दिवाळी अंक २००९

ती

सोनाली जोशी

माझे तिच्यावर प्रेम आहे याची तिला वारंवार मी हमी देत होतो. भल्याबुर्‍या शब्दात मी तिची निर्भर्त्सना केली. मग पुन्हा हात जोडून तिच्या लाखवेळा विनवण्या केल्या. आता त्या घटनेचा विचार केला की वेडेपणावर हसायला येते. पण त्यावेळी माझ्यासमोर दुसरा कोणताच मार्ग नव्हता.

एकदा असेच नोकरीनिमित्ताने मी तिच्या गावातील एका हॉटेलात उतरलो होतो. तेव्हा तिला फोन केला. जुना रुसवा फुगवा अथवा भांडण आमच्यामध्ये आले नाही. ती भेटायला आली, माझ्याशी नीट बोलली. पण गाडी पुढे गेली नाही.

एक वर्षाने तिने मला माहिती नसलेले तिचे आयुष्य माझ्यासमोर ठेवले होते. त्याच गोष्टी पुन्हा काही वर्षांनी तिच्या काही मित्रमैत्रिणींनीसुद्धा मला सांगितल्या. अगदी सुरुवातीपासून किंवा जिथून तिच्या माझ्या वाटा वेगळ्या झाल्या निदान तिथून तरी. त्यांच्या दृष्टीने मी तिच्या गोष्टीत अगदीच किरकोळ होतो. पण तसे स्वतःला कधी मी जाणवू दिले नाही. मला तसे वाटले नाही. आमच्या भेटी बंद होण्याचे कारणच मुळी तिचे लग्न ठरणे होते. नवरा अर्थातच तिच्या मित्रांपैकी होता. मी त्याला माझ्या पहिल्याच ट्रिपमध्ये भेटलो होतो. एका प्रियकरापेक्षा अधिक माझ्यातला पुरुष दुखावला होता. मी नोकरीत रुळलो होतो. लग्नाचा विचार मात्र डोक्यातून काढून टाकला होता. तिची माझी भेटसुद्धा झाली नाही. फोनवर बोलणेही नाही. तिच्या मित्रमैत्रिणींकडून तिची खबरबात कळायची. सहा महिन्याचा डिप्लोमा कोर्स करून ती नोकरीला लागली होती म्हणे. शिवाय शिकत होती. तिचे एकंदर छान सुरू होते.

पुढे एक दोन वर्षातच तिचा अन् त्याचा घटस्फोट झाला, आमच्याइतकाच तिला पण तो धक्का असावा. कुठे बिनसले त्यांनाच माहिती. पण ती तिच्या ऑफिसातल्या एका माणसाशी संबंध ठेऊन आहे असा नवर्‍याला संशय होता म्हणे. घटस्फोट काही सुखासुखी झाला नव्हता. शिवीगाळ, हाणामारी सगळे झाले होते. तिच्या नवर्‍याने बेदम मारल्याने तिचा जबडा फाटला होता. सगळेच भयंकर होते.

अजूनही एकटा असलो की माझ्यासमोर तिचाच विचार असतो. असेच एकदा स्वप्नात ती डॉक्टरांनी शिवलेला जबडा घेऊन जाहिरात करते आहे असे मला दिसले. मनातून खूप आनंद व्हायला हवा होता तिचे ते थोबाड पाहून पण झाला नाही. तिच्याविषयी कोणताच वाईट विचार मनाला अजूनही आवडत नव्हता.मी अधून मधून तिची भेट घेत होतो, तिच्या बातम्या काढत होतो. मी विसरलो होतो पण तिनेच सांगितले होते की तिला मध्येच अंगावर झुरळे धावतात अशी स्वप्ने वारंवार पडायची त्याबद्दल.

तीच बोलत होती त्या नवर्‍याविषयी, त्यांच्यातल्या बिघडत गेलेल्या संबंधांविषयी. नवर्‍यापासून सुटका झाली याचा तिला आनंद झाला होता. पण ती सुखी नव्हती.

आता माझी नोकरी उत्तम पगाराची होती. जमेल तशी तिला मदत करत होतो, तिच्याकडून कोणताही मोबदला न मागता. तिने एकदाची एक डिग्री मिळवली होती. एका विमान कंपनीत तिला मॅनेजरची नोकरी मिळाली होती. आता ती सुखी असायला हवी होती. पण ती झुरळे पुन्हा परत आली होती बहुधा. तिला त्रासही देत असावीत. वारंवार तिला नैराश्याचे झटके यायचे. एक दोन वर्षे वेगवेगळ्या औषधगोळ्या खाऊन ती थकून गेली होती. नवरा नाही म्हणून म्हणा किंवा त्या मधल्या फेजमध्ये होती म्हणून असेल, ती अनेक पुरुषांची सोबत पडताळून बघत होती. अर्थात मीसुद्धा त्यापैकी एक होतो. त्या काळात जेव्हा आम्ही एकत्र आलो तेव्हा किमान दहा वेळा ती बाथरूमकडे धावली होती. कुठलीशी डिस्‌ऑर्डर आहे तिला असे म्हणत होती. स्वतःबद्दल फार तटस्थपणे बोलत होती. तिच्यामध्ये एक नाही तर तीन व्यक्तिमत्त्वे आहेत असे काही सांगत होती. एक निरागस मुलगी, एक जी कुटुंबाचा घटक होती आणि एक जिला पेंटिंग करायचे होते, मॉडेल बनायचे होते. मी तिला अधूनमधून भेटत होतो. ती दिसली नाही की तिच्या काळजीने धास्तावत होतो. मध्येच मी जीव देईन असेसुद्धा म्हणायची ती. ती घेत असलेल्या उपचारांमधला तो एक टप्पा होता असे डॉक्टर म्हणायचे, पण ती असे काही करणार नाही असा मी स्वतःला दिलासा देत होतो. अखेर स्वतःची अशी खात्री पटवून मी काळजीमुक्त जीवन जगायचा प्रयत्न करू लागलो. तिने आत्महत्या वगैरे काही केली नाही. लग्नाचा विषय काढू नकोस असे तिने मला बजावले होते. मी तिच्या विचारांच्या परिघात राहून तिच्यापासून दूर राहत होतो.

