सफर लेह-लडाखची
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
भ्रमंतीची आवड असणार्यांमध्ये हिमालयाचे आकर्षण नाही अशी व्यक्ती मिळणे विरळाच! त्यातूनही सिमला-कुल्लू-मनालीच्या निसर्गसुंदर हिमालयाचे रूप वेगळे, श्रीनगरमधले त्याचे बर्फाच्छादित नाजुक देखणेपण वेगळे, कैलासाकडचा रौद्र, अंगावर धावून येणार्या कडे-कपारींचा उग्र हिमालय वेगळा तर लेह-लडाखमधले त्याचे करडे, रुक्ष तरीही विभिन्न छटा दर्शविणारे रांगडे रूप विलक्षण वेगळे. हिमालयाच्या या वेगळेपणामुळेच तो सतत आपल्याला खुणावत राहतो.
(मोठ्या आकारातील चित्रांसाठी तसेच सरकचित्रांसाठी (स्लाईडशो) चित्रांवर टिचकी मारावी.)
हिमालयाच्या या रांगड्या रूपाचा वेगळेपणा अनुभवायचा म्हणजे पदभ्रमणासारख्या साहसी उपक्रमाशिवाय पर्यायच नाही असा समज असल्यामुळे बरेच पर्यटनप्रेमी लेह-लडाखला सहकुटुंब जाण्याचा विचार करताना सहसा आढळत नाहीत. पण लेहला थेट विमानाने किंवा गाडीनेही जाता येते. लेह-लडाखची सफर करणे सुख-सुविधायुक्त अन्य पर्यटनस्थळांना भेटी देण्यापेक्षा थोडे वेगळे निश्चितच आहे. विरळ हवेमुळे होणारे त्रास, खूप थंड आणि खूप गरम असे दोन्ही टोकाचे तापमान, हिमालयात सर्वत्रच अनुभवाला येणार्या बदलत्या हवामानामुळे आखीव कार्यक्रमात अचानक करावे लागणारे बदल, अशा सर्व गोष्टींसाठी असावी लागणारी मानसिक तयारी; यांमुळे लेह-लडाखचे पर्यटन अगदी पदभ्रमणाइतके कठिण नसले तरी साहसी पर्यटन म्हणावे इतपत निश्चितच वेगळे आहे. त्यामुळे सर्वच पर्यटन कंपन्या लेह-लडाखच्या सफरी आयोजित करताना आढळत नाहीत. आपणच आपल्या पसंतीची ठिकाणे निवडून लेह-लडाखच्या सफरीचा कार्यक्रम आखू शकतो. पण यासाठी लागणारा वेळ नसल्याने अशा प्रकारच्या साहसी पर्यटनाचे आयोजन करणार्या एखाद्या ट्रॅव्हल कंपनीच्या शोधात असतानाच माइलस्टोन एंटरप्राइजची जाहिरात वाचनात आली. त्यांच्यातर्फे १२ जून ते २५ जून २००९ या कालावधीत लेह-लडाखची फक्त महिलांसाठी एक साहस सफर आयोजित करण्यात आली होती. त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि हिमालयाच्या अनोख्या रूपाचे एक नवे दालन उघडले.
स्वच्छ, नितळ नद्या; विशाल, निळेशार चमकते तलाव; विस्तीर्ण दर्या; लाल-पिवळ्या-हिरवट-राखाडी रंगांचे उंच-उंच पहाड; त्यांवर कोरल्यासारखे दिसणारे वळणदार रस्ते; उंच टेकडीवर दिमाखात असलेल्या गोम्पा; रस्त्यांवर ठिकठिकाणी आढळणारे स्तूप; वार्यावर फडफडणार्या रंगीबेरंगी कापडी पताका, त्यांवर तिबेटी भाषेत लिहिलेल्या प्रार्थनेच्या ओळी; पहाडांच्याच मातकट रंगाची घरे, हसतमुख आणि साधी-सुधी माणसे ही लेह-लडाखची वैशिष्ट्ये! लेह-लडाख ईशान्येला काराकोरम पर्वतरांगांनी आणि दक्षिणेला हिमालय पर्वतरांगांनी वेढलेले आहे. जगातला सर्वात जास्त उंचीवरचा मोटरगाड्या जाण्यायोग्य रस्ता इथेच आहे. लेहचा विमानतळही जगातला सर्वात जास्त उंचीवरचा विमानतळ. जगात सर्वात उंचावर मनुष्यवस्ती असलेले ठिकाणही इथेच. त्यामुळे परदेशी पर्यटकांचेही हे आवडते पर्यटनस्थळ आहे.
