कंत्राट
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
रेस्ट हाऊसच्या राजमाची स्यूटच्या अँटेचेंबरमध्ये जयराज मोहिते नवीन भंडारींना निरोप देत असतानाच कोपऱ्यातील फोनची घंटा वाजली. मोहित्यांचे तिकडे लक्ष गेले आणि क्षणात त्यांच्या कपाळावर एक आठी आली. भंडारींच्या भावेश्वरी कार्पोरेशननं जिल्ह्यातील सगळ्या आश्रमशाळा आणि वसतीगृहांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी गणवेष द्यायचे हा निर्णय झाला होता. असं एखादं सकारात्मक पाऊल टाकल्यानंतर त्यांना आता हे नेहमीचे फोन नको होते. कारण किती नाही म्हटलं तरी गेल्या काही दिवसात पालकमंत्री म्हणून घेतलेले असे काही निर्णय त्यांची एक प्रतिमा निर्माण करीत होते आणि भावी मुख्यमंत्री या दिशेनं आश्वासक वाटचाल सुरू झालेली होती. त्यातील ही भर काही क्षण त्यांना एन्जॉय करायची होती. पण...
"सर, रमेशअण्णा आहेत. लगेच बोलायचं म्हणताहेत..." पाळकरांनी सांगितलं तसं मोहित्यांनी एक क्षण त्यांच्याकडं प्रश्नार्थक पाहिलं.
पाळकरांनी चेहरा शून्य ठेवला होता, त्यावरून मोहित्यांच्या ध्यानी आलं फोन महत्त्वाचा असणार. पाळकर अनेकदा अशा गोष्टी ब्रीफ करीत नाहीत. ते मोहित्यांना 'फ्रॉम द हॉर्सेस माऊथ' ऐकायला लावतात. काही काळापूर्वी, बऱ्यापैकी संवाद जुळल्यानंतर खुद्द पाळकरांनीच ते मोहित्यांना स्पष्ट केलं होतं. त्याचं कारणही सांगितलं होतं. "शेवटी मी किंवा कोणीही काम करतो ते तुमच्या स्ट्रेन्ग्थवर. त्या स्ट्रेन्ग्थला आमचीच स्ट्रेन्ग्थ मानणं मूर्खपणाचं आहे. हे आमच्या मंडळींना खपणार नाही, पण वास्तव आहे. म्हणून मला वाटतं की, काही गोष्टी या आपल्या प्रमुखानं - म्हणजेच तुम्ही - थेट ऐकाव्यात. सोर्सकडून." याला ते गंमतीनं 'फ्रॉम द सोर्सेस माऊथ' असं म्हणायचे. हे पाळकर. तेव्हापासून त्यांनी पाळकरांना काही झालं तरी स्वतःच्या ताफ्यात कायम ठेवायचं हे ठरवून टाकलं होतं. सत्तेत नसलेल्या मधल्या चार वर्षांच्या काळातही त्यांनी पाळकरांना स्वतःच्या संस्थेतून पगार देत डेप्युटेशनवर घेऊन ठेवलं होतं. त्याचाच फायदा आत्ता मिळत असलेली उंची.
मोहित्यांनी घाई केली नाही. दारापर्यंत जाऊन भंडारींना निरोप दिला. दार उघडलं तेव्हा बाहेर कोण-कोण आहे हेही त्यांच्या ध्यानी आलं. काहींकडं पहात त्यांनी नमस्कार केला, काहींना केवळ स्मितहास्य पुरेसं होतं. काहींबाबत केवळ नजर पुरेशी होती. मग ते आत वळले.
"हां. बोला अण्णा. काय म्हणताय?" मोहिते अशावेळी खर्जातला खास आवाज लावतात. विशेषतः पक्षाचे पदाधिकारी आणि नोकरशहांशी बोलताना. तोच लागला होता.
रमेशअण्णा जिल्हाध्यक्ष. पण मोहिते त्यांना फारसं कधीही जवळ करीत नव्हते. त्यामुळं आवाजातील ती हुकमत.
