दिवाळी अंक २००९

मि. क्विन ह्यांचे आगमन

मिलिंद फणसे


मूळ इंग्रजी कथा - "The Coming of Mr. Quin" (1930)
मूळ लेखिका: अगाथा क्रिस्टी


३१ डिसेंबर.

रॉयस्टनला आलेल्या पाहुण्यांतील ज्येष्ठ मंडळी दिवाणखान्यात जमली होती.

तरुण पोरे झोपायला गेल्यामुळे श्री.सॅटर्थवेटना बरे वाटले. तरुणांच्या झुंडी त्यांना फारशा आवडत नसत. त्यांना ते नीरस, अपक्व वाटत. वाढत्या वयाबरोबर सॅटर्थवेटना लाघव, तरलता अधिक पसंत होती.

सॅटर्थवेट बासष्ट वर्षांचे होते. किंचित वाकलेले, बारीक, शोधक नजरेचे, आणि दुसर्‍यांच्या आयुष्यात वाजवीपेक्षा जास्ती रस असलेले. ते जन्मभर जणु काही पुढच्या रांगेत बसून मानवी स्वभावांची वेगवेगळी नाटके पाहात आले होते. त्यांची भूमिका कायम प्रेक्षकाची. आता उतारवयात मात्र ते ह्या नाटकांविषयी अधिकाधिक चोखंदळ होऊ लागले होते. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे मागू लागले होते.

ह्या बाबतीत त्यांना नक्कीच जाण होती. वातावरणात नाट्य असल्याचे त्यांना आपोआप कळे. त्यांना त्याचा वास यायचा. त्या दुपारी रॉयस्टनला आल्यापासून त्यांचे हे सुप्त इंद्रिय जागे झाले होते. काहीतरी घडत होते किंवा घडणार होते.

जमलेल्यांची संख्या फार नव्हती. हसतमुख, सुस्वभावी यजमान टॉम इवशॅम व त्याची राजकारणात असलेली गंभीर पत्नी, पूर्वाश्रमीची लेडी लॉरा कीन ह्यांच्याव्यतिरिक्त माजी सैनिक व क्रीडापटू सर रिचर्ड कॉनवे, सहा-सात तरुण मंडळी ज्यांची नावे सॅटर्थवेट ह्यांच्या लक्षात नव्हती, आणि पोर्टल दांपत्य.

ह्या जोडप्याने सॅटर्थवेटांचे कुतूहल जागृत केले होते.

ऍलेक्स पोर्टलला ते ह्यापूर्वी कधी भेटले नव्हते, पण त्याच्याबद्दल त्यांना बरेच काही माहीत होते. त्याच्या वडिलांना व आजोबांना ते ओळखत असत. ऍलेक्स त्यांच्याच वळणावर गेला होता. चाळीसच्या आसपास वय, सोनेरी केस व निळे डोळे असलेला, खेळांची आवड असणारा आणि कल्पनाशक्ती नसलेला. चाकोरीबद्ध इंग्रज!

त्याची बायको मात्र वेगळी होती. ती ऑस्ट्रेलियन होती हे सॅटर्थवेटना ठाऊक होते. दोन वर्षांपूर्वी पोर्टल ऑस्ट्रेलियाला गेला होता तेव्हा त्यांची भेट झाली होती. तिच्याशी लग्न करून तो तिला मायदेशी घेऊन आला होता. लग्नाआधी ती कधीच इंग्लंडला आली नव्हती. पण ती सॅटर्थवेटना आजपर्यंत भेटलेल्या कोणत्याही ऑस्ट्रेलियन बाईसारखी नव्हती.

आताही ते तिला चोरून न्याहाळत होते. अतिशय रोचक स्त्री. इतकी स्तब्ध आणि तरीही इतकी जिवंत! हो, जिवंत! सुंदर नाही, तिला सुंदर नाही म्हणता येणार, पण तिच्यात काहीतरी जादू होती. कोणत्याही पुरुषाला जाणवेल अशी जादू. इथे सॅटर्थवेटांमधला पुरुष बोलला. पण त्यांच्या मनाच्या स्त्री-जाणिवा असलेल्या भागाला वेगळाच प्रश्न पडला होता. सौ. पोर्टलनी आपले केस का रंगवले असावेत?

इतर कोणा पुरुषाला हे कळले नसते पण सॅटर्थवेटना कळले. अनेक स्त्रिया आपल्या काळ्या केसांना सोनेरी कलप लावतात पण सोनेरी केस असलेल्या स्त्रीने आपले केस काळे केलेले त्यांनी कधी पाहिले नव्हते.

ती एक कोडे होती त्यांच्यासाठी. एका विचित्र अंतःप्रेरणेने त्यांना खात्री वाटत होती की ती एक तर खूप आनंदात आहे किंवा खूप दु:खी तरी. नक्की काय ते कळत नव्हते व म्हणून ते अस्वस्थ होते. भरीस भर म्हणून तिचा तिच्या नवर्‍यावर होणारा अजब परिणाम.

'तो तिच्यावर जिवापाड प्रेम करतो', सॅटर्थवेट स्वत:शी म्हणाले, 'पण मधूनच त्याला तिची भीती वाटते!'

पोर्टल फार पीत होता एवढे मात्र खरे. बायकोचे लक्ष नसेल तेव्हा तो तिच्याकडे विचित्र नजरेने बघायचा.

