माणकेश्वराचा पुतळा
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
दहा बारा वर्षं लोटली. पांडुरंग आता तरुण दिसू लागला होता. त्याचा कोवळा आवाज आता फुटला होता. ओठांवर काळी रेघ दिसायला लागली होती. शेतातली कामं, जनावरांचा चारा-पाणी सारं आता पांडुरंग सांभाळायला लागला होता. आईचे कष्ट त्याने आता आपल्या खांद्यावर घेतले होते.
अन याच सुमारास गावात बातमी आली की गावात कुणी एक धर्मचैतन्य महाराज येणार आहेत आणि पुढं असंही कळलं की हे धर्मचैतन्य महाराज म्हणजे माणकेश्वराचा अवतारच आहेत कारण त्यांचं रुप हुबेहुब माणकेश्वराच्या पुतळ्यासारखंच आहे. गावात उत्साहाचं वातावरण पसरलं. लोकांनी धर्मचैतन्य महाराजांच्या स्वागताची जोरदार तयारी चालवली.
धर्मचैतन्यांचं तिकडे शहरांमध्ये मोठं प्रस्थ होतं म्हणे. सार्या भारतभर त्यांचे मठ होते. त्यांची प्रवचनं ऐकायला हजारोंच्या संख्येनं लोक जमायचे. त्यांच्या अनुयायांमध्ये राजकारणी नेते, अधिकारी, मोठे उद्योगपती तर होतेच शिवाय हजारोंनी सर्वसाधारण लोक पण होते. परदेशातही धर्मचैतन्यांची व्याख्यानं व्हायची. तिकडेही त्यांचे बरेच अनुयायी होते. त्यांच्या भजनांची गाणी गणपती उत्सव, नवरात्र अशा सणा-समारंभांना लाऊडस्पीकर लावून वाजवली जायची. लोक घरात यांचे फोटो लावून त्यांना हार घालायचे. असे हे जगद्विख्यात धर्मचैतन्य महाराज गावात येण्याचा दिवस उजाडला. लोकांनी सकाळीच सारं गाव झाडून स्वच्छ केलं. दरवाजांपुढे सडे, रांगोळ्या घातल्या. गुढ्या उभारल्या. पांडुरंगाचं मनही उचंबळून येत होतं. आज साक्षात माणकेश्वरच या गावात अवतरणार होता. पांडुरंगानं सकाळी उठल्या उठल्याच माणकेश्वराच्या पुतळ्याकडे बघितलं. थंडीचे दिवस असल्यामुळे दरीत सर्वदूर धुकं पसरलं होतं. सभोवताल असलेल्या धुक्याच्या पुंजक्यांतून माणकेश्वराचा चेहेरा ध्यानमग्न असल्याचा भास पांडुरंगाला झाला.
दहा साडेदहाच्या सुमाराला धर्मचैतन्य महाराज आणि त्यांचा लवाजमा गावात अवतीर्ण झाला. परदेशी बनावटीच्या गाड्यांचा भला मोठा ताफा धूळ उडवत गावात शिरला. महाराजांच्या नावाचा उद्घोष झाला. मोठे मोठे जयजयकार झाले. सार्या गर्दीत पांडुरंग बिचारा कुठच्या कुठे मागे फेकला गेला. ज्या वेगानं हा सारा ताफा गावात शिरला, त्याच वेगानं महाराज त्यांच्यासाठी मुद्दाम बांधलेल्या विश्राम-गृहात आराम करायला निघून गेले.
गर्दीत रेटारेटी करून पुढे घुसू शकलेल्या आणि महाराजांच्या खास मर्जीतल्या श्रीमंत भक्तांनाच फक्त महाराजांचं दर्शन मिळू शकलं.
"हुबेहुब माणकेश्वराचंच रुप... "
"अगदी शंकाच नको. तस्संच नाक, तस्सेच डोळे... "
चेहेर्यावर काय तेज झळकतंय... " ज्यांना महाराजांचं दर्शन घडलं, ते इतरांना महाराजांचं वर्णन सांगत होते. ज्यांना महाराज दिसले नव्हते ते, ज्यांना दिसले होते अशांच्या भोवती घोळका करून त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत होते. पांडुरंगाला महाराज न दिसल्यामुळे तो हिरमुसला होता. इतक्यात महाराजांच्या विश्राम-कक्षातून भगवे कपडे घातलेला आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळेत महाराजांचा फोटो घातलेला त्यांचा एक शिष्य बाहेर आला.
"हे पाहा, महाराज आता विश्राम करताहेत, त्यामुळे इथे कुणीही गर्दी करू नका. महाराज संध्याकाळी सर्व ग्रामस्थांना दर्शन देतील आणि त्यानंतर महाराजांचं प्रवचन आणि नंतर भजन असा कार्यक्रम होईल. कृपा करून आता इथे कुणीही गर्दी करू नका. " शिष्यानं उच्च स्वरात सांगितलं. खिन्न मनानं पांडुरंग घरी परतला.
संध्याकाळी लवकरच पांडुरंग दर्शन मंडपात जाऊन बसला. हळू हळू लोक जमू लागले. मंडप भला मोठा होता. मंडपात पुढच्या बाजूला मोठ्ठं व्यासपीठ तयार केलं होतं. या व्यासपीठावर मधोमध सिंहासनासारखी खुर्ची ठेवली होती. खुर्चीच्या मागे पूर्ण उंचीचा महाराजांचा ध्यानस्थ बसलेला फोटो लावण्यात आला होता. सिंहासनाच्या खुर्चीच्या गाद्या श्रीमंती मखमली होत्या. खुर्चीवर बसून हात ठेवण्यासाठी तसल्याच मखमली आवरणात गुंडाळलेले लोड ठेवले होते. व्यासपीठाच्या खुर्चीच्या खाली दोन्ही बाजूला गाद्या घातल्या होत्या. त्यांच्यावर पांढरी शुभ्र वेलवेटची आवरणं घातली होती. व्यासपीठावर पितळेची मोठी चकाकणारी समई तेवत होती. तिच्या शेजारीच दोन मोठ्या उदबत्त्या उलट्या टांगून लावल्या होत्या. महाराजांचे शिष्य आणि शिष्या लगबगीनं इकडून तिकडे जात येत होते. लोकांच्या गर्दीनं मंडप भरून गेला. व्यासपीठावर महाराजांच्या सिंहासनासारख्या खुर्चीजवळ तबला आणि पेटी आणून ठेवण्यात आली.
