दिवाळी अंक २००९

कंत्राट

श्रावण मोडक

कळा. केवळ कळा... कपाळाच्या उजव्या भागातून त्यांची सुरवात होते. खरं तर, कपाळाच्या नव्हे, त्याच्याही मागं. तिथून तो झोत खाली येत जातो. आधी गालापाशी. तिथंच काही क्षण थांबतो. एक जोरदार कळ सरकते मग खालच्या दिशेनं, आणि गायब होते. वाटतं संपलं सारं. पण संपलेलं नसतं. बरगड्या संपतात तिथं अचानक एक कळ येते आणि तो झोत टिकतो. तसाच राहतो. पोट पिळवटून निघतं. चेहऱ्यावर त्या कळीचं प्रतिबिंब असावं. आपण उठू शकत नाही. त्यामुळं ती कळ कशी दिसत असावी हे काही कळत नाही. अन्यथा समोर आरसा आहेच. पण नाही. उठण्याचा प्रयत्न केला तर अंगाच्या अन्य भागातून कळा सुरू होतात. मग ओरडावं लागतं. एकट्याचंच नसतं ते. इतरांचेही आवाज येतात. काही कळेनासं होत जातं...

15980_767942.jpg

---
मोबाईल गरजू लागला तशी त्याला जाग आली. रोजचीच सवय. सकाळी आधी जाग येतेच. पण पुन्हा लोळत पडायचं असतं. ते पडलं की मग मध्येच डुलकी लागते आणि ती ताणते काही वेळेस नको इतकी. मग एकदम दुपारी बारा वगैरे. ते टाळायचं असेल तर हा साडेआठचा गजर.

नेहमीचेच प्रश्न यावेळी. 'रात्री इतकं जागरण का केलं? केलं तर केलं, त्यात काय केलं? जास्ती 'झाली' असेल तर का झाली? आज काय-काय आहे?'

जागं झाल्यानंतरची पाचेक मिनिटं पुन्हा अशीच जातात. तशीच त्यानं ती घालवली. डोळ्यांसमोर दिवसाचं चित्र स्पष्ट होत गेल्यानंतर एकदम तो उठून बसला. अनेकदा त्याला हे सांगितलं गेलं होतं की, असं एकदम सरळसोट उठायचं नाही. कुशीवर जाऊन मग उठावं. पण अशा गोष्टींकडं थोडं कुत्सितपणेच पाहण्याची वृत्ती अंगी भिनलेली आहे. त्यामुळं कॉटवरून धा़डकन अंग उचलून उठायचं आणि लगेच वळून पाय बाहेर काढायचे हे ठरलेलं. झोप उडते म्हणे पूर्णपणे त्यामुळे.

सकाळी कलेक्टरांची प्रेस, पाठोपाठ पालकमंत्र्यांची प्रेस, दुपारी तीनला सरस्वती महाविद्यालयातील परिसंवाद, संध्याकाळी कंट्रोल रूम. बास्स. डोळ्यांसमोर आलेल्या या चारही असाईनमेंट कालच लिहिलेल्या आहेत. परिसंवाद तानाजी करेल. अगदी वाटलंच तर आपण चक्कर मारायची हे त्यानं ठरवलेलं होतं.

'कलेक्टरांची प्रेस सकाळी कशी? एरवी ती केव्हाही दिवसभराचं काम संपल्यानंतर...' कालपासून त्याच्या डोक्यात हा प्रश्न घुमत होता. संध्याकाळी त्यानं त्यांना फोनही केला होता. पण त्यांनी काही दाद लागू दिली नाही. "या की भेटायला. का यायचं नाही?" असं म्हणत त्यांनी त्यालाच निरुत्तर केलं होतं. विषय काय हा मुद्दा इतर मार्गानं त्यानं छेडण्याचा प्रयत्न केला, पण दाद लागली नाही. इतकंच नव्हे तर, "आता माझं बोलणं झाल्यानंतर देशमुखांना नका करू फोन. उगाच वाया जायचा", असा टोलाही मारला होता.

'मनीष अवस्थी. सुधारणार नाही' इतकीच त्याची प्रतिक्रिया होती. देशमुख म्हणजे अवस्थींचे पीए. अवस्थींना त्याचे आणि देशमुखांचे संबंध चांगले ठाऊक होते म्हणून त्यांनी तो टोला मारला होता... त्याच्या डोळ्यासमोरून कालचा हा छोटा घटनाक्रम गेला. एकूण कलेक्टरांची प्रेस सकाळी का हे काही कळलंच नाहीये, म्हणजेच जावं लागेल.
आवरायला अर्धा तास. त्याआधी पहिली सिगरेट, मग पेपर. म्हणजे एकूण वेळ सव्वा ते दीड तासांचा. तेवढा वेळ त्यानं घेतला. गाडीला किक मारून कोपऱ्यावरच्या 'सायली'वर मिसळपाव आणि चहा घेऊन तो निघाला.

