दिवाळी अंक २००९

कंत्राट

श्रावण मोडक

"आश्रमशाळा आणि वसतीगृहांना दुधाच्या भुकटीचा भेसळयुक्त पुरवठा झाल्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय सरकार घेईल. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय असेल..." मोहित्यांनी घोषणा केली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतेच. अवस्थींच्या प्रेसमधून बारवाले बाहेर पडला तेव्हाच त्याला हे समजून चुकले होते की, मोहिते सारवासारव करणार. ती करायची त्यांची शैली अधिक आक्रमक असणार. म्हणून ते उच्चस्तरीय चौकशी वगैरे जाहीर करतील. इथे फरक तसा किरकोळ होता, सीआयडीकडे तपास. तोही पुढच्या टप्प्यात अपेक्षित होताच.

मोहित्यांचे निवेदन तसे त्रोटक होते. 'मला एवढेच सांगायचे होते" असे म्हणत त्यांनी सीआयडी चौकशीची घोषणा संपवून टाकली. प्रश्नांच्या तयारीत ते होते.

"या गैरप्रकाराची, फसवणुकीची माहिती तुम्हाला केव्हा मिळाली?" सुधाकर वेणकर, म. टा.

"अहो, आम्ही पालकमंत्री आहोत. योग्यवेळीच आमच्याकडे माहिती आलेली असते. हा प्रश्नच मला समजत नाहीये..."

"कलेक्टरांची प्रेस आत्ताच झाली, आत्ताच हे सगळं बाहेर येतंय, त्याच्या बातम्याही होण्याच्या आधी तुम्ही इथं सीआयडीचा निर्णय..."

"तुम्ही आमचं कौतूक करताहात की...? खरं तर, यात आत्ताच वगैरे काही. सहा महिन्यांपूर्वी या बातम्या आल्याच होत्या..." पालकमंत्र्यांनी त्याच्याकडं पाहिलं आणि सूचक हास्य केलं.

"सात्विक समुहाचे मालक हितेंद्र भंडारीच आहेत ना?" त्याचा प्रश्न सणकन मोहित्यांवर आदळला... "हितेंद्र आणि नवीन हे दोघंही बंधू. त्यांचा तो एकत्रित समूह आहे. या समुहाकडे राज्यातील अन्य १२ जिल्ह्यांसाठीचे पुरवठा कंत्राट आहे हे खरे आहे का?"

मोहित्यांच्या कपाळावरच्या आठ्या किंचित टोकदार झाल्या. पण क्षणभरच. "त्याची चौकशी करण्याचा आदेश मी सचिवांना दिला आहे. त्यातून नेमके तथ्य समोर येईलच."

"या समुहाकडील, किमान अन्न-पदार्थाच्या पुरवठ्याचे इतर जिल्ह्याचे कंत्राट काढून घेण्याचे धाडस सरकार दाखवू शकेल का?" तो आता थांबायला तयार नव्हता.

"कसलाही दोष इतर जिल्ह्यांमध्ये दिसत नाहीये. त्यामुळं तसं करता येणार नाही..." मोहिते म्हणाले. पण त्यात जोर नव्हता. एकूण परिस्थिती हातून निसटते आहे अशी चिन्हे दिसू लागली होती.

"कंत्राटविषयक नियमानुसार एका जिल्ह्यात अपात्र असलेला सरकारी यादीतून अपात्र ठरतो..." पुन्हा तोच. मुद्दा न सोडता रेटायचा हे जुनं कौशल्य.

"चौकशीत ते सारं समोर येईलच..."

मोहिते अशी दाद लागू देणार नाहीत हे त्याच्या ध्यानी आलं. तेव्हा मात्र क्षणात त्याचा निर्णय झाला. देशमुखांकडून आलेली माहिती एक्स्क्लूझिव्ह होती. म्हटलं तर त्याच्या अंकात ती पहिल्या पानावर एकीकडे जिल्हाधिकारी आणि एकीकडे पालकमंत्री अशीही गेली असती. पण क्षणात त्याचा निर्णय झाला.

"आज तासापूर्वीच नवीन भंडारी तुम्हाला इथंच भेटून गेले..." त्यानं सूर प्रश्नार्थक ठेवत वाक्य अर्धवट सोडून दिलं.

"हो भेटून गेले..."

