दिवाळी अंक २००९

माणकेश्वराचा पुतळा

मिलिंद जोशी

या दरम्यानच पांडुरंगाच्या हाती एका थोर तत्त्ववेत्त्याचं एक पुस्तक आलं. या तत्त्ववेत्त्याबद्दल तो बरंच ऐकून होता. परंतु आज प्रथमच त्याचं तत्त्वज्ञान त्याला वाचायला मिळालं. वेदांताची या तत्त्ववेत्त्यानं करून दिलेली ओळख पांडुरंगाला मनोमन भावली. मनुष्यमात्राला असलेलं स्व-स्वभावाबद्दलचं तुटपुंजं आणि चुकीचं ज्ञान, त्यातून उद्भवणार्‍या मर्यादा आणि अशा मर्यादांपासून मोक्ष मिळवण्याचा वेदान्तानं दाखवलेला मार्ग - या सार्‍या गोष्टींचं विवेचन या तत्त्ववेत्त्यानं आपल्या पुस्तकात फार सुंदर रीतीनं मांडलं होतं. पांडुरंगानं हे सारं तत्त्वज्ञान मोठ्या रसग्राहकेतनं वाचून काढलं. ते त्याच्या मनात खोल जाऊन रुजलं.

याबरोबरच आणखीही एक योगायोग घडून आला. या तत्त्ववेत्त्या लेखकाचा जन्म याच भागात झाला होता. परंतु लहान वयातच हा मुलगा शिक्षणाकरता म्हणून शहरात गेला आणि तिकडेच स्थायिक झाला. पुढं शिक्षण घेऊन, वेगवेगळी पारितोषिकं मिळवून आणि तत्त्वज्ञानाचा खूप अभ्यास करून यानं मोठी कीर्ती संपादन केली होती. दिवसभराची कामं संपवून रोजच्याप्रमाणेच पांडुरंग आपल्या घराच्या दरवाजात येऊन बसला आणि माणकेश्वराकडे बघून म्हणाला
"माझी खात्री आहे की हा तत्त्ववेत्ता नक्कीच तुझं रुप असणार. याचं लिखाण, याचे विचार आणि याचं तत्त्वज्ञान एवढं उच्च प्रतीचं आहे! तू वर्णन केलेला तो संत महात्मा हाच असणार. शिवाय याचा जन्मही याच भागातला असल्यामुळे तर मला कुठलाही संदेह उरलेला नाही. "
माणकेश्वर नेहेमीसारखाच स्थितप्रज्ञ होता. शांत, मंद स्मित करत.

उन्हं कलू लागल्यावर रोजच्या प्रथेप्रमाणेच पांडुरंगाच्या खळ्यात गावकरी जमू लागले. पांडुरंगानं अर्थातच नव्यानं वाचलेलं हे तत्त्वज्ञान गावकर्‍यांसमोर मांडलं. त्यातल्या प्रत्येक तत्त्वाचा अर्थ तो सविस्तरपणे गावकर्‍यांना समजावून सांगू लागला. तल्लीन होऊन गावकरी पांडुरंगाचा एक एक शब्द ऐकू लागले आणि याच सुमारास पांडुरंगाच्या दरवाज्यात एक मोटार येऊन उभी राहिली. मोटारीतून साठीच्या आसपासचे नीटनेटके कपडे केलेले एक प्रौढ ग्रहस्थ उतरले. हात जोडत पुढे जाऊन पांडुरंगानं पाहुण्यांचं स्वागत केलं. आदरानं त्यांना तो स्वतःच्या खळ्यात घेऊन आला.

चहा-पाणी आलं आणि मग पांडुरंगानं आस्थेनं चौकशी केली,
"आपण कोण? कुठच्या गावचे? आणि इकडे कसे काय आलात? "
पाहुणे गालातल्या गालात हसत विचार करत राहिले आणि काही वेळाच्या शांततेनंतर मनात काहीतरी नीट जुळवल्यासारखं करून उत्तरले,
"मी मूळचा याच गावचा. पांडुरंग, तुझ्याबद्दल खूप ऐकलं म्हणून मुद्दाम तुझी भेट घेण्यासाठी म्हणून इथे आलो. " आणि थोडसं संकोचत पाहुणे पुढे म्हणाले " अं... आणि माझी ओळख म्हणजे... तुझ्या हातात जो ग्रंथ आहे... तो... माझाच... म्हणजे मीच त्याचा लेखक आहे... "
पांडुरंगाचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना म्हणून त्यानं पुन्हा विचारलं
"काय?... हे पुस्तक... हे सारं तत्त्वज्ञान लिहिणारे लेखक तुम्हीच? "
"अं... हो... माझंच आहे ते. " मंद हसत पाहुणे उत्तरले. पांडुरंगाचा आनंद गगनात मावेना. खळ्यात बसलेल्या गावकर्‍यांना पांडुरंगानं सांगितलं की जे तत्त्वज्ञान आता मी तुम्हाला सांगत होतो, त्याचे खरे लेखक, जनक हेच आहेत. गावकरी स्तिमित होऊन पाहुण्यांकडे बघत राहिले.

