ती
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
मला चांगले आठवते आहे. कशी होती ती नक्की? डोळ्यात भरेल असा पुष्ट उभार, निमुळते होत जाणारे पाय आणि निळे डोळे... बस्स माझ्या लेखी हीच तिची ओळख. तिची माझी पहिली भेट झाली तो साधारण वीस वर्षांपूर्वीचा प्रसंग. वयच तसे होते, तीही तशी होती. तिला पाहिले तेव्हाच ती मला आवडली होती. काही दिवस, काही तास, काही मिनिटे ती भेटल्यानंतर कसे गेले कळले नाही. तिची मातृभाषा वेगळी होती. पण एकंदरीत ती खूप कमी बोलायची. माझ्याशी तरी. ती तिच्या गावी निघून गेली आणि त्यानंतर मात्र मी विरहाच्या विळख्यात सापडलो. कॉलेजला जाणे बंद, मित्रांबरोबर फिरणे बंद, फक्त तिचाच विचार.

एका रात्री मला एक स्वप्न पडले. मी एका बारमध्ये बसलो होतो. बार बराचसा रिकामा होता. एका खुर्चीवर एक देवदूत बसला होता. आपल्या गालावर हाताचा पंजा ठेवून दुसर्या हाताने तो कपातली कॉफी ढवळत होता. माझ्याकडे बघून तो मोठ्याने हसू लागला. ओ ती तुझी देवता! तुझे सर्वस्व! तुझी प्रियतमा! असे काही बरळू लागला आणि अचानक त्याच्या चेहर्यावरचे भाव बदलले. त्याचे डोळे आग ओकू लागले. त्याच्या मत्सराने फार उग्र रूप धारण केले. मी घाबरलो.
वेटर, वेटर अशा हाका द्यायचा प्रयत्न केला तर कोणी येईना, बोलती बंद झाली होती माझी. मला जाग आली तेव्हा मी घामाने डबडबलो होतो. शेवटी ते स्वप्न होते आणि माझी सुटका झाली होती.
मग कित्येक रात्री मला स्वप्नच पडले नाही, अनेक रात्री मी वेड्यासारख्या बसून काढल्या. कधी झोप लागलीच तर उठून रडत तिला मी पत्रे पाठवत होतो. लांबलचक... माझे किती प्रेम आहे ते सांगणारी. भेटायला ये, आपण एकत्र राहू अशी विनवणी करणारी. आणि तिची उत्तरे यायची ती अगदीच त्रोटक. कसा आहेस तू? आय लव्ह यू अशी एवढीच.
कधीतरी आता खूप पाऊस पडतो आहे असले काही तरी लिहायची. चिडायचो मी. तर कधी खूप भीती वाटायची ती पत्रे वाचून. वाटायचे संपले सगळे. एकदा अशीच सगळी पत्रे काढून बसलो होतो, बारकाईने. तेव्हा मनात आले कदाचित आपली भाषा तिला येत नाही. चुकांची भीती वाटून ती लिहीत नसेल. अतिशय मानी होती ती. कुठलाही कमीपणा घ्यायची नाही. ते मान्यच नव्हते तिला. तिच्या अशा वागण्याने मी दुखावलो जातो याचीसुद्धा पर्वा नव्हती का तिला?
ती माझ्यापेक्षा तीन वर्षे लहान होती, नुकतीच बारावी झाली होती. गाण्याची आवड आहे म्हणायची . पेंटिंग पण आवडते म्हणायची. तिने कॉलेजात नाव घातले होते. मला असे वाटते की तिला खरे संगीत किंवा पेंटिंग कशाचीच आवड नव्हती. आपण कशाने तरी झपाटून जावे असे तिला कधी वाटलेच नाही.
असेच एकदा तिचे पत्र आले की तिला मॉडेल व्हायचे आहे. त्याची ऑडिशन द्यायला जाणार आहे ती.
अचानक मला काय झाले कुणास ठाऊक पण मी भरभरून लिहिले तिला पत्रात... तेही तिच्या दिसण्याविषयी. तिचे निळे निळे भुरळ पाडणारे डोळे. तिची निमुळती मला आवडणारी मान, लांबसडक बोटे आणि तिला कधी मिठीत घेतो असे पुरुषाला अगतिक करणारे तिचे पुष्ट स्तन. मी लिहीत सुटलो होतो.
तिची मॉडेल म्हणून निवड होईल याकरता तिचा आत्मविश्वास आणखी वाढवावा म्हणून ते पत्र लिहायला घेतले होते. पण भलतेच घडले होते. जे सांगायचे होते पण सांगणे कसे दिसेल म्हणून गप्प होतो, ते सर्व बाहेर आले होते.
शिष्टाचाराचे नियम मोडून बसलो की काय? लिहून झाल्यावर पत्र टाकावे की नाही या विचारात मी बसून होतो. बंद पाकिट वर खाली करत त्याकडे बघत बराच वेळ गेला. पण शेवटी मी पत्र पोस्ट केले.
तिच्याकडून काही येईपर्यंत एक दोन आठवडे निघून गेले. तिला फोन करून बोलावेसे तर खूप वाटत होते. पण मी फोन केला नाही. दरम्यान माझे कॉलेज संपले होते आणि मी नोकरीच्या शोधात होतो. थोडक्यात बेकार होतो. ऑडिशनमधून तिची निवड झाली होती. पण ती दुसरी होती. त्यामुळे अजून काँट्रॅक्ट मिळाले नव्हते.
