये असूनही अतुल रोज वीस पंचवीस मिनिटे उशीरा यायचा. शारदा इन चार्ज असल्यामुळे तिला ग्राहकांच्या रोषाला तोंड द्यावे लागे. 'कॅश अलाऊन्स हवा असेल तर वेळेवर येत जा' असे बजावूनही अतुलमध्ये काहीच फरक पडत नव्हता. 'कॅशमध्ये वेळेवर येणारा माणूस द्या' असे मॅनेजरांना विनवूनही काही उपयोग झाला नव्हता कारण त्यांना अतुलशी पंगा घ्यायचा नव्हता. तिचे अतुलशी वारंवार खटके उडू लागले. मग ज्या दिवशी त्यांचे भांडण होई त्या दिवशी अतुलला हटकून डिफरन्स येई. दोन अडीच तास शोधाशोध केल्यावर अतुललाच त्याची चूक सापडे. घरी जायला उशीर झाला तरी अतुलचे काहीच बिघडत नसे पण शारदाचे सगळे वेळापत्रक कोलमडून जाई. एकदा कंटाळून ती अतुलला म्हणाली, "तू जर मला छळायचं थांबवलं नाहीस तर तुला दुसरी सुद्धा मुलगीच होईल"
तेव्हा अतुल दुसऱ्या अपत्याच्या प्रतीक्षेत होता. अतुलने आपल्या वागण्यात बदल केला नसावा. त्याला दुसरी मुलगीच झाली!
दुसर्यांना रडवणारा अतुल आपल्या बायकोसमोर मात्र नांगी टाकून होता. पूजेच्या दिवशी ती जितका वेळ बँकेत होती तितका वेळ तो मुलींशी फार अदबीने वागत होता. 'ह्या साठेबाई, ह्या नायकबाई, ह्या मेहताबाई' अशी ओळख करून देत होता. वास्तविक आमच्याकडे मुलींना 'अहो जाहो' करायची, आडनावाने हाक मारायची पद्धत नव्हती. त्यामुळे अतुलची बायको गेल्यावर त्याच्या सभ्यपणाची सगळ्यांनी यथेच्छ टर उडवली.
एका दुपारी सगळे जेवायला गेले होते. मी माझे काम करत बसले होते. तेवढ्यात माझ्या टेबलावर अतुलला एका बाईचा फोन आला. तिने लाडात येऊन 'पैचान कौन' विचारले असावे. अतुल म्हणाला, "काही लक्षात येत नाही. आवाज ओळखीचा वाटतोय पण नक्की कोण ते सांगता येत नाही."
समोरच्या व्यक्तीने फारच ताणल्यावर अतुलने विचारले, "कोण मोनिका का?" दुर्दैव अतुलचे. त्याची बायकोच आवाज बदलून बोलत होती. मोनिकाचे नाव ऐकताच तिथे अकांडतांडव झाले असावे कारण अतुल आर्जवे करीत होता, "अग, तुझा आवाज मी कसा ओळखणार नाही? मी खरंच ओळखलं तुला. तुझी मस्करी करायला मी मोनिकाचं नाव घेतलं. देवाशपथ मी कुठल्याही मोनिकाला ओळखत नाही."
या अजीजीचा काहीही परिणाम झाला नाही. फोन मध्येच कट झाला. मला कितपत कळले आहे याचा अंदाज घेण्यासाठी अतुलने तिरका कटाक्ष टाकला पण मी साळसूदपणे माझे काम करत राहिले.
सगळे पुन्हा जागेवर आले तेव्हा मी मोठ्याने म्हटले, "मंडळी, आज एक अघटित घडलं." अतुल साशंकतेने आणि इतर उत्सुकतेने माझ्याकडे पाहू लागले. "आज मी वाघाला गवत खाताना पाहिलं." अतुलच्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष करीत मी प्रसंगाचे साद्यंत वर्णन केले. त्यानंतर सगळ्यांनी अतुलला बरेच छळले. काही हिशेब चुकते झाले.
मी बँक सोडल्यापासून अतुलची भेट झाली नाही पण अधून मधून त्याच्या सुरस कथा कानावर येतच असतात.