मि. क्विन ह्यांचे आगमन
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
अजून एक गोष्ट त्यांच्या अचानक लक्षात आली. हे सर्व मि.क्विन घडवून आणत होते. ह्या नाटकचे ते दिग्दर्शक होते, नटांना क्यू देत होते. रहस्याच्या मध्यभागी राहून बाहुल्यांना दोर्यांवर नाचवत होते. त्यांना सारे काही ठाऊक होते, अगदी वर जिन्यात लपून बसलेल्या बाईचे अस्तित्वही.
आपल्या खुर्चीत आरामात रेलून सॅटर्थवेट डोळ्यांदेखत घडणारे नाटक पाहू लागले. मि.क्विन शांतपणे आणि सहजगत्या दोर्या ओढत होते, बाहुल्यांना हलवत होते.
"बाई -" ते कुजबुजल्यागत बोलले, "जेवताना कुणा बाईचा विषय निघाला होता का?"
"अरे हो, आठवलं!" इवशॅम म्हणाला, "त्यानं त्याचं लग्न ठरल्याचं जाहीर केलं. त्यामुळेच तर त्याच्या आत्महत्येचे गूढ वाढलं. अत्यंत आनंदात होता तो. म्हणाला, इतक्यात सगळ्यांना सांगायचं नाही – पण जॅकपॉट लागणार असल्याचे संकेत देत होता."
"अर्थात, आम्ही ओळखलं होतं मुलगी कोण होती ते." कॉनवे म्हणाला, "मार्जोरी डिल्क. चांगली होती मुलगी."
आता मि.क्विनची बोलण्याची पाळी होती पण ते गप्प राहिले. जणू न बोलून ते कॉनवेच्या विधानाला आव्हान देत होते. त्यामुळे कॉनवे बचावात्मक पवित्रा घेऊन म्हणाला,
"दुसरी कोण असणार? काय रे, इवशॅम ?"
"त्या रात्री डेरेकचं वागणं काही वेगळंच होतं. आनंदाच्या नशेत असल्यासारखं. मला नीट नाही सांगता येणार, पण काहीसं आव्हानात्मकही." इवशॅम म्हणाला.
"दैवाला आव्हान देणार्या माणसासारखं." ऍलेक्स पोर्टल म्हणाला.
तो डेरेक कॅपेलविषयी बोलत होता की स्वत:विषयी ? त्याच्याकडे बघून सॅटर्थवेटना दुसरा पर्याय बरोबर वाटला. हो, ऍलेक्स पोर्टल दैवाला आव्हान देत होता.
मद्याने गोंधळलेली त्याची कल्पनाशक्ती कॅपेलची गोष्ट ऐकून स्वत:चीच कुठली तरी खाजगी अडचण उगाळत होती.
सॅटर्थवेटनी वर पाहिले. ती अजून तिथेच होती. पाहात, ऐकत. निश्चल, गोठलेली. एखाद्या कलेवरासारखी.
"अगदी बरोबर." कॉनवे म्हणाला, "कॅपेल उत्साहाने सळसळत होता. जुगारात प्रचंड मोठी रक्कम पणाला लावून जिंकलेल्या माणसासारखा."
"जे करायचं ठरवलं होतं त्यासाठी धीर एकवटत असेल का तो?" पोर्टलने सुचवले आणि उठून स्वत:साठी आणखी एक पेग भरला.
"मुळीच नाही." इवशॅम पटकन म्हणाला. "मी शपथेवर सांगू शकतो की त्याच्या मनात तसं काही नव्हतं. कॉनवे म्हणाला ते बरोबर आहे. एखाद्या अट्टल जुगार्याने खूप कठीण खेळी जिंकावी आणि त्याचा स्वत:च्या नशिबावर विश्वासच बसू नये, असं त्याचं वागणं होतं."
"आणि तरी," कॉनवे निराश सुरात म्हणाला, "दहा मिनिटांनंतर..."