पुढं काही मिनिटं मोहिते केवळ ऐकत होते. चेहऱ्यावरचे भाव झपाट्यानं बदलत गेले आणि कपाळावरील आठ्यांची जागा घड्यांनी घेतली. पण ते काही बोलले नाहीत. आधीइतक्याच संथ आणि स्थिर आवाजात त्यांनी "असं? ठीक आहे." इतकीच प्रतिक्रिया दिली आणि मोजून चार मिनिटांनी फोन ठेवला,
पाळकरांकडं पहात मोहित्यांनी, "चला, किती जण आलेत?" अशी विचारणा केली.
"स्थानिक सारे आहेत. दहा मिनिटे आहेत. थोडे थांबू. सकाळ, म.टा., लोकसत्ताचेही येतील."
"अच्छा. वेळ आहे होय अजून!" असं म्हणत मोहित्यांनी घड्याळाकडं पाहिलं आणि ते खुर्चीत बसले. क्षणात त्यांनी काही निर्णय घेतला आणि फोन हाती घेतला.
---
अवस्थींनी सुरवात केल्यानंतर पहिल्या दहाच मिनिटांत तो छिन्नभिन्न झाला होता. अंदाजही नव्हता त्याला की सहा महिन्यांपूर्वीची आपलीच ती बातमी अशी एकदम आज अंगावर येणार आहे. त्यानं तर त्या बातमीचा पाठपुरावाही महिन्यातच सोडून दिला होता. बातमी तशी साधी होती. जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये पुरवली जात असलेली दुधाची भुकटी भेसळयुक्त असल्याचा संशय होता. संशय व्यक्त करणारी मंडळी निनावीच होती, बातमीत तरी. त्याला त्यांची नावं ठाऊक होती. बातमी सिद्ध करा म्हटलं तर पंचाईत आहे हे त्यालाही ठाऊक होतं. पण त्याच्याकडं एक आकडेवारी होती. या शाळांमध्ये एकूण मुलं होती साडेतीन हजाराच्या घरात. त्यापैकी सुमारे हजारावर विद्यार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांत सारखा पचनाचा त्रास होत होता. आणि त्यांच्यावर उपचार झाले होते. हीच काय ती पाठबळ देऊ शकणारी माहिती. अर्थातच, कायदेशीरदृष्ट्या बिनकामाची.
"जिल्ह्यातील आश्रमशाळांना दुधाची भुकटी आणि इतर खाद्यपदार्थ पुरवण्याचे 'सात्विक समुहा'चे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. या संस्थेने पुरवलेल्या भुकटीत भेसळ असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळं संस्थेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे..."
अवस्थींचं पहिलं निवेदन असं सुरू झालं होतं. तिथून पुढं मग त्याला फारसं काही ऐकावं लागलं नाही. बाकी बातमी त्याच्याकडं सहा महिन्यांपासूनच होती. तरीही तो बसून होता. काहीही विचारत नव्हता. अवस्थींनीच त्याला विचारलंदेखील एकदा, काही प्रश्न आहेत का तुमचे, असं अगदी स्पेसिफिकली. त्यानं मान नकारात्मक डोलावली.
आपली नजर चहुकडे ठेवूनच तो बसून होता. विषय सोपा नव्हता. आपलं बोलणं संपल्यानंतर अवस्थींनी माईक गवारींकडे सोपवला. आदिवासी प्रकल्प. यात अवस्थींची खेळी होती. मुख्य निवेदन त्यांनी केलं असलं तरी, ते सगळं आदिवासी विभागाकडूनच आलेलं असणार. त्यांच्याकडूनच त्यांनी करून घेतलं असणार हे त्याच्या ध्यानी आलं. पण तो गप्प राहिला. गवारी बोलले. नमुने कोठून घेतले, चाचणी कोठे केली वगैरे सारा तपशील पुढे आला.
