उषःकाल होता होता...
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
ते लोक वेधशाळेपाशी येऊन पोचले तेव्हाच बीटाचा शेवटचा तांबडा लाल किरण जमिनीवर उतरला. आणि मग सगळ्या मानवतेवरचाच सूर्य मावळला आणि मागे उरली फक्त भीती.
"चल लौकर... आपण वर जाऊ या. " शीरिन म्हणाला.
वरती, घुमटामध्ये एकटा यिमो आपल्या सोलरस्कोपपाशी होता. बाकीची सगळी मंडळी बीनायच्या कॅमेऱ्याजवळ दाटीवाटीने उभी होती. बीनाय त्यांना भराभर सूचना देत होता. त्याच्या खोल गेलेल्या आवाजातून त्याच्यावरचा ताण जाणवत होता.
" मी काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या सगळेजण. बीटाच्या खग्रास अवस्थेच्या काही क्षण आधीचे फोटो मला घ्यायचेत आणि फोटोग्राफिक प्लेटसही बदलायच्या आहेत. एकेक जण एकेका कॅमेर्यापाशी उभे राहा. तारे प्रकट होतील तेव्हा काय करायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. हो ना? "
आजूबाजूच्या लोकांनी माना डोलवल्या. आपल्या डोळ्यांवर आपला हात आडवा धरून बीनायने आडोसा केला आणि इकडेतिकडे पाहिलं.
" दिवे अजून जळतायत ना? असू दे. दिसले मला दिवे. तर मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा. जास्त चांगले फोटो मिळवण्याच्या फंदात पडू नका. तसं करताना तुम्ही मोलाचा वेळ वाया घालवाल. एका वेळी दोन दोन तारे फोटोत येण्यासाठी धडपडू नका. मिळतील तसे आणि मिळतील ते फोटो काढत राहा. आणि एखाद्या क्षणी तुम्हाला जर असं वाटलं की आता आपला अवतार संपला, तर लगेच कॅमेर्यापासून लांब पळा.... "
शीरिन आणि थर्मन अजून दाराजवळच उभे होते. शीरिन म्हणाला, " मला ऍटन कुठे दिसत नाहीयेत. मला त्यांच्याकडे घेऊन चल... "
मिट्ट काळोखात जळणारे दिवे नुसत्याच प्रकाशाच्या ठिपक्यांसारखे दिसत होते. त्यांच्या फरफरत्या प्रकाशात सगळ्या खगोलशास्त्रज्ञांच्या आकृत्या विचित्र दिसत होत्या. थर्मन थोडा वेळ काहीच बोलला नाही. मग एकदम तो म्हणाला, " किती अंधार आहे... "
शीरिनने आपले दोन्ही हात समोर ताठ धरले आणि अंधारातच चाचपडत, ठेचकाळत तो ऍटनना शोधू लागला. "ऍटन... ऍटन! "
थर्मनने त्याचा हात धरला. "थांबा मी नेतो तुम्हाला त्यांच्याकडे... "
अंधारातून कशीबशी वाट शोधताना अंधाराला आपल्यापर्यंत येऊ न देण्यासाठी त्याने डोळे मिटून घेतले आणि विचारही शक्य तितके बंद केले. त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. अंधारात चालता चालता शीरिन भिंतीवर जाऊन आदळला. "ऍटन! " कळवळून त्याने हाक मारली.
कोणीतरी थरथरत्या हातांनी त्याचा हात धरला. मग सोडून दिला. "कोण? शीरिन? तू आहेस का? "
"ऍटन! "आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी शीरिन धडपडत होता. " त्या मोर्चाची व्यवस्था लावून आलो. आता तुम्ही आजिबात काळजी करू नका. कोणीही आत शिरू शकणार नाही. "
लॅटिमर आपल्या जागेवरून उठून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरील संभ्रमाची जागा आता निग्रहाने घेतली होती. त्याने शांत बसायचं कबूल केलं होतं. दिलेला शब्द मोडला असता तर त्याला नरकात जावं लागलं असतं. पण त्याच्याकडून जबरदस्तीने वचन घेतलं गेलेलं होतं. त्याने आपणहून थोडंच दिलं होतं! आता तारे प्रकट होणार होते. तो शांतपणे बसून राहून जे चाललय ते बघू शकत नव्हता - पण त्याने शब्द दिला होता...
बीटाच्या अगदी अखेरच्या काही किरणांच्या प्रकाशात वर बघत असलेल्या बीनायचा चेहरा अंधुक दिसला आणि मग तो चेहरा खाली वाकून कॅमेर्याच्या आड लुप्त झाला. त्या क्षणीच लॅटिमरचा निर्णय झाला. त्याला इतका ताण आला होता, की त्याची नखं त्याच्या तळहातामध्ये रुतत होती. घाईघाईने पुढे जायच्या प्रयत्नात तो वेड्यागत भेलकांडला. त्याच्या समोर, आजूबाजूला अगदी पायाखालीही फक्त एक काळी पोकळी दिसत होती. तेवढ्यात कोणीतरी त्याला धरलं. कोणाचीतरी बोटं त्याच्या गळ्याभोवती फासासारखी चिकटली.
