उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची

प्रत्येक व्यक्ती ही ईश आहेच. तिच्याकडे अगदी लहान प्रमाणात का होईना, सत्ता आहे. बल, बुद्धी आणि कर्मकौशल्य या गोष्टी ज्याच्याकडे इतरांपेक्षा अधिक प्रमाणात आहेत तो श्रेष्ठत्व पावतो. तो ईश्वर होतो. या ईश्वरांमध्ये जो लोकोत्तर तो परमेश्वर असतो. परमेश्वराची सत्ता चराचरावर अव्याहत राहाते. या परमेश्वराविषयी केलेले चिंतन म्हणजे वेदवाङ्मय. ऋषिमुनींनी या परमेश्वराच्या सत्तेचा विचार केला आणि त्यांच्या चिंतनातून त्यांनी त्या परमेश्वराला 'ब्रह्म'पदवी दिली. त्यांचे सारे चिंतन मग या ब्रह्मतत्त्वाभोवती केंद्रित झाले.
ब्रह्म या शब्दाने मनाच्या अत्युच्च अवस्थेचा बोध करून दिलेला आहे. "अणु: अणुयान् महतो महियान्" हे वचन पहा. अणू हा सूक्ष्मातिसूक्ष्म आणि त्याहून सूक्ष्म असलेले असे जे, ते या विश्वाच्या अफाट पसा-यापेक्षाही विशाल असणारे असे या ब्रह्मतत्त्वाचे वर्णन ऋषि करतात. यातून हेही अभिप्रेत आहे की, हे ब्रह्म पिंडी आहे तसेच ते विश्वांडामध्येही भरून पुन्हा उरलेले आहेच. अशा अलौकिक तत्त्वाची ओळख करून घेण्यासाठी मनाला किती प्रगल्भ अवस्था लागत असेल!
आधुनिक विज्ञान जे सांगते, त्याप्रमाणे सहस्र-सहस्र आकाशगंगांनी व्यापलेले हे विश्व सतत प्रसरण पावते आहे. आम्ही एकच सूर्य पाहात असतो. पण असे कोट्यवधी सूर्य अवकाशात आहेत. त्या सूर्यांच्या आपापल्या ग्रहमाला आहेत. हे सूर्यही स्थिर नाहीत. त्यांनाही सूक्ष्म गती आहेच आणि ते सान्त आहेत, त्यांनाही शेवट आहे. असे हे दृष्टीच्या आवाक्यातील तसेच दृष्टीच्या आवाक्याबाहेरील बृहत् विश्व एकाच केंद्राभोवती चक्रगतीत बांधलेले आहे. 'सूर्यकोटिसमप्रभ'आणि 'हिरण्यगर्भ'ही पदे अशा या विश्वाचा बोध करून देतात. तरीही हे विश्व केवळ एक ब्रह्मांड आहे. श्रीकृष्णाने तिघांना विश्वरूप दर्शन दिले. यशोदा, अर्जुन आणि अप्रत्यक्षतः संजय हे तिघेजण ते भाग्यवान. त्यांनी भगवंताच्या उदरात अशी असंख्य ब्रह्मांडे फिरत असलेली पाहिली, असे वर्णन महाभारतात व्यासमहर्षिंनी लिहून ठेवले आहे.
मानवी मनाला या ब्रह्मांडांच्या पलीकडील अवस्थेत नेणारे वेदवाङ्मय ऐहिक अवस्थेतून माणसाला बाहेर काढते. विश्वाच्या पसार्यात एक किरकोळ जीव असलेल्या माणसाची गणती करावयाची झाली तर त्यासाठी कोणते परिमाण लावायचे? माणसाच्या शरीरात वास्तव्य करणारे बॅक्टेरिया हे सुद्धा तुलनेने महत् वाटावे असे या विश्वामध्ये माणसाचे अस्तित्व आहे. तरीही प्रचंड शक्तीचे आगर असलेले मन मानवाला या विश्वात अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त करून देते. माणसाच्या मनोव्यापाराची सीमा जोखायची तर ऋग्वेदातील नासदीय सूक्त पाहायचे. काहीही भौतिक साधने उपलब्ध नसताना या सृष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य जाणून घेण्यासाठी या मनाने केलेले प्रयत्न विस्मित करून टाकतात. आणि हेच मन त्या परमोच्च तत्त्वाला जाणून घेतल्यानंतर भौतिक कर्माच्या माध्यमातून सामान्य नराचा नारायण होण्याचा मार्गही दाखविते. त्याचबरोबर, भौतिक कर्मे ही गौण आहेत परंतु ती आवश्यकही आहेत, असेही सूचित करते. म्हणून ही सारी साधना एक ज्ञानसाधना ठरते.
