माणकेश्वराचा पुतळा
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
गावाचं रहाट-गाडगं पुन्हा पहिल्यासारखं व्यवस्थित फिरायला लागलं. वर्षांमागून वर्षं लोटली. तारुण्य संपवून पांडुरंगही गृहस्थ झाला. त्याच्या चित्तवृत्ती, स्वभाव, वागणूक सारं काही अधिक परिपक्व झालं. त्यानं धर्मशास्त्रं वाचली, गीतेचं सार वाचलं, रामायण, महाभारत आणि पुराण ग्रंथ वाचले. त्याच्या बुद्धीच्या तेजानं गावकर्यांमध्ये त्यानं मानाचं स्थान मिळवलं.
रोज संध्याकाळी त्याच्या खळ्यात गावकरी जमायचे. त्यानं वाचलेलं तो त्यांना वाचून दाखवायचा. त्यावर विवेचनं करायचा. गावकर्यांच्या शंकांना उत्तरं द्यायचा. वेगवेगळी तत्त्वज्ञानं समजावून सांगायचा. मोठ-मोठ्या शब्दजंजाळात न अडकता साध्या सोप्या शब्दात नीती-अनीती, धर्म-अधर्म, कर्म-अकर्म अशा गोष्टींचं विवरण करायचा. त्याच बरोबर तो गावकर्यांच्या उपयोगीही पडायचा. त्यांची कामं पण करायचा. त्यांच्यातले तंटे-बखेडे अगदी सर्वमान्य पद्धतीनं सोडवायचा. त्यांच्या वैयक्तिक अडचणींमध्ये त्यांना योग्य सल्ले द्यायचा. त्यांना मदत करायचा. गावकर्यांनाही आता पांडुरंगाबद्दल आदर, भक्तीभाव वाटायला लागला होता.
एवढं असूनही पांडुरंगामध्ये अहंकाराचा लवलेशही नव्हता. अपल्या शेतामध्ये तो आजही दिवसभर कष्ट करायचा. जनावरांचा चारा पाणी, शेण-गोठा सारं काही सांभाळायचा. त्याचे कपडे, त्याचं बोलणं-चालणं सारं काही साधंच होतं आणि ते त्यानं कधीच बदललं नव्हतं.
दिवसामागून दिवस जात होते. आणि अचानक गावात पुन्हा बातमी आली, गावात श्री स्वामी समर्थ आत्मानंदजी महाराज येणार होते. बातमी घेऊन येणारे लोक अत्मानंदांबद्दल मोठ्या विश्वासानं बोलत होते. त्यांनी अगदी खात्रीपूर्वक गावकर्यांना सांगितलं की आत्मानंदजी म्हणजे माणकेश्वराचंच रुप. त्यांचा म्हणे कण न कण माणकेश्वराशी मिळता जुळता होता. या पूर्वीचा अनुभव एव्हाना गावकर्यांच्या विस्मृतीत गेला होता. त्यामुळे पुन्हा एकदा सारं गाव उत्साहानं तयारीला लागलं.
आत्मानंदजी मनःसामर्थ्यदात्याचे उपासक होते आणि त्यांच्या भक्तांनाही ते मनःसामर्थ्यदात्याचं नामस्मरण करायला सांगायचे. कुठल्याही भक्ताच्या कुठल्याही समस्येवर ते त्याला सांगायचे "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." भक्तांना म्हणे त्यामुळे सतत कुणीतरी पाठीशी उभं असल्याचा भास व्हायचा! पूर्वी आलेले महाराज स्त्री लंपट होते त्यामुळे त्या धसक्यानं गावकर्यांनी आत्मानंदजींबद्दलही माहिती मिळवली. परंतु माहितगारांकडून त्यांच्या चारित्र्याबद्दल अगदी चांगला अभिप्राय मिळाल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला. माणकेश्वराच्या स्वागतासाठी गाव पुन्हा एकदा सजलं, नटलं.
गावकर्यांची धामधूम आणि उत्साह बघून पांडुरंगाच्या अपेक्षाही उंचावल्या. गावकर्यांनी त्याला दिलेल्या आत्मानंदजींच्या माहितीवरून तर त्याची जणू खात्रीच पटली की आत्मानंद म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून साक्षात माणकेश्वरच. पांडुरंगानं रोजच्या सारखंच पुतळ्याकडे बघितलं.
