दिवाळी अंक २००९

पाटलांच्या गोष्टी

संजोप राव

काही - खरे तर फार- वर्षांपूर्वी व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार कथाकथनाचे जाहीर कार्यक्रम करत असत. संपूर्ण वेगळ्या शैलीचे, वेगळ्या पार्श्वभूमीचे पण आपापल्या जागी उत्तम प्रतिभासंपन्न असे हे तीन कथाकार.

धिंड

माडगूळकरांच्या कथा अत्यंत अकृत्रिम, अस्सल गावरान मातीचा वास असलेल्या, जन्माने ब्राह्मण पण वृत्तीने रामोशी असलेल्या एका प्रतिभावान (आणि कदाचित म्हणूनच) कलंदर माणसाच्या कथा. खरे तर या गोष्टीच. नाटकीपणाचा लवलेश नसलेल्या अशा या गावाकडच्या गोष्टी. मिरासदारांचा पंथ वेगळा. मिरासदार हे कलेपेक्षा कौशल्यावर अधिक भर देणारे साहित्यिक. त्यांची कथा बेतून, साधून, रचलेली. काहीशी मुद्दाम बांधकाम केल्यासारखी. बहुदा अतिशयोक्तिवर आधारित असा मिरासदारांचा विनोद आहे. पण अतिरसाळ आणि म्हणून भरपूर मनोरंजनमूल्य असणारा. त्यामुळे त्यांची कथा काहीशी भाबडी, पण (म्हणूनच? ) सामान्यांना भुरळ पाडणारी अशी आहे.

आणि यांच्यासारख्या दिग्गजांच्या जोडीला असणारे शंकर पाटील. शंकर खंडू पाटील. शंकर बाबाजी पाटील नावाचे एक कथाकार होते ते वेगळे. हे कोल्हापूर जिल्ह्यातले (माझ्या माहितीनुसार हातकणंगले तालुक्यातले) आणि त्यामुळे मराठी आणि कानडी अशा जवळजवळ दोन मातृभाषा असणारे शंकर पाटील. या सीमाभागात बोलली जाणारी कानडीचा गोड आघात असणारी मराठी पाटलांना फार चांगली अवगत होती. ('एक गाव बारा भानगडी' मधल्या झेलेअण्णाचा बाज नीट कळावा म्हणून निळू फुल्यांनी पाटलांकडून या भाषेचे रीतसर प्रशिक्षण घेतले होते). आघात गोड, पण एकंदरीत मराठीसारखी ही भाषा रांगडीच. विनय, नम्रता वगैरे बाबतींत जरा कमीच. याचे बरोबर अवलोकन करुन, पण या भाषेचे कुठलेही उदात्तीकरण न करता पाटलांनी ही भाषा आपल्या कथांमध्ये वापरली आहे. (एकच उदाहरण पुरेसे ठरावे. तुच्छतादर्शक शब्दांची आणि वाक्प्रचारांची मराठीत वानवा नाही. 'कोल्लापुरी' भाषेत एखाद्याचा तृतीयपुरुषी एकवचनी उल्लेख करणे हे अगदी सर्रास केले जाते. 'ते कसं करतंय बगा' असली उदाहरणे या भाषेचे पाटलांचे निरीक्षण दाखवून जातात.)

पाटलांनी त्या मानाने कमी लिहिले, पण जे लिहिले ते बहुतांशी कसदार लिहिले. पाटलांच्या 'दसरा' या (तशा लौकिकार्थाने काही कथानक नसलेल्या) गोष्टीचे कौतुक मराठीतल्या फार कमी लेखकांची प्रशंसा करणाऱ्या ज्येष्ठांनी केले आहे. पण पाटलांच्या कथाकथनात येणाऱ्या आणि ज्यांमुळे पाटलांना खूप प्रसिद्धी मिळाली अशा गोष्टींच्या निमित्ताने हे लिखाण. आणि या गोष्टी म्हणजे 'मिटींग', 'नाटक' आणि जिच्या उल्लेखाशिवाय पाटलांवरचा कोणताही लेख पूर्णच होऊच शकणार नाही, ती पाटलांची अविस्मरणीय 'धिंड'.

