बॉम्ब
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची

जांभुळवाडी गांव तसं छोटं. ना धड शहर ना खेडेगांव. तालुक्याचं ठिकाण, पण थेट गांवातूनच रेल्वे गेल्यानं शहराशी बर्यापैकी संबंध ठेऊन असणारं. गावचे सरपंच सर्जेराव मोठा हिकमती माणूस. पोरगं शहरात शिकायला ठेवलेलं म्हणून शहरातील मातब्बर नगरसेवकांशी संधान बांधून गांवात निरनिराळ्या सोयी करून गांवचा विकास करू पाहणारा. त्यातच भर म्हणून गावातली रिकामटेकडी पोरं काहीबाही वाचून, चावडीवरचा टिव्ही पाहून गावाला श्यानं करणारे. एकंदरीत जांभुळवाडी शहरातील ठळक घटनांशी संबंध राखून असणारं गांव होतं.
सध्या तर जांभुळवाडीत कारगिलची लढाईच चालली होती. आज ना उद्या गांवातील प्रत्येक घरातून एका जवान गड्याला लढाईवर जावं लागेल ह्या कल्पनेने तालमीत पहिलवान दांडपट्टा फिरवू लागले होते. चावडीवरचा टिव्ही बघत बापेमंडळी, पोरंसोरं, म्हातारीकोतारी, सगळे झाडून कारगिलची लढाई जणु सोताच्या डोळ्यांनी पाहात होते. त्याला कारणच मुळी तसं होतं. संपत पवाराच्या मावळणीचा भाचा मुंगसर्याहून लढाईच्या बातम्यांची पोतडी घेऊन आला होता. कारण त्याचा खुद्द आतेभाऊच कारगिलची लढाई लढत होता. मग बातम्यांना काय तोटा? तिथे म्हणं रोज सकाळ संध्याकाळ बंदुकीच्या गोळ्या सुटतात, बोफर्स का काय म्हणतात त्यातून हे मोठाले तोफेचे गोळे उडतात, एक ना दोन. त्यातच सपकाळ गुरुजींनी बातमी आणली की प्रत्यक्ष जागेवर तर लढाई होतेच, पण गाडीत, एस्टीच्या बशीत, मोठ्या शहरात रस्त्यावर, कुठेही बॉम्ब ठेऊन माणसं मारत्यात म्हणे. हे ऐकून तर जांभुळवाडीच्या काळजाचा ठोकाच चुकला. न जाणो कुठेही बॉम्ब ठेवता ठेवता जर जांभुळवाडीवर पडला तर आख्खा बारदानाच गारद व्हायचा!त्यातून तो सरळसरळ एक डाव टाकून मोकळं बी होत नाहीत म्हणे तर तो रंगीत कागदात, खोक्यात किंवा लहान पोरांच्या खेळण्यांत भरून ठेवतात म्हणे!आता आली का पंचाईत!
“राव हे तर मोठं अवघडंच काम झालं! हे ओळखावं कसं?” नाम्या व्हाव्याने शंका काढली. तेव्हा असं काही कुठे जरी दिसलं तरी अज्याबात हात लावायचा न्हाई, तर थेट राणे फौजदाराकडे धाव घ्यायची, असं ठरवून त्या दिवशीची सभा बरखास्त झाली.
असे जांभुळवाडीचे दिवस चालले होते. लढाई थंड पडू लागली होती. गप्प्पांचा जोरही ओसरला होता. मावळणीचा भाचा लोकांना रवंथ करायला भरपूर बातम्या देऊन चालता झाला होता. अन अशातच एक दिवस जांभुळवाडी हादरली. का तर म्हणे नदीकाठच्या महादेवाच्या पडक्या देवळांत रंगीत कागदात गुंडाळलेलं एक मध्यम आकाराचं खोकं पडलं होतं. सकाळच्या सुमारास म्हादू गुरव पूजा करायला देवळांत गेला होता. खोकं पाहून बोंब मारतच तो गावाकडे सुटला होता. प्रथम चावडीवरच्या बाप्यांमध्ये ह्याची लागण झाली आणि हां हां म्हणता आख्ख्या जांभुळवाडीत ही बातमी पसरली. हळुहळू दबक्या चालीनं मंडळी देवळाकडे सरकू लागली.
गडीमाणसं काय पाहायला चालली म्हणून बाया मंडळीही “तू हो म्होरं मी आलेच मागे” म्हणत एकमेकीच्या कानाला लागू लागल्या. चालती पोरं भावंडांना कडेवर घेत “चला रं खोकं पाह्याला” म्हणत एकमेकाला रेटत पळू लागली. तशी “आरं पोराओ जर का त्या खोक्याला हात घालाल तर टकुरंच फोडून ठेवीन” म्हणत आया त्यांना दटावू लागल्या.गांवभर एकच कालवा झाला. देऊळ हळुहळू माणसांनी भरू लागलं.
“ए चाल ग चाल खोका पाह्याला”, “का गं चालती ना? आवरलं का काम?” म्हणत कामकरी बायकाही निघाल्या. त्यातल्या त्यात काही गर्त्या बायका, जोशी बामणीण, शिंप्याची सुळाबाई, वाण्याची मोठी भाबी दबकत दबकत पाटलीण बाईंना घेऊन जावं म्हणून तिच्याकडे आल्या.पण पाटील रात्री नर्सबाईंकडून उशिरा आल्यामुळे पाटलिणीचं टकुरं जाग्यावर नव्हतं. कावतच ती बाहेर आली आणि “पाटलाचंच खोकडं व्हायची वेळ आलीय अन आता कुठलं खोकं पाहता? न्हाई तर काय मेलं! घेनं ना देनं आनि फुकटच कंदिल लावनं!” असा पाटलिणीचा नूर पाहून बायकांनी काढता पाय घेतला.