---

कळा पुन्हा तशाच. थोड्या वेगळ्या. म्हणजे त्या येतात सर्वांगातून. पण जाणवताना फक्त छातीच्या भागातील जाणवतात. इतर कळांची कदाचित सवय झाली असावी. असावी कशाला झालीच आहे. त्यामुळंच तर आता आपण कपाळाची उजवी बाजूही उशीला टेकवू शकतो आणि ती उशीवरून उचलतानाच कळतं की, तिथंही कळा आहेतच. बाकीच्या कळा मात्र छातीच्या भागात आहेत. उजवं अंग किंचित हललं की, तिथली बरगडी न बरगडी दुखू लागते. त्यातही सर्वांत खालच्या बरगड्यांची कळ अधिक तीक्ष्ण असते. न कळतच अंग आपसूक पुढं सरकून ती कळ घालवण्याचा प्रयत्न करतं. न-कळत म्हणजे अगदी न-कळत. आपल्याला कळायच्या आतच गादीवरून अंग उचललेलं असतं.

आठवत कसं नाहीये पण या कळांचं कारण? आज किती दिवस झाले असावेत इथं पडून? तीन? चार? सहा?... कुणास ठाऊक... कळा येतात कधीपासून ते मोजणार कसं? मोजण्यासाठी आधी प्रकाश आणि अंधार कळावा लागेल. तो तर इथं नसतोच. म्हणजे अंधार नसतो. प्रकाशही नसतो. अंधूक असं काहीतरी असतं. त्यात आपल्याला काय दिसणार म्हणा? उजव्या कपाळावरून आलेली पट्टी डोळा झाकून गेलेलीच आहे. डावीकडचा डोळा उघडा आहे. पण तो जिथं टक लावून आहे तिथं आणि त्याच रेषेत फिरू शकतो. इतरत्र फिरवायचा म्हणजे अंग हलवणं आलं. अंग हलवायचं? नक्को... काही पहायला मिळालं नाही तरी चालेल. पण अंग हलवणं नक्कोच. म्हणजे प्रकाश आणि अंधार कळत नाही. म्हणून दिवस नाही. म्हणून या कळा कधीपासून ते कळत नाही. म्हणूनच कळांचं कारण कळत नाही.

शेवटचं काय आठवतंय? स्ट्रेचरवरून आणलं गेलं ते. त्याआधी? अंधार. सगळा अंधार. त्याआधी? काहीही नाही. स्ट्रेचरवरून आणल्यानंतर? कळा. फक्त कळा. आणि ही गादी, डाव्या हाताच्या वरच्या बाजूला दांडक्याला लटकवेली बाटली. त्यातून निघालेली ट्यूब. त्यानंतर? त्यानंतर काय? काही नाही. कळा आणि केवळ कळा.

उजव्या खांद्याच्या बाजूनं कळेचा एक झोत निघालाय. न-कळतच खांदा उडतोय. ओठ वळलेत पूर्ण आतमध्ये. तोंडातून येणारा आवाज रोखत. आssss... पुढच्या 'ई'च्या वेळी मात्र पुन्हा एकदा बरगडीतून कळेचा झोत. 'ई'चा तोंडातून स्फोट होतोय. पण पुढं कळ... ती जिरवण्यातच क्षणापेक्षा जास्त काळ जातो. मग शक्तीच नसल्यानं त्या 'ई'चा आवाज होत नाही... आवाजच नाही तर ती तरी कशी समोर येणार? अर्थात, तिला थोडीच हाक मारतोय म्हणा आपण. ती आहेच कुठं?

हा स्फोट कुणी सांगितला होता? आवाजाचा म्हणे आधी स्फोट होतो. मग तो ऐकू येतो वगैरे. हां, तो मास्तर पण औरच होता. सांगायचा सगळ्या गोष्टी. खरं काम होतं सांगायचं ते अर्थशास्त्र आणि समाजाची सध्याची स्थिती. ते सांगायचा, त्यापेक्षा इतर गोष्टी अधिक सांगायचा. त्यातलीच ही एक. कुठला तरी संस्कृत दाखला द्यायचा.

आपलंही डोकं असं ना, काहीही ध्यानी ठेवतं. त्या स्फोटाची आठवण आत्ता इथं इतक्या कळांनी मरण समोर दिसत असताना का यावी? काहीही...

