दिवाळी अंक २००९

कंत्राट

श्रावण मोडक

"मुख्यमंत्र्यांविरुद्ध गाऱ्हाणं घेऊन मोहिते दिल्लीला" या बातमीत वाहिन्या गर्क होत्या तेव्हा गावांत दंगा उसळला होता. अवघ्या तीन तासांत. ही दंगल आटोक्यात आणण्यासाठी अवस्थींना आणि पोलीस प्रमुख राजीव दयाल यांना तीन मुख्य निर्णय करावे लागले. पहिला संचारबंदीचा. मोहित्यांचा विरोध डावलून दयालांच्या सूचनेनुसार अवस्थींनी संचारबंदी लावली. दुसरा निर्णय होता तो नवा पुतळा तात्काळ करून त्याची संचारबंदीच्याच काळात प्रतिष्ठापना करण्याचा. पुन्हा मोहित्यांचा विरोध. तिसरा निर्णय ऐनवेळी घ्यावा लागला. लोकमान्य नगरात ओळीने वृत्तपत्रांची कार्यालये होती. तिथं जमावाकडून दंगा सुरू झाला तेव्हा गोळीबार करण्याचा. अर्थात, हा निर्णय स्पॉट डिसिजन होता.

अस्वस्थ अवस्थी विचारांत होते. लोकमान्य नगरातील हल्ल्यात नेमके तीन बातमीदार कसे ठोकले जातात?

गावाला दंगलीचा इतिहास नाही. कोणत्याही स्वरूपाचा. मग ही दंगल कशी झाली? पुतळा विटंबना झाली हे खरं, पण पुतळा काही कोणा फार मोठ्या लोकनेत्याचा नव्हता. स्थानिक, तेही वार्डापुरतं मर्यादित व्यक्तीमत्व ते. तरीही दंगल पेटते आणि ती तीन तासांत गावात पसरते याचा अर्थ काय?

सात्विकचं प्रकरण वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरून आत जाण्यास एवढी दंगल पुरेशी होती.

अवस्थी खुर्चीतून उठले. अँटी-चेंबरमध्ये जाऊन बसले. त्यांनी बेल दाबली. बाळाराम आता आला तेव्हा त्यांनी देशमुखांना बोलावण्यास सांगितलं आणि चहा मागवला. बाळाराम निघाला तेव्हा अवस्थींनी त्याला पुन्हा हाक मारली.

"तुला काय वाटतं, तीन तासांत दंगल पसरते, संचारबंदी लावावी लागते आणि त्यानंतर गोळीबार, मग तिसऱ्याच दिवशी गाव शांत होतं... कारण काय असावं?"

खरं तर, अशी चर्चा जिल्हाधिकारी आणि त्यांचा शिपाई यांच्यात होत नसते. पण अवस्थींची ही एक खासीयत होती. ते असं कुणालाही केव्हाही काहीही विचारायचे.

"साहेब, मी काय सांगणार? पण एक आहे, लोकमान्यनगरात दंगेखोर कोण होते हे कळलं पाहिजे नेमकं. तिथं पाणी पुरतंय... मी या गावचा आहे साहेब. ही दंगल नाही असं मात्र मला राहून - राहून वाटतंय..."

अवस्थींनी मान डोलावली आणि बाळाराम बाहेर गेला.

बाळाराम गेला, पण अवस्थींच्या डोक्यात किडा वळवळू लागला. देशमुख आत येताच त्यांनी फर्मावलं, "दयालांना घ्या फोनवर जरा... आणि फोन झाल्यानंतर तुम्ही परत आत या."

"राजीव, आयम वंडरिंग हू आर द पीपल इन लोकमान्यनगर... इलेक्शन्स आर नॉट राऊंड द कॉर्नर. थ्री जर्नालिस्ट्स आर बीटन. धिस इज समथिंग डिफरण्ट राजीव..."

"आय न्यू धिस इज कमिंग... देन अगेन वन ऑफ देम हॅपन्स टू बी..." दयालांनी वाक्य अर्धवट सोडलं. उल्लेख अर्थातच त्याचाच होता हे उघड होतं. अवस्थी आणि तो ही मैत्री तशी खास वर्तुळात माहितीची होती.

दयाल पुढे बोलू लागले, "वेल, द फॅक्ट इज दॅट मोस्ट ऑफ द पीपल - आय हेट यूजिंग धिस वर्ड - आर फ्रॉम स्क्रॅप बिझनेस. सगळेच्या सगळे नाहीत. पण बहुतेक तेच..."

"व्हॉट?" अवस्थी चमकले. तो सूर बोलण्यातही आलाच.

"येस्स. आपल्या तपासात तशीच माहिती पुढे येते आहे. प्रत्येकाचा स्क्रॅपशी काही ना काही संबंध आहे..."

"तुम्ही इथं केव्हा येऊ शकता?"

"सर, यू से अँड आयल बी देअर नाऊ..."

"देन कम."

फोन बंद झाला आणि अवस्थींच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. लोकमान्य नगरातील सारे दंगेखोर स्क्रॅपशी संबंधित? स्क्रॅपचा गावातील म्होरक्या नाना. नाना आणि भंडारी एका बैठकीतले... अवस्थी एकदम सोफ्यातून उठले. तेवढ्यात देशमुख आत आले. त्यांना घेऊन अवस्थी डेस्कवर आले.

"देशमुख, मला लगेच तपशील हवेत. 'सात्विक'च्या केसचं काय झालं?"

"सर, मी तुम्हाला सांगणारच होतो आत्ता, गवारी आलेत. त्यांना तुम्हाला लगेच भेटायचं आहे..." देशमुखांचा सूर ताणलेला.