'मिटींग' या कथेचा जीव फार थोडा आहे. ग्रामपंचायतीच्या मिटींगला अजून कुणीच पंच - सरपंचांच्या भाषेत 'मेंबरं '- कसे काय आले नाहीत हे बघायला बाहेर पडलेल्या म्हादू शिपायाची ही कथा. मग ज्या ज्या मेंबरांच्या घरी तो जातो तिथे तिथे त्याच्यावर ओढवलेले प्रसंग आणि शेवटे महत्प्रयासाने गोळा करून आणलेल्या मेंबरांची सुरू झालेली मिटींग - बस इतकेच! मग यात 'पाकरावानी कवळ्या झोपेचं' पंच बापसाब लोहार आहेत ( आणि त्यांना झोपेतून उठवताना म्हादूनं घातलेल्या 'बापसाब... बापसाबै..बापसाब... बापसाबै..' अशा हाका आहेत. गावाकडे एखाद्याला हाका मारण्याची अशीच पद्धत आहे. 'जिन्नाप्पा... जिन्नापै..' अशा ), मिटींगला जातो म्हणून घरात सांगून फुटाण्या चंपा परटिणीच्या घरी गुलूगुलू बोलत बसलेले पंच शंकरआण्णा कोळी आहेत ( आणि त्यांच्यावरच्या संशयानं 'पिष्टान तापावं तशी तापलेली' त्यांची बायको आहे! ), कर्नाटकातनं घरजावई म्हणून महाराष्ट्रात आलेले आणि ढेलजेत ठेवलेली ज्वारीची पोती लेव्ही बसेल म्हणून आत रचण्याच्या घाईत असलेले, दणकट बांध्याचे - रोमनाळच्या रोमनाळ असे- देसाईआण्णा आहेत ( लेव्ही म्हणजे सरकारतर्फे करण्यात येणारी सक्तीची खरेदी. पेन्शनप्रमाणे हीही 'बसत' असे! ), सांच्यापारीच एक फुल आणि एक हाप रिचवून 'फुलटॉस' झालेले पंच रामा धायगुडे आहेत आणि पंचायतीच्या मिटींगपेक्षा आपल्या व्यायला झालेल्या म्हशीची अधिक काळजी असणारी तारामावशी आहेत. खरे तर ही विविध व्यक्तिचित्रेच. पाटलांनी ती या कथेत रंजकतेने गुंफली आहेत .

'नाटक' ही पण 'मिटींग' च्या धर्तीवरची कथा. गावातल्याच संचात स्वतंत्र सामाजिक नाटक बसवणाऱ्या अन्याबा परीट आणि गुलाब हेरवाड्याची ही गोष्ट. तीन महिने तालमी होऊनही नाटकाच्या वेळी होणारे घोटाळे आणि फजिती यांची ही कथा आहे. त्यात तिकिटं न काढताच दरवाज्याला ढोसलून आणि भिताडावरनं उड्या मारून माणसं आत येतात, ग्यासबत्तीची झळ लागू नये म्हणून सुतार भाड्याने आणलेले फ्लॅट हातहातभर कापूनच काढतो. नायकाची सायबी टोपी आणि वुलनचा सूट तर सोडाच, पण नायिकेचं 'झंपार' ही ऐनवेळी मिळत नाही, पात्रं ऐनवेळी भाषणं विसरतात, छपरी मिशा असलेलं एक पात्र 'आईबा असताना मिशा कशा काढायच्या' म्हणून घाबरं होतं आणि कोल्लापुरास्नं येणारा 'ड्रॉप' रात्रीची गाडी निघून गेली तरी येत नाही....
असल्या सगळ्या गोंधळाची चित्तरकथा म्हणजे 'नाटक'.

'धिंड' या गोष्टीचा माडगूळकर फार आदराने उल्लेख करत. एकदा ते म्हणाले होते, " पाटलांच्या तोंडून 'धिंड' ऐकणे हा एक वेगळाच अनुभव असायचा. पाटील आधी इतर गोष्टी सांगत. मग प्रेक्षकांकडून 'धिंड' 'धिंड' असा आग्रह व्हायचा. आणि मग पाटील रंगात येऊन रंगवून रंगवून 'धिंड' सांगायला लागायचे...."

धिंड

धिंड

पाटलांच्या कथाकथनाचा हा अनुभव मी प्रत्यक्ष घेतला आहे. सुदैवाने या तीनही कथांचे ध्वनीमुद्रण उपलब्ध आहे, त्यामुळे पाटलांची ही धिंड अजरामर झाली आहे. 'धिंड' ची कल्पनाच भन्नाट आहे. स्वेच्छेने दारुबंदी स्वीकारणाऱ्या गावात चोरून कुणी दारू प्यालाच, तर त्याची गाढवावरून धिंड काढायचे ठरते. दारू न पिण्याच्या शपथा घेतल्यावर दुसऱ्या-तिसऱ्याच दिवशी राऊ खोत पिऊन 'हाल्ट' होऊन बायकोबरोबर 'धुमडी' करताना गावतो. मग गावकरी उत्साहाने त्याच्या धिंडीच्या तयारीला लागतात. एक 'नेटाक' गाढव पकडून आणले जाते. हलगीवाले, चिरमुरेवाले, लेझिमवाले, गुलालवाले सज्ज होतात. पिऊन टेर झालेल्या राऊला 'फड जिंकलेल्या पैलवानागत' उचलून आणले जाते. गाढवावर उलटे बसवून त्याची धिंड सुरू होते. गावकऱ्यांचा उत्साह उतू जात असतो. कुणी गाढवाच्या या कानापासून त्या कानापर्यंत फीत बांधून पाटलांच्या हस्ते धिंडीचं 'उद्गाटन' करतो, तर कुणी चार टारगट बाप्यांना लुगडी नेसवून त्या सुवासिनींकडून त्याला ओवाळतो. हे सगळं चालू असताना राऊही हळूहळू या धिंडीत रंगायला लागतो. शेवटी गावकरी भेंडाळतात, पण राऊ ऐकायला तयार नाही. सगळं गाव, सगळ्या पेठा, महारवाडा, मांगवाडा असं करत शेवटी धिंड दुसऱ्या दिवशी पहाटे कशीबशी संपते. गावकरी दुसरा दिवस झोपून घालवतात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चावडीवर पुन्हा राऊ खोत झिंगत हजर होतो...