पाणवठ्यावर काही मुली धुणी धुवत होत्या. त्यांनाही काही टारगट पोरांनी “ए! क्या बोलती तू? आती क्या खोका पाहायला?” म्हणत आपली हिरोगिरीची हौस भागवून घेतली.
देवळात पाय ठेवायला जागा नव्हती. गावकर्यांच्या तर्काकुतर्काला नुसता ऊत आला होता. सर्कशीतून सुटून आलेल्या प्राण्याकडे बघावं तसे सर्वजण त्या खोक्याकडे बघत होते. दुर्पी लक्षीच्या कानाला लागत म्हणाली, “ ए बया, ह्या इवल्याश्या खोक्यातून कशी गं मान्सं मरत असतील?” तिला समजावीत अल्की म्हणाली, “ए आते, अगं ह्यातून न्हाई मान्सं मरत. ह्याला हात लावला ना की मोठा स्फुट होतो आनि ह्यो फुटून आग लागते.” तिने शाळेतले ज्ञान पाजळले. पोरांनी नुसतं खोक्याकडे पाहिलं तरी बॉम्ब फुटेल ह्या भीतीने बायका पोरांना मागे ओढू लागल्या. पाटलांचा पत्ता नव्हता. एवढ्यात शहराला गेलेले सरपंच आले. आल्या आल्या ते गरजले, “हात लेकांनो बघताय काय भितडावानी? फौजदाराला का नाही बोलिवलं?” लगोलग चौकीकडे दोन-चार टाळकी धावली. राणे फौजदार काठी फिरवत आले. “ ए काय कालवा मांडलाय? व्हा फुडं व्हा फुडं!” म्हणत गर्दी पांगवत ते खोक्याजवळ गेले. अपघाताच्या गाडीचा पंचनामा करावा त्याप्रमाणे त्यांनी भोवताली हिंडून खोक्याची बारकाईने पाहणी केली. कोणी कधी पाहिलं? कसं कळलं? ह्याची चौकशी केली.
कसं पकडलं ह्या थाटात त्यांनी विचारणा केली, “ का रं? ह्यात बॉम्बच कशावरून?”
“आरं तिच्यामारी ती अतिरेक्यांची मान्सं कशातबी बॉम्ब ठिवुन आपल्या इंडियाला न्हाई का मारून राह्यली? कुठे राहता राव?” राणेच्या ज्ञानाचा पंचनामा करीत पाटील सरपंच उद्गारले.
जमावात खसखस पिकली. पडलो तरी नाक वर यानुसार “अरे ते बॉम्बस्फुट व्हतात ते मुंबई दिल्लीसारख्या मोठ्या शहरात: असं म्हणत त्यांनी आपली बाजू सावरली.
"बरं आता ह्याचा निकाल लावा राव!” खोळंबलेल्या माणसांतून कोणीतरी म्हणालं.
“आम्हाला पावर न्हाई”, ’मेरी झासी नही दूंगी’ च्या चालीवर राणे म्हणाले.
“का वं वन्स? त्या टिवीच्या तिन साबणालाबी पावर असतिया अन याला ग कशी न्हाई?” हौशी लक्षीच्या कानांत कुजबुजली. “ अगं म्हणून तर ह्याच्या बायकोला प्वार नाही.” त्यावर बायकांमध्ये हास्याची कारंजी उसळली. “खोकं उघडण्यासाठी बॉम्बची माहिती असणारा तज्ज्ञ आणला पाहिजे.” राण्यांनी माहिती पुरवली. तेव्हा पक्या आणि गोविंदा अतिउत्साहाने तातडीने फटफटीवर बसून शहराकडे रवाना झाले. लोकांची उत्सुकता थंडावली. पुरूष मंडळी तिथेच चंच्या सोडून पान तंबाखू चघळत टेकली. पोरांनी गोट्या आणि विटीदांडूचा डाव टाकला. बाया पोरींची डोकी निवडत बसल्या. कामवाल्या सासुरवाशिणी घराकडे जाऊ लागल्या.
एवढ्यात गोप्याने मारलेली विटी उडून एका कुत्र्याला लागली आणि ते केकाटत थेट त्या खोक्यालाच जाऊन भिडलं आणि त्यालाच दोषी समजून त्यानं तोंडानं काड काड चावत ते खोकं फोडलं. लोकांचे श्वास गळ्यातच अडकले. काहींनी भीतीने डोळे-कान मिटले. बायांनी एकमेकींना मिठ्या मारल्या. क्षणभर शांतता पसरली. सगळ्यात आधी डोळे उघडले ते राणे फौजदारांनी. त्यांनी पाहिलं तर कुत्रं शांतपणे निघून गेलं होतं आणि त्या खोक्यातून रंगीत बांगड्या चौखूर पसरल्या होत्या. श्वास रोखून बॉम्बच्या बांगड्या कश्या झाल्या हे लोकं आचंब्याने पाहात होते. आणि पाटलांचा अशोक आणि राणेंची लता एकमेकांची नजर टाळत उभे होते, कारण कालच देवळात अशोकने तिला ते खोकं दिलं होतं आणि अंधारात ती ते तिथेच विसरली होती.