"हे खरं आहे का की त्यांना आश्रमशाळा आणि वसतीगृहांतील विद्यार्थ्यांसाठी गणवेष पुरवण्याचे कंत्राट हवे आहे?"

मोहित्यांनी नकारात्मक मान डोलावली, "ते मला ठाऊक नाही. आमचं बोलणं सातारा जिल्ह्यात ते स्थापन करीत असलेल्या महिलांच्या पतसंस्थेविषयी झालं."
त्याच्यादृष्टीने हेच पुरेसं होतं. "अरे वा, साताऱ्यातील पतसंस्थेविषयी इथे चर्चा... छान!" असं म्हणून त्यानं त्याच्यापुरता विषय संपवला. आणि मोहित्यांनीही पत्रकार परिषद आवरती घेतली.

---

वेदना... जाणवतात की... नाही?... का ही क्ळत नाही... कितवा दिवस असावा हा... आssssss... कळ आहे कुठंतरी... कुठं?... पायात आहे... छा ती त ही...

---

नवीन भंडारींच्या गाडीनं पॅरामाऊंट हॉटेलच्या आवारात प्रवेश केला तेव्हा ते खुशीत होते. स्वाभाविकच होतं. मोहित्यांशी झालेल्या चर्चेत पुढच्या गोष्टी ठरल्या होत्या. कापड, खाद्यान्न या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या आणि एका विभागात तरी आता आपली मोनॉपली होणार हे नक्की होतं, त्याचीच ही खुशी होती. पण ती अल्पजीवी असेल हे त्यांना ठाऊक नव्हतं. भंडारींना पाहून हॉटेलचा मॅनेजर एकदम ताडकन उठून उभा राहिला. त्यांनं विश केलं आणि समोरच्या रजिस्टरमधून एक स्लीप काढून त्यांच्या हाती ठेवली. सहा फोन. एक ग्रूप ऑफिसमधून. दोन मोहित्यांचे सचिव पाळकर यांचे. इतर असेच. पाळकरांचं नाव पाहून भंडारींच्या कपाळावर आठ्या आल्या. काय गडबड? पाहिलंच पाहिजे. पाळकर कुठं असतील आता? आपल्या भेटीनंतर दोन तास झाले आहेत. मोहिते भवनावर असतील तर पाळकर तिथंच भेटतील, पण नसले तर...? भंडारींनी पी.ए.ला आवाज दिला, "देशमाने..." आतल्या विंगकडे पाणी पिण्यासाठी सरकलेला हिंमत तसाच मागं वळला.

"कंट्रोलला पहा जरा मोहित्यांचं लोकेशन कुठं आहे ते..."

देशमानेंना क्षणभर काही कळेनाच. आत्ता दोनेक तासापूर्वी झालेली भेट आणि पुन्हा त्यांचीच चौकशी? पण पुढे लगेच भंडारींचा आवाज आला, "लगेच पहा. पाळकरांशी बोलायचंय..."

मनातल्या मनातच देशमानेनं सुटकेचा निश्वास सोडला आणि तो रिसेप्शनच्या शेजारी असलेल्या कक्षात शिरला. मॅनेजरचा कक्ष. भंडारींच्या माणसांसाठी तिथं मुक्त प्रवेश, कारण कायमचं गिऱ्हाईक. भंडारी स्वतः, शिवाय त्यांच्या ग्रूपसाठीचं कायमचं बुकींग.

"नमस्कार. पोलीस कंट्रोल रूम. एएसआय पाटील बोलतोय..."

"पाटीलसाहेब, हिंमत देशमाने बोलतो. नवीन भंडारीसाहेबांचा पी.ए..."

पुढं मग वेळ लागला नाही. मोहित्यांचं लोकेशन रेस्ट हाऊसच होतं. देशमानेनी पुन्हा एक सुस्कारा सोडला असावा. कारण आता कॉण्टॅक्ट सोपा होता. नाही तर एरवी मंत्री आहे तिथं त्याचा सेक्रेटरी सापडेलच असं नसतं आणि भंडारींना सारं काही झटापट लागतं. त्यांनी लगेच रेस्ट हाऊसला फोन लावून पाळकरांना लाईनवर घेतलं आणि तिथूनच फोन आत भंडारींकडं वळवला आणि लगोलग ते स्वतः आत शिरले.