अशा या शंकर पाटलांच्या तीन गोष्टी. या तीन्ही गोष्टींमधली भाषा अगदी साधी, अकृत्रिम आहे. पाटलांच्या या गोष्टींमधल्या उपमा गावरान शेंगेसारख्या टच्च आणि चविष्ट आहेत. मिटींगला पंच येतात की नाहीत, कोरम भरतो की नाही या काळजीत असलेल्या म्हादू शिपायाला, तारामावशी मिटींगला यायला तयार झाल्यावर 'दसऱ्याची शिकार सापडावी' तसा आनंद होतो, नाटकाचा बोर्ड वाचत असणारी पोरे त्याचा 'घनघट्याला चिच्चंचा गोळा लावून तो तोंडात रवी फिरवावी तसा फिरवल्यागत' त्या बोर्डाची मजा घेत असतात (घनघटा म्हणजे ज्वारी किंवा मक्याचे भेंड. गाभुळलेल्या चिंचा, गूळ, मीठ आणि लाल तिखट एकत्र ठेचून त्याचा गोळा त्या घनघट्याला लावतात. आणि मग तो गोळा मजेमजेनं चाखतमाखत, चाटत खायचा असतो. तोंड आंबतं, तिखट-खारटही होतं...पण या देशी लॉलीपॉपला जगात तोड नाही! ), बोर्ड वाचून मजा वाटलेला रामा लव्हार एकीकडे कोपऱ्यात जाऊन 'गाडवासारखा' एकटाच हसत राहातो' लक्ष्मीच्या देवळात नाटक बघायला 'वाळवाण' पसरावं तशी माणसं पसरलेली असतात... अशा उपमांबरोबरच लोकांची वर्णनं, त्यांच्या लकबी, बोलण्याच्या पद्धती आणि भाषा याही पाटलांनी हुबेहूब टिपल्या आहेत. नाटकातल्या कटकटींनी वैतागलेला दिग्दर्शक अन्याबा परीट बिडी पेटवून बिडीचा एक 'चरचरीत' झुरका घेतो, दारावर राखण करायची आर्डर झालेला रामा लव्हार हातात भाला 'खेळवतच' दाराकडं जातो, गावातलीच नाटकाची पार्टी म्हटल्यावर त्याला 'बेजान' हसू फुटतं, अंगात नुसतं मलमलचं 'बदाम' घातलेले, मानेवर एवढाएवढा गोळा असलेले देसाईआण्णा पोटाच्या वळकट्या चाचपतच सदरेवर अस्वस्थपणे येरझारा घालत असतात, अपरात्री धिंडीतलं 'वाजाप' ऐकून मंडळी जागी होतात (यातला 'वाजाप' हा शब्द अगदी ग्रामीणातील ग्रामीण - तुमच्या महाराचा मी महार - असा आहे!), व्यायला झालेल्या म्हशीचा 'नूर' काय आहे हे बघायला हा ग्रामपंचायतीचा शिपाई जातो... अशी सगळी या गोष्टींमधली मजा आहे.

याचा अर्थ पाटलांच्या या गोष्टी संपूर्णपणे निर्दोष आहेत असे नव्हे. तसे बघितले तर कुणाचे आणि कुठले लिखाण संपूर्ण निर्दोष असे असते? पाटलांच्या लिखाणातही असे कच्चे दुवे आहेत. काही कमअस्सल वाक्ये आहेत. कुठे लेखनाचा दर्जा घसरलेला आहे. पण तरी या गोष्टी वाचणे आणि ऐकणे यापरता आनंद नाही. विशेषतः 'धिंड'. 'धिंड' आता इतक्यांदा वाचून आणि ऐकून झाली, तरी प्रत्येक वेळी राऊ खोताची 'वेंट्री' झाली की हसू फुटतं. म्हारवाड्यात, मांगवाड्यात धिंड आली की हलगीवाल्यांना सांगावसं वाटतं 'घुमवा, घुमवा.. ' आणि दुसऱ्या दिवशी थकून झोपलेल्या सनद्यांना राऊ उठवायला आला की त्याच्याबरोबरच तोंडानं हलगी म्हणावीशी वाटते ' हे ढांग टिक टाक टिक टाक टिक टाक टिक, ढांग टिक टाक टिक टाक टिक टाक टिक...'