लेहला गाडीने मनालीमार्गे किंवा श्रीनगरमार्गेही जाता येते. मनालीवरून जाणारा मार्ग जुलैपासून साधारणपणे ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लेहसाठी खुला असतो. हा मार्ग श्रीनगर-लेह मार्गाशी तुलना करता थोडा कठिण असला तरी मार्गातील सृष्टिसौंदर्य अप्रतिम आहे. लेहपर्यंत थेट विमानसेवाही उपलब्ध असली तरी तिथल्या विरळ हवेला आपले शरीर लगेच सरावू शकत नसल्याने कमी दाबाच्या हवेचा त्रास होऊ शकतो. विमानाने लेहला जाणार्यांना दोन दिवस पूर्ण विश्रांती आवश्यक आहे. त्यामुळे मनालीहून चार चाकी वाहनाने दोन दिवसांत टप्प्या-टप्प्याने लेहला पोहोचल्यास तिथल्या विरळ हवेच्या बदलाला तोंड देणे शक्य होते.
लेह-लडाखला जायचे ठरले आणि मग सतत तिकडच्या हवामानाचे, होणार्या त्रासांवरील उपाययोजनांचे, तिकडे मिळणार्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचा न चुकता आस्वाद घेण्याचे सल्ले मिळू लागले. सतत थोडे-थोडे पाणी पीत राहणे, कमी जेवणे, जलद हालचाली किंवा कृती न करणे, प्राणायाम करणे, श्वसनाचा त्रास जाणवू लागला तर सतत कापूर जवळ ठेवून तो हुंगणे, दीर्घ श्वास घेणे असे अनेक सोपे-सोपे उपाय होते. पण त्यांबद्दल वेगवेगळ्या लोकांकडून सतत दिली जाणारी माहिती आणि त्यांचे अनुभवकथन ऐकून परिस्थितीचे गांभीर्य चांगलेच लक्षात आले होते.
यातच भर म्हणून मनाली सोडून मुक्कामाच्या पहिल्या टप्प्याकडे -सरचूकडे- प्रयाण सुरू करताच जेमतेम रोहतांग पासपर्यंत पोहोचतो न पोहोचतो तोच खराब हवामानाने आपली झलक दाखवायला सुरूवात केली. प्रथम पाऊस, मग भुरभुरणारा हिमवर्षाव अशी चुणुक दाखवत हवामानाने आपला रंग बदलायला सुरुवात केली आणि हिमवर्षावाने चांगलाच जोर पकडला. सगळे वातावरण धूसर, करडे झाले आणि संयोजकांनी रोहतांग पासला जराही न थांबता वेगाने तडक सरचू गाठण्याचा निर्णय घेतला. ६-६ जणींच्या समूहांमध्ये सर्व सहभागी विभागले होते. ५-६ तवेरा तडक सरचूच्या दिशेने पळू लागल्या. वळणा-वळणाच्या रस्त्यामुळे मळमळ-उलट्या यांचे त्रायदायक सत्र चालू झाले. विरळ हवामानामुळे येणार्या संकटांशी सामना करणे अजून दूरच होते. सरचू मनालीपासून २२२ कि.मी. अंतरावर आणि ४२५३ मीटर उंचीवर होते. संपूर्ण सफरीतील हा सर्वात जास्त उंचीवरील मुक्काम होता. सरचूला मुक्कामाची व्यवस्था तंबूंमध्ये होती. त्यामुळे तिथे सर्वात जास्त थंडी असणार याची कल्पना आधीच देण्यात आली होती. थंडीला तोंड देण्याची कडेकोट तयारी होती, पण आता खराब हवामानामुळे आणि अति हिमवर्षावामुळे थंडी कुठल्या थराला पोहोचली असेल याचा अंदाज येत नव्हता.
