दिवाळी अंक २००९

मि. क्विन ह्यांचे आगमन

मिलिंद फणसे

क्षणभर कोणी काही बोलले नाही. मग इवशॅम पुन्हा मुद्द्याकडे वळला.

"तो ऍपलटन खटला आता मला नीट आठवला. केव्हढा गहजब झाला होता! ती सुटली ना? दिसायला सुंदर होती, सोनेरी केसांची."

सॅटर्थवेटांची नजर आपसुक वर बसलेल्या आकृतीकडे वळली. ती जराशी मागे सरली की त्यांना भास झाला?

काच पडून फुटल्याचा आवाज झाला. व्हिस्की ओतून घेताना ऍलेक्स पोर्टलच्या हातातून बाटली निसटली होती.

"क्षमा करा. अचानक मला काय झालं कळलंच नाही."

"जाऊ दे रे," इवशॅम म्हणाला. "होतं असं कधी कधी. पण त्यावरून मला आठवलं, तिनंही हेच केलं होतं, नाही का? सौ.ऍपलटननं? पोर्टची बाटली फोडली होती ना?"

"हो. ऍपलटन रोज रात्री एक ग्लास पोर्ट प्यायचा. तो मेल्यानंतर दुसर्‍या दिवशी एका नोकरानं तिला ती बाटली मुद्दाम फोडताना पाहिलं. कुजबुज सुरू झाली. तो तिला छळायचा हे त्या सगळ्यांना माहीत होतं. अफवा पसरत गेल्या, आणि शेवटी काही महिन्यांनी त्याच्या काही नातेवाईकांनी शव-विच्छेदनाची मागणी केली पोलिसांकडे. त्यात सिद्ध झालं की त्याला विष देऊन मारण्यात आलं होतं. आर्सेनिक दिलं होतं, ना?"

"नाही. मला वाटतं, स्ट्रिक्नीन. काय फारक पडतो ? संशय घेण्याजोगी एकच व्यक्ती होती . सौ. ऍपलटनवर खटला भरला गेला पण ती पुरेशा पुराव्याअभावी सुटली. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर तिचं नशीब बलवत्तर होतं. पण खून तिनंच केला होता ह्यात काही शंका नाही. पुढे काय झालं तिचं ?"

"ती कॅनडाला गेली ना? की ऑस्ट्रेलियाला ? तिथे तिचा कोणी काका का मामा होता ज्याच्याकडे राहात होती. त्या परिस्थितीत दुसरं काय करू शकली असती?"

आपला ग्लास घट्ट धरणार्‍या ऍलेक्स पोर्टलच्या उजव्या हाताकडे मि.सॅटर्थवेटचे लक्ष गेले.

"सांभाळ, नाहीतर आता ग्लासही फोडशील." त्यांनी विचार केला. 'हे सारं फारच रोमहर्षक आहे.'

इवशॅमने उठून ड्रिंक ओतून घेतले.

"डेरेक कॅपेलने आत्महत्या का केली ह्याचं रहस्य काही आपण उलगडू शकलेलो नाही." तो म्हणाला, "चौकशीत काही फारसं हाती लागलं नाही, मि.क्विन."

मि.क्विन हसले...

ते हसणे छद्मी होते आणि तरीही दु:खमिश्रित. सर्वांना धक्का देणारे.

"माफ करा." ते म्हणाले, "तुम्ही अजूनही भूतकाळात वावरत आहात, मि.इवशॅम. पूर्वग्रहांनी बद्ध आहात. पण मला - एका परक्या, अनोळखी माणसाला - फक्त घटना दिसतात!"

"घटना ?"

"हो, घटना."

"तुम्हाला काय म्हणायचंय?", इवशॅमने विचारले.

"मला घटनाक्रम स्पष्टपणे दिसतोय. त्याची रूपरेषा तुम्हीच आखलीत पण तुम्हाला त्याचं महत्त्व कळलं नाही. दहा वर्षं मागे जाऊया आणि पाहुया काय दिसतंय – कल्पनांच्या किंवा भावनांच्या आहारी न जाता."

मि.क्विन उठून उभे राहिले होते. खूप उंच दिसत होते ते. त्यांच्या मागे, फायरप्लेसमध्ये ज्वाळा नाचत होत्या. मंद पण जरब असलेल्या आवाजात ते बोलू लागले.

