उषःकाल होता होता...
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
आता त्या खोलीत शांतता पसरली . लॅटिमरने आपली खुर्ची उचलून एका दिव्याखाली नेऊन ठेवली आणि दिव्याच्या प्रकाशात तो बुक ऑफ रिव्हिलेशन मधले उतारे म्हणायला लागला. म्हणताना फक्त त्याचे ओठ तेवढे हलत होते. बीनायही आपल्या कॅमेर्यात डोळे घालून उभा होता. ही संधी साधून थर्मन आपल्या उद्याच्या वृत्तपत्रातल्या लेखाची टिपणे काढायला लागला. गेले दोन तास तो हा उद्योग करत बसला होता. अगदी पद्धतशीरपणे. आणि या गोष्टीचा फोलपणा त्याला जाणवत होता. पण मगाशी शीरिन म्हणाला होता तसं, लिखाण करण्यात दंग झालेलं त्याचं मन इकडेतिकडे भरकटत नव्हतं. आता आकाशात एक सैतानी तांबडी जांभळी आभा पसरली होती. जणू काही एखादं बीट चिरून कोणीतरी आकाश रंगवून काढलं होतं. आता हवाही एकदम घट्ट झाल्यासारखी वाटत होती. खिडकीतून मावळतीची उदास छाया आत आली. खोलीतल्या दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशाने त्या छायेवर आपल्या उजेडाच्या नख्या रुतवल्या आणि ओरखडे काढले. बाहेरचा करडेपणा आता हळूहळू काळेपणाकडे झुकू लागला. खोलीत दिव्यांभोवती दबक्या पावलांनी लोक आपलं काम करत होते. मध्येच कोणीतरी एकदम दचकायचं. जोराने श्वास आत ओढून घ्यायचं. जो तो शांत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. त्यांचं जग अंधाराच्या कुशीत चाललं होतं.
थर्मनला अचानक कसला तरी कोलाहल जाणवला. खोलीतल्या शांततेमुळे तो खूप लांबून येत असावा असं वाटत होतं. तो एकदम ताठ बसला. टिपणं काढायची आपली लहानशी वही बंद करून त्याने आपला श्वास रोखून धरला आणि कान देऊन ऐकायचा प्रयत्न केला. मग काळजीपूर्वक पावले टाकत, सोलरस्कोप आणि बीनायचा कॅमेरा यांच्यामधून वाट काढत तो खिडकीजवळ जाऊन उभा राहिला.
"शीरिन!!! "
तिथल्या शांततेत त्याचा आवाज घुमला. दोन ढांगांमध्ये शीरिन त्याच्या शेजारी येऊन पोचला. एकाएकी काम थांबलं. ऍटन खिडकीपाशी येऊन उभे राहिले. प्रचंड मोठ्या अशा सोलरस्कोपमध्ये डोळे घालून बसलेल्या यिमोनेही एकदम खाली काय चाललंय हे बघायला मान वळवली.
बाहेर बीटा एक क्षुल्लक, धुमसणारा निखारा होता, निरुपाय होऊन लगाशकडे जणू शेवटचं पाहत होता. शहराच्या दिशेला पूर्वक्षितिज अंधारात हरवून गेलं होतं, आणि सारो शहर आणि वेधशाळा यांना जोडणारा रस्ता मात्र लालेलाल रिबिनीसारखा दिसत होता. रस्त्याचा दुतर्फा असणारी जंगलं अंधारात गूढ वाटत होती.
पण लक्ष वेधून घेत होता तो रस्ता कारण त्यावर सारो शहराकडून वेधशाळेच्या दिशेनेच लोटत असलेला एक मोठा, भेडसावणारा जमाव अंधुक दिसत होता.
ऍटन म्हणाले, " भ्रमिष्ट झालेली शहरातली माणसं इकडेच येताहेत... "
"खग्रास ग्रहणाला किती वेळ उरलाय? " शीरिनने विचारलं.
"अजून पंधरा मिनिटं... पण ते लोक इथे पाच मिनिटात पोचतील. "
"ठीक आहे. तुमचं काम असंच चालू राहू द्या. आम्ही त्यांना थोपवतो. ही इमारत एखाद्या किल्ल्यासारखी बांधलेली आहे. ऍटन, या लॅटिमरवर जरा लक्ष ठेवा . मी आलोच. चल रे थर्मन!"
शीरिन दारातून बाहेर पडला. थर्मनने पळत जाऊन त्याला गाठलं. समोरच खाली जायचा गोल जिना होता. मधल्या खांबाभोवती गोल पायर्या खाली खाली जात अंधारात नाहीशा झालेल्या होत्या. त्यांचा सुरुवातीचा झपाटा चांगलाच होता. त्यामुळे काही क्षणांमध्येच ते पन्नास एक फूट खाली जाऊन पोचले. आता वरच्या घुमटातून येणारा उजेड लांब राहिला होता. त्यांच्या डोक्यावर आणि पायाखाली अंधार दाटलेला होता. उतरता उतरता शीरिन एकाएकी थांबला. आपल्या लठ्ठ गुबगुबीत पंजा आपल्या छातीवर दाबून धरत तो म्हणाला, "मला श्वास घेता येत नाहीये. तू एकटाच जा आणि खाली जाऊन सगळी दारं लावून टाक.... " शीरिनचे डोळे एखाद्या बेडकासारखे बाहेर आले होते. आवाज नीट फुटत नव्हता.
थर्मन काही पायर्या खाली उतरला आणि मागे वळून म्हणाला, "जरा थांबा. अजून थोडा वेळ दम नाही का धरवणार तुम्हाला? "
त्याला स्वतःला धाप लागली होती. श्वासोच्छ्वास जोराने चालला होता. आणि अंधारात एकट्याने खाली जायच्या कल्पनेनेच तो सटपटला होता. थर्मनला अंधाराची भीती वाटत होती!