अवस्थी केवळ त्यांच्याकडे पाहू लागले आणि त्यांनी मान डोलावली. गवारी आत आले.

"गुड इव्हिनिंग सर. देअर इज डेव्हलपमेंट. खरं तर हा शब्द वापरू नये मी. पण इलाज नाही. माझ्या ट्रान्स्फर ऑर्डर आल्या आहेत. पुणे. संशोधन संस्थेत."

सारे संदर्भ क्षणात एका चौकटीत बसले आणि चित्र स्पष्ट होऊ लागलं तसं अवस्थींच्या विचारानं पुढची पायरी गाठली. "हू इज द रिप्लेसमेंट?"

"मला ठाऊक नाही. मी चार्ज सोनावणेंकडं देऊन रीलिव्ह व्हायचं आहे."

"आपण काही करावं असं तुम्हाला वाटतं का?"

"ते मी कसं सांगू?..."

"ठीक आहे. मी पाहतो काय करायचं ते. तुम्ही केव्हा चार्ज द्यायचं ठरवलं आहे?"

"आज शुक्रवार आहे. सोमवारी देईन. बुधवारी पुण्यात जॉईन होईन असं आत्ता ठरवलेलं आहे."

"यू स्पोक टू द कमिशनर?"

"नाही. उपयोग नाही. ते मोहित्यांचंच ऐकतील."

"राईट. लेट्स सी. करंट स्टेटस काय आहे?"

मग गवारींनी सारं ब्रीफिंग सुरू केलं. ते ऐकून घेऊन अवस्थींनी त्यांना थांबायला सांगितलं. राजीव दयाल येणार आहेत हे ते सांगत असतानाच दयाल तेथे पोचले. आणि चर्चा सुरू झाली.

चित्र स्पष्ट झालं तेव्हा संध्याकाळचे साडेसहा झाले होते. दंगल घडवली गेली पद्धतशीर. सात्विकचं वादळ मागं गेलं. दंगलीच्या हाताळणीवरून आरडाओरडा सुरू झाला. गवारींची बदली झाली. दयालांचा नंबर आता लागणार होता.

आणि आपण एकाकी पडत चाललोय हे अवस्थींच्या लक्षात येत गेलं...

एक निर्णय अवस्थींनी त्या क्षणी घेतला. दंगल आणि सात्विक समुहाचा ठेका रद्द होणं याचा संबंध स्पष्ट करणारा अहवाल. अर्थातच गोपनीय. थेट मुख्य सचिव आणि गृह सचिवांना.

---

मुंबईत मोहित्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आपली काहीही गाऱ्हाणी नाहीत हे सांगितलं त्यावेळीच मुख्यमंत्र्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याचं जाहीर केलं. अवस्थींचा अहवाल वृत्तपत्रांकडं कसा पोचला याची चौकशी केली जात आहे, तो प्राथमिक अहवाल आहे वगैरे स्पष्टीकरणं करण्यासही ते विसरले नाहीत. आपल्या आसनाला काही धोका नाही हेही त्यांनी आवर्जून सांगितलं.

---

क ळा थां ब ल्या की का य?...

ना ही. आहेत. हातात आहे कळ... कळ असणं भाग्याचं असावं का? ती असल्यानं आपलं अस्तित्त्व आहे हे कळतंय बहुदा. ती असावीच.

आवाज येताहेत कुणाचे तरी... अवस्थी पुन्हा? बहुदा तेच. हो तेच. सोबत कोण आहे? राजीव? रा जी व? दयाल? ओह्ह...

"राजीव, ही हॅज बिन द व्हिक्टिम... द अदर टू वेअर बीटन सो दॅट धिस डझन्ट अॅपीअर टू बी ब्लॅटण्ट, ऑब्व्हियस..."

काय होतंय नेमकं? काय बोलताहेत हे?

आपल्यावरच्या हल्ल्याविषयी? तो तर भंडारीचा हल्ला... ओह्ह... कळ! आsssssssss...

---

स्थळ : रेस्ट हाऊस. गावात पाहणी करून आलेल्या मुख्यमंत्र्यांचा पत्रकारांशी वार्तालाप.

"या दंगलीमागे नेमके कोण आहेत हे तपासण्यासाठी सीआयडी चौकशीचा निर्णय झाला आहे. गोळीबाराची दंडाधिकारी चौकशी होईल. त्यातून वास्तव समोर येईल..."

"या दंगलीचा जिल्हाधिकारी अवस्थींनी घेतलेल्या काही निर्णयांशी काहीही संबंध नाही... दंगेखोर विशिष्ट समुहाचे असले आणि त्यांचा सात्विक किंवा भंडारींशी संबंध असला तरी दंगलीला पुतळा विटंबना हेच कारण होतं हे स्पष्ट दिसतंय..."

"दंगलीच्या दरम्यान हल्ला झालेल्या पत्रकाराचे निधन झाल्याचे दुःख आम्हालाही आहे. शासनाची त्यांना श्रद्धांजली. पत्रकारांवर हल्ला का झाला हाही मुद्दा चौकशीसाठी आहेच...."

अर्ध्या तासाने मुख्यमंत्री तेथून निघाले तेव्हा त्यांच्या मोबाईलवर एसएमएस होता मोहित्यांचा - "थँक्स!"

मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर पसरलेलं छद्मी हसू त्यावेळी केवळ त्यांच्या सचिवांनाच दिसू शकत होतं आणि त्यानं सुखावून त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य पसरलं होतं!