दिवाळी अंक २००९

मनस्वी प्रशांत

वरदा वैद्य

जोरदार व्यापारी वार्‍यांनी पश्चिमेकडे वाहून नेलेल्या पाण्यामुळे पश्चिमेकडील भागामध्ये उष्ण आणि दमट हवेला घेऊन वर जाणार्‍या वार्‍यांचा वेगही वाढतो. त्याने मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती होऊन पश्चिम समुद्रात तसेच इंडोनेशीय प्रदेश, ऑस्ट्रेलिया व आसपासच्या प्रदेशांत पावसाचे प्रमाण आणि जोर वाढतो. तिथे मुसळधार पाऊस पडतो, पूर येतात, ओला दुष्काळ येऊ शकतो. हवेच्या वरच्या थरातील पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणार्‍या वार्‍यांचा जोर वाढून मोठ्या प्रमाणात थंड आणि कोरडी हवा सागराच्या पूर्वभागात तसेच दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम भागात खाली उतरते. त्यामुळे इक्वेडोर, पेरू व आसपासच्या देशांमध्ये ह्यावेळी पावसाचे प्रमाण खूपच कमी होऊन दुष्काळी परिस्थिती ओढवते.

एल निन्यो आणि ला निन्यामुळे निर्माण होणारी समुद्री आणि वातावरणी परिस्थिती एकमेकांच्या विरुद्ध असली तरी तीव्रतेच्या बाबतीत एल निन्योच्या तुलनेत ला निन्या सहसा सौम्य (mild) असते. म्हणजे एल निन्यो परिस्थितीमध्ये विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पश्चिम भागातील तापमान जेवढ्या प्रमाणात वाढते त्यामानाने ला निन्या परिस्थितीत ह्या भागातले तापमान तेवढ्या प्रमाणात कमी होत नाही. एल निन्यो परिस्थिती सुमारे ४ ते ७ वर्षांनी येते. सहसा (पण नेहमीच नव्हे) एल निन्यो नंतरच्या वर्षामध्ये ला निन्या परिस्थिती येते. म्हणजेच ला निन्या एल निन्योला अनुसरते.

जागतिक परिणाम

पृथ्वीवर स्थानिक, प्रांतिक आणि जागतिक श्रेणींची (scales) अनेक अभिसरण चक्रे एकाच वेळी कार्यरत असतात. त्यापैकी प्रमुख अभिसरण चक्रे आणि मानवाच्या अभिसरणाच्या आकलनामध्ये काळानुरूप होत गेलेल्या प्रगतीचा आढावा मनोगतावरील 'वातावरणीय अभिसरण भाग १ ते ७' ह्या लेखमालेमध्ये वाचता येईल. ही अभिसरण चक्रे एकमेकांमध्ये गुंतलेली असून एका चक्रात झालेला बदल कमी जास्त प्रमाणात इतर चक्रांमध्ये परावर्तित होतो. वातावरण ह्या बदलांशी जुळवून घेते ते इतर चक्रांमध्ये बदल करून. काही चक्रांमध्ये एन्सोपाठोपाठ लगेच बदल घडतो तर काही चक्रांमध्ये बदल घडण्यासाठी मध्ये काही काळ लोटावा लागतो (time lag). एन्सो घटनांमुळे वॉकर अभिसरण चक्राच्या तीव्रतेमध्ये बदल होत असल्याने पावसाचे प्रदेश त्यांच्या मूळ ठिकाणांपासून इतरत्र सरकतात. पृष्ठीय हवेच्या दाबाचे पट्टेही जागा बदलतात. पृष्ठीय तापामानामध्ये बदल होतो. त्याचा जागतिक हवामानावर परिणाम होऊन काही प्रदेशांना जास्त प्रमाणात पाऊस मिळतो तर काहींना अवर्षणास तोंड द्यावे लागते, काही ठिकाणी तापमानामध्ये वाढ होते तर काही ठिकाणी घट होते, काही ठिकाणी हवा कोरडी होते तर काही ठिकाणी दमट. आकृती ७ व ८ मध्ये अनुक्रमे एल निन्यो आणि ला निन्या परिस्थितींमुळे जागतिक हवामानात उन्हाळी व हिवाळी महिन्यांमध्ये कसे बदल होतात ते दर्शविले आहे. एन्सो घटनांचा परिणाम अर्थातच विषुववृत्तानजिकच्या प्रदेशात सर्वाधिक असतो. एल निन्योमुळे इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढते, पेरूमध्ये पूर येतात, दक्षिण अमेरिकेच्या वाळवंटी भागात अचानक पाऊस पडतो.

(मोठ्या आकारातील चित्रांसाठी तसेच सरकचित्रांसाठी (स्लाईडशो) चित्रांवर टिचकी मारावी.)


आकृती ७. The International Research Institute for Climate and Society च्या संकेतपानावरून साभार व सुधारित.

भारतीय उपखंडामध्ये हवामान मान्सून वार्‍यांवर अवलंबून असते. ऑस्ट्रेलियातील मान्सून आणि भारतीय मान्सून यांचा घनिष्ठ संबंध आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामानावर एन्सोचा मोठा परिणाम होत असल्याने परिणामी भारतीय उपखंडाच्या हवामानावरही एन्सो घटनांचा परिणाम होतो. एल निन्यो घटनेनंतरच्या उन्हाळ्यामध्ये भारतीय उपखंडावर हवा अधिक प्रमाणात कोरडी होते व पावसाचे प्रमाण कमी होते, तर हिवाळ्यात थंडी कमी पडते. ला निन्यामुळे भारतामध्ये एकूण पावसात वाढ होते आणि हवामान थंड होते.