---

"वी हॅव टू टेक अ स्टेप बॅकवर्ड, नवीन." मोहित्यांनी खर्जातला सूर जाणीवपूर्वक बाजूला ठेवला. भंडारीकडं अशा वेळी तो चालायचा नाही याची त्यांना कल्पना होती.

"व्हाय? नाही. मी पैसा गुंतवला आहे तुमच्या भरोशावर. अशी कशी माघार?"

"नवीन, गुन्हा नोंदवला आहे. तू नाही, पण तुझ्या भावाचा प्रश्न आहेच. तुमचे किमान दोन जण आत जातील..."

"काही होत नाही. केस सुरू राहील. ती चालू द्या. इतर कॉण्ट्रॅक्टमध्ये त्याचं किंवा सात्विकचं नाव नाही घ्यायचं एवढं पाहू... तुम्ही थोडा बदल करा."

"सोपं नाहीये. मीडिया सुटेल आता. आधीपासून त्यांना कुणकूण होतीच. अवस्थी कुठलीही गोष्ट अर्धीकच्ची करत नाही. माघार घ्यावी लागेल."

"मीडियाची चिंता तुम्ही माझ्यावर सोपवा. अवस्थीचं पहा."

"अवस्थीला नाही हात लावता येणार. बोंब होईल. महागात जाईल."

"नाही मोहितेसायब. तसं नाही. अवस्थीचा सगळा भरोसा आहे तो गवारीवर. तुम्ही फक्त गवारीला उचला. बाकी मी पाहतो. मीडिया बंद होईल..."

"काय करणार आहेस तू?" मोहित्यांच्या स्वरात चिंता होती हे पाळकरांच्याही लक्षात आलं.

"मी काही करणार नाही मोहितेसाहेब. मीडिया बंद होईल इतकंच."

"नको. काही करू नका. मी पाहतो काय करायचं ते..." मोहिते अस्वस्थ झाले. पाळकरांच्या ते लक्षात आलं. भंडारी हे प्रकरण कधी ना कधी अवघड जाईल असा त्यांचा अंदाज होताच, ती वेळ आली की काय असं वाटून तेही थोडे हबकले. आत्ता कुठं मुख्यमंत्रीपदाच्या जवळ जाण्याची सुरवात होतेय आणि तितक्यात इथं असं काही झालं तर...? हा त्यांच्याही भविष्याचाच प्रश्न. पण त्यांच्यातला अट्टल अधिकारी जागा झाला. सावरत त्यांनी मोहित्यांकडे पाण्याचा ग्लास नेला. मोहित्यांनी त्यांच्याकडं पाहिलं आणि ते पुढं बोलू लागले.

"नवीन काही करायचं नाही. मी हाताळतो. मी मघाशी म्हटलं तसं तुमच्यातील दोघांपुरतं ते मर्यादित राहील हे पाहतो..."

"साहेब, प्रश्न मोठा आहे. प्रश्न केवळ तीनशे कोटींचा नाही. म्हणजे राज्याची सम घेतली तर... त्याच्या जोडीनं आमच्या आणि तुमच्याही इभ्रतीचा आहे. म्हणूनच तुमच्या आणि आमच्याही भविष्याचा आहे. हे इथंच थांबलं नाही तर सगळा सत्यानाश हे नक्की."

"नवीन, म्हणूनच विचार करून काय ते करावं लागेल..."

भंडारीचं फक्त हास्य ऐकू आलं मोहित्यांना आणि त्यांनी फोन बंद केला.

---

"डॉक्टर, तो शुद्धीवर आहे असं म्हणता येईल का?"

"अर्थात. डोक्याच्या भागातील मार आणि चेहऱ्याचे स्नायू त्यामुळे विकल झाले असल्याने त्याच्याकडून काहीही होणार नाही. पण तो शुद्धीवर आहे. त्याची विचार प्रक्रिया सुरू असणार हे नक्की."

हे शब्द कानावर येतात. कळतात. पण पुढं काय? कळा...

अवस्थींचा आवाज आहे का हा? बहुदा तेच.

आणखी एक. आपल्याला चेहऱा असल्याची जाणीवही होत नाहीये... हे आत्ता लक्षात येतंय. डोळे उघडल्याची जाणीव झाल्याची एक आठवण आहे पुसटशी...
आता तर डोळ्यांपुढं अधार आहे हे कळतंय. बाकी फक्त कळाच...

---