दिवाळी अंक २००९

भाषा... नव्याने अनुभवताना!

मानसी केळकर

आता शीर्षक वाचून कोणाला वाटेल की सतत बोलतच तर असतो आपण... कोणाची मातृभाषा मराठी, कोणाची इंग्रजी, कोणाची तमिळ, तेलुगू,... आणि जगात बोलल्या जाणार्‍या हजारो भाषांपैकी कोणतीही एक भाषा.. कधी एखादी भाषा नव्याने शिकतो, ऐकतो, बोलतो... इथपर्यंत कळले.. मग हे आता "अनुभवणे" कुठून आले?

शंका अगदी योग्य आहे नि उत्तरही तितकेच सोपे! आज मी भाषाशास्त्राच्या छोट्याशा खिडकीतून मला नव्याने दिसलेली भाषा तुम्हालाही दाखवणार आहे.

वयाच्या चौथ्या महिन्यापासून प्रत्येक माणूस मुखातून काही ना काही आवाज काढत असतोच. तो आवाज केवळ मराठी बाळ काढते, भारतीय बाळ काढते, युरोपियन बाळ काढते किंवा आफ्रिकन बाळ काढते असे नसतेच मुळी! कारण ते असतात केवळ उच्चार, नाद. फुप्फुसातून बाहेर पडणारी हवा मुखातल्या विविध अडथळ्यांमुळे हे नाद निर्माण करते. जगातल्या सर्व माणसांच्या विशिष्ट मुखरचनेमुळे हे नाद निर्माण होऊ शकतात. मग काही महिन्यांनंतर मराठी बाळ मराठीत "बा-बा-बा" म्हणते, इंग्रजी बाळ इंग्रजीत "पा-पा-पा" म्हणते नि आपल्याला कोण आनंद होतो! कारण यापुढे भाषेने नेमून दिलेल्या एका चौकटीत, नियमांचा हात धरून ते बाळ हळूहळू शब्द नि मग वाक्येच्या-वाक्ये बोलू लागणार असते. ते आपल्याशी संवाद साधणार असते. इथे आपल्या नकळत भाषा आपल्यात आणि त्या बाळात एक दुवा साधणार असते. याचाच अर्थ एका व्यक्तीला संपूर्ण समाजाशी जोडण्याचे, सांधण्याचे काम करते ती भाषाच!

पण हे केवळ बाह्य जगाशी जोडणे नसते, तर आपल्या मनातले विचार, बुद्धीचा तर्क हे सारे शब्दरूप घेऊनच तर व्यक्त होतात. याकरता विशिष्ट संकेतांनी युक्त अशी भाषा एक व्यवस्था म्हणून काम करते. आपण भाषेद्वारेच विचार करतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

ही भाषा प्रत्येकाला स्वत:ची एक ओळख मिळवून देते. माणसाला माणसाशी जोडून ठेवणारी जशी भाषा असते, तशीच त्यांच्यात भिंती निर्माण करणारीही भाषाच असते, हे आपल्यासारख्या भाषावार प्रांतरचनेची फळे चाखणार्‍या(?) / दुष्परिणाम भोगणार्‍या सूज्ञांना सांगण्याची गरज नाही. पण भाषेमुळे मिळणारी ही ओळख केवळ भाषेच्या नावामुळे नसते तर त्या नावामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत झालेल्या असतात. प्रत्येक भाषेची स्वत:ची एक संस्कृती असते. तिचे काही रीती-रिवाज असतात, काही संकेत-काही धारणा असतात. हे सर्व भाषेद्वारेच व्यक्त होत असते. भाषा संस्कृतीला - पर्यायाने माणसाला हरतर्‍हेने समृद्ध करत असते.
आता आपण याच्या थोडे पुढे जाऊ. प्रांतिक भाषेच्या सीमा ओलांडून जरा मोठ्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करू. भारत हा सर्वाधिक भाषिक वैविध्य असणारा देश. २० हून अधिक राज्ये आणि त्या प्रत्येक राज्याची स्वतंत्र भाषा. जर एका भारत देशाची ही कथा तर मग जगाचे काय? त्यातही प्रत्येक भाषेच्या स्थानपरत्वे विविध बोली आहेतच. अशावेळी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे जरी नकाशावर रेषारेषांनी प्रांत वेगळे करता येत असले तरी त्या प्रांतात राहणार्‍या लोकांच्या भाषेला असे रेषेने वेगळे करता येत नाही. इथे महाराष्ट्राची हद्द संपली नि इथे गुजरात/कर्नाटकाची सुरू झाली म्हणून या रेषेअलिकडील माणसांनी फक्त मराठी नि रेषेपलिकडील माणसांनी फक्त गुजराती/कानडी बोलायला हवे अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. प्रांतरचना ही शासनकर्त्यांनी कारभाराच्या सोयीसाठी केलेली एक व्यवस्था आहे हे विसरून चालणार नाही. त्यातही आजूबाजूच्या दोन प्रांतातल्या लोकांचा एकमेकांच्या भाषेवर पडणारा प्रभाव, सीमेवरील लोकांची वैशिष्ट्यपूर्ण भाषा हा संघर्षाचा नाही, तर अभ्यासाचा खूप विलक्षण विषय आहे. भारतातील बहुतांश लोक हे द्विभाषिक/ बहुभाषिक आहेत. अशा या राष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण देताना कोणत्या भाषेचा माध्यम म्हणून उपयोग करायचा? त्यांना कोणकोणत्या भाषा एक अभ्यासविषय म्हणून शिकवायच्या? त्याची काठीण्य पातळी काय असावी? या सगळ्याविषयी जगभरातील भाषातज्ज्ञांना कुतूहल असताना आपण मात्र भाषिक अस्मितेच्या नावाखाली राजकारण करण्यातच धन्यता मानत आहोत यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही.

