दिवाळी अंक २००९

ती

सोनाली जोशी

काळ पुढे जात होता. दोन व्यक्तिरेखांचे आयुष्य मी जगत होतो. तिच्याशी बोलणे मला टाळता येत नव्हते. महिन्यातून एक तरी फोन मी करायचो. आजकाल ती निर्विकारपणे बरेच काही सांगायची.

"मला कॅन्सर झाला आहे" तिने एकदा सांगून टाकले.

ती हसत होती. माझा विश्वास बसला नाही. नंतर आम्ही आमच्या मुलाबाळांबद्दल बोललो. इतर आयुष्याबद्दल बोललो. मला अधून मधून स्वप्ने पडू लागली. असेच एकदा तिला कॅन्सर वगैरे नाही आणि ती माझ्याशी खोटे बोलते आहे असे मी ओरडलो.

कामानिमित्त पुन्हा एकदा तिच्या गावात गेले होतो. टेलिफोन बुथवरून तिच्या घरी फोन केला. कोणीच फोन उचलला नाही. काय करावे? काय झाले असेल? त्या गावात तिच्याशिवाय मी फक्त आणखी एकाच मित्राला ओळखत होतो. त्याच्याकडे फोन केला तर तो म्हणला सध्या ती बाहेरगावी आहे.

"कसे आहेत सगळे?"

"तिला कॅन्सर झाला आहे. तिने सांगितले असेल ना.."

आणि मग तो काय बोलतो आहे ते माझ्या कानात शिरलेच नाही. मी दोन्ही खिसे सिगरेट मिळते का म्हणून चाचपले. मी सिगरेट ओढता ओढता त्याचे बोलणे ऐकत होतो. तिचा कॅन्सर, डॉक्टरांचा सल्ला, उपचार. तिचे वागणे. सगळे तुकड्यातुकड्यामधून माझ्या समोर येत होते. मी वेड्यासारखा रडायला लागलो. आता कुणीच तिला माझ्याकरता वाचवू शकणार नव्हते का?

तिने आणि मी एकत्र घालवलेला काळ, तिचे वागणे, तिचा आजार, तिचा नवरा ..तिचे वाईट वागणे, तिचा संसार सगळे सगळे माझ्या अंगावर एकदम कोसळले .

मी सुन्नपणे रस्त्यावर बसून राहिलो. कुणीतरी माझ्या हाताला हलवत होते. एक भिकारी मला पैसे मागत होता. त्याच्याकडे पाहिले . त्याचा चेहरा, त्याचे खोल गेलेले डोळे,
फाटके कपडे. मला काय करावे ते काही सुचले नाही. काही काळ मी शून्यात होतो. कोणताच विचार न करता पाकिटातून हाती आले तेवढे पैसे त्याला देऊन टाकले. मी चालू लागलो. त्याची केविलवाणी स्थिती बघतांना मला ती आठवली नव्हती... कुठेतरी मी हरवलो होतो, तिच्याशिवाय...

तिला कॅन्सर नाही.. नाही, तिला बाकी काही होऊ शकते पण कॅन्सर नाही.... मलाच अपराधी वाटू लागले होते.
त्यानंतर जवळजवळ दिवसातून एकदातरी मी तिला फोन करू लागलो. ती शांत होती. ती निर्रथकपणे बडबडायची. अगदी चुकीच्या ठिकाणी थांबायचे, नको तिथे उद्गारवाचक चिन्हे द्यायची आणि मूळ मुद्द्याला बगल द्यायची असे तिचे बडबडणे कागदावर लिहिले तर दिसले असते. नको त्याचे चर्‍हाट लावायचे. म्हणजेच एका वाईट कथालेखकाप्रमाणे ती वागत होती. तिने ऑपरेशन कशाचे करणार ते सोडून इतर बरीच अनावश्यक माहिती मला दिली. मी निमूटपणे ऐकून घेत होतो. कदाचित यापैकी कोणतेही आमचे दोघांचे शेवटचे बोलणे ठरणार होते. माझ्या घरचे समजूतदारपणे मला झेलत होते.

ऑपरेशन होण्याच्या एक दिवस आधी मीच अवस्थ होतो. तिच्या नवर्‍याशी बोललो. तिच्या मुलाशी बोललो. ते वरवर तरी शांत होते. ती घरी नव्हती. तिच्या नवर्‍याची ती माझ्याकडे आली आहे असे समजूत झाली असावी असे वाटल्याबरोबर मी ताडकन उत्तर दिले ती इथे नाहीये. त्याने त्याचे समाधान झाले नसावे. ती कुठे गेली याची माहिती इतर मित्रांकडे मिळाली नाही. मी वेड्यासारखा तिची वाट बघत जागा होतो. ऑफिसच्या कामाचे कारण काढून तिची वाट बघत होतो. पण ती आली नाही.....तीन चार दिवसांनी फोन केल्यावरही तिचा पत्ता समजला नाही. तिच्या नवर्‍याने कुठे जात असेल ती अशी चिंता व्यक्त केली. लहान मुलगा सध्या खूप हळवा झाला आहे असे सांगितले.

मी जेव्हा तिसर्‍यांदा फोन केला तेव्हा मला बोलतांना जाणवले की तिच्या नवर्‍याला सोबत हवी आहे. तो आधार शोधतो आहे. पण मी त्याला धीर देण्याच्या पलिकडे गेलो होतो. केव्हाचाच....