अंकल सॅमला तुमची गरज नाही!
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
प्रा. रिचर्ड पी. फाईनमन हे विसाव्या शतकातील एक जागतिक कीर्तीचे भौतिकशास्त्रज्ञ (physicist). त्यांचा जन्म १९१८ साली अमेरिकेतील न्यूयॉर्कजवळच्या 'फार रॉकवे' ह्या छोट्या शहरात झाला. शालेय शिक्षण तिथेच झाले आणि पुढील शिक्षण एम.आय.टी. आणि प्रिन्स्टन ह्या विद्यापीठांत झाले. प्रिन्स्टनमधूनच त्यांनी डॉक्टरेट मिळवली. १९६५ साली त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांची 'फाईनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स' ही पुस्तकमाला खूप प्रसिद्ध आहे. भौतिकशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा ह्या पुस्तकांशी निश्चितच परिचय झालेला असतो. १९८८ साली फाईनमन ह्यांचे कॅन्सरच्या दुखण्याने निधन झाले.
फाईनमन यांना भौतिकशास्त्राव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींमध्ये रस होता. कोणत्याही नव्या गोष्टीबद्दल कुतूहल होते - मग ते संगीत असो, चित्रकला असो, रेडिओदुरुस्ती असो अथवा कुलपे उघडण्याच्या कॢप्त्या असोत! त्यांचे चित्रकलेतील स्वारस्य आणि त्यानंतर त्यांनी त्यामध्ये मिळवलेले प्रावीण्य इतके होते की त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. ते ब्राझिलला गेलेले असताना तिथल्या सांबा म्युझिक, सांबा बॅण्ड ह्यांकडे ते इतके आकृष्ट झाले की ते त्यातील एक वाद्य -फ्रिजिडेअर (frigideira)- वाजवायला शिकले आणि त्यानंतर एका बॅण्डच्या पथकात सामील होऊन त्यांच्या अनेक कार्यक्रमात त्यांनी भागही घेतला. ह्या सर्वांबरोबरच त्यांच्याकडे उत्तम विनोदबुद्धी होती आणि स्वभावात एक खोडकर मिश्किलपणा होता. त्यांनी आपल्या बालपणीच्या, महाविद्यालयीन जीवनातल्या आणि त्यानंतरच्या आयुष्यातील आठवणी आपल्या मित्रांना सांगितल्या आहेत आणि त्याचे संकलन "Surely You're Joking, Mr. Feynman!" आणि "What Do You Care What Other People Think?" ह्या दोन पुस्तकांच्या रूपात प्रकाशित झाले आहे. त्यांचे व्यक्तिमत्व बहुरंगी असल्याने ह्या आठवणींमध्ये वैविध्य तर आहेच पण त्या सर्वांमधून जाणारा एक समान धागाही आहे आणि तो म्हणजे प्रत्येक आठवणीतून डोकावणारा एक खट्याळ मुलगा!
"Surely You're Joking, Mr. Feynman!" ह्या पुस्तकातील एका प्रसंगाचे मराठी भाषांतर इथे देत आहे. अर्थात मूळ लिखाण वाचण्यातून मिळणारा आनंद भाषांतरात मिळणार नाही ह्याची कल्पना आहे, तरीही हे वाचून एखाद्या वाचकाला मूळ पुस्तक वाचण्याची इच्छा झाली तर ह्या भाषांतराचे सार्थक झाले असे मला वाटेल.

दुसर्या महायुद्धानंतर अमेरिकेमध्ये सैन्यात भरती करण्याची जोरदार मोहीम सुरु झाली. कारण जर्मनीत सैन्य पाठवायचं होतं. मागच्या वेळी मला सैन्यात घेतलं नव्हतं कारण तेव्हा मी महत्त्वाच्या (बॉम्ब बनवण्याच्या) प्रकल्पाशी संबंधित होतो. पण आता परिस्थिती वेगळी होती. त्या उन्हाळ्यात मी स्कनेक्टडी येथे हान्स बेथ बरोबर जनरल इलेक्ट्रिक ह्या कंपनीत काम करत होतो. सैन्यात भरती होण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या वैद्यकीय तपासणीसाठी मला अल्बनीला जावं लागलं होतं.
