दिवाळी अंक २००९

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

यशवंत जोशी

तर, त्रिसुपर्णाच्या प्रथम अनुवाकात सोमदेवतेची स्तुती आहे. सोम म्हणजे मद्य अशी आपली धारणा झाली आहे. ती अर्थातच चुकीची आहे. सोमरस हा प्रत्यक्ष यज्ञावेळी सोमलता कुटून काढलेला रस असतो. त्यामुळे जोम वृद्धिंगत होतो. इंद्राला असुरांशी लढताना असा अतिरिक्त जोम प्राप्त व्हावा, म्हणून सोमरस अर्पण केला जात असे. तेव्हा, सोम हे एक तत्त्व आहे. ऍस्पिरिन हे अशाच प्रकारातले असून त्याचा शोध कसा लागला हे यासंदर्भात पाहण्यासारखे आहे. रशियाच्या अतिडोंगराळ प्रदेशातील लोक एका झाडाच्या पाल्याचा तरतरी आणण्यासाठी उपयोग करत असल्याचे आढळले आणि मग त्या वनस्पतीवर अधिक संशोधन केले गेले. त्यातून हे औषध उपलब्ध झाले. आपण नित्य सेवन करतो तो चहा हा सुद्धा असाच वनस्पतीजन्य आहे. आयुर्वेदात अनेक वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रभावांचा अभ्यास केला गेलेला आहे. या सोमतत्त्वाची देवता चंद्र आहे. वनस्पतींना वेगवेगळे गुण चंद्राच्या प्रभावाने प्राप्त होत असतात, असे भारतीय शास्त्रे सांगतात. या पारंपारिक माहितीचा सखोल शोध आपल्याकडे घेतला जात नाही, याचेच वैषम्य वाटते. 'पाश्विमात्यं प्रमाणम्' समजायचे आणि आपली सोडवणूक करून घ्यावयाची की झाले.

तर सोम ही एक वैदिक देवता आहे. तेज जसे सूर्याकडून मागायचे, तसा (नशा नव्हे) जोम सोमाकडून मागायचा. जोम हा प्राणाचा सशक्तपणा असतो. ज्यांच्या ठिकाणी जोम भरपूर प्रमाणात असतो, ते मानव सोमाचे प्रजाजन असल्याचे त्रिसुपर्ण सांगते. हा सोम अज्ञानरूपी दुःस्वप्नातून बाहेर काढतो.

'ब्रह्ममेतु माम् । मधुमेतु माम् । ब्रह्ममेव मधुमेतु माम् ॥' अशा प्रार्थनेने त्रिसुपर्णाची सुरुवात होते. यात प्रथम ब्रह्मप्राप्ती, नंतर मधुप्राप्ती व नंतर ब्रह्म जे मधु आहे, त्याची प्राप्ती मागितली आहे. इथे आपल्याला एक जिज्ञासा उत्पन्न होते. ब्रह्म ही परमावस्था तर मधु म्हणजे अमृत. नुसते ब्रह्म देऊ नकोस तर त्याबरोबर माधुर्यही दे, अशी ही सोमदेवतेला विनंती आहे. ऋषिंनी किती सखोल विचार केला होता हे पाहून मन अचंबित होते. ब्रह्म ही परमावस्था जरी असली तरी ती सच्चिदानंदघन अवस्था असेलच असे नाही, असे यावरून सूचित होते. कोरडी ब्रह्मावस्था नको. अशा मधुसह ब्रह्मावस्थेच्या प्राप्तीसाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी ऋषी दाखवितात.

दुसर्‍या अनुवाकाच्या पहिल्या ऋचेत 'मेधया' असे पद वापरलेले आहे. मेध म्हणजे यज्ञ, त्याग, बली. यातील बली म्हणजे बळी किंवा वध नव्हे, हे लक्षात घ्यायचे. इथे बलीचा अर्थ त्याग, स्वत्व किंवा स्वामित्व सोडणे. असा त्याग म्हणजे मेध. या मेधाने प्राणाचे स्वामित्व सोडल्याने ब्रह्म-मधु प्राप्त होते. हे सांगितल्यानंतर सविता देवतेची प्रार्थना आहे. इथे आपण भौतिकतेत येतो. त्या सवितेची (उगवत्या सूर्याची) जी प्रजा त्यातील आपण एक असल्याचे सांगून सविता देवतेकडे पुत्रवत् प्रेमाची याचना, संकट निवारणासाठी प्रार्थना आणि सौभाग्यप्राप्तीची इच्छा व्यक्त करायची. या सौभाग्यात संपन्नता, पुत्रपौत्रादी संततीचा समावेश आहे.