" तुम्ही इथेच थांबा. मी एक सेकंदात येतो. आलोच... " असं म्हणत तो वर पळाला. एका दमात दोन दोन तीन तीन पायर्या चढत तो धापा टाकत वरच्या घुमटात पोचला. त्याला दम लागला असला तरी हा दम काही पळत आल्यामुळे लागला नव्हता. वर येऊन एका शमादानातला दिवा त्याने खेचून बाहेर काढला. त्या दिव्यातून उग्र दर्प येत होता आणि त्याच्या काजळीमुळे थर्मनला काहीच दिसेनासं झालं होतं. पण तो दिवा म्हणजे जणू काही एखादा विश्वमोलाचा आनंदाचा ठेवाच आहे असंच त्याला वाटलं. तो दिवा घेऊन जिना उतरताना त्याची ज्योत मागे मागे उफाळत होती.
थर्मनने खाली वाकून शीरिनला जोरजोरात हलवलं. शीरिन जोरात कण्हला. थर्मन म्हणाला, " जागे व्हा आणि स्वतःला सांभाळा. हा बघा आपल्याकडे एक दिवा आहे. " अंधारात शीरिनची पावलं अडखळत होती. थर्मनने एका हातात दिवा उंच धरला आणि दुसर्या हाताने शीरिनच्या दंडाला धरून, त्याला आधार देत देत तो एकेक पायरी उतरायला लागला. आता अगदी बुडायला आलेल्या बीटाचा उरलासुरला प्रकाश तळमजल्यावरच्या खोल्यांमध्ये भरून राहिला होता. त्या प्रकाशाकडे पाहून थर्मनला जरा बळ आल्यासारखं वाटलं.
"त्यांचा आवाज येतोय बघा... पकडा हा दिवा!" तो एकदम खेकसला.
शब्द कळत नसले तरी बाहेरून काहीतरी बोलल्याचे आवाज येत होते. शीरिन म्हणाला ते अगदी खरं होतं. शंभर एक वर्षांपूर्वी बांधलेली वेधशाळेची इमारत चांगली दणकट होती. जणू काही एखादा अभेद्य किल्लाच. तिच्यावर नव्या गाव्होटियन शैलीचा प्रभाव असल्यामुळे इमारतीच्या सौंदर्यापेक्षा टिकाऊपणा, उपयुक्तता यांना जास्त महत्त्व दिलं होतं. वेधशाळेच्या सगळ्या खिडक्यांना बाहेरून एकेक इंच जाडीचे पोलादी गज बसवलेले होते आणि या गजांची टोकं भिंतींच्या बांधकामात पक्की बसवून टाकलेली होती. इमारतीच्या भिंती दगडातून बांधून काढलेल्या होत्या आणि इतक्या भक्कम होत्या की भूकंप झाला असता तर त्यांना एक साधी चीरसुद्धा पडली नसती. वेधशाळेत यायचा मुख्य दरवाजा ओक लाकडाचा बनवलेला होता. आणि त्याला बाहेरून पोलादाचं आवरण चढवलेलं होतं. थर्मनने ते दार लावून घेतलं आणि कड्या लावून टाकल्या. त्या कड्यांचा बद्दबद्द आवाज सगळीकडे घुमला.
बोळकांडीच्या दुसर्या टोकाला पोचलेल्या शीरिनने एक जोरदार शिवी हासडली. तिथे एक लहान दरवाजा होता. त्याचं अंगचं कुलूप कोणीतरी छिन्नी हातोडीने फोडलं होतं.
"लॅटिमर इथून आत घुसला असणार... "
" बापरे, अहो नुसते उभे काय राहिलाहात? आपल्याला टेबलं खुर्च्या रचून ते दार बंद करायला हवं. आणि तो दिवा जरा माझ्यापासून लांबच ठेवा प्लीज. त्याच्या काजळीने मला गुदमरायला होतंय... "
बोलता बोलता त्याने एक मोठं टेबल ओढत ओढत त्या दारापाशी नेलं आणि त्या दारामागे उभं केलं. मग आणखी तीन चार खुर्च्या आणून त्याने त्या दारामागे पक्क्या रचल्या आणि ती वाटच बंद करून टाकली. ते लाकडी सामान चांगलं जड आणि दणकट होतं. तयार झालेली बॅरिकेड दिसायला फारशी पद्धतशीर नसली, तरी अभेद्य होती हे नक्की. एव्हाना त्यांना बाहेरच्या बाजूने हाताने दार वाजवल्याचे आवाज ऐकू यायला लागलेले होते. कोणीतरी जोरजोरात ओरडत होतं. ते सगळंच एखाद्या अर्धवट जागृतावस्थेतल्या स्वप्नासारखं वाटत होतं.
बाहेरचा जमाव सारो शहरातून पायी चालत इथवर आला होता. त्यांच्या मनात फक्त दोनच गोष्टींनी घर केलं होतं. एक म्हणजे संप्रदायाकडून शुद्धिपत्र मिळवण्यासाठी वेधशाळा नष्ट केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठार वेडं करून सोडेल अशी पाशवी दहशत. सारो शहरातून वेधशाळेत येण्यासाठी वाहनं वापरावीत, एक नेतृत्व उभं करावं, सुसंघटित आणि योजनाबद्ध प्रयत्न करावेत, हत्यारं घेऊन यावं अशा गोष्टी त्यांच्या गावीही नव्हत्या. वेधशाळेच्या दाराबाहेर निःशस्त्र उभे राहून नुसत्या हातांनीच ते वेधशाळेची दारं फक्त ठोठावीत होते.