दिवाळी अंक २००९

अंकल सॅमला तुमची गरज नाही!

मीरा फाटक

आमचा काही वेळ असा वाद चालला होता. मला म्हणायचं होतं की शरीरशास्त्राच्या दृष्टीने अपेंडिसायटिस आणि वेडेपणा ह्यांच्यात फरक आहे. तर त्याला वाटत होतं की मी सामाजिक दृष्टिकोनातून त्या दोन्हींत फरक आहे असं म्हणतोय.

आतापर्यंत मी थोडा तुटकपणे वागलो होतो हे खरं पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी प्रामाणिकपणे दिली होती. पण तो जेव्हा म्हणाला की दोन्ही हात पुढे कर, तेव्हा मात्र मला थोडी गंमत करायची लहर आली. मी दोन्ही हात पुढे केले पण एक उताणा आणि दुसरा पालथा ठेवला. त्याचं त्याकडे लक्षच नव्हतं. तो म्हणाला, "आता दोन्ही हात उलटे कर." मी तसं केलं आणि पुन्हा एक हात उताणा आणि एक पालथा. पण तेही त्याला कळलं नाही. तो एकाच हाताकडे टक लावून पाहात होता. माझ्या हाताला कंप वगैरे सुटतोय का हे त्याला पाहायचं होतं. म्हणजे माझा हा बार फुसकाच गेला!

आता पुन्हा त्याने तो खेळीमेळीचा सूर लावला आणि माझी कागदपत्रं पाहात म्हणाला, "डिक, तू पीएच.डी. झाला आहेस नाही का? कुठे बरं झालं तुझं शिक्षण?"

"एम.आय.टी. आणि प्रिन्स्टन. आणि तुमचं शिक्षण कुठे झालं?"

"येल आणि लंडन. तुझा विषय काय होता डिक?"

"भौतिकशास्त्र. आणि तुमचा?"

"वैद्यकशास्त्र."

"हे चाललंय ते काय वैद्यकशास्त्र आहे?" मी थोडा आवाज चढवून आणि त्याच्याकडे रोखून पाहात म्हटलं.

"हो! तुला काय वाटलं, हे काय आहे? जा, त्या बाकावर जाऊन बस. थोड्या वेळानं तुला पुन्हा बोलावलं जाईल."

मी बाकावर जाऊन बसलो. बाकावरचा एक मुलगा माझ्या जरा जवळ सरकला आणि म्हणाला, "बाप रे, तुला त्यांनी २५ मिनिटं घेतली. बाकीच्यांना पाच पाच मिनिटात वाटेला लावलं."

"हो."

तो पुढे म्हणाला, "तुला माहिती आहे का, ह्या मानसोपचारतज्ज्ञांना कसं बनवायचं ते? फक्त तिथे जाऊन नखं कुरतडायची. ही अशी."

"मग तू का तसं करत नाहीस?"

"कारण मला सैन्यात भरती व्हायचंय!"

"तुला त्यांना बनवायचं नं? मग हेच तू त्यांना सांग." मी म्हणालो.

थोड्या वेळाने मला दुसऱ्या टेबलावरून बोलावणं आलं. हा माणूस पहिल्याच्या मानाने वयाने थोडा मोठा आणि जरा टिपटॉप दिसत होता. पहिल्याचा बॉस असावा! त्यानं पण माझी कागदपत्रं पाहिली आणि म्हणाला, "हॅलो डिक, तू युद्धकाळात लॉस ऍलॅमोसमध्ये होतास नाही का?"

"हो."

"तिकडे एक मुलांची शाळा आहे नं?"

"बरोबर."

"शाळेच्या बऱ्याच इमारती आहेत का?"

"नाही. अगदी थोड्या आहेत."

पुन्हा तीच ट्रिक! पहिले तीन प्रश्न साधे, सरळ. चौथा प्रश्न एकदम वेगळा. "तुझ्या डोक्यात तुला आवाज ऐकू येतात असं तू म्हणालास. त्याबद्दल जरा सविस्तर सांग बरं."