सविता देवतेच्या प्रार्थनेनंतर विश्वेदेव या देवतेची प्रार्थना आहे. नांवाप्रमाणेच विश्वाच्या व्यवस्थापनाची ही देवता आहे. अन्न, वायु, आरोग्य आदींची ही देवता. तिच्याकडे काय मागितले आहे, तर सुखाचे वारे, नद्यातून वाहणारे गोड-निर्मळ पाणी, आरोग्यदायक-शक्तीवर्धक वनस्पती, (सुखदायक स्वप्नयुक्त) चांगल्या रात्री, (सत्कर्म फलदायक) चांगले दिवस, एव्हढेच नव्हे, तर सुखदायक होणारे धूलिकणही. तसेच हा पितास्वरूप विश्वेदेव जीवनदायी मधुर दूध देणार्‍या गायी देवो, अशा विनंतीचाही त्या प्रार्थनेत समावेश आहे.

तिसर्‍या अनुवाकात पुन्हा सोमदेवतेची प्रार्थना आहे. ब्रह्म, मधु हे यज्ञस्वरूप आहेत. ते यज्ञाने प्राप्त होतात. जे ज्ञानी आहेत, त्यात देवांमध्ये ब्रह्मा, बुध्दिमंतांमध्ये ऋषी आणि विशेष प्रयोगविज्ञान जाणणारे विप्र, पशुंमध्ये बलवान गवा (महिषो मृगाणाम्), मोठ्या पक्षांमध्ये ससाणा, शस्त्रांमध्ये परशु हे जसे श्रेष्ठ असतात, तद्वत् यज्ञात हवि देण्यासाठी जी द्रव्ये असतात त्या द्रव्यांमध्ये सोम श्रेष्ठ असल्याचे या अनुवाकातील ऋचा सांगते. यानंतर सूर्यदेवतेचे स्तवन आहे. सूर्याला हंस म्हटलेले आहे. हे ब्रह्म-मधुचे प्रत्यक्ष रूप असून ही सूर्यदेवता तेजरूपाने आकाशात असते, उदकात असते, (सूर्य-चंद्राच्या) किरणात असते, जे सत्य त्यात ती असते. अर्थात तेज हेच सर्वाधिष्ठानभूत परब्रम्हरूप असल्याचे या ऋचेतून सांगितले आहे.

तिसर्‍या अनुवाकातील पुढील ऋचा महत्त्वपूर्ण आहे. 'अन्तहृदा मनसापूयमानाः' असे पद वापरलेले आहे. अंतःकरणातील श्रध्देने पवित्र झालेल्या 'तुपाच्या धारा'. या तुपाच्या धारांचे हवन करीत असल्याचे वर्णन येथे येते. असे हवन करणारे सात ऋषी यज्ञकुंडाच्या भोवती बसून ही परंपरा चालू ठेवतात, अशी कल्पना येथे पाहावयास मिळते.

यज्ञ-हवनाची परंपरा चालू ठेवणारे हे ऋषी कोण, याचे स्पष्टीकरण चौथ्या अनुवाकात मिळते. यज्ञ या संकल्पनेतली मेख ज्याने जाणली आहे, अशा विद्वानाचा आत्मा हा त्या यज्ञाचा यजमान असतो. त्याच्या अंतःकरणातली श्रध्दा ही त्याची पत्नी असते. त्याचे शरीर हे इंधन तर वक्ष किंवा हृदयाकाश ही यज्ञवेदी किंवा यज्ञकुंड असते. त्याच्या देहावरील केस हे दर्भ, वेद ही शिखा आणि हृदय हे यज्ञपशु ज्यास बांधावयाचा तो स्तंभ होय. पुढे असे स्पष्ट केले आहे की, चित्तात भ्रम निर्माण करणारे विकार हेच यज्ञपशू होत. काम म्हणजे हवनीय तूप तर निग्रहाने केलेले तप म्हणजेच यज्ञाग्नी. या यजमानाचे चित्त हे शमियता आहे तर इंद्रियांची शांती ही यज्ञातल्या पुरोहितांची दक्षिणा आहे. असे पुरोहित सात असतात. त्यांच्याबाबतचा खुलासा पुढील ऋचेत येतो.