आकृती ८. The International Research Institute for Climate and Society च्या संकेतपानावरून साभार व सुधारित.

विषुववृत्तीय प्रशांत महासागर आणि किनारी प्रदेशांमध्ये एल निन्यो आणि ला निन्या परिस्थितींमुळे पाऊसपाण्यामध्ये कसा बदल होतो हे आपण वर पाहिलेच. तसेच किनारी प्रदेशांमधील मत्स्योत्पादन व संबंधित व्यवसायांवरील परिणामही पाहिले. पावसापाण्यावर शेती व्यवसाय अवलंबून असल्यामुळे अर्थातच शेती व इतर व्यवसाय यांवर परिणाम होऊन पर्यायाने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हवामानबदल आणि मानवी आरोग्य यांचा परस्पर संबंध असल्याने एन्सोचा परिणाम तिथेही दिसतो. पावसापाण्यावर अनेक जीवजंतूंची वाढ आणि जननदर अवलंबून असतो. अनेक देशांतील साथीच्या रोगांचे प्रमाण एन्सो घटनांमुळे बदलल्याचे पुरावेही अनेक शोधनिबंधांमधून मिळतात. एन्सोच्या परिणामस्वरूप कोरड्या हवेमुळे काही ठिकाणी वणव्यांमध्ये वाढही होऊ शकते.

समुद्रपृष्ठाच्या तापमानावर चक्री वादळांची निर्मिती अवलंबून असते. गरम पाण्यामुळे वादळनिर्मितीस चालना मिळते. एन्सो घटना सर्व प्रमुख महासागरातील उष्णकटिबंधीय चक्री वादळांवर (tropical cyclones) परिणाम करतात. वेगवेगळ्या ठिकाणी चक्री वादळांवरचा परिणाम वेगवेगळा असतो. चक्री वादळांवरचे परिणाम मुख्यत: पुढील प्रकारांचे असतात - १. चक्री वादळांच्या वारंवारितेमध्ये बदल (कमी वा जास्त संख्येने चक्री वादळांची निर्मिती), २. चक्री वादळांच्या मूळ स्थानांमध्ये बदल (सहसा महासागराच्या ज्या भागात वादळांची निर्मिती होते, त्या ऐवजी वेगळ्या भागांत वादळे निर्माण होतात), ३. चक्री वादळांच्या तीव्रतेमधील बदल. प्रशांत महासागरातील चक्री वादळांवर बदललेल्या सागर पृष्ठीय तापमानामुळे थेट परिणाम होतो. इतर महासागरांतील चक्रीवादळांवरचा परिणाम अभिसरण चक्रांमध्ये पडलेल्या फरकांच्या साखळी परिणामामुळे होतो.

एन्सो घटनांचे निरीक्षण, वेध व अंदाज

एन्सो घटनांचा सर्वाधिक परिणाम विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या आसपासच्या देशांच्या हवामानावर होत असल्याने ह्या देशांमधील हवामान संस्था सागरी पृष्ठाच्या तापमानाची सतत नोंद घेत असतात. ह्या नोंदींचा वापर करून हवामान अंदाज वर्तवण्यासाठी विविध हवामान प्रारुपे (climate models) चालवली जातात. प्रशांत महासागरी पृष्ठीय तापमानाची नोंद घेण्यासाठी विविध प्रकारच्या नांगरलेल्या वा तरंगत्या बुई (बुऑय), व कृत्रिम उपग्रहांचा (satellites) वापर होतो. एन्सोचे परिणाम जागतिक हवामानावर आणि पर्यायाने मानवी जीवनावर होत असल्यामुळे एन्सोचा अंदाज वर्तवणे महत्त्वाचे ठरते. प्रशांत महासागरी प्रदेशापासून दूर असणार्‍या देशांतील हवामान संस्थाही एल निन्योचा वेध घेऊ लागल्या आहेत. एल निन्योच्या अंदाजामुळे आगामी ऋतूंमधील बदल आणि त्यांचे अर्थकारण, आरोग्य आणि राहणीमानावर होणारे परिणाम यांची आगाऊ कल्पना येऊन त्यानुसार देशांच्या आर्थिक अंदाजपत्रकांमध्ये आणि वेळापत्रकांमध्ये बदल करता येऊ शकतात.

प्रशांत महासागराच्या मनस्वी स्वभावाचा जो जो वेध घ्यावा तो तो त्याचे नवनवे परिणाम आणि त्याची रुंदावणारी व्याप्ती जाणवू लागते. नवनव्या संशोधनांमधून आजवर न जाणवलेले परिणामही लक्षात येऊ लागले आहेत. तुम्ही जगात कुठेही राहा, प्रशांत महासागराच्या स्वभावाचा परिणाम कमी-जास्त प्रमाणात आणि लवकर किंवा उशीरा तुमच्यावर होतच असतो आणि होणारच असतो.

संदर्भसूची -
१. 'Tropical Climatology: An Introduction to the Climates of the Low Latitudes' by Simon Nieuwolt, Glenn R. McGregor, Publishers: Wiley, John & Sons, Incorporated, 1998, pp. 101 - 110.
२. NOAA चे एल निन्यो संकेतपान
३. The International Research Institute for Climate and Society (IRI) चे संकेतस्थळ
४. अर्बाना शॅंपेन येथील इलिनॉय विद्यापीठातील वातावरण विज्ञान विभागाचे WW2010 संकेतपान, El Nino: Online Guide