"तुम्ही जेवत होतात. डेरेक कॅर्पेलने त्याचं लग्न जमल्याचं सांगितलं. तुम्ही समजलात मार्जोरी डिल्कशी जमलं. पण आता तुम्हाला खात्री वाटत नाही. तो उत्साहाने फसफसत होता. असा वागत होता जणू दैवावर मात केली असावी, मोठा जुगार जिंकला असावा. मग दारावरची घंटा वाजते. तो जाऊन पत्रं घेऊन येतो. ती पत्रं तो उघडत नाही, पण तुमच्या म्हणण्यानुसार तो वर्तमानपत्र चाळतो. दहा वर्षं होऊन गेली. त्या दिवशी काय मोठी बातमी होती हे आता आठवत नाही. कुठेतरी भूकंप ? राजकीय वादळ ? पण त्या पेपरात आलेली एक छोटी बातमी मात्र आपल्याला माहीत आहे – की सरकारने तीन दिवसांपूर्वी मि. ऍपलटनचे शव उकरून त्याचे विच्छेदन करण्याची परवानगी दिलेली होती.

"काय?"

मि.क्विन पुढे म्हणाले, "डेरेक कॅपेल त्याच्या खोलीत गेला. खिडकीतून त्याला काहीतरी दिसलं. सर रिचर्ड कॉनवेंनी सांगितल्याप्रमाणे खिडकीतून अंगण आणि दाराकडे येणारा रस्ता दिसतो. त्याने असं काय पाहिलं की त्याने आत्महत्या करावी?"

"तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय ? काय दिसलं त्याला ?"

"मला वाटतं," मि.क्विन म्हणाले, "त्याला एक पोलिस दिसला. एक हवालदार जो कुत्र्याला पोहोचवायला आला होता. पण कॅपेलला ते माहीत नव्हतं. त्याने फक्त पाहिला - एक पोलिस."

थोड वेळ कोणी काही बोलले नाही. त्यांचा अर्थ समजायला त्यांना थोडा वेळ लागला.

"बाप रे!" शेवटी इवशॅम म्हणाला. "अहो, काय बोलताय काय ? ऍपलटन ? पण ऍपलटन मेला तेव्हा कॅपेल तिथे नव्हता. तो म्हातारा आणि त्याची बायकोच होते. "

"पण त्याच्या एक आठवडा अधी कॅपेल तिथे होता. स्ट्रिक्नीन जर हायड्रोक्लोराईडच्या स्वरूपात नसेल तर फारसं विरघळत नाही. पोर्टच्या बाटलीत घातलं तर त्यातील बहुतांश भाग शेवटच्या ग्लासात येईल, कॅपेल त्यांच्या घरून गेल्यावर साधारण आठवड्यानंतर."

पोर्टल अचानक पुढे झाला. त्याचा आवाज घोगरा झाला होता, डोळे लाल झाले होते.

"तिने बाटली का फोडली?", त्याने काकुळतीस येऊन विचारले. "तिने बाटली का फोडली ते सांगा मला."

प्रथमच मि.क्विन सॅटर्थवेटना उद्देशून बोलले.

"मि.सॅटर्थवेट, तुम्हाला आयुष्याचा खूप अनुभव आहे. कदाचित तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल."

सॅटर्थवेटांचा आवाज जरासा कापरा झाला. शेवटी त्यांना त्यांची ’क्यू’ मिळाली होती. नाटकातल्या काही अत्यंत महत्त्वाच्या ओळी त्यांच्या वाट्याला आल्या होत्या. आता तेही नट होते. केवळ प्रेक्षक उरले नव्हते.

"मला असं वाटतं," ते म्हणाले, "तिला डेरेक कॅपेल आवडत असावा. पण ती एक सुशील स्त्री होती व म्हणून तिने त्याला प्रतिसाद दिला नसावा. जेव्हा तिच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा तिने सत्य ओळखलं असावं, निदान तिला तसा संशय आला असावा. आणि कॅपेलवरच्या प्रेमापायी, त्याल वाचवण्यासठी तिने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा. नंतर त्याने तिला पटवलं असावं की तिचा संशय निराधार होता, म्हणून ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार झाली असावी. पण तरीही, काहीतरी तिला मागे ओढत असणार! स्त्रियांना काही गोष्टी आपोआप जाणवतात!"