ज्ञानाच्या अभिव्यक्तीचे एक माध्यम म्हणून मन शब्दांचा आधार घेते. देवनागरी वर्णमालेत व्यंजनमालेची सुरुवात 'क'या अक्षरापासून होते आणि 'ज्ञ'अक्षराने ती वर्णमाला संपन्न होते. मजा अशी आहे की, 'क'या अक्षराचा प्रश्नाशी अतूट संबंध राहातो तसेच प्रश्नाचा संबंध ज्ञानाशी असतो. कसे, का, काय, किती, कुठे, केव्हा, कोण आदी प्रश्नकर्ते शब्द वापरून मन ज्ञानाची तहान भागवून घेत असते. म्हणून 'क'हा प्रश्न आहे तर 'ज्ञ'हे उत्तर आहे. 'ज्ञ'ची सिद्धी झाली की मनाला समाधान लाभलेले असते. शब्दांचे कार्य तेव्हा संपते. परमार्थ साधला की मनाला पूर्ण समाधानावस्था लाभते आणि मन मौन स्वीकारते. ही प्रक्रिया लक्षात आली की शब्द केवळ भौतिक साधने ठरतात.
शब्द हा भौतिक असला तरीसुद्धा तो अत्यंत महत्त्वाचा असतो. मनाला ज्ञानाच्या अवकाशात प्रवेश मिळवून देणारी ती किल्ली असते. अज्ञानाचे कुलुप शब्द उघडून देतो. मग अंतःकरणाला हव्याहव्याशा वाटणार्या बेचैनीची प्राप्ती होते. मन प्रश्न मांडते. तेच त्या प्रश्नाच्या पैलूंना उलगडत नेते. उत्तर सापडले म्हणून ते आनंदी होते. पण तो आनंद अल्पजीवी ठरणारा असतो. ते उत्तरच प्रश्न बनते. पुन्हा मनाची धावपळ सुरू होते. पुन्हा उत्तर, पुन्हा प्रश्न या साखळीतून मिळणारी उत्तरे मन वेगळी साठवत असते. त्यातून बुद्धीची पिशवी भरत असते. या बुद्धीच्या मदतीला विवेक जागा होतो. मग बुद्धीला जे पटते, ते ती निवडून बाजूला काढते. चित्ताच्या तिजोरीत ते निवडक विचारधन साठविले जाते. असे होता होता परमार्थाचा हिरा जेव्हा चित्ताला प्राप्त होतो, तेव्हा मन आणि बुद्धीचे व्यवहार शांत होतात. मग 'ना आठव ना विसर'अशा अवस्थेत 'अहं'समाधान पावतो. चित्ताला या स्थितीत पोहोचविण्याची जी प्रक्रिया तेच चिंतन.
तर 'क'पासून 'ज्ञ'पर्यंतचा प्रवास म्हणजेच यज्ञ. या यज्ञासाठी लौकिक साधने वापरली, जसे तूप, भात, समीधा वगैरे, तर होणारी प्राप्ती ही भौतिक स्वरूपाची असते; मग ती वातावरण शुद्धी असेल वा मनोवांछापूर्ती असेल. अशा प्राप्तीला सातत्य नसते. दुसरी गोष्ट म्हणजे यज्ञाचे अंतिम लक्ष्य मनामध्ये अविचल असावे लागते. दैनिक उपासनेतील सोळा उपचारांची पूजा, पाच उपचारांची पूजा किंवा फलम्-पुष्पम्-तोयम् या प्रकारातील पूजन सांगताना मनातल्या भावाचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. मूर्ती ही सुध्दा मनाची एकाग्रता साधावयासाठीचे एक भौतिक साधन असते.