---

अवस्थींनी घड्याळात पाहिलं. सव्वानऊ. म्हणजे पाऊण तास हाती आहे. निर्णय घेण्यासाठी. दहा वाजताची पत्रकार परिषद. अवस्थींना एरवी इतका वेळ लागत नाही निर्णय करण्यासाठी. पण आजचा महत्त्वाचा. निर्णय काहीही घेतला तरी पंचाईत हे नक्की आहे. पंचाईत म्हणजे त्यांचीच पंचाईत. 'हो, पुढं जायचं,' हा निर्णयही पंचाईत करणारा. 'नाही,' हा निर्णयही पंचाईतच करणारा. पहिला निर्णय म्हणजे पालकमंत्री अडचणीत. भावी मुख्यमंत्री अडचणीत. म्हणजेच आपलं करियर अडचणीत. दुसरा निर्णय म्हणजे आपल्या तत्वांशी प्रतारणा. म्हणजे मानसिक स्वास्थ्य गमावणं, म्हणजे आपण अडचणीतच. अवस्थींसमोरचा पेच अगदी स्पष्ट होता. अनुप्रिताला विचारावं का? अवस्थींच्या मनात क्षणभर एक वावटळ उमटली. नकोच, तिचं उत्तर असणार ते पहिल्याच पर्यायाचं! मग निर्णय आपणच करूया. त्यांनी तेवढ्यापुरता निर्णय केला. क्षणात त्यांच्या चेहऱ्यावर एक सौम्य हास्यही पसरलं. "आपल्यातला पुरूष तसा संपणार नाहीच. तिचा निर्णय तोच येणार इतकं ध्यानी येताच, आपण स्वबळावर निर्णय करू पाहतो. कारण काय तर, तोच निर्णय झाला तर थोडं श्रेय तिलाही जाईल आणि ते नको जायला... भरपाई केली पाहिजे..." त्यांच्या चेहऱ्यावरच्या हास्याचं हे कारण त्यांच्याच मनात उमटून गेलं. अवस्थी विचारात पडले.

पावणेदहाला अवस्थी गाडीत बसले तेव्हा त्यांचा निर्णय झाला होता. पण आधी डोक्यात आले होते त्या पर्यायांच्या हिशेबात नाही. अवस्थींची विचारमाला जशी पुढे जात राहिली तसं त्यांच्या ध्यानी येत गेलं की, दुसरा निर्णय आपल्याला अधिक महागात पडणार आहे हे नक्की. पण तो महाग पडण्याची सारी चौकटच मुळी खूप कठीण आहे. "आपल्या तत्त्वांना मुरड घालता येणार नाहीये हे आपल्याला कायमचंच ठाऊक आहे. त्यामुळं कुठल्याही निर्णयासंबंधात असा पेच आला की, आपल्यापुढं हे दोन पर्याय हमखास येतात. आपण हकनाक त्यांचा विचार करत बसतो. खरं तर दुसऱ्या पर्यायाची आधारभूमीच खरी आहे. आपण त्यानुसारच चाललं पाहिजे. गेल्या सात वर्षांच्या नोकरीत आपण एवढंही अद्यापपर्यंत शिकू शकलो नाही... छे..." आणि त्यांचा तो निर्णय झाला.

ऑफिसला पोचल्यानंतर पुढे सरकण्यास त्यांना वेळ लागला नाही.

---

या कळा आणखी किती काळ अशा राहणार आहेत? सांगता येणार नाही आपल्याला. सांगण्याजोगं कळतंय तरी कुठं म्हणा. डोळेही अजून उघडता येत नाहीत. त्यामुळं ते केव्हाचं तरी एक चित्र सारखं डोळ्यांसमोर असतं, डाव्या बाजूला नळी आणि त्याला जोडलेली एक बाटली. स्ट्रेचर. आणखी काही...? काही तरी... काही तरी... हो नक्कीच. ओह्ह... परत ही कळ. उजव्या बाजूलाच बरगडीच्या खाली. झोतच एक. घाम आल्यासारखा वाटतोय...

काही तरी आहे पण हे नक्की... डोळ्यांसमोर काठी येतेय एक. तिच्यामागं निळी गांधीटोपी... पण गांधीटोपी आणि निळी? गडबड आहे काही तरी... पँटवर पट्टा दिसतोय. पण मुख्य म्हणजे छातीपाशी काळी पट्टी. पण वाचता येत नाहीत. कानात डूल आहेत का? चमकतंय काही तरी तिथं. कपाळ... कपाळावर टिळा आहे बहुदा...

आह... असं आहे तर!!! ती काठी आहे. काठी नव्हे. लाठी... एक नव्हे, तीन... डोळ्यांसमोर येतात त्या स्वच्छपणे आता...

उजवा हात वर का सरकतोय? कोपरापाशी घडी होतेय त्याची. अच्छा. बरगडीपाशी खाज आलीय...

तीन लाठ्या... एक डावीकडून, दोन उजवीकडून. खाट्ट! खट, खट, खट... लाठी नव्हे... सळी...

अंधार.

---