आणि मग पाहुण्यांची आणि पांडुरंगाची गप्पांची बैठक रंगली. तास दीड तास दोन्ही बाजूंनी ज्ञानगंगा वाहत राहिल्या, त्यांचा संगम झाला. गावकरी अचंबित नजरेनं ही मैफल बघत राहिले. बोलण्याचा पहिला ओघ जसा सरला, तसं मात्र पांडुरंगाच्यानं राहवेना. त्यानं गावकर्‍यांना उद्देशून म्हटलं, "मित्रांनो, युगानुयुगं, वर्षानुवर्षं ज्या संत महात्म्याची आपण वाट पाहत होतो, तो दिवस आज उजाडलाय. माणकेश्वरानंच या गृहस्थांना इथे जन्म दिलाय आणि माणकेश्वरानंच आज त्यांना पुन्हा इथे आपल्यामध्ये पाठवलंय. ज्याच्या वाटेकडे आपण डोळे लावून बसलो होतो, तेच हे माणकेश्वराचं रुप. मित्रांनो हा सण मोठ्याच उत्साहनं साजरा व्हायला पाहिजे. "
गावकर्‍यांचं आश्चर्य शिगेला पोहोचलं होतं. नक्की काय करायचं हे न कळल्यानं ते तसेच बसून राहिले होते. पांडुरंगाचं मन आनंदानं काठोकाठ भरून गेलं. प्रमोदित चेहेर्‍यानं तो गावकर्‍यांना म्हणाला, "बसू नका, उठा. आपल्या तपश्चर्येला आज फळ आलंय... "

आणि एवढ्यात पाहुण्यांनी पांडुरंगाचं बोलणं तोडलं. गावकर्‍यांकडे वळत पाहुणे म्हणाले,
"मित्रांनो जरा थांबा. आधी मला जरा बोलायचंय. माझा जन्म या गावात झाला असला तरीही माझं सारं आयुष्य शहरातच गेलंय. कित्येक देश, कित्येक शहरं, कित्येक गावं मी बघितली. पण आज माझ्या लक्षात येतंय की इतर कुठल्याही खेड्यापेक्षा हे माझंच गाव अतुलनीय सुंदर आहे. " बोलता बोलता पाहुण्यांचे डोळे भरून आले होते.
"या गावाला निसर्गदत्त सौंदर्य तर लाभलं आहेच, पण इथले लोकही तितकेच सुंदर आहेत. तुमच्या आदरातिथ्यानं मी भारावून गेलोय आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गेल्या तास दीड तासात तुम्ही दाखवलेली साधी सरळ आपुलकी, शहरात वाढलेल्या मला आज पहिल्यांदाच अनुभवायला मिळत्ये. तुमची स्वच्छ मनं पाहून मला, शहराचा तोरा मिरवणार्‍या माझ्यासारख्यांची लाज वाटत्ये. तुम्ही मला माणकेश्वराचं रुप देऊ पाहताय पण खरं तर माझी तेवढी लायकी नाही. "
बोलता बोलता पाहुणे पांडुरंगाकडे वळले आणि म्हणाले
"पांडुरंगा, मी तुझ्या समोर नतमस्तक आहे. हे सारं तत्त्वज्ञान मी लिहिलंय खरं, परंतु आज तुझ्यासमोर मी कबूल करतो की माझं तत्त्वज्ञान आणि माझं आचरण यात खूप फरक आहे. या गावात दोन ढोंगी महाराज येऊन गेलेत आणि खरं सांगायचं तर ... थोड्या फार फरकानं मीही त्यांच्याच रांगेतला आहे. यश, कीर्ती आणि पैसा मला भरपूर मिळालाय. पण हे सारं माझ्या तत्त्वज्ञानानं नाही तर हे सारं मिळवण्याचं शहरी व्यावसायिक गणित मला अवगत असल्यामुळे. हे माझं गाव आहे आणि माझ्या गावातल्या लोकांच्या सरळ, साधेपणानं मी आज पश्चात्तापदग्ध झालोय. आणि म्हणूनच म्हणतो मला माणकेश्वराचं रुप समजण्याची चूक कृपा करून करू नका... " पाहुण्यांच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली होती. शरमेनं त्यांनी चेहेरा खाली घातला होता. सारा जनसमुदाय आ वासून पाहुण्यांकडे बघत होता.

आपल्या अश्रूंना कुठलाही आवर न घालता पाहुणे परत पुन्हा बोलू लागले,
"मित्रांनो माणकेश्वराचं रुप असलेल्या संत महात्म्याला कुठे वेड्यासारखे जगभर शोधताय? " अन पांडुरंगाकडे हाताने दर्शवत ते म्हणाले "तुमच्या समोर माणकेश्वराचं हे साक्षात रुप उभं असताना तुम्ही कुठच्या महाराजांच्या आणि बुवाच्या शोधात आहात? जरा विचार करा. या माणसाचे आचार आणि विचार दोन्हीही ईश्वराचीच साक्ष देतात, असं नाही वाटत तुम्हाला? या माणसाच्या चेहेर्‍याकडे कधी नीट बघितलंत? बघा, अजूनही नीट बघा. बघा ही माणकेश्वराच्या शिल्पाची सही सही नक्कल नाही? मित्रांनो तुमचा पांडुरंग हाच तुमचा माणकेश्वर आहे... "

गावकर्‍यांच्या आश्चर्याला सीमाच उरली नाही. अनिमिष नेत्रांनी ते परत परत माणकेश्वराच्या पुतळ्याकडे आणि पांडुरंगाच्या चेहेर्‍याकडे पाहत राहिले. हा सारा वेळपावेतो पांडुरंग मात्र अगदी शांत होता. त्यानं माणकेश्वराच्या पुतळ्याकडे बघितलं, डोळे मिटले आणि मनातल्या मनात पुन्हा एकदा त्यानं माणकेश्वराला विचारलं, "माणकेश्वरा, आता तरी सांग. खरंच तो तुझा स्वरुप असलेला... तो संत महात्मा आम्हाला कधी दिसणार? " माणकेश्वराच्या पुतळ्यावर संधिप्रकाश पसरला होता. तो नेहेमीसारखाच निःस्तब्ध, स्थितप्रज्ञ होता. शांत, मंद स्मित करत असल्यासारखा....