यज्ञाच्या प्रक्रियेचे स्पष्टिकरण 'त्रिसुपर्ण सूक्त'करून देते. जेवावयास बसणार्या पंक्तीत हे त्रिसुपर्ण म्हटले जात असे. आता हे पठण जवळजवळ कालबाह्य झाले आहे असे दिसते. १९९७ साली पुस्तकांच्या दुकानात 'सार्थ त्रिसुपर्ण'या नांवाचे छोटे पुस्तक पाहावयास मिळाले. बालपणी एकदोनदा पुण्याच्या एका राममंदिरात रामनवमीच्या महाप्रसादावेळी वडिलांबरोबर भोजनासाठी गेलो होतो, तेव्हा हे त्रिसुपर्ण जेवण सुरू करण्यापूर्वी ब्राह्मणांनी म्हटलेले ऐकले होते व नंतर वडिलांनी त्याबाबत जुजबी माहिती दिली होती. त्यामुळे जेवणापूर्वी म्हणावयाचे मंत्र एव्हढेच त्रिसुपर्णाबाबत माहीत होते. ते छोटे पुस्तक पाहाताना त्यातला गर्भित अर्थ फार मोठा असल्याचे दिसले. चार रुपये किंमतीचे ते पुस्तक पुण्याच्या अनमोल प्रकाशनाने छापलेले आहे. डॉ. पु. पां. जाखलेकर यांनी त्रिसुपर्णाचा अनुवाद केला आहे.
त्रिसुपर्ण या शीर्षकाबद्दल डॉ. जाखलेकर लिहितात की, सुपर्ण म्हणजे गरुड आणि गरुडाने ज्याप्रमाणे देवांना अमृत प्राप्त करून दिले त्याप्रमाणे हे सूक्त ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देते. त्याचे तीन अनुवाक (ऋचांचे संच) आहेत, म्हणून ते त्रिसुपर्ण. हे महानारायणोपनिषदातील कांही मंत्रांचे संकलन आहे. यातील सात ऋचा ऋग्वेदातील मंडल एक, चार, पाच व नवव्या मंडलातील असल्याचे 'लघु ऋग्वेद'(ऋग्वेद रत्न भांडार) या गंथावरून दिसले. त्यात आदरणीय रा. गो. कोलांगडे यांनी दिलेला अर्थ आणि डॉ. जाखलेकरांनी दिलेला अर्थ जवळजवळ सारखाच आहे.
खरे म्हणजे आपण नावाचेच भारतीय आहोत. आपल्यावर झालेले संस्कार धेडगुजरी आहेत. आपण ना धड पूर्णपणे आपल्या मूळ संस्कारांशी जवळीक ठेवू शकलो ना निर्भेळपणे पाश्चिमात्य संस्कार आपलेसे करून घेऊ शकलो. आपल्या संस्कृतीशी आपण समरस होऊ शकलो नाही, त्यामुळे वेद-उपनिषदे यांच्या भाषेबद्दल आपण अनभिज्ञच राहिलो. जेव्हा त्याबद्दलची उत्सुकता जागी होते, त्यावेळी बुद्धीची झेप मंदावलेली असते. अशा स्थितीत मनात एक रुखरुख लागून राहाते. कधीतरी योगायोगाने त्रिसुपर्णासारखी रत्ने वाचावयास मिळाली की अशी रुखरुख अधिकच तीव्र होते. जाऊ दे, जे हाती लागेल त्यात लाभणार्या समाधानातच समाधान मानायचे. तेव्हढयानेही मनावर होणार्या संस्कारांनी काहीशी निराळी दिशा गवसते! मला असे वाटते की, भगवद्गीतेच्या वाचन-चिंतनातून मनावर इष्ट परिणाम होत जातात. त्यातून या सनातन ज्ञानाचे शिंतोडे जरी आपल्या मनावर पडले, तरी एक वेगळाच आनंद, एक वेगळीच अनुभूती येत राहते. मनाच्या चंचल धारणेत काहीशी स्थिरता येते.