दिवाळी अंक २००९

सफर लेह-लडाखची

छाया राजे

लेहपासून कारगिलकडे जाणार्‍या रस्त्यावर मॅग्नेटिक हिल्सचा थक्क करणारा नैसर्गिक चमत्कारही अनुभवला. ड्रायव्हरने एका विशिष्ट ठिकाणी गाडी थांबवली. समोर एक चुंबकीय शक्तीचा डोंगर होता. थांबवलेली गाडी त्या डोंगरातील चुंबकत्वाने आपोआप पुढे ओढली जाऊ लागली. उलट दिशेला वळवलेली गाडी मागे जात होती. तिथे एक फलकही होता. त्यावर लिहिले होते, Magnetic Hills - The phenomenon that defies gravity. निसर्गाच्या या चमत्काराबरोबरच लेह-लडाखमध्ये मानवाच्या प्रयत्नांची आणि निसर्गावर केलेल्या कुरघोडीची खूण म्हणजे इथे सर्वात उंचीवर मोटरगाडी चालविण्यायोग्य बांधलेले रस्ते! लांबून पाहताना हे रस्ते उंच पहाडांवर अगदी कोरून काढलेल्या वळणदार रेषांप्रमाणे दिसतात. खार्दुंग-ला ('ला' म्हणजे पास किंवा खिंड) पास हे असेच १८३८० फूट उंचीवरील ठिकाण जिथे मोटारीने जाता येते. जगातील हा मोटार जाण्यायोग्य सर्वात उंचावरील रस्ता आहे.

खार्दुंग-ला पासला बर्फाच्छादित पहाडांवर मनमुराद खेळण्याचा आनंद लुटता आला. पण इथे विरळ हवामानाचा त्रास सर्वाधिक जाणवला. थंडीही बर्‍यापैकी होती. लेहलाच ज्यांच्या तब्येती ठीक नव्हत्या आणि ज्यांचा मुळातच असलेला उच्च रक्तदाबाचा त्रास वाढला होता त्यांना डॉक्टरांनी खार्दुंग-ला ला जाण्यास मनाई केली होती. काही जणी लेहला हॉटेलमध्येच आराम करीत होत्या. पण तरीही खार्दुंग-लाला जाण्यासाठी सक्षम असणार्‍यांमध्ये काहींना प्राणवायू देण्याची गरज पडली होती. तिथे तशी मोफत सोयही आहे. लष्करी छावण्याही मदत करतात. आमच्या गाडीतील एका मैत्रिणीला चक्कर येत होती म्हणून ती लगेच गाडीत जाऊन बसली होती. त्रास होऊ लागला तर त्या उंचीवरून खाली जाणे हा उत्तम मार्ग होता. त्यामुळे खार्दुंग-लाला जास्त वेळ थांबणे ठीक नव्हते. तिथल्या एका दुकानात खार्दुंग-लाची आठवण म्हणून पेन-स्टँड, कप, टी-शर्ट वगैरे खरेदी करून लगेच परतीच्या रस्त्याला लागलो.

(मोठ्या आकारातील चित्रांसाठी तसेच सरकचित्रांसाठी (स्लाईडशो) चित्रांवर टिचकी मारावी.)


खार्दुंग-ला पास

खार्दुंग-ला पास

पॅंनगॉंग सरोवर

पॅंनगॉंग सरोवर

बर्फाचे शेत

बर्फाचे शेत

हिमशिल्प

हिमशिल्प

सूरजताल

सूरजताल

इथले सर्वात निसर्गरम्य ठिकाण म्हणजे पॅनगाँग लेक. हे सरोवर १३९३० फूट उंचीवर आहे. ४० मैल लांब आणि ४ मैल रुंद असलेल्या या विशाल सरोवराचा ७५ टक्के भाग चीनमध्ये आहे आणि फक्त २५ टक्के भागच भारतात आहे. पॅनगाँग सरोवराकडे जाताना वाटेत दोन नाले लागतात. शैतान नाला आणि पगला नाला. शैतान नाल्यावर अनेक वेळा पूल बांधायचे प्रयत्न झाले पण पूल टिकत नसे. त्यामुळे त्या नाल्याला लोक शैतान नाला म्हणून ओळखतात. हे नाले ओलांडायचे म्हणजे उन्हामुळे बर्फ वितळून नाल्याचे पाणी वाढायच्या आत तिथे पोहोचले पाहिजे म्हणून भल्या पहाटे अगदी साडे-तीन चारलाच निघायचे असे ठरले होते. प्रत्यक्षात निघेपर्यंत सव्वा पाच वाजले. पण नाले पार करायला वाहनांना फारसा त्रास पडला नाही. थंडीमुळे नाल्यातील पाणी बरेचसे गोठलेलेच होते. बर्फावरून गाडी व्यवस्थित पार झाली. पॅनगाँगला जाताना १७८०० फूट उंचीवरचा चांग-ला पास पार करायचा होता. पासमधून जाताना पुन्हा हवेचा विरळपणा जाणवला. हा रस्ता आणि प्रवास खडतरच होता. लेक दहा-बारा कि.मी.वर असताना वाटेत सैफ अली खान भेटला. तो एकटाच पायी पॅनगाँगला चालला होता. त्याच्याशी गप्पा-टप्पा झाल्या, फोटो काढले. त्यामुळे खडतर प्रवासातली मरगळ एकदम दूर झाली.