त्याने आपला गुडघा वाकवला आणि तो त्या हल्लेखोराच्या पोटात मारला. "सोड मला. सोड मला.. नाहीतर मी तुझा जीव घेईन"
त्या प्रहाराने कळवळून थर्मनने एक किंकाळी फोडली आणि तो म्हणाला, " अरे हरामखोरा! दिलेला शब्द फिरवतोस? "
काही क्षण थर्मनला सगळं अगदी लख्ख जाणवत होतं. कुठूनतरी बीनायचा आवाज ऐकू आला. "मला चांगली फ्रेम मिळते आहे. सगळे आपापल्या कॅमेर्याजवळ जा. कामाला लागा. लवकर... "
कुणीतरी दिवा मालवल्यासारखा पूर्ण अंधार होताना सूर्याचा शेवटचा किरण लुप्त झालेला त्याला अगदी स्पष्ट जाणवला.
आणि त्याच वेळी बीनाय ओरडला.. "हाऽऽऽ". शीरिनने किंकाळी फोडली. कोणीतरी वेड्यासारखं हसायला लागलं आणि मग ते हसणं बंद झालं. अचानक तिथे अगदी स्मशानशांतता पसरली. थर्मनने आपल्या हातांनी घट्ट धरलेला लॅटिमरचा देह लुळा पडला. थर्मनने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या काळ्या डोळ्यांमधली दृष्टी हरवली होती. त्या डोळ्यांमध्ये जळणार्या दळिद्री दिव्यांचं प्रतिबिंब पडलं होतं. त्याच्या तोंडाला फेस आला होता.
भयचकित होऊन एका जागी खिळल्यासारखा होत अगदी सावकाश एका हाताचा आधार घेऊन तो बसता झाला आणि त्याने खिडकीकडे पाहिलं. खिडकीमध्ये रक्त गोठवणारा अंधार भरलेला होता आणि त्यातून तारे दिसत होते!
पृथ्वीवरून दिसतात तसे मंद मंद छत्तीसशे तारे नव्हेत तर तीस हजार तेजस्वी सूर्य लगाशच्या आकाशात नाचत होते.. लगाश हा एका तेजस्वी तारकागुच्छाच्या केंद्रापाशी होता. खिडकीतून दिसणारी ती तेजाची पखरण बघताना बोचर्या वार्यामुळे वाजणारी थंडी आणखीनच वाढली होती आणि त्या तार्यांचं दर्शन प्राणांवर डाग द्यावेत तसं भाजत होतं.
धडपडत थर्मन उभा राहिला. त्याचा श्वास अडकला होता. अनामिक भयाने त्याचं सगळं शरीर आवळलं जात होतं. त्याला वेड लागत होतं आणि त्याला ते कळत होतं. त्याच्या मनात खोल कुठेतरी शहाणपणाचा एकच अंकुर या काळ्या भ्रमाला दूर सारायचा प्रयत्न करत होता. आपण भ्रमिष्ट होत आहोत ही जाणीवच फार भयंकर होती. अजून थोड्या वेळाने आपण शरीराने इथेच असू पण आपल्यातला मानव्याचा सगळा अंश कायमचा ठार झालेला असेल... अंधारात बुडून गेलेला असेल.. हाच तो काळोख... हाच तो सगळ्याचा अंत. हीच जगबुडी....
जमिनीवर रांगत जाणाऱ्या कोणालातरी त्याने हातानेच अडवलं. पण तो माणूस त्याच्या अंगावर धडकला. आपला दुखणारा गळा दोन्ही हातांत धरून थर्मन लंगडत लंगडत दिव्यापाशी गेला. "उजेड! प्रकाश!! "तो ओरडला.
दूर कुठेतरी ऍटन कण्हत होते. एखाद्या घाबर्या झालेल्या मुलासारखे गळा काढून रडत होते. "केवढे हे तारे! आणि आम्हाला कधी कळलंसुद्धा नाही.. आम्हाला वाटलं, एका विश्वात सहा तारे असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. या तार्यांबद्दल काहीच माहिती नसणं हाच तर खरा अंधार आहे. कायमचा अंधार आहे. आणि आम्हाला हे कधीच कळलं नाही.... आजिबात कळलं नाही.... "
घुमटामध्ये शिल्लक राहिलेल्या एका दिव्याला कोणीतरी धक्का लावला आणि तो दिवा खाली पडून विझला. आता ते बाहेरचे झळाळणारे तारे त्यांना वेढूनच बसले. खिडकीबाहेर सारो गावाकडे एक लाल प्रकाश दिसत होता. पण हा प्रकाश सूर्याचा मात्र नव्हता. काहीतरी धडाडून पेटलं होतं. त्याच्या ज्वाळा उंच उंच उफाळत होत्या.
पुन्हा एकदा एक भलीथोरली रात्र वस्तीला आली होती.