पण एक झालं. गवारींचं बोलणं सुरू झालं तेव्हाच उजव्या बाजूनं एक हालचाल झाली. कडेनं पुखराज बारवाले उठला आणि बाहेर गेला. त्याच्या लक्षात आलं, गडबड झाली. त्यानं सूचकपणे अवस्थींकडं पाहिलं. सहा महिन्यातील रॅपो असा इथं कामी येत होता. अवस्थी शांत होते. काहीही प्रतिक्रिया न देता. ठीक तासाने पत्रकार परिषद संपली.
इतर व्यवसायबंधूंसह तो उभा होता तेव्हाच देशमुख तिथं आले. थेट त्याच्याकडं येत म्हणाले, "येतोस का चहाला दुपारी?" दोघांची वैयक्तिक मैत्री इतरांना ठाऊक असल्यानं तो गेला असता तरी त्यात कोणी पडलं नसतं, पण त्यानं मात्र शांतपणे नकार दिला. "ठीक आहे. बघ. प्यावासा वाटला तर ये. तुझ्या खोलीवर काही चहा होतच नसणार," एवढं बोलून देशमुख पुढे निघून गेले.
बातमी किती मोठी आहे हे कोणीही बोलण्याची गरज नव्हतीच. प्रश्न इतकाच होता की पुढं काय?
"काही नाही. रेस्ट हाऊसवर जाऊ. चौकशीचा आदेश दिल्याची बातमी घेऊ," तो इतरांना उद्देशून म्हणाला. संदर्भ पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचाच होता. साऱ्यांची पावले रेस्ट हाऊसकडं वळली. पाचच मिनिटांचं अंतर. रेस्ट हाऊसवर गेल्या-गेल्या त्यानं राजमाचीकडं न जाता जाधवांच्या खोलीकडं पावलं टाकली. इतरांना करंगळी उंचावून खूण करत पुढं जाण्यास सांगतच. जाधवांच्या खोलीत - म्हणायचे जाधवांची खोली, प्रत्यक्ष रेस्ट हाऊस व्यवस्थापकाचा कक्ष - टेलिफोन होता, तिथून त्यानं आधी देशमुखांना फोन लावला. "कधी?" "रक्कम किती होते?" "किती दिवसांसाठी?" एवढे तीनच प्रश्न त्यानं इकडून विचारले होते. काही क्षणातच फोन ठेवून तो राजमाचीच्या दिशेनं चालू लागला.
---
डोळे उघडताहेत. वा. हे एक बरं झालं. आता काही पाहता तरी येईल. पण डोळ्यांवर पट्टी दिसतेय. आतल्या आत पापणी उचलली जातेय, पण पुढं अंधारच आहे. पापणी खरंच उचलली जातेय का? की भासच तोही? नाही. उचलली जातेय. काही हालचालही जाणवते आहे का? हो बहुदा. नर्स? डॉक्टर? तानाजी? कोण असावं? ओठ हलतात, पण आवाज येत नाहीये. थोडा जोर लावला तर मात्र कळ येतेय. छातीच्या खालूनच...
स्ट्रेचरच्या आधी काय झालं होतं? नेमकं कोण होतं? कपाळावर टिळे? शर्टावर छातीपाशी पट्टी... कोण?
आssssssss पुन्हा एक जोरदार कळ. यावेळी ही कळ गुडघ्याच्या खालून आहे. उजव्या गुडघ्याच्या. तिथंही मार बसलाय की काय? आपल्याला आठवतात ते डोक्यावर बसलेले फटके. त्यापलीकडे या कळाच इतर फटक्यांची जाणीव करून देणार बहुदा...
फटके किती बसले असावेत? आपण होतो तरी कुठं त्यावेळी? काही आठवत नाही. हे भान तरी कायम आहे हे खूपच म्हणायचं का? बोलता येत नाही, पाहता येत नाही, ऐकता येतं, पण त्यावर रिअॅक्ट होता येत नाही... हालचालही करता येत नाही. असा अजून किती काळ जाऊ द्यावा लागेल कोणास ठाऊक? पण काही असो आधी तोंडातून उच्चार आले पाहिजेत. मग बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील...
---