"तुझं रुप असलेलेल आत्मानंदजी येत आहेत. माणकेश्वरा, तुझं रुप बघण्याचं भाग्य अखेरीस तू आमच्या पदरात टाकलंस... "
माणकेश्वर नेहेमीसारखाच स्थितप्रज्ञ होता. शांत, मंद स्मित करत.
येणार येणार म्हणून गाजत असलेलेल आत्मानंदजी अखेरीस गावात येऊन पोहोचले. पांडुरंगानं गर्दीत धक्के-बुक्के खात दर्शनाला जाण्यापेक्षा संध्याकाळीच त्यांच्या प्रवचनाला जायचं ठरवलं. पण मधल्या काळात आत्मानंदजींना बघून आलेल्या लोकांनी पांडुरंगाकडे येऊन त्याचं रसभरीत वर्णन केलं.
"यावेळेस अगदी तिळमात्र शंकेला जागा नाही. आत्मानंदजी आणि आपला माणकेश्वर म्हणजे अगदी जशीच्या तशी एक दुसर्याची नक्कल. " आणि
"यावेळेस पांडुरंग मी तुला अगदी पैजेवर सांगतो, आत्मानंदजींमध्ये अगदी एकही वैगुण्य तुला शोधूनही सापडणार नाही. खर्या अर्थानं माणकेश्वराचंच रुप. "
ही सारी वर्णनं ऐकून मोठ्या उत्साहानं आणि अपेक्षेनंच पांडुरंग आत्मानंदजींचं प्रवचन ऐकायला गेला. मागच्या वेळप्रमाणेच मंडप गावकर्यांच्या गर्दीनं ओतप्रोत भरला होता. पांडुरंग पोहोचल्यानंतर पाचच मिनिटांनी आत्मानंदजी व्यासपीठावर आले. आधीच्या महाराजांप्रमाणे यांचा प्रवेश नाट्यमय नव्हता. त्यांच्या अवती भवती बायका नाचत नव्हत्या. पण पायघोळ भगवी कफनी यांनीही घातली होती. त्यांच्या हातात एक जाडजूड ग्रंथ होता. त्यांच्यासाठीही व्यासपीठावर सिंहासनासारखी खुर्ची होती. आपल्या खुर्चीत स्थानापन्न होताच त्यांनी उजव्या हाताचा पंजा सगळ्यांना आशीर्वाद देण्याच्या थाटात वर केला आणि मंद स्मित करत सगळ्या सभेवरून नजर फिरवली. सभाजनांचा उत्साह शिगेला पोहोचला. आत्मानंदांच्या जयघोषानं आसमंत भरून गेला. आत्मानंद मात्र सगळ्या सभाजनांना आशीर्वाद देत मंद स्मित करत सर्व भक्त जनांवर कृपा-दृष्टिचा स्रोत फिरवत राहिले.
पांडुरंगानं आत्मानंदांचं नीट निरीक्षण केलं. पुनःपुन्हा मनाची खात्री करून घेतली आणि मग मात्र त्याचा निर्णय नक्की झाला. त्याच्या सार्या उत्साहावर विरजण पडलं होतं. त्याच्या सार्या अपेक्षांचा भंग झाला होता. आत्मानंदजींचं नाक सरळ आणि ओठ जाड होते, पण पुतळ्याच्या आणि त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वात जमीन-आस्मानाचा फरक होता. निराशेनं त्यानं मान खाली घातली.
आलोच आहोत तर निदान यांचं प्रवचन तरी ऐकून जावं असं म्हणून पांडुरंग जागचा हलला नाही. आत्मानंदांनी कबीराच्या एका भजनानं प्रवचनाची सुरुवात केली. आत्मानंदांचा आवाज सुरेख होता. त्यांच्या गायनानं भक्तवर्गाला संमोहित करून टाकलं. भजन संपल्यावर आत्मानंद मुख्य प्रवचनाकडे वळले. मनःसामर्थ्यदात्याचं नामस्मरण केलं गेलं आणि मग आत्मानंदांनी मन म्हणजे काय, सामर्थ्य म्हणजे काय आणि हे सामर्थ्य देणारा दाता कोण याचं विश्लेषण सुरू केलं.