थोड्या वेळाने गाडीने वळणे घेत थोडे खाली उतरायला सुरुवात केली आणि अगदी अनपेक्षितपणे समोर आलेल्या पॅनगाँग लेकच्या नि:स्तब्ध निळाईने सर्वांना अवाक् केले. दोन डोळ्यांमध्ये न सामावू शकणारे विलोभनीय अथांग दृष्य आमच्या समोर होते. करडे-मातकट, पिवळे-तांबूस, तपकिरी रंगाचे डोंगर, प्रदूषणविरहित वातावरणातील आकाशाचा गडद निळा रंग व शुभ्र ढगांचे रूप आपल्या दर्पणी दाखवणारे, लांबच लांब पसरलेले विस्तीर्ण सरोवर! या अनोख्या अनुभवाचे आपणच एकमेव साक्षीदार आहोत असा आतून होत असलेला आभास! शांत-शीतल, निखळ, नितळ निळाई, जलाशयात उठणारे हलके तरंग, त्यांवर हेलकावत विहरणारे सैबेरियन बगळे!

किनार्‍याजवळ स्वच्छ, पारदर्शी पाण्यातून दिसणारे तळाचे दगड-गोटे! बिचारे डोळे अगदी जे-जे दिसेल ते-ते साठवून ठेवण्याच्या प्रयत्नात होते. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इथे कसलेही फलक नव्हते, दुष्ट शक्तींना पळवून लावणार्‍या रंगीबेरंगी पताका नव्हत्या, कोणाचेही देऊळ नव्हते, देव नव्हता, घाटाचे बांधकाम नव्हते की चहाची टपरी नव्हती. होता तो निव्वळ निसर्ग! डोळ्यांचे पारणे फेडणारा शुद्ध, स्वच्छ, पारदर्शी, अस्पर्श्य निसर्ग! ज्याच्यापुढे या सर्वांनीच आपल्या मर्यादा ओळखल्या होत्या. समोर कोणत्याही कठड्याची आडकाठी नसलेले विशाल सरोवर असूनही पावलेही आपल्या मर्यादा ओळखतात. सरोवरात पाय धुवावे असे वाटत नाही. त्याचे स्वच्छ, शांत सौंदर्य तसेच अस्पर्श्य राहिले पाहिजे याचे भान आपोआपच येते. पण या मंत्रमुग्ध करणार्‍या स्वप्नवत् दृष्यातून भानावर यायला मात्र तसा वेळच लागतो. परतीची वेळ होते. मनात विचार येतात, पाण्यातील हे निळे–जांभळे रंग दिवसभरातील सूर्याच्या दशे आणि दिशेप्रमाणे बदलत असतील. संध्याकाळी, रात्री, चंद्रप्रकाशात, पावसात किती वेगवेगळी रूपे दाखवेल इथे निसर्ग! आपल्या डोळ्यांनी जे साठवले ते म्हणजे दिशा न बदलता पाहिलेली कॅलिडोस्कोपची केवळ एक झलक! तरीही इतके भारावून गेलो आपण!

परतीच्या प्रवासातही एक भारावलेपण होते. वर्णनातीत अनुभवावर बोलणार तरी काय? या विलक्षण अनुभवविश्वातून सहजासहजी पुन्हा कुणालाच खडतर रस्त्यांवरून शैतान नाला पार करण्याच्या वास्तवात यायचे नव्हते. परतीच्या रस्त्यावरही एकटाच पॅनगाँग सरोवराच्या दिशेने चालणारा सैफ अली खान दिसला. पण आता त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते.