मि.सॅटर्थवेटचे संवाद म्हणून झाले होते.

अचानक एक दीर्घ उसासा ऐकू आला.

"हा कसला आवाज होता?" इवशॅम घाबरून म्हणाला.

सॅटर्थवेट त्याला सांगू शकले असते की हा जिन्यावर बसलेल्या एलिनर पोर्टलचा आवाज होता, पण तसे करून त्यांना नाटकाचा परिणाम बिघडवायचा नव्हता.

स्मित करत मि.क्विन उठले.

"एव्हाना माझी गाडी दुरुस्त झाली असेल. पाहुणचाराबद्दल आभारी आहे, मि.इवशॅम. मला वाटतं, मी मैत्रीचं कर्तव्य पार पाडलंय."

ते सारे त्यांच्याकडे विस्मयाने बघू लागले.

"हा पैलू तुमच्या लक्षात आला नाही? त्याचं त्या बाईवर प्रेम होतं. अगदी तिच्यासाठी खून करण्याइतपत. जेव्हा त्याला वाटलं की त्याचा गुन्हा उघडकीस आला आहे तेव्हा त्यानं जीव दिला. पण असं करून, अजाणतेपणी तिला गोत्यात आणलं."

"ती सुटली!" इवशॅम पुटपुटला.

"पुराव्याअभावी! मला वाटतं हे सावट आजही तिच्या आयुष्यावर आहे."

पोर्टलने आपला चेहरा ओंजळीत झाकून घेतला.

क्विन सॅटर्थवेटांकडे वळले.

"येतो मी, मि.सॅटर्थवेट. तुम्हाला नाटकं आवडतात, होय ना?"

सॅटर्थवेटनी चकित होऊन होकार दिला.

"हार्लेक्विनेड पाहा. हल्ली त्याचे खेळ क्वचितच होतात. पण पाहण्यासारखं आहे ते. त्यातील रूपकं, प्रतीकं समजायला जरा अवघड आहेत, पण शेवटी चिरंजीव ते चिरंजीवच. शुभ रात्री!"

मि.क्विन बाहेर, अंधारात गेले.

मि.सॅटर्थवेट वर, त्यांच्या खोलीत गेले. खिडकीतून बोचरा, गार वारा येत होता. ते खिडकी बंद करायला गेले. त्यांनी पाहिले की घराच्या एका छोट्या दारातून एक स्त्री बाहेर, अंगणात आली व मि.क्विनजवळ धावत गेली. काही क्षण ते दोघे बोलले व मग ती परत घराकडे वळली. ती त्यांच्या खिडकीखालून गेली. आता ती सुखद स्वप्नात असल्यासारखी चालत होती.

"एलिनर!"

ऍलेक्स पोर्टल तिच्याजवळ गेला.

"एलिनर, मला क्षमा कर. तू मला सगळं खरं सांगितलस पण – पण माझा विश्वास बसला नाही त्यावर...."

मि. सॅटर्थवेटना दुसर्‍यांच्या जीवनात रस असला तरी ते सुसंस्कृत होते. आपण खिडकी बंद करायला हवी ह्याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी तसे केले.

पण हळूहळू बंद केली.

तिचा अवर्णनीय आवाज त्यांच्या कानी पडला.

"मला ठाऊक आहे .. ठाऊक आहे तुम्ही किती नरकवास भोगलाय! कधी मीही तो भोगलाय! प्रेम करायचं.. विश्वास ठेवायचा, संशय घ्यायचा.. शंका दूर सारायच्या आणि त्यांना पुन्हा पुन्हा येऊन आपल्याला वेडावून दाखवताना पाहायचं!...मला माहीत आहे ऍलेक्स!...पण याहूनही भयंकर यातना मी तुमच्यासोबत जगताना भोगल्या आहेत. तुमच्या शंका.. तुम्हाला माझी वाटणारी भीती .. ह्यांनी तुमच्या मनातील प्रेम कलुषित होताना पाहिलं आहे मी. आज त्या आगंतुकाने मला वाचवलं. मला हे सगळं असह्य झालं होतं. आज रात्री ....आज रात्री मी जीव देणार होते...ऍलेक्स...ऍलेक्स..."