दिवाळी अंक २००९

नोकरशाही

सुधीर कांदळकर

पंधरा वीस मिनिटांनी शिंदेसाहेब आणि डिसोझा असे दोघेही माझ्याकडे परत आले.

शिंदेसाहेबांचा पारा चढलेला. "तुमच्या स्टोअर कीपरला सांगा की जास्त शहाणपणा करू नकोस म्हणून."

मी शांत, थंड स्वरात ओठावर स्मित ठेवत संथपणे म्हणालो, "पहिली गोष्ट म्हणजे 'शहाणपणा' हा शब्द गैर आहे. आणि गैर शब्द वापरू नका. डिसोझा आमचे मान्यवर एम्प्लॉयी आहेत. तुमच्या घरचे नोकर नाहीत. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर मला सागू शकता." मी.

"नॉन सेनव्हॅटेड वस्तूचे स्टॉक रजिस्टर पाहिजे मला." शिंदेसाहेब.

"ते आपण मेंटेन करीत नाही साहेब." डिसोझा.

"हो. बरोबर. ठाऊक आहे मला." मी.

"तुम्हाला मेंटेन करावे लागेल. नाहीतर आम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल." शिंदेसाहेब.

माझा स्वर थडच, "हे पाहा साहेब, पहिली गोष्ट म्हणजे हे रजिस्टर कायद्याप्रमाणे आवश्यक नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त इन्व्हेस्टिगेशन करून तुमचा अहवाल पाठवू शकता. कोणतीही ऍक्शन तुम्ही घेऊ शकत नाही तेव्हा तुमच्या मर्यादा ओळखून बोला. तुम्हाला शांतपणे सहकार्य देणार्‍या आमच्या एम्प्लॉयीला दमदाटी करायचे तुम्हाला काहीही कारण नाही नाहीतर मी 'व्हेक्सेशस बिहेवियर' किवा 'कोअर्सिव्ह मेझर्स' म्हणजे 'धाकदपटशा दाखवणे' वा 'कठोर कारवाई करणे' अशी तक्रार तुमच्याविरुद्ध करू शकतो. कुठल्या सेक्शनखाली की रूलखाली ते तुम्हाला ठाऊक असेलच. मग आमच्याबरोबर तुमचीही चौकशी चालू होईल. तोपर्यत तुमचे इन्क्रीमेंट आणि ईबी होल्ड होतील. आमच्या प्रॉडक्टमध्ये काळ्या बाजाराला बिलकुल वाव नाही. पुन्हा एकदा सागतो की आमचे युनिट हे रेंजमधले हाईयेस्ट टॅक्स पेयर आहे. तरीही, जशी मी तुमची तक्रार करू शकतो तशी माझ्या साहेबाकडे तुम्ही माझ्याविरुद्ध त्वरित तक्रार करू शकता. हवा तर मीच फोन लावून देतो. माझी नोकरी जाईल म्हणून मी घाबरत नाही. आय कॅन ऑल्वेज अर्न माय ब्रेड इन अ रिस्पेक्टेबल मॅनर."

आता बोना डिसोझाची कळी खुलली.

त्याच्याबरोबरचे मि. पटेल नावाचे एक इन्स्पेक्टर काम करीत होतेच. त्याना बहुधा 'रिस्पेक्टेबल मॅनर' चा टोला वर्मी लागल्याचे दिसले. कारण त्यानी अचानक चमकून माझ्याकडे पाहीले. पण मी वरकरणी काहीही गैर शब्द वापरला नव्हता. ते मला मराठीतून म्हणाले, "मि. सुधीर, डेली प्रॉडक्शन रिपोर्ट दिले नाहीत तुम्ही?"

"आम्ही मेंटेन करीत नाही." मी.

"का?"

"आमचे प्रॉडक्ट वेगळे आहे. जास्त टेक्निकल आहे आणि मुख्य म्हणजे इन्स्पेक्शन करून, जरूर तर टेस्ट रन घेऊन तयार झाले की लगेच पाठवावे लागते. इतरही खूप कारणे. पूर्वी ऑडिटमध्ये या प्रश्नाचा उहापोह झालेला आहे. डेली प्रॉडक्शन रिपोर्ट इज नॉट मॅंडेऽऽटरी ऍंड जस्ट नॉट पॉसिबल."

"पण तो लिहायला पाहिजे."

मी उत्तर दिले नाही.

"डेली प्रॉडक्शन रिपोर्ट न लिहायची परमिशन घेतली आहे का कमिशनरची?" पटेलसाहेब.

"मुळात हा रिपोर्टच मॅंडेटरी नाही. तशा परवानगीचा प्रश्नच येत नाही."

"मॅंडेटरी आहे."

"मी तुम्हाला नम्रपणे सागतो साहेब, कलम जरा नीट वाचा. हे घ्या आर के जैन चे एक्साईज लॉ मॅन्युअल साहेब."

"मी तुमच्याकडून कायदा शिकायला आलेलो नाही."