'चित्त थार्‍यावर नाही ह्याचं', सॅटर्थवेटांच्या मनात आले. 'तिला हे ठाऊक आहे, पण ती त्याबद्दल काही करत नाहीये.'

त्यांना त्या जोडप्याविषयी अतिशय कुतूहल वाटत होते. काहीतरी घडत होते जे त्यांना उमगत नव्हते.

कोपर्‍यात उभ्या घड्याळाच्या टोल्यांनी त्यांना भानावर आणले.

"मध्यरात्र झाली!" इवशॅम म्हणाला, "सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खरे तर ते घड्याळ पाच मिनिटं पुढं आहे. मला कळत नाही, मुलं मध्यरात्रीपर्यंत जागली का नाहीत?"

"मला नाही वाटत की ती झोपली असावीत," त्याची बायको म्हणाली. "आपल्या बिछान्यांमध्ये केस विंचरायचे ब्रश किंवा आणखी काहीतरी ठेवत असतील. का कुणास ठाऊक, त्यांना असल्या गोष्टींची गंमत वाटते. आपल्या तरुणपणी आपल्याला असं काही करू दिलं नसतं कोणी."

"कालाय तस्मै नम:!" कॉनवे हसून म्हणाला.

तो उंच, सैनिकी बाण्याचा होता. तो व इवशॅम एकाच माळेचे मणी होते. प्रामाणिक, सद्वर्तनी, प्रेमळ आणि फारसे हुशार नसलेले.

"आमच्या तरुणपणी आम्ही सारे फेर धरून 'ऑल्ड लँग साइन' हे गाणे म्हणायचो." लेडी लॉरा पुढे म्हणाली, "कशी विसरावी जुनी आठवण, किती हृदयस्पर्शी शब्द आहेत."

"जाऊ दे, लॉरा, इथे नको!"' इवशॅम अस्वस्थपणे म्हणाला व तरातरा जाऊन त्याने आणखी एक दिवा लावला.

"चुकलंच माझं!" लेडी लॉरा हळूच म्हणाली, "त्याला बिचार्‍या कॅपेलची आठवण होते. अगं, तुला फार गरम होतंय का?"

"हो, मी माझी खुर्ची फायरप्लेसपासून जरा लांब नेते." एलिनर पोर्टल पटकन बोलली.

सॅटर्थवेटच्या मनात विचार आला, 'किती सुंदर आवाज होता तिचा! हळुवार, कुजबुजणारा, घुमणारा, कायम स्मरणात राहील असा. तिचा चेहरा मात्र अंधारात होता. छॅ!'

आपल्या अंधार्‍या जागेवरून ती पुन्हा म्हणाली, "श्रीयुत कॅपेल?"

"हो. ह्या घराचा आधीचा मालक. त्यानं स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली... ठीक आहे, टॉम, तुला आवडत नाही तर ह्या विषयावर मी नाही बोलणार. टॉमला ह्या प्रकाराने खूप धक्का बसला होता, कारण तोही तेव्हा इथेच होता. तुम्हीही होता ना, सर रिचर्ड?"

"हो, लेडी लॉरा."

दुसर्‍या कोपर्‍यातील घड्याळ कण्हले. त्याने दमेकर्‍यासारखी धाप टाकली, आणि मग बाराचे टोले वाजवले.

"नूतन वर्षाच्या शुभेच्छा!" इवशॅम म्हणाला.

लेडी लॉराने आपले विणकाम नीट गुंडाळून ठेवले.

"चला, नवीन वर्षाचं स्वागत करून झालं." सौ.पोर्टलकडे बघत ती पुढे म्हणाली, "झोपावं का आता?"

"हो, हो." एलिनर पोर्टलने उठून दुजोरा दिला.

'केवढी निस्तेज झाली आहे ही', सॅटर्थवेटनी उठता उठता विचार केला, 'एरवी इतकी पांढुरकी नसते.'

एक मेणबत्ती पेटवून त्यांनी तिला दिली. ती घेऊन ती संथपणे जिना चढून जाऊ लागली. अचानक सॅटर्थवेटना काय झालं कुणास ठाऊक. तिच्या मागे जावे, तिला धीर द्यावा , असे त्यांना वाटत होते. तिला कसला तरी धोका आहे असे वाटत होते. ती ऊर्मी सरली व त्यांना स्वत:चीच लाज वाटू लागली. त्यांचेही चित्त थार्‍यावर नव्हते.

वर जाताना तिने नवर्‍याकडे पाहिले नव्हते पण आता मान वळवून तिने काही क्षण त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिले. सॅटर्थवेटवर त्या नजरेचा परिणाम झाला. भांबावलेल्या अवस्थेत ते यजमानीणबाईंना 'शुभ रात्री' म्हणू लागले.

"नवीन वर्ष आनंदाचे जाईल अशी आशा करुया. पण राजकीय परिस्थिती चिंताजनक आहे."

"हो." सॅटर्थवेटनी सहमती दर्शवली.

"उंबरा ओलांडून येणारा पहिला माणूस सावळा असेल अशी आशा करूया!" लेडी लॉरा पुढे म्हणाली, "असं म्हणतात की नववर्षाच्या पहिल्या दिवशी घरी येणारा पहिला पाहुणा सावळा असणं शुभ असतं. बिछान्यात ह्या मुलांनी काही भलतं-सलतं ठेवलेलं नसलं म्हणजे झालं. धुडगूस घालतात नुसती!" मान हलवत लेडी लॉरा जिना चढून जाऊ लागली.