सरचूला पोहोचण्यापूर्वी रोहतांग पासनंतर केलॉँग-दारचा मार्गे बारालाचा-ला पास (१६०५० फूट) ची उंची गाठायची होती. बारालाचा-ला पासून चिनाब आणि सिंधू (इंडस) नद्या वेगळ्या होतात. पण हिमवर्षाव आणि पावसामुळे गाडीच्या काचा उघडणे शक्य नव्हते. काचेतून सतत एकच-एक करडा रंग दिसत होता. सकाळी नाश्ता करून साधारण ९ च्या सुमारास मनाली सोडले होते. रस्त्यात दारचाला जेवणासाठी १५-२० मिनिटे थांबून पुढे सरचूला पोहोचायला संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. सरचूला मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या सपाटीवर दोन्ही बाजूला २०-२५ तंबू ओळीने लावलेले होते. हिमाच्छादित पर्वतांच्या पृष्ठभूमीवर केशरी रंगाचे तंबू अगदी मोहक दिसत होते. तंबूंमध्ये पलंग, गाद्या, रजया, वीज, पाणी, कमोडसह टॉयलेटची छान व्यवस्था होती. पदभ्रमणातील आजतागायतचे तंबूतील मुक्काम आठवले. वास्तविक इतक्या उंचीवर, जवळपास गाव किंवा वस्ती नसतानाही तंबूमध्ये राहण्याची इतकी उत्तम व्यवस्था म्हणजे मोठी चैनच होती. तंबूतील वास्तव्याची ही सोय सर्वांसाठी उपलब्ध आहे. www.ladakhmanali.com (Goldrop Camp) वेबसाइटवर याची माहिती मिळू शकते.
सरचूला गाडीतून खाली उतरताक्षणी थंडीची कल्पना आली होती. इथे काहींना थंडीबरोबरच उंचीवरील हवामानाचा त्रास सुरू होऊन डोके जड होणे, मळमळ, पोटदुखी, अन्नावरची वासना उडणे, चक्कर येणे इ. लक्षणे दिसू लागली. पाणी पीत रहाणे आणि पूर्ण आराम करणे हाच उपाय होता. त्यामुळे जेवणासाठी जेवणाच्या तंबूपर्यंत जाण्यासाठी आवश्यक तितकी कमीतकमी हालचाल करून जाडजूड रजयांमध्ये घुसणेच सर्वांनी पसंत केले. तापमान (-) ८ होते. थंडी मी न म्हणेल तरच नवल ! स्वेटर, मफलर, हातमोजे, पायमोजे, माकडटोपी, कोट आदी समस्त गरम कपडे थंडीचा कोट लढविण्यासाठी अंगा-खांद्यावर चढले होते. गरम पाण्याच्या पिशव्या पोटाशी धरून थंडीशी दोन हात करण्याचे अयशस्वी प्रयत्न चालू होते. तंबू नीट बंद होत नसल्यामुळे आत येणारा झोंबरा गार वारा जाडजूड, वजनदार रजयांनाही जुमानत नव्हता. शिवाय रजया वजनामुळे सारख्या घसरून खाली जमिनीवर पडत होत्या. त्या दोन्ही हातांनी उचलून पुन्हा-पुन्हा अंगावर ओढून घेतानाही दमछाक होत होती. अशातच एकदाची रात्र सरली. पहाटे लवकर उठून चहा-नाश्ता करून लेहकडे प्रयाण करायचे होते. उणे तापमानामुळे कँपवरील पाण्याचा ओहोळ गोठून त्याचा बर्फ झाला होता.