मी तिथे पोहोचलो. त्यांनी मला बरेचसे फॉर्म्स भरायला दिले आणि ते घेऊन मी तिथे असलेल्या निरनिराळ्या बूथ्सच्या दिशेने मोर्चा वळवला. एका ठिकाणी माझे डोळे तपासले, दुसरीकडे कान, तिसरीकडे रक्त आणि चौथीकडे आणखी काही. असे करत करत शेवटी मी १३ नंबरच्या बूथजवळ पोहोचलो. त्यावर लिहिले होते : मानसोपचारतज्ज्ञ. तिथे जाऊन मी एका बाकड्यावर आपला नंबर येण्याची वाट पहात बसलो. तिथे तीन टेबलं होती आणि प्रत्येकाच्या मागे एकेक मानसोपचारतज्ज्ञ बसलेला होता.
त्यावेळी मानसोपचारतज्ज्ञांसंबंधीचे बरेच चित्रपट आले होते. स्पेलबाऊंड हा पण त्यातलाच एक. त्यात एक बाई पियानोवादक असते. एकदा, कसे कुणास ठाऊक, पण तिचे हात असे काही आखडल्यासारखे होतात की ते तिला अजिबात हलवता येत नाहीत. मग तिचे आईवडील एका मानसोपचारतज्ज्ञाला बोलावतात. तो वर तिच्या खोलीत जातो आणि खाली सगळेजण वाट बघत बसतात की आता काय होतंय? तेवढ्यात ती बाई हात तसेच आखडलेल्या अवस्थेत घेऊन खाली येते आणि सरळ पियानोकडे जाते. पियानोपुढच्या स्टुलावर बसल्यावर तिचे हात एकदम ‘सुटतात’ आणि ती पियानोच्या पट्ट्यांवर बोटं फिरवू लागते. मग काय एकदम डिड्ल डम् डिड्ल डम् डम् डम्... सुरु! मला ह्या सगळ्या थापा वाटतात. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांबद्दल माझं काही फारसं चांगलं मत नाहीये. मला हे सगळं आठवत असतानाच माझा नंबर पुकारला गेला.
मी पहिल्या टेबलासमोर जाऊन बसलो. तिथला माणूस माझी कागदपत्रं बघायला लागला आणि मग हसत, अगदी खेळीमेळीच्या स्वरात म्हणाला, "हाय डिक, तू कुठून आलास?"
मी मनात म्हटलं ह्याला इतक्या सलगीत यायला काय झालं? समजतो कोण स्वतःला? पण तरीही उत्तर दिलं "स्कनेक्टडी"
"तू नोकरी कुठे करतोस डिक?" पुन्हा तीच सलगी आणि तोच खेळीमेळीचा स्वर!
"जनरल इलेक्ट्रिक"
"डिक, तुला ते काम आवडतं का?" पुन्हा चेहर्यावर तेच स्मितहास्य.
"थोडं थोडं." मी अशीच त्रोटक उत्तरं द्यायचं ठरवलं होतं.
असे तीन साधे, सरळ प्रश्न झाल्यावर चौथा प्रश्न एकदम वेगळा! जरा हळू, खाजगी आवाजात.
"तुला असं वाटतं का की लोक आपल्याबद्दल बोलत असतात?"
मी उत्साहाने म्हटलं, "हो, तर! मी घरी गेलो की माझी आई मला सांगते की ती कशी आपल्या मैत्रिणींना माझ्याबद्दल सांगत असते."
माझं पूर्ण बोलणं ऐकून न घेता केवळ "हो, तर" ऐकून तो त्या फॉर्ममध्ये काही तरी लिहायला लागला.