चुरचुरीत आणि विनोदी बोलणं, आपण ज्ञानी आहोत आणि आधुनिक जगाचंही आपल्याला ज्ञान आहे हे दाखवण्यासाठी मधून मधून इंग्रजी वाक्यांची फेक, मनोरंजक किस्से आणि उदाहरणं यांनी आत्मानंदांचं प्रवचन दुथडी भरून वाहत होतं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या प्रवचनात या सार्याशिवाय इतर काहीच नव्हतं. अध्यात्माची अधून मधून उडवलेली फक्त राळ होती.
ते सारं प्रवचन ऐकून पांडुरंगाचं मन उद्विग्न झालं. त्याचा मोठा अपेक्षाभंग झाला होता. दुःखी मनानं पांडुरंग घरी परतला त्यावेळेस अंधार पडला होता. पूर्वेकडून अष्टमीची कोर आकाशात वर आली होती. टिपूर चांदण्यांच्या प्रकाशात दरी न्हाऊन निघत होती. घराच्या दरवाजात बसून पांडुरंगानं पुतळ्याकडे बघितलं. चंद्रप्रकाशात पुतळ्याच्या चेहेर्यावर आध्यात्मिक भाव उमटले होते. पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी तरळलं.
"माणकेश्वरा, कसली परीक्षा बघतोयस बाबा आम्हा सगळ्यांची? "
अन धीरगंभीरपणे पुतळा पांडुरंगाला जणू समजावून सांगत होता
"जरा धीर धर... ते येतील... अगदी नक्की येतील... "
पंधरा एक दिवसातच गावकर्यांना आत्मानंदांची बेगडी धार्मिकता लक्षात येऊ लागली आणि अर्थातच आत्मानंदांच्या लवाजम्यानं लवकरच गावातनं काढता पाय घेतला. गावातली धामधूम निवली आणि गाव पुन्हा रोजच्या व्यवहारांमध्ये बुडून गेलं.
पांडुरंगाच्या खळ्यामध्ये पुन्हा संध्याकाळच्या बैठका घडू लागल्या. वर्षांमागून वर्षं उलटली. पांडुरंगाचे केस पिकायला लागले. त्याच्या चेहेर्यावर सुरकुत्या पडायला लागल्या. त्याचे केस जसे पिकायला लागले तसे त्याचे विचार, त्याच्या बुद्धिमत्तेची प्रगल्भताही वाढत गेली. त्यानं केलेली विवेचनं, मांडलेले विचार आणि त्याचं तत्त्वज्ञान कित्येक वर्षाच्या जीवन प्रवाहाच्या कसोटीवर तपासलं गेलं. मुशीतून काढल्याप्रमाणे तावून सुलाखून निघालं. त्याच्या ज्ञानसंचयाची प्रभा दूरदूर पर्यंत फाकू लागली. पांडुरंगाची कीर्ती त्याचं गाव, त्याची पंचक्रोशी ओलांडून मोठ्या मोठ्या शहरांपर्यंत जाऊन पोहोचली. वेगवेगळ्या विषयांमधले पंडित, ज्ञानी, विचारवंत पांडुरंगाला भेटायला त्याच्या गावी येऊ लागले. पांडुरंगाला तरीही गर्वाचा, अहंकाराचा स्पर्श झाला नाही. या सर्व ज्ञानी विचारवंतांशी तो आदरानं बोलायचा. त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्यात त्याला उपकृत झाल्यासारखं वाटायचं. तर स्वतःचे ज्ञानकण तो सढळ हाताने दुसर्यांना वाटायचा. त्याची मतं तो निर्भीडपणे आणि स्पष्ट शब्दात मांडायचा आणि दुसर्याच्या मतांचा मान राखायचा. त्याचे शुद्ध आणि सात्त्विक विचार जसे त्याच्या कृतीतून नकळत प्रकट व्हायचे तसेच त्याच्या तोंडातून शब्दाद्वारे प्रवाहीत व्हायचे. त्यानं सांगितलेली सत्यवचनं ज्या ज्या लोकांच्या कानावर पडली, त्या त्या लोकांवर ते संस्कार कायमचे घडवले गेले. पांडुरंगाची ही सारी प्रगती एवढी सहज आणि हळुवारपणे होत गेली की गावकर्यांना, त्याच्या मित्रांना लक्षातही आलं नाही की पांडुरंग आता त्या सर्वांपेक्षा खूपच वरच्या पातळीवर जाऊन पोहोचला होता. एवढंच काय पण ही गोष्ट पांडुरंगाच्या स्वतःच्याही लक्षात आली नव्हती.