दुसर्या दिवशी सकाळी लवकरच निघायचे होते. लेहच्या दिशेने प्रवास सुरू झाल्यावर हायसे वाटले. आता मार्गात लाचालांग-ला पास (५०६५ मिटर) आणि तांगलांग-ला पास (५५६५ मिटर) ची उंची गाठायची होती. प्रवास जरी गाडीतून असला आणि उंची गाठण्यासाठी चालण्या-चढण्याचे कष्ट जरी नसले तरी उंचीचा आणि विरळ हवेचा त्रास गाडीत बसल्या-बसल्यासुद्धा चांगलाच जाणवायचा. तांगलांग-ला जगातला दोन नंबरचा उंचावरील मोटार जाण्यायोग्य मार्ग (Second highest motorable road) होता. नंतर खाली उतरायचे होते. लेह सरचूपेक्षा खाली (उंची ३५०५ मिटर) होते त्यामुळे तिथे थंडी आटोक्यात असणार होती, शिवाय आता ३-४ दिवस मुक्काम लेहलाच ह़ॉटेलमध्ये म्हणजे एकाच ठिकाणी होता. फक्त रोज सकाळी निघून वेगवेगळी ठिकाणे पाहून परत यायचे होते. संध्याकाळपर्यंत लेहला पोहोचलो. थोडा वेळ प्रवासाचा शीण घालवल्यावर पायीच जवळपासच्या भागात भटकंती केली. संध्याकाळी थोडी थंडी जाणवू लागली. पण सरचूच्या अनुभवामुळे थंडीला सगळे सरावले होते. आता काहींना विरळ हवेचे परिणाम जाणवू लागले. प्रवासातच हा त्रास सुरू झाला होता. आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा देण्यात आली. काहींनी त्रास होऊ नये म्हणून आधीच रोज इमाने-इतबारे डायमॉक्स गोळी घ्यायला सुरुवात केली होती.
लेहमधील स्थानिक प्रेक्षणीय स्थळांमध्ये 'सिंधू घाट' पाहिला. अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले घाट आणि त्यामागील हेतू आठवले. नदीच्या दोन्ही तीरांवरील आम जनतेच्या सोयींसाठी त्यांनी घाट बांधले होते. पण सिंधू नदीचे पात्र इथे काहीसे उथळ आणि अरुंदच आहे. दोन्ही तीरांवर वस्तीही नाही. नदीच्या पात्रात उतरायला पायर्यांची तर अजिबात गरज नाही. त्यामुळे इथे 'सिंधू घाट' बांधण्याचा घाट कशासाठी घालण्यात आला असा प्रश्न पडला. २००१ मध्ये तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांच्याहस्ते त्याचे उद्घाटन झाल्याचा एक फलक तिथे झळकतो आहे. सिंधू घाट हा जनतेच्या पैशाचा अपव्यय वाटला. एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून इथूनच गेलेले काही लोक तिथे आवर्जून जातात. अन्यथा चिटपाखरूही नसते अशी अवस्था! घाटामुळे सिंधू नदीचे दर्शन सुलभ व्हावे असा हेतू असेल असे मानावे तर इथे सिंधूचे दर्शन दुय्यम आणि घाट मुख्य असेच दिसते. त्यामुळे सिंधूच्या नैसर्गिक प्रवाही सौंदर्याला बाधाच आल्यासारखे वाटते. इथे एक उत्सव होतो अशी माहिती मिळाली. पण उत्सवाचे स्वरूप कळले नाही.