"असं अगदी क्वचित होतं. मी जेव्हा परदेशातल्या कोणाचं भाषण ऐकत असतो तेव्हा ते उच्चार मला समजायला कठीण जातात आणि मग मी ते खूप लक्ष देऊन ऐकायला लागतो. असं केल्यावर रात्री अगदी झोप येत असताना मला तो आवाज अगदी स्पष्ट ऐकू येतो. हे एकदा एम.आय.टी.मध्ये एका प्राध्यापकांचं व्याख्यान ऐकल्यावर झालं होतं आणि दुसऱ्यांदा शिकागोमध्ये एका प्राध्यापकांनी बॉम्बची रचना आणि काम समजावून सांगितलं तेव्हा. मला वाटतं प्रत्येकाच्या बाबतीत कधी ना कधी असं होत असेलच नाही का?"

तो मानसोपचारतज्ज्ञ आपलं हसू लपवत होता पण माझ्या प्रश्नाचं उत्तर काही त्यानं दिलं नाही. मग त्यानं आणखी काही कागदपत्रं चाळली आणि मला म्हणाला, "तू आपल्या मृत पत्नीशी बोलतोस असं तू सांगितलं आहेस. काय बरं बोलतोस तू तिच्याशी?"

आता मात्र माझा राग अनावर झाला. मी चिडून म्हटलं, "मी तिला सांगतो की माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तुमची याला काही हरकत आहे का?"

असंच थोडा वेळ चाललं होतं. मग तो म्हणाला, "तुझा सुपरनॉर्मल गोष्टींवरती विश्वास आहे का?"

"सुपरनॉर्मल म्हणजे काय मला माहीत नाही."

"काय? तू भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहेस आणि तुला सुपरनॉर्मल माहीत नाही?"

"बरोबर. मला ते माहीत नाही."

"सर ऑलिवर लॉज आणि त्याचे अनुयायी ज्याच्या अस्तित्वावर वर विश्वास ठेवतात ते सुपरनॉर्मल."

"तुम्हाला सुपरनॅचरल म्हणायचं आहे असं वाटतंय."

"तुला हवं असेल तर तसं म्हण."

"हो. मी तसंच म्हणणार आहे."

"मेंटल टेलीपथी वर तुझा विश्वास आहे का?"

"नाही. तुमचा?"

"अं...... मी ह्या बाबतीत माझ्या मनाचे दरवाजे उघडे ठेवले आहेत."

"तुम्ही? एक मानसोपचारतज्ज्ञ? आणि मनाचे दरवाजे उघडे ठेवता? हा हा हा!"

असं थोडा वेळ चाललं आणि तो म्हणाला, "तुझ्या दृष्टीने आयुष्याची किंमत किती?"

"चौसष्ट."

"चौसष्ट कशावरून?"

"म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की मी ही किंमत मोजली कशी?"

"नाही. तू चौसष्ट का म्हणालास, दुसरं काही, उदा. त्र्याहत्तर, का नाही म्हणालास?"

"मी त्र्याहत्तर म्हणालो असतो तरी तुम्ही हाच प्रश्न विचारला असता."

आधीच्या माणसाप्रमाणे ह्यानेही शेवटी तीन साधे प्रश्न विचारले, माझी कागदपत्रं मला दिली आणि माझी बोळवण केली. मी पुढच्या बूथकडे निघालो. तिथे रांगेत उभे राहून मी माझे कागद बघू लागलो. माझ्या डोक्यात एकदम काय आलं कुणास ठाऊक? मी जरा बावळट चेहरा करून माझ्या शेजारी उभ्या असलेल्या मुलाला विचारलं, "अरे, तुला सायकियाट्रिकमध्ये काय मिळालं? N मिळाला? मला सगळीकडे N मिळालाय, पण हे बघ सायकियाट्रिकमध्ये D मिळालाय. D म्हणजे काय रे?" मला माहीत होतं N म्हणजे नॉर्मल, D म्हणजे डेफिशियंट. पण तरीही मी गंमत म्हणून विचारलं. तो मुलगा माझ्या खांद्यावर थोपटल्यासारखं करून समजुतीच्या स्वरात म्हणाला, "काही काळजी करू नकोस हं. सगळं ठीक आहे." आणि एकदम घाबरल्या चेहर्‍याने माझ्यापासून दूर चालू लागला तो थेट खोलीच्या दुसर्‍या टोकाला जाऊन पोहोचला!