पुन्हा खाजगी आवाजात, "तुला असं वाटतं का की लोक तुझ्याकडे टक लावून बघत असतात?" ह्याचं काय उत्तर द्यावं ह्याचा मी विचार करत असतानाच तो म्हणाला, "म्हणजे असं बघ, त्या बाकावर बसलेल्या मुलांपैकी कोणी तुझ्याकडे बघत आहेत असं तुला वाटतं का?"
बाकावर १२ मुलं होती आणि तिथल्या ३ मानसोपचारतज्ज्ञांव्यतिरिक्त त्यांना बघायला दुसरं काहीच नव्हतं. तेव्हा प्रत्येक टेबलाकडे चार/चार जण बघत असतील असा तर्क करायला हरकत नव्हती! पण म्हटलं चार म्हणजे जरा जास्त होतील, म्हणून मी म्हणालो, "त्यांच्यापैकी दोघेजण आपल्याकडे पाहात असतील." त्यावर तो म्हणाला, "मान फिरव आणि बघ." पण हे म्हणताना तो स्वत: मान वर करून त्यांच्याकडे बघत नव्हता. त्याला तर मानही फिरवावी लागणार नव्हती! असो. मी मान वळवून पाहिलं तर खरंच दोघेजण आमच्याकडे पाहात होते. मी म्हटलं, "तो बघा, तो आणि त्याच्या पलीकडचा आपल्याकडे बघताहेत." पण मी असं म्हणत असताना बाकीचेही आमच्याकडे बघायला लागले. तर मी म्हटलं, "आणखी दोघेजण, आणि तो तिसरा पण आणि आता तर सगळेच आपल्याकडे पाहताहेत." पण मी काय बोलतोय तिकडे त्याचं लक्षच नव्हतं. तो खाली मान घालून भराभरा काहीतरी लिहीत होता.
मग तो एकदम म्हणाला, "तुला कधी डोक्यात आवाज ऐकू येतात का?
"अगदी क्वचित." आणि मी केव्हा ते सांगणार त्याच्या आधीच त्याने पुढचा प्रश्न विचारला, "तू कधी स्वतःशी बोलतोस का?" मी म्हटलं, "हो, बोलतो की! विशेषतः मी दाढी करत असतो तेव्हा किंवा काही तरी विचार करत असतो तेव्हा." तो आता कागदावर आणखी काही तरी खरडत होता. मग माझी कागदपत्रं चाळत म्हणाला, "तुझ्या पत्नीचं निधन झालेलं आहे नं? तू कधी तिच्याशी बोलतोस?" आता मात्र मला राग आला पण तरीही मी स्वतःला आवरून म्हणालो, "कधी कधी मी एकटाच टेकडीवर जातो आणि तिचा विचार करत असतो तेव्हा बोलतो."
कागदावर आणखी काहीतरी खरडणे!
पुढे विचारता झाला, "तुझ्या कुटुंबातील कोणी मनोरुग्णांच्या संस्थेत आहे का?"
"हो, माझी एक मावशी वेड्यांच्या इस्पितळात आहे."
तो जरा रागाने म्हणाला, "वेड्यांचं इस्पितळ काय म्हणतोस? मनोरुग्णांची संस्था असं म्हण."
"मला वाटतं दोन्हीचा अर्थ एकच आहे."
आता तो चांगलाच रागावला आणि म्हणाला, "वेडेपणाची तुझी व्याख्या काय?"
"वेडेपणा हा मनुष्यप्राण्यांमधला एक काहीसा वेगळा आणि जरा विचित्र असा आजार आहे."
"त्यात वेगळं किंवा विचित्र असं काहीच नाही. अपेंडिसायटिस हा जसा एक रोग आहे तसाच वेडेपणाही."
मी म्हटलं, "मला तसं वाटत नाही. अपेंडिसायटिसमध्ये आपल्याला रोगाचं कारण आणि त्याचे परिणाम यांच्यात बर्यापैकी संगती लावता येते.
वेडेपणात अशी संगती लावणं फार गुंतागुंतीचं आणि समजायला जरा कठीण असतं."