थोडावेळ सारे स्तब्ध झाले. इवशॅम टेबलावर जोरात हात आपटून म्हणाला, "त्या दहा मिनिटांत काहीतरी घडलं असणार. नक्की! पण काय? आठवून बघूया. आपण सगळे गप्पा मारत होतो. मध्येच कॅपेल अचानक उठला आणि खोलीबाहेर गेला."
"का?" मि.क्विन म्हणाले.
मध्येच आलेल्या प्रश्नाने इवशॅम गोंधळला.
"काय म्हणालात?"
"मी एवढंच विचारलं, का?" मि.क्विन म्हणाले.
इवशॅम आठवण्याचा प्रयत्न करत होता.
"तसं काही महत्त्वाचं वाटलं नव्हतं तेव्हा. अरे हो ! पत्रं आली! दाराची घंटी वाजली आणि आपण काय खुष झालो होतो! बर्फ पडल्यामुळे तीन दिवस घरात अडकून पडलो होतो, आठवतंय ? अनेक वर्षांत इतका बर्फ पडला नव्हता. सगळे रस्ते बंद होते. वर्तमानपत्रं नाहीत, पत्रं नाहीत. कॅपेलने दार उघडलं तर ढीगभर पत्रं व वर्तमानपत्रं मिळाली. त्याने वर्तमानपत्र चाळून बघितलं, आणि मग पत्रं घेऊन वर गेला. तीन मिनिटांनंतर आम्ही गोळीचा आवाज ऐकला...का? हे कळणं अशक्य आहे."
"अशक्य का?" पोर्टल म्हणाला, "नक्कीच त्याला पत्रात काहीतरी अनपेक्षित बातमी मिळाली असणार. उघड आहे!"
"एवढं सोपं असतं तर आम्हाला कळलं नसतं ? मॅजिस्ट्रेटनेही सर्वात आधी हाच प्रश्न विचारला. पण कॅपेलने एकही पत्र उघडलेलं नव्हतं. पत्रांची थप्पी त्याच्या ड्रेसिंग टेबलवर तशीच पडलेली होती."
पोर्टल खजील झाला.
"तुला खात्री आहे त्याने एकही पत्र उघडलं नव्हतं ? वाचल्यानंतर त्याने ते नष्ट केलं असेल कदाचित."
"नाही. खात्री आहे मला. एकही पत्र फोडलं नव्हतं. काही जाळलेलं नव्हतं की फाडलेलं नव्हतं. त्याच्या खोलीत फायरप्लेस नव्हती."
"अजब आहे!" पोर्टल मान हलवत म्हणाला.
"फार भयानक प्रकार होता." इवशॅम हळू आवाजात म्हणाला, "गोळीचा आवाज ऐकून मी आणि कॉनवे वर गेलो तर तो मेलेला आढळला. हादरलोच मी..."
"मग तुम्ही पोलिसांना फोन केला असेल, नाही?", क्विनने विचारले.
"त्या काळी रॉयस्टनमध्ये फोन नव्हता. मी हे घर विकत घेतलं तेव्हा बसवून घेतला. पण सुदैवाने गावचा हवालदार त्या वेळी इथे आलेला होता. स्वयंपाकघरात होता. कॅपेलचा एक कुत्रा – तुला रोव्हर आठवतो, कॉनवे?- आदल्या दिवशी हरवला होता. कोणालातरी तो बर्फात अडकलेला सापडला. तो त्याला पोलिस स्टेशनात घेऊन गेला. पोलिसांनी कॅपेलच्या कुत्र्याला ओळखलं आणि हवालदार त्याला घेऊन आला. गोळी सुटण्याच्या एक मिनिट आधी तो आला होता. त्यामुळे आमचा बराच त्रास वाचला."
"काय बर्फ पडला होता तेव्हा!" कॉनवे म्हणाला, "साधारण ह्याच सुमारास ना ? जानेवारीच्या सुरुवातीला."