एक दिवस तिने फोन केला. मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ऑडीशनमध्ये चांगला अनुभव मिळाला म्हणून ती खूशही होती. कितीतरी वेळा तिने तिची गोष्ट मला रंगवून सांगितली... त्या दिवसात मी जेव्हा जेव्हा तिला फोन केला तेव्हा तेव्हा फक्त तीच रेकॉर्ड वाजत होती. तिचा स्वभाव आता समजू लागला होता. मी इतर पुरुषांप्रमाणे श्रोत्याची भूमिका घेतली. माझ्या पत्रामुळे ती प्रभावित झाली असे म्हणाली. कदाचित खरे असेल. असो. दोन चार फुटकळ कामे करून हाताशी पैसे आले होते. मी तिकीट काढले. तिच्या गावी पोहोचलो. स्टेशनवर एक चहा मारून आणि तीन चार सिगरेटी फुंकून मी अस्वस्थता लपवण्याचा प्रयत्न केला.
सकाळी दहाच्या दरम्यान तिने दिलेल्या पत्त्यावर हजर झालो.
दारावरची बेल दाबली. दार उघडायला किती वेळ लागला... निदान मला तरी तसे वाटले. एका मध्यमवयीन लठ्ठ स्त्रीने दार उघडले. तिच्या बोलण्यात आईचा उल्लेख कधी नव्हता. कोण होती ही? मी तिला भेटायला आलो असे सांगितल्यावर त्या लठ्ठ बाईच्या चेहर्यावर माझ्याकडे बघून खाटकाकडे असणार्या बोकडाकडे पाहावे तसे भाव आले. मी त्याकडे तेव्हा दुर्लक्ष केले. पण आता एवढ्या वर्षांनंतर तिच्या नजरेतल्या भावांचा अर्थ समजतो आहे.
बराच वेळ मी त्या हॉलमध्ये बसून होतो. ती अजून आली नव्हती. मी खोलीभर नजर फिरवली. हॉल चांगला मोठा होता. दोन्ही खिडक्यांतून भरपूर प्रकाश येत होता. त्या प्रकाशात जेव्हा ती समोर आली तेव्हा अगदी स्वप्नातल्या परीप्रमाणे नाजूक आणि झगमगणारी वाटली. माझ्या मनात असा विचार येणे सुद्धा मूर्खपणाचे आणि ते तिला सांगणे तर त्याहून मूर्खपणाचे होते. पण माझे मन ताब्यात नव्हते हेच खरे.
पुढे महिनाभर ती आणि मी एकत्र होतो, आणि दिवसरात्र तिचा सहवास मला मिळाला होता. आम्ही अनेकदा सिनेमाला गेलो. बार, डिस्को, हॉटेल जमेल तसे पैसे उडवत होतो. अर्थात क्रेडिट कार्ड मदतीला होते. मी तिच्याबरोबर पार्ट्यांना गेलो, तिच्या मित्रमैत्रिणींना भेटलो. मिठीमध्ये तिचा जीव गुदमरेल एवढे तिच्यावर प्रेम केले. माझ्याबरोबर चल, आपण एकत्र राहू म्हणून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.
तिचे उत्तर काय असणार याची कल्पना होती. माझ्या हातात ना नोकरी ना धंदा, ना वाडवडलांची इस्टेट. पण हे दिवसही जातील अशी खात्री होती. अखेर महिन्यानंतर मी माझ्या गावी परत आलो. आजसुद्धा कोणत्याही स्त्रीचा विचार मनात आला की आधी माझ्या समोर त्यावेळी तिच्या संगतीत घालवलेले ते दिवस येतात. एक प्रचंड उलथापालथ घडवणारी ती तिच्या गावाची सफर मी अजून मनात जपलेली आहे.
वर्षभर उमेदवारी केल्यानंतर अखेर मला आयटी कंपनीत नोकरी मिळाली. मी आयुष्याची स्वप्ने खर्या अर्थाने रंगवू शकत होतो. अशीच ती एकदा माझ्याबरोबर घरी आली. माझ्या आईला भेटली. मुलाला आवडलेली मुलगी आहे म्हणून आई तिच्याशी बोलली. पण आईला मनातून एकंदर सगळे पटले नसावे.
“ मी तिला सोडू शकत नाही, गोष्टी आता फार पुढे गेल्या आहेत.” आईकडे शांतपणे बघत मी उत्तर दिले.
महिन्या दोन महिन्यांनी तिचे पत्र आले. आजवरचे सर्वात मोठे. त्यात तिने आपण यापुढे भेटू नये असे सुचवले होते. एकत्र राहू अशी इच्छा व्यक्त करून मी तिच्यावर उगीच नाही ते दडपण आणत होतो असे तिचे मत होते. त्याने ती कशी धास्तावली आहे, इत्यादी गोष्टी तिने लिहिल्या होत्या. मी संतापलो. तिच्या माझ्यात जे काही झाले, एकदा नाही तर अनेकदा झाले तो सगळा काय पोरखेळ होता का?