"मग मी काही करू शकत नाही."

पटेलसाहेब काहीतरी पुटपुटत उठले आणि आमच्या संचालकांना भेटून त्यांनी माझ्याविरुद्ध तक्रार केली.

----

तेवढ्यात दूरध्वनी संचालिकेकडे दूरध्वनी ठणाणला.

ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.

"गुड आफ्टरनून, हील्डन."

"त्या बदमाषाशी बोलू शकतो का मी?

"सॉरी?"

"तो बदमाष! मि. बिल क्लिटन?"

"कोण बोलते आहे?"

"मि. लेविन्स्की. त्या हरामखोराने माझ्या बहिणीच्या कपड्यावर डाग पाडले."

"हा हा हा! गुड आफ्टरनून, मि. फॅटसो! ओळखला बरे आवाज. कसे आहात तुम्ही? कॉंग्रॅट्स! तुम्ही नवी कार घेताय म्हणे?"

"हो. आणि मला ड्रायव्हर पाहिजे. खास करून लेडी ड्रायव्हर. नाव खास करून ऐश्वर्या असायला हवे!"

"ही ही, हू हू हू! बोला मि. सुधीरशी."

हे महाशय आमचे मघाचे मित्ररत्नच होते आणि तो नेहमी अशीच तिची टोपी उडवायचा. तिने त्याला कधी पाहिले नव्हते. पण त्याच्या बोलण्याची गंमत मात्र तिला वाटत असे. दोन क्षणाचा विरंगुळा. आणखी काय! हा संवाद तिनेच मला दुसर्‍या दिवशी सकाळी कौतुकाने जसा झाला तसा इंग्रजीतून साभिनय म्हणून दाखवला.

"काय रे?" मी.

म्हटले झोपण्यापूर्वी तुझी खबर घ्यावी. शत्रुपक्ष काय म्हणतो?"

"ठीक. फोन केल्याबद्दल धन्यवाद."

"बाय!"

----
एक्साईज इन्स्पेक्टर पटेल आणि आमचे संचालक असे दोघे माझ्या कॅबिनमध्ये आले. "क्या हो गया?" आमचे संचालक.

जसे घडले तसे मी सागितले.

"पटेलसाब, मि. सुधीर आमच्या बरोबर गेली दहा वर्षे काम करताहेत. सगळ्या गव्हर्मेट ऑफिशिअल्सशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्याची तक्रार करणारे तुम्ही पहिलेच. तरी जर तुम्हाला वाटत असेल की तुमचेच बरोबर आहे तर तुमचा जोऽऽ काही रिपोर्ट असेल तो पाठवा. नो प्रॉब्लेम. आणि प्लीऽऽज, नवख्यासारखी ऍक्शन घ्यायची धमकी मात्र देऊ नका." जसा मी बोना डिसोझाला पाठिबा दिला तस्साच मला देखील आमच्या संचालकांनी पूर्ण पाठिबा दिला.

आता त्या सुपरिटेंडंटनी प्रसंग ओळखून हस्तक्षेप केला, माझी माफी मागितली आणि शिंदेना अणि पटेलना समजावून कायद्याच्या कक्षेत राहून काम करायला सगितले. बरोबर पाचला काम थांबवले. नंतर आणखी दोन दिवस काम चालवले. शिंदेसाहेब त्या काळात आमच्याकडे पाणी देखील प्याले नाहीत. एकटेच बाहेर जाऊन जेवून वा चहा पिऊन यायचे आणि पाण्याची बाटली पण स्वखर्चाने विकत आणायचे. पटेलसाहेबासहीत इतर चौघे मात्र मी मागवलेले चहापाणी, जेवण वगैरे मजेत खातपीत होते. पाच वर्षांचे हिशेब तपासले. आदल्या वर्षाचे अभिलेख सखोल तपासणीला घेऊन गेले. त्यांचा अहवाल जिथे पाठवायचा तिथे पाठवला. शेवटी त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. एका कवडीचीही डिमाड, पेनल्टी वा फाईन येऊ शकली नाही.

अर्थात सगळे सरकारी अधिकारी असेच नसतात. शंभरात पाचेक असे असतात. त्यांना विसरून जायचे. पाचेक टक्के तर सौजन्यमूर्ती असतात. उदा. मेनन मॅडम. अशा सौजन्यमूर्ती पण मला बत्तीस वर्षाच्या कालावधीत बर्‍याच भेटल्या. त्यांची आठवण जरूर ठेवावी. बाकी सगळे नॉर्मल असतात. म्हणजे पैशाच्या अपेक्षेने पटापट कामे करतात. पैसे मिळणार नाही असे वाटले तर खूप उपद्रव देऊन काम या ना त्या निमित्ताने लांबवणारे. हा काळाचा महिमा आहे, झाले. व्यवसायाचा एक भाग म्हणतो आणि पैसे टाकून काम करून घेतो. अजिबात मनस्ताप करून घेत नाही.