मि. क्विन ह्यांचे आगमन
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
बायका गेल्यावर पुरुष मंडळींनी आपल्या खुर्च्या फायरप्लेसच्या जवळ ओढल्या.
इवशॅमने सगळ्यांना व्हिस्की दिल्यानंतर गप्पांचा ओघ मघाच्या वर्ज्य विषयाकडे वळला.
"सॅटर्थवेट, तुम्ही डेरेक कॅपेलला ओळखत होतात, नाही का?" कॉनवेने विचारले.
"हो, थोडासा."
"आणि तू, पोर्टल?"
"नाही, आमची कधी भेट नाही झाली."
हे त्याने इतके चिडून व त्याचबरोबर बचावात्मक रीतीने म्हटले की सॅटर्थवेट आश्चर्याने पाहू लागले.
"लॉरा हा विषय काढते ते मला मुळीच आवडत नाही." इवशॅम म्हणाला. "त्या घटनेनंतर हे घर एका उद्योजकाला विकलं गेलं. वर्षभरच राहिला तो इथं – त्याला लाभलं नाही म्हणे. घरात भुतं-खेतं असल्याचं बोललं जाऊ लागलं. लॉराने जेव्हा मला ह्या मतदार-संघातून उभं राहायला लावलं तेव्हा आम्हाला ह्या भागात राहाणं आलं. रॉयस्टन स्वस्तात मिळत होतं म्हणून घेतलं. भुतं-बितं सारं बकवास, पण ज्या घरात आपल्या एका मित्राने आत्महत्या केली त्याच घरात आपण राहातो आहोत ह्याची वारंवार आठवण कशाला हवी? बिचारा डेरेक. त्यानं असं का केलं हे कधीच कळणार नाही."
"कारण न देता आत्महत्या करणारा तो काही पहिला किंवा शेवटचा नाही." ऍलेक्स पोर्टल म्हणाला.
तो उठला व स्वत:साठी अजून एक ड्रिंक बनवून घेतले. त्यात व्हिस्की भरपूर ओतून घेतली.
'ह्याचं काहीतरी बिनसलंय', सॅटर्थवेट स्वत:शी पुटपुटले. 'चांगलच बिनसलंय. काय ते कळायला हवं.'
"कसा सोसाट्याचा वारा सुटलाय! वादळी रात्र आहे." कॉनवे म्हणाला.
"भुतं बाहेर पडण्याची रात्र!" पोर्टल हसत हसत बोलला. "राक्षसांची रात्र."
"लेडी लॉराच्या म्हणण्यानुसार त्यांच्यातला एखादा सावळा आपलं नशीब उजळेल." कॉनवे हसून म्हणाला. "ऐका!"
वार्याच्या सूं सूं करत वाहण्याबरोबर दरवाजा कोणीतरी तीनदा ठोठावला होता.
सगळे चमकले.
"एवढ्या रात्रीचं कोण असू शकेल?" इवशॅम बोलला.
ते एकमेकांकडे बघू लागले.
"मी उघडतो." एवशॅम म्हणाला. "सगळे नोकर झोपले असतील." असे म्हणत त्याने जाऊन दार उघडले. दार उघडताच गार वारा घोंघावत दिवाणखान्यात शिरला.
दारात एक उंच, सडपातळ माणूस उभा होता. दाराच्या वरती असलेल्या रंगीत काचेमुळे असेल, सॅटर्थवेटना तो रंगी-बेरंगी कपड्यात असल्यासारखा भासला. मात्र आत आल्यावर तो बारीक, सावळा व उंची कपडे परिधान केलेला दिसला.
"असा आगंतुक आल्याबद्दल क्षमा करा," तो म्हणाला. "पण माझी गाडी अचानक तुमच्या घराजवळच बिघडली. तसे काही फार गंभीर नाही, माझा चालक तिला दुरुस्त करत आहे. पण अर्धा-एक तास तरी लागेल. बाहेर कडाक्याची थंडी आहे म्हणून. "
तो बोलता बोलता थांबला तसा इवशॅम लगेच म्हणाला, "हो, फारच थंडी आहे बाहेर. या, या, बसा. ड्रिंक घ्याल ना ? गाडी ठीक करायला काही मदत हवी आहे का?"
"त्याची काही गरज नाही. माझा चालक करेल ते. माझं नाव आहे क्विन, हार्ले क्विन."
"या, मि.क्विन, बसा." इवशॅम म्हणाला. "तुमची ओळख करून देतो - सर रिचर्ड कॉनवे, मि.सॅटर्थवेट, मी इवशॅम."
ओळख करून झाल्यावर इवशॅमने पुढे केलेल्या खुर्चीत मि.क्विन बसले. त्यांच्या चेहर्यावर पडलेल्या सावलीमुळे त्यांनी मुखवटा घातल्याचा भास होत होता.
इवशॅमने आगीत आणखी दोन लाकडे सारली.
"काही पिणार?"
"चालेल. धन्यवाद."
"ह्या भागात ह्याआधी कधी आला होतात, मि.क्विन ?"
"काही वर्षांपूर्वी आलो होतो. तेव्हा हे घर कॅपेल नावाच्या माणसचे होते."
"हो." इवशॅम बोलला. "बिचारा डेरेक कॅपेल. तुम्ही ओळखायचात त्याला ?"
"हो, ओळखायचो."