आता या भाषेचाच आणखी एका वेगळ्या अंगाने विचार करु.

एक उदाहरण देते. मी पहिल्यापासून मुंबईतच राहिले. फक्त मीच नाही तर माझे आई-वडील, आजी-आजोबासुद्धा इथलेच. पण कोणी मला विचारले - तुम्ही कुठचे? तर मी माझ्या कोकणातल्या अशा एखाद्या गावाचे नाव त्यांना सांगते जे मी कधी पाहिलेलेही नाही. माझे आडनाव-बंधू असेच जगाच्या पाठीवर कुठेकुठे विखुरलेले आहेत. त्यांच्यात नि माझ्यात काही ना काही समानधर्म आहेत. काही शारीरिक-स्वाभाविक-भाषिक वैशिष्ट्ये जी आम्ही एकाच कुळातले असल्यामुळे वाटून घेतो. कधी कधी खूप काळ एकत्र घालवल्यामुळे आमच्या शेजार-पाजारच्यांच्याही काही सवयी आम्हाला लागतात. मग जी गोष्ट माणसांची तीच भाषेची! या सबंध पृथ्वीतलावर एकंदर बोलल्या जाणार्‍या भाषा या काही कुळांमध्ये विभागल्या आहेत. प्रत्येक कुळाची काही वैशिष्ट्ये आहेत. ज्यामुळे युरोपातली जर्मन नि आपली संस्कृत यांच्यात साम्यस्थळे आहेत. मात्र त्याचवेळी बर्‍याच काळाच्या सहवासामुळे अन्य भाषाकुळांची काही वैशिष्ट्येदेखील या भाषा आत्मसात करतात. उदाहरणार्थ- संस्कृत आणि अन्य युरोभारतीय भाषांमध्ये आढळणारी ट, ठ, ड, ढ, ण ही व्यंजने द्राविडी भाषांमधून आलेली दिसतात.

साहित्य ही तर आपल्याला अत्यंत प्रिय अशी भाषेची देणगी. आपण सगळे जे काही बोलतो त्या सगळ्यालाच काही साहित्य म्हणत नाही. जे आपल्या मनाला आनंद देते, भावनांना हात घालते अशा शब्दरम्य कलाकृतींना आपण साहित्याचा दर्जा देतो. मग ते साहित्य कोणत्याही भाषेतील असो. त्याला स्थल-कालाचे बंधन नसते. म्हणून तर मराठी रसिक जसा पु.लं.चे "असा मी असामी" डोक्यावर घेतो, तसाच तो त्यांची "ती फुलराणी" सारखी अनुवादित नाटकेही उचलून धरतो. भाषांतरित साहित्यही मूळ साहित्यकृतीइतकेच दर्जेदार असू शकते, कारण ते त्या नव्या भाषेचा, नव्या मातीचा, पर्यायाने एका नव्या संस्कृतीचा गंध लेवून एक नवीन कलाकृती म्हणून आपल्यासमोर उभे राहते.

आता पुन्हा मागे जाऊ नि "भाषा अनुभवणे" असे जे मी म्हटले ते का? याचा विचार करु.

साहित्याची / एखाद्या भाषेची विद्यार्थिनी म्हणून मी आजवर जेव्हा भाषेकडे पाहत होते, तेव्हा ते होते केवळ भाषा बोलायला, ऐकायला, वाचायला आणि लिहायला शिकणे. त्या-त्या भाषेची कोणतीही वैशिष्ट्ये आत्मसात करताना "हे असे का?" असा प्रश्न कधीच पडला नव्हता. आपणा सर्वांनाच मी आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी माहिती असतीलही, पण भाषेचा अत्यंत सैल वापर करताना "भाषा" ही फार साधी-सोपी चीज नसून अनेक पैलू असणारे ते एक अनमोल रत्न आहे याचा विचार आपण कधीच करत नाही. कोणत्याही भाषेचा एकांतिक विचार करता येत नाही. प्रत्येक भाषेचे अनंत पैलू हे परस्परात गुंतलेले असतात आणि ते पैलू एकदा जाणवले की मग कोणाचेही बोलणे ऐकणे हा एक आनंददायी खेळ होतो. भाषाशास्त्राच्या अभ्यासाने मला भाषेकडे पाहण्याची ही नवी दृष्टी दिली. म्हणूनच तर मी अनुभवलेले रत्नाचे हे काही पैलू तुम्हालाही दाखवावेत म्हणून हा लेखप्रपंच!