लेहमध्ये पाहण्यासारखे आणखी एक ठिकाण म्हणजे 'हॉल ऑफ फेम'. कितीही दगड मनाचा माणूस इथे भारावून गेल्याशिवाय राहणार नाही. लडाखी संस्कृती आणि लष्करी वारश्याचे दर्शन इथे घडते. युद्धकाळात शहीद झालेल्या वीरांची छायाचित्रे, युद्धात वापरलेली शस्त्रे, शत्रूकडून हस्तगत केलेली हत्यारे, आदींचे एक छोटे संग्रहायल म्हणजे 'हॉल ऑफ फेम'. भारतीय जवानांबद्दल असलेला आदर इथे शतगुणित होतो.
१७व्या शतकात बांधलेला लेहचा प्रसिद्ध नऊ मजली राजवाडा पाहिला. हा राजवाडा तत्कालीन तिबेटी वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे असे सांगितले जाते पण राजवाड्याच्या भग्न-भकास अवस्थेने आणि तिथल्या धुळीने राजवाड्याबद्दलच्या कल्पना अगदीच धुळीला मिळवल्या. मातीच्या विटा आणि लाकडाचा वापर असलेल्या आपल्या जुनाट वाड्यांसारखा हा राजवाडा पाहून खूप आश्चर्य वाटले. आत ठिकठिकाणी बांबूंचे टेकू दिले होते. अंधारे, मातीच्या पायर्यांचे मोठे जिने, कोनाडे-खिडक्या, काही बंद दरवाजांच्या कड्या पाहून लहानपणी कोल्हापुरात पाहिलेले जुने वाडे आठवले. हा राजवाडा नांदता असेल तेंव्हा त्याचे रूप कसे असेल याची काही केल्या कल्पना येईना. पण राजवाड्यावरून दिसणारे संपूर्ण लेहचे दृष्य खूप विलोभनीय होते.
ठिकसे गोम्पा पाहिली. गोम्पांमध्ये गौतम बुद्धाची मूर्ती पाहून हरिवंशराय बच्चनांच्या 'बुद्ध और नाचघर' कवितेतल्या ओळी आठवल्या….'वे थे मूर्ति के खिलाफ, इसने उन्हींकी बनाई मूर्ति। वे थे पूजा के विरुद्ध, इसने उन्हींको दिया पूज। उन्हें ईश्वर में था अविश्वास, इसने उन्हींको कहा भगवान। वे आए थे फैलाने को वैराग्य, मिटाने को सिंगार-कटार, इसने उन्हींको बना दिया शृंगार। बनाया उनका सुंदर आकार..उनका बेलमुंड था शीष, इसने लगाए बाल घुंघरूदार..' अगदी अशाच वर्णनाच्या बुद्धाच्या मूर्ती साधारण सगळ्याच गोम्पांमध्ये आढळतात.
गोम्पांसोबत शांतिस्तुपाचा उल्लेखही अपरिहार्य आहे. स्तूप बुद्धाच्या अस्तित्वाचे प्रतीक असल्याने जिथे-जिथे बुद्ध तिथे-तिथे स्तूप असतातच. शांतिस्तूप लेहमध्ये एका टेकडीच्या माथ्यावर आहे. बौद्ध धर्म लडाखच्या जीवनाचा गाभाच असल्यामुळे इथे रस्त्या-रस्त्यात अनेक स्तूप आढळतात.
तसेच बुद्धसूक्ते लिहिलेल्या रंगीबेरंगी पताकाही! वार्यावर फडफडणार्या या पताकांवर लिहिलेल्या प्रार्थनांच्या ओळी दुष्ट किंवा वाईट शक्तींना उडवून लावतात असा लडाखी लोकांचा समज आहे. या शिवाय इथल्या निसर्गात हिरवाई किंवा फुलांच्या विविध रंगांची जी कमतरता आहे ती या पताकांचे गडद रंग भरून काढतात असे वाटते. एरवी लेह-लडाखच्या निसर्गात मातकट करड्या रंगाचेच प्राबल्य आहे.