इंग्रजांचा स्वभाव ठाऊक नसलेल्यांना न जाणवण्याइतपत सूक्ष्म बदल इवशॅमच्या वागण्यात आला. आधी त्याच्या वागण्यात थोडेसे अंतर होते, जे आता मिटले. क्विनची व डेरेक कॅपेलची ओळख निघाली होती. ते एका मित्राचे मित्र होते आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवता येत होता.
"तो प्रकार चकित करणारा होता." एखादे गुपीत सांगितल्याच्या आविर्भावात तो म्हणाला. "आम्ही त्याविषयीच बोलत होतो. मी तुम्हाला सांगतो, ही जागा विकत घेणं मनाला पटत नव्हतं. दुसरी कोणतीही योग्य जागा न मिळाल्यामुळे नाईलाज झाला. ज्या रात्री त्याने आत्महत्या केली त्या रात्री मी इथेच होतो. कॉनवेही होता. मला सतत वाटतं की त्याचं भूत इथे फिरत असावं."
"खूप रहस्यमय घटना होती ती!" क्विन महत्त्वाचे वाक्य बोलणार्या नाटकातील नटाप्रमाणे म्हणाला आणि थांबला.
"असं रहस्य जे कधीच उलगडणार नाही!", कॉनवे उद्गारला.
"खरंच?" क्विन निर्विकारपणे म्हणाला. "काय म्हणत होता तुम्ही, सर रिचर्ड?"
"आश्चर्यकारक होतं ते. तरूण, आनंदी माणूस. कसल्याही चिंता नाहीत. पाच-सहा जुने मित्र राहायला आलेले. हा माणूस रात्री मस्त मजेत, हसत-खेळत जेवतो, भविष्यातल्या योजनांबद्दल बोलतो आणि जेवणाच्या टेबलावरून वर आपल्या खोलीत जातो, खणातून रिवॉल्वर काढून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करतो. का ? कोणालाही कळलं नाही आणि कधी कळणारही नाही."
"ही अतिशयोक्ती होते आहे असं नाही वाटत, सर रिचर्ड ?" क्विन किंचित हसून बोलला.
कॉनवे त्याच्याकडे बघत राहिला.
"म्हणजे? मला समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचय ते."
"एखादा प्रश्न सुटलेला नाही ह्याचा अर्थ तो कधीच सुटू शकत नाही असा होत नाही."
"अहो, तेव्हा तपास करूनही काही सापडलं नाही तर आता दहा वर्षांनंतर काय सापडणार?"
क्विनने नकारार्थी मान हलवली.
"मी तुमच्याशी सहमत नाही. इतिहासाची साक्ष तुमच्याविरुद्ध आहे. समकालीनांपेक्षा नंतरच्या पिढ्यांतील इतिहासकारांना सत्य अधिक स्पष्ट दिसतं. रिलेटिविटी म्हणा ना."
"अगदी खरं बोलतात, मि.क्विन." ऍलेक्स पोर्टल पुढे वाकून बोलला, "कालौघात प्रश्न वाहून जात नाही – तो नव्या रूपाने आपल्यापुढे येतो."
इवशॅम मंद स्मित करत होता.
"मि.क्विन, तुम्हाला काय म्हणायचे आहे? जर आपण आज रात्री डेरेक कॅपेलच्या मृत्युची चौकशी केली तर सत्यापर्यंत पोहोचण्याची त्या वेळेइतकीच शक्यता आहे?"
"त्याहून जास्त शक्यता आहे, मि.इवशॅम. वैयक्तिक संदर्भ आता राहिलेले नाहीत. तुम्हाला आज त्या घटना केवळ घटना म्हणून आठवतील, त्यातून तुम्ही व्यक्तिगत निष्कर्ष काढणार नाही."
इवशॅमच्या चेहर्यावर अविश्वास दिसला.
"अर्थात, कुठूनतरी सुरुवात करायला हवी", क्विन म्हणाला. "सहसा सुरुवात तर्काने केली जाते. तुमच्यापैकी एखाद्याने तरी काही तर्क केला असेलच ह्याविषयी. सर रिचर्ड, तुम्ही?"
कॉनवे विचारात पडला.
"मला वाटलं, आम्हां सगळ्यांनाच वाटलं, की ह्या प्रकारात कोणीतरी बाई असणार. अशा घटनांच्या मागे एकतर बाई असते, किंवा पैसा, नाही का ? आणि कॅपेलला पैशांची कमतरता नव्हती. मग दुसरं काय असणार?"
सॅटर्थवेत दचकले. काहीतरी बोलण्यासाठी ते पुढे वाकले, आणि तेव्हढ्यात त्यांना जिन्याच्या गजांआड दडलेली एका बाईची आकृती दिसली. ती अशा जागी बसली होती जिथे बाकी कोणाच्याही नजरेस पडू शकत नव्हती. सर्व शक्ती कानांत एकवटून ती खाली चाललेले संभाषण ऐकत होती. ती इतकी स्तब्ध होती की त्यांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना.
पण त्यांनी तिचा ड्रेस ओळखला. ती एलिनर पोर्टल होती.
आणि मग अचानक त्या रात्रीच्या सार्या घटनांचा संबंध त्यांना जाणवू लागला . मि.क्विनचे आगमन हा योगायोग नव्हता, तर ठरल्या वेळी ह्या नटाचा रंगमंचावर प्रवेश झाला होता. रॉयस्टनला त्या रात्री एक नाटक सुरू होते – जरी त्या नाटकातल्या एका नटाचा मृत्यू झाला असला तरी. हो ! डेरेक कॅपेलला ह्या नाटकात नक्कीच भूमिका होती. सॅटर्थवेटना ह्याची खात्री पटली होती.