"मला वाटतं, फेब्रुवारी. मला आठवतंय, त्यानंतर आम्ही परदेशी गेलो."
"मला चांगलं आठवतंय, जानेवारी महिनाच होता. माझा घोडा नेड, तुला नेड आठवतो? जानेवारीच्या अखेरीस लंगडायला लागला होता. ह्या प्रकारानंतर."
"असेल, जानेवारीच्या शेवटी असेल. इतक्या वर्षांनंतर तारखा लक्षात राहणं अवघड असतं."
"अतिशय अवघड असतं." मि.क्विन म्हणाले. "त्याच सुमारास एखादी महत्त्वपूर्ण घटना घडली असेल तर गोष्ट वेगळी. एखाद्या राजाची हत्या, किंवा एखादा मोठा खुनाचा खटला."
"अरे हो," कॉनवे म्हणाला, "ऍपलटन खटल्याच्या थोडं आधी तर हे घडलं."
"खटल्यानंतर! हो ना?"
"अंहं, तुला आठवत नाही – कॅपेल ऍपलटन जोडप्याला ओळखायचा. आदल्या वर्षी वसंतात त्या म्हातार्याच्या घरी राहिला होता तो. म्हातारा मरण्याच्या आठवडाभर आधी. एकदा कॅपेल त्याच्याविषयी बोलला होता. कसा तो खडूस होता, त्याच्याशी संसार करणं त्याच्या तरूण आणि सुंदर बायकोला किती जाचक होतं. त्या वेळी कोणाला शंकाही नव्हती की तिने नवर्याचा खून केला असणार."
"खरं आहे. मला आठवतंय मी वर्तमानपत्रात वाचलं होतं की शव-विच्छेदनासाठी त्याचं प्रेत उकरून काढण्याचा हुकूम दिला गेला होता. मला वाटतं त्याच दिवशी वाचली होती मी ती बातमी. नीटसं लक्ष नव्हतं माझं. वर बिचारा डेरेक मरून पडला होता. त्याच्याच विचारात होतो."
"असं बर्याचदा होतं." मि.क्विन म्हणाले, "मनावर जेव्हा प्रचंड ताण असतो तेव्हा आपलं मन एखाद्या बिनमहत्त्वाच्या गोष्टीवर केंद्रित होतं, जी नंतर आपल्याला स्पष्टपणे आठवते. कदाचित त्या ताणामुळे ती गोष्ट मनावर बिंवली जात असावी. एखादी क्षुल्लक गोष्ट! भिंतीवरच्या वॉलपेपरच्या पॅटर्नसारखी. पण ती कधी विसरली जात नाही."
"मि.क्विन, तुम्ही आता बोलत असताना मला भास झाला की मी पुन्हा डेरेकच्या खोलीत आहे. जमिनीवर डेरेकचा मृतदेह पडलेला आहे", कॉनवे म्हणाला. "खिडकीबाहेरचं मोठं झाड मला स्पष्ट दिसलं होतं, बर्फावर पडलेली त्याची सावली दिसली होती. चांदणं, बर्फ, सावली – मला ह्या क्षणीही दिसताहेत. मनात आणलं तर त्यांचं चित्र काढू शकेन. पण त्या वेळेस मी हे सर्व पाहात होतो हे माझ्या लक्षातच आलं नाही."
"ती पोर्चवरची मोठी खोली त्याची होती, बरोबर?", मि.क्विनने विचारले.
"हो, आणि ते झाड म्हणजे अंगणातल्या वळणावरचे बीचचे मोठे झाड."
मि.क्विनने समाधानाने मान डोलवली. सॅटर्थवेटची आता खात्री झाली होती की मि.क्विनचा प्रत्येक शब्द, आवाजाचा प्रत्येक चढ-उतार सहेतुक होता. ते काहीतरी सुचवत होते. काय ते मि.सॅटर्थवेटना ठाऊक नव्हते, पण सूत्रधार कोण ह्याविषयी त्यांची खात्री झाली होती.