वाचा हा होता (प्रमुख पुरोहित, आवाहक), प्राण हा उद्गाता (सामगायनाचे तंत्र सांभाळणारा), नेत्र हा अध्वर्यु (प्राथमिक तयारीपासून ते आहुती देण्यापर्यंतचे यज्ञकर्म करणारा), मन हे ब्रह्मा (यज्ञकार्यावर देखरेख ठेवून कांही चूक झाल्यास प्रायश्चित्त देणारा) आणि पांचवा पुरोहित म्हणजे श्रोत्र किंवा कान जो अध्वर्यूचा साहाय्यक असतो. यातील डोळे व कान हे दोन-दोन असल्याने ते चार, वाचा, प्राण व मन मिळून पुरोहितांची एकूण संख्या सात होते. हे सात पुरोहित यज्ञकर्म पार पाडीत असतात.

हे त्रिसुपर्ण जेवणापूर्वी कां म्हणायचे? तर, भौतिक साधनातून अलौकिक लाभ घेण्यासाठी भोजनाद्वारे यज्ञ कसा साध्य होतो, ते पुढील ऋचा सांगते. जोपर्यंत प्राणधारणा आहे तोपर्यंतचा काल हा दीक्षाकाल होय. म्हणजे संपूर्ण आयुष्यभर हा यज्ञ साधावयाचा आहे. जे अन्नग्रहण करावयाचे, ते हविर्द्रव्य समजायचे. द्रवपदार्थाचे सेवन (फळांचा रस, खीर, निर्मळ पाणी आदी) म्हणजे सोमरसपान. या अन्नग्रहण-क्रियेत रमून जाणे हे उपसद. यजमानाची उठणे-बसणे, फिरणे वगैरे क्रिया ज्या यज्ञ पार पाडण्यासाठी होतात, त्या क्रिया म्हणजे प्रवर्ग. प्रवर्ग म्हणजे यज्ञाग्नी. इथे उदर हे यज्ञकुंड व उदरात वास करणारा वैश्वानर अर्थात भूक हा प्रवर्ग. भोजनापूर्वीच्या हालचाली, यात पाकसिध्दीसाठी केल्या जाणार्‍या हालचालींचाही समावेश होणारा आहे. मुख हे आवहनीय म्हणजे ज्यात हवन करावयाचे ते अग्निस्थान होय. यजमान जो मंत्रोच्चार करतो, ते शब्द याही आहुती होत.

तर भोजन हाच एक यज्ञ असल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्रिसुपर्णाचा चौथा अनुवाक पुढे सांगतो की, 'यज्ञविषयक हे विज्ञान अर्थात भौतिक अनुभवातून संपादन केलेले जे ज्ञान, त्याचे मी हवन करतो'. याचा अर्थ असा होतो की, भौतिक ज्ञानाचा त्याग करून जे यथार्थ म्हणजे ब्रह्म-मधुविषयक जे ज्ञान ते मी आत्मसात करतो.

पुढे आणखी असे स्पष्टीकरण येते. सकाळी-सायंकाळी जे अन्नग्रहण करतो, त्या समिधा. सकाळ-सायंकाळ ही सोमरस काढण्याची वेळ. (गाईंचे दूध या वेळी काढले जात असते!) असे हे यज्ञकार्य दिवस, रात्र, पंधरवडा, महिना, चार महिने साधावयाचे आणि ते आपले मनोविकाररूपी पशु बंधित करून करावयाचे. परिपूर्ण ज्ञानप्राप्तीने हे यज्ञकार्य संपन्न होते. अशा यज्ञाची समाप्ती म्हणजे अवभृतस्नान. असे स्नान म्हणजे देहविसर्जन, मृत्यू.

असे हे म्हातारपणाअखेर म्हणजेच लाभलेल्या दीर्घायुष्याअखेरपर्यंत चालणारे यज्ञकार्य त्रिसुपर्णातून उलगडत जाते. यासाठी परिवत्सर हा शब्द योजलेला आहे. या परिवत्सर या पदाचा अर्थ डॉ. जाखलेकर देतात तो असा - परिवत्सर म्हणजे साठ वर्षांचे एक चक्र. त्याचे बारा भाग. प्रत्येक पांच वर्षांच्या कालाला युग म्हणतात. यातील प्रत्येक वर्षाला वेगवेगळी नांवे दिली आहेत ती अशी - संवत्सर, परिवत्सर, इंदुवत्सर, अनुवत्सर आणि इद्‍वत्सर. या पांच वर्षांचा मिळून 'अहर्गण' होतो. सर्वसाधारणपणे संवत्सर आणि परिवत्सर या दोन उल्लेखांमध्ये इतर वत्सरांचा समावेश होतो व त्या सर्वांना मिळून 'अहर्गण' नांव दिले जाते.

समर्थ रामदासांच्या 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' या उक्तीच्या मागील अर्थ 'त्रिसुपर्ण' जेव्हा समजले, तेव्हा उलगडला गेला!