अचानक तिने फोन करून सांगितले की ती तिच्या सहकार्‍याच्या प्रेमात पडली आहे आणि दोघे लग्न करत आहेत. मी जणू आपला या घटनेशी संबंध नाही असा पावित्रा घेऊन ऐकत होतो. तो अमूक आहे, तमूक आहे, असा आहे, तसा आहे, खूप संयमी आहे, तो माझी काळजी घेईल असे ती बोलत होती. बहुधा स्वतःचे समाधान करत असावी. तिचे अभिनंदन करून मी आयुष्यातला एक अंक अखेर समाप्त करायच्या तयारीला लागलो. तिच्या शिवाय जगात इतर मुली आहेत आणि कदाचित माझ्यासाठी त्यातली एखादी असेल याचा शोध घेऊ लागलो.

पण तिच्या बातम्या किती टाळल्या तरी वसंतात जशी झाडाला नवी पालवी येते तितक्या सहजपणे त्या माझ्यापर्यंत यायच्या. कधीतरी एखाद्या पार्टीत तिची गाठभेट व्हायची. तसे सांगण्यासारखे फार काही नसले तरी ती स्वतःबद्दलच बडबडत असायची. विषय फक्त बदलायचे - मॉडेल होणे, पेंटिंग, तिचे नैराश्य, तिचा नवरा...

मला फक्त एवढच कळत होत की माझ्या स्मरणात असलेली , मला माहिती असणारी ती कुठे तरी हरवली आहे. तिने जीम जॉइन केली होती. वाढलेले वजन कमी झाले तरी औषधांचा परिणाम आणि तिचे वय तिला तिशी ओलांडल्यावर लपवता येणे आता अवघड होते. तिच्या नवर्‍याला मूल हवे होते. त्यावरून वाद वाढला होता. तिने नवर्‍याच्या इच्छेप्रमाणे वागायचे ठरवले होते. त्यांना एक मुलगा झाला होता .

मुलगा झाला म्हणजे ती फार सुखी झाली असे झाले नाही. तिने वरवर तशी समजूत घालण्याचा प्रयत्न मात्र केला होता. ती फोन करायची, बोलायची. मी काही विचारले की भलत्याच प्रकारे स्वतःचे समर्थन करत बसायची. सगळे तसेच होते. ती बदलली नव्हती. उलट परिस्थिती हाताबाहेरच गेली होती. काहीतरी कारणावरून माझ्याशी ती फोनवर भांडली होती तेव्हापासून मी बराच काळ तिला स्वतःहून फोन केला नव्हता. माझी नोकरी फिरतीची होती. माझे आयुष्य जरी पुढे गेले होते, तरी तिच्या आठवणींच्या खुंटाला स्वतःला बांधून मी नुसता वर्तुळात फिरत होतो. तिला विसरणे माझ्याकरता अशक्य होते. एकदा का तिच्या आठवांत शिरलो की माथ्यावर आलेल्या सूर्याने तापलेल्या रस्त्याला आणखी भाजून काढावे असे माझे व्हायचे. मग तिचा आवाज तरी ऐकावा असे वाटे. तो मोह टाळता यायचा नाही. नजर नकळत फोनकडे जायची.

असेच एकदा तिच्या गावी मुक्काम होता. मी फोन केला. "भेटायला येशील का?" ती हो म्हणाली आणि आली सुद्धा. तिच्यात खूप बदल झाला होता. तिला ओळखणे सुद्धा अशक्य व्हावे एवढा. मेकपचे लेपन सुद्धा तिच्यातले बदल लपवू शकत नव्हते. मला भरून आले. खरे तर तिचा राग यायला हवा होता, तिचे सौंदर्य गेले याचा आसुरी आनंदसुद्धा व्हायला हवा होता. पण उलट तिची कीव आली.

तिचे हास्यसुद्धा बदलले होते. आता निरागसपणा किंवा खोडकरपणा जाऊन एक प्रकारचा धूर्तपणा, मत्सर त्यात दिसत होता. जणू काही मीच तिचा शत्रू होतो. मला तिच्याशी वाद घालायचा नव्हता.

"कशी दिसते मी? "

तिचा हा प्रश्नच किती मूर्खपणाचा होता! त्याचे खरे उत्तर देणे म्हणजे तिच्या थोबाडीत देण्यासारखेच होते. काही तरी विषय काढून मी मूळ मुद्दा टाळला होता. माझ्या गाडीची वेळ झाली होती हे एका अर्थी बरेच झाले त्यामुळे मी चटकन निघालो.

ही तिची माझी शेवटची भेट.