मी पुन्हा माझे कागद बघायला लागलो. त्यात मानसोपचारतज्ज्ञांनी लिहिलेलं निश्चितच दुर्लक्ष करण्यासारखं नव्हतं! पहिल्याने लिहिलं होतं :

-लोक आपल्याबद्दल बोलतात असं वाटतं.
-लोक आपल्याकडे टक लावून पहातात असं वाटतं.
-ऑडिटरी हिप्नोगॉगिक हलुसिनेशन्स.
-स्वतःशी बोलतो.
-मृत पत्नीशी बोलतो.
-मावशी मनोरुग्णांच्या संस्थेत.
-कधी कधी अतिशय विचित्र नजरेनं पहातो. (हे मी "हे चाललंय ते काय वैद्यकशास्त्र आहे?" असं नजर रोखून विचारलं होतं, त्याच्याशी संबंधित होतं हे माझ्या लगेच लक्षात आलं.)

दुसरा मानसोपचारतज्ज्ञ नक्कीच पहिल्याच्या ‘वर’ होता. कारण त्याचं अक्षर वाचणं मला जास्त कठीण गेलं! त्यामध्ये "ऑडिटरी हिप्नोगॉगिक हलुसिनेशन्स कन्फर्म्ड" असं लिहिलेलं होतं. वैद्यकीय भाषेत आणखीही काही काही लिहिलं होतं. माझ्या दृष्टीनं ह्या सगळ्याचा अर्थ एकच होता की जे झालं होतं ते बरोबर नव्हतं! आता हे ‘दुरुस्त’ कसं करायचं ह्याचा मी विचार करायला लागलो.

वैद्यकीय तपासणीच्या शेवटी एका ज्येष्ठ अधिकाऱ्यापुढे उभं राहावं लागतं. तुमची कागदपत्र पाहून आणि स्वतःचं तारतम्य वापरून ह्या उमेदवारास घ्यायचं की नाही हा अंतिम निर्णय तो अधिकारी घेतो. तो मला एकूणच कडक वाटला आणि मी असा अंदाज केला की हा माणूस निर्णय घेताना हलगर्जीपणा करत नसेल, किंवा कोणत्याही दडपणाला बळी पडणारा नसेल. माझ्या ह्या तर्काला पुष्टीही मिळाली. कारण माझ्या पुढच्या मुलाच्या मानेची दोन हाडं वर आलेली होती. तर तो अधिकारी आपल्या खुर्चीवरून उठला आणि हात लावून ती हाडं खरी आहेत ह्याची स्वतः खात्री करून घेतली. मला आशा वाटायला लागली की आधीच्या दोघांचे आपल्याबद्दल जे काही गैरसमज झाले आहेत ते ह्याच्याशी बोलून आपल्याला दूर करता येतील. माझा नंबर आला तेव्हा मी माझी कागदपत्रं त्याला दिली आणि स्पष्टीकरण देण्यासाठी वाक्याची जुळवाजुळव करायला लागलो. पण त्यानं कागदातून डोकं वर काढलंच नाही. सायकियाट्रिकमध्ये D पाहिल्यावर त्यानं 'अस्वीकृत' चा शिक्का उचलला, तो माझ्या कागदावर उठवला आणि माझ्याकडे ढुंकूनही न बघता माझ्या हातात कागदपत्रं ठेवली!

मग काय? मी सरळ बाहेर पडलो आणि स्कनेक्टडीला जाणार्‍या बसमध्ये जाऊन बसलो. बसमध्ये मी झाल्या प्रकाराचा विचार करायला लागलो आणि जसजसा विचार करायला लागलो तसतसं मला हसूच यायला लागलं, ते इतकं की मी एकटाच जोरजोरात हसायला लागलो. माझ्या मनात आलं, आता जर त्यांनी मला पाहिलं तर त्यांची माझ्या वेडेपणाबद्दल खात्रीच पटेल!