लेहमधले वास्तव्य संपले. परतताना पुन्हा सरचूच्या तंबूतील थंडीला तोंड द्यायचे होते. आता हवामानात थोडा बदल झाला होता. त्यामुळे लेहला येताना हिमवर्षावामुळे जे पहाता आले नव्हते ते पाहण्याची संधी मिळणार होती. परतीच्या प्रवासात लेह-लडाखमधले विविधरंगी, विभिन्न आकारा-प्रकारांचे, ठिसूळ, निसरडे, सुरकुत्या पडलेले, एकावर एक दगड रचल्याप्रमाणे किंवा खडकात उभ्या खाचा पाडल्यासारखे दिसणारे, तर कधी झोपलेल्या हत्तीच्या खरखरीत पाठीसारखे दिसणारे डोंगर आता आणखी वेगळ्या रूपात बर्फाचे आच्छादन घेऊन उभे होते. गाडीच्या दुतर्फा इतके बर्फ होते की जणू बर्फाच्या शेतातूनच आम्ही चाललो होतो. कधी वाटायचे आपण एखाद्या परग्रहावर तर नाही? रस्त्याकडेला नुकत्याच पडलेल्या बर्फाचे वेगवेगळे आकार तयार झाले होते. हिमशिल्पेच जणू! कधी मोर, कधी बाहुली, कधी माणूस तर कधी वेगवेगळे प्राणी! रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेकविध आकारांची ही हिमशिल्पे सतत दिसत होती. लेहला जाताना जो हिमवर्षाव झाला होता त्याचेच हे खेळ होते. आमच्या परतीच्या प्रवासात आम्हाला आपले नवे रूप दाखविण्यासाठी अजूनही टिकून राहिले होते.

सरचूला पोहोचलो. तापमान पहिल्यापेक्षा सुसह्य (-) ३ होते. पाण्याचा ओहोळ अजून गोठलेलाच होता. पण आता या थंडीचा फारसा त्रास झाला नाही. आजूबाजूला हिंडून-फिरून पहाता आले. लेह-मनाली हे ४७५ कि.मी.चे अंतर एका दमात पार करणे तसे कठिणच. म्हणून इथे तसे फक्त मुक्कामापुरतेच लोक येत. इथे लेहला जाणारे काही लोकही मुक्कामाला आले होते. (-३) थंडीचा त्यांचा पहिलाच अनुभव होता. ही थंडी पाहून पुढे जावे की नाही अशा विचारात त्यातले काही होते. आता आम्ही अनुभवी होतो. त्यांना सल्ले द्यायला पात्र झालो होतो. मिळालेले सल्ले वारसाहक्काने पुढच्या पर्यटकांना देऊन आम्ही ऋणमुक्त झालो. पुढे अशी थंडी असणार नाही असा दिलासा घेऊन ते लेहकडे रवाना झाले आणि आम्ही मनालीकडे ! बरेच जण लेहला मनाली मार्गे गेल्यास परतताना कारगिल-श्रीनगरमार्गे येण्याचा बेत आखतात. पण परतीसाठी आम्ही हाच मार्ग निवडल्याचे पुरेपूर समाधान मिळाले. जाताना हिमवृष्टीमुळे जे पहाता आले नव्हते ते आता स्वच्छ, शुभ्र हिमाच्छादित स्वरूपात दिसत होते. सूरजताल पूर्णपणे गोठलेला होता. ड्रायव्हरने सांगेपर्यंत कळलेही ही नाही की तिथे तलाव आहे.

दारचा पार केल्यावर बर्फ कमी झाले. आता जमीन दिसू लागली. खडकांच्या फटीतून हिरवट रोपे आणि रानफुले आपली इवली मान वर करू लागली. इथून पुढे फुलांचा मौसम सुरू होणार होता, त्याचीही झलक दिसली. रोहतांग पास नंतर हिरवळ, फुले, हिरवे डोंगर, धबधबे ही नित्याची हिमालयीन दृष्ये दिसू लागली. पण मनात मात्र लेहच्या हिमालयाची आणि सरोवराची दृष्ये कायमस्वरूपी घर करून बसली होती. 'सेफ्टी' ऍट रोड इज 'सेफ टी' ऍट होम' सारखे फलक मागे टाकत गाडी मनालीच्या रस्त्याला लागली आणि 'होम स्वीट होम' च्या आठवणींसोबतच एका अनोख्या पर्यटनाच्या अनुभव घेऊन सुखरूप परतलो.