सारं अध्यात्मिक वातावरण यथास्थित जमल्याची शिष्य आणि शिष्यांनी खात्री करून घेतली. सार्या गर्दीची उत्सुकता शिगेला पोहोचली आणि एवढ्यात आरोळी उठली
"धर्मचैतन्य महाराज की जय... "
आरोळीच्या पाठोपाठ मंडपाच्या मागच्या बाजूनं महाराज व्यासपीठावर प्रवेश करते झाले. महाराजांच्या बरोबर त्यांच्या मागे पुढे त्यांच्या दहा बारा खास शिष्याही व्यासपीठावर आल्या. या सार्या शिष्या भगव्या रंगाच्या सॅटीनच्या साड्या आणि तसलेच ब्लाऊज घातलेल्या होत्या. त्यातल्या चार शिष्या महाराजांवर चवर्या ढाळत होत्या आणि बाकीच्या हातात झांजा घेऊन महाराजांचं भजन म्हणत होत्या. बाकी सारा जनसमुदाय महाराजांच्या जयघोषानं निनादत होता.
महाराजांचा प्रवेश तर अगदी नाट्यपूर्ण झाला. महाराज सिंहासनावर येऊन बसले. एका शिष्येनं त्यांना पंचारतीनं ओवाळलं. दुसरीनं दूध आणि पाण्यानं त्यांचे पाय धुतले. सॅटीनच्या साड्यांमुळे या दोन्ही शिष्यांचे पदर सारखे घसरत होते आणि मंद स्मित करत महाराज त्या दोघींच्या साड्यांआडची भरगच्च गोलाई न्याहाळत होते. हे सारे सोपस्कार उरकल्यानंतर, खर्या अर्थानं महाराजांचा चेहेरा सगळ्यांना दिसला. महाराजांनी श्रीमंती पायघोळ कफनी घातली होती. गळ्यात सोन्यामोत्याचे गोफ होते. उजवा हाताचा पंजा महाराजांनी आशीर्वाद दिल्यासारखा कोपरापासून उभा धरला होता.
महाराजांच्या चेहेर्याकडे बघताच पांडुरंगाला प्रचंड धक्का बसला. महाराजांच्या चेहेर्यात आणि माणकेश्वराच्या पुतळ्यात कोणतंही साम्य नव्हतं. माणकेश्वराचं भव्य कपाळ, टपोरे डोळे, मंद स्मित करणारे जाड ओठ, सरळ नाक यातल्या कशाशीच महाराजांचं साधर्म्य नव्हतं. पांडुरंगानं परत परत नीट बघून खात्री करून घेतली. अगदी नक्कीच. हा माझा माणकेश्वर नव्हेच. पांडुरंगानं गर्दीकडे नजर टाकली.
संमोहित केल्याप्रमाणे सगळी गर्दी टाळ्या वाजवत, माना डोलवत महाराजांच्या मागे भजन म्हणत होती. पांडुरंगानं पुन्हा एकदा महाराजांकडे बघितलं. महाराजांचे बारीक बारीक धूर्त डोळे पांडुरंगाला अजिबात आवडले नाहीत. सगळी गर्दी डोळे मिटून भजन म्हणत होती आणि महाराज मात्र गर्दीतल्या स्त्रियांना न्याहाळत होते.
पांडुरंगाला तिथं बसणं असह्य झालं. उद्विग्न मनानं तो घरी आला. घराच्या दरवाजात बसून त्यानं माणकेश्वराकडे बघितलं. माणकेश्वराच्या पाठीमागे कोकणात सूर्य मावळतीला निघाला होता. मावळतीच्या सूर्याची पिवळी किरणं विशिष्ट कोन साधून माणकेश्वराच्या चेहेर्यावर पसरली होती. माणकेश्वराच्या चेहेर्यावर मिष्किल भाव पसरल्यासारखं पांडुरंगाला वाटलं.
"माणकेश्वरा, आज बघितलं ते नक्कीच तुझं रुप नाही. हा कुणी संत महात्माही नाही. " पांडुरंगानं आपली तक्रार माणकेश्वराला ऐकवली. माणकेश्वर मिष्किल हसत राहिला आणि मिष्किल हसता हसताच जणू पांडुरंगाला सांगत राहिला
"धीर धर. ते येतील... अगदी नक्की येतील... "
पहिले काही दिवस गावकर्यांना अगदी ठाम वाटलं की धर्मचैतन्य महाराज म्हणजेच माणकेश्वराचं रुप. परंतु हळू हळू गावकर्यांनाही महाराजांचं 'वचस्ये एकं, मनस्ये एकं' रुप लक्षात यायला लागलं. गावातल्या स्त्रियांनी गाव-प्रमुखाकडे महाराजांच्या लंपटपणाच्या तक्रारी केल्या आणि पंधरावीस दिवसातच महाराजांनी आपलं चंबू-गबाळं गावातून उचललं. माणकेश्वराचा पुतळा तसाच निर्विकल्प, निःस्तब्ध मंद स्मित करत उभा राहिला.