उषःकाल होता होता...
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
विज्ञान कथांचे जगद्विख्यात लेखक आयझॅक असिमॉव्ह यांच्या 'नाईटफॉल' (१९४१) ह्या प्रसिद्ध दीर्घकथेचा स्वैर अनुवाद.
"If the stars should appear one night in
a thousand years, how would men believe
and adore, and preserve for many generations
the remembrance of the city of God?"
-Ralph Waldo Emerson
सारो विद्यापिठाचे उपकुलगुरू ऍटन ७७ आपल्या टेबलापाशी बसले होते. त्यांच्या डोळ्यात संतापाने नुसता अंगार फुललेला होता. त्वेषाने दात- ओठ खात आणि आपला खालचा ओठ हटवादीपणाने किंचित पुढे काढून ते आपल्या पुढ्यात बसलेल्या तरूण वार्ताहराकडे खाऊ का गिळू अशा नजरेने बघत होते.
त्यांच्या समोर बसलेल्या वार्ताहराचं नाव होतं थर्मन ७६२. गेले काही दिवस सर्व बिनीच्या वर्तमानपत्रांमधून त्याचं स्तंभलेखन भलतंच गाजत होतं. अगदी सुरुवातीला त्याचे स्तंभ म्हणजे उगाच काहीतरी खूळ आहे असं म्हणून वाचकांनी तो विषय सोडून दिला होता. पण आता मात्र त्याच्या स्तंभांना फारच महत्त्व प्राप्त झालं होतं. या स्तंभलेनाच्या अनुभवातून तो बरंच काही शिकला होता. इतर कुठल्याही पत्राकाराला हेवा वाटावा अशा, अशक्य कोटीतील लोकांच्याही मुलाखती मिळवणं हे त्याचं प्रमुख कौशल्य होतं. या मुलाखती घेताना त्याला कधी धक्काबुक्की झाली, मारहाणही झाली. क्वचित हाडं मोडली. कधीकधी तर प्रकरण अगदी गंभीर दुखापती होण्यापर्यंत गेलं.. पण या सगळ्यातून तो दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकला होता. आपलं डोकं सतत शांत कसं ठेवायचं आणि आत्मविश्वासाने समोरच्या माणसाशी कसं वागायचं . त्यामुळे ऍटन यांच्या थयथयाटाकडे त्याने अगदी सहज दुर्लक्ष केलं. हस्तांदोलनासाठी पुढे केलेला आपला हातही त्याने मागे घेतला आणि ऍटन च्या संतापाला उतार पडण्याची वाट बघत तो मख्खासारखा आपल्या खुर्चीत बसून राहिला. तसं बघायला गेलं, तर खगोलशास्त्रज्ञ म्हणजे मोठी विचित्र जमात असते. त्यातून गेल्या दोन महिन्यातलं ऍटनचं वागणं बघता, हा चमत्कारिक म्हातारा म्हणजे सगळ्या तऱ्हेवाईक खगोलशास्त्रज्ञांचा मेरूमणीच म्हणायला हवा होता.
आपलं डोकं किंचित शांत झाल्यावर ऍटननी बोलायला सुरुवात केली. आपल्या भावनांना कष्टाने आवर घातल्यामुळे त्यांचा आवाज जरासा थरथरत होता पण त्यांच्या ज्ञानाची खोली प्रकट करणारी त्यांच्या आवाजातली जरब मात्र तशीच होती.
" हा असला प्रस्ताव घेऊन तू माझ्यासमोर येऊच कसा धजावलास? हा प्रस्ताव म्हणजे माझा धडधडीत अपमान आहे. अर्थात तुझ्यासारख्या निर्लज्ज आणि गेंड्याची कातडी असलेल्या लोकांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार म्हणा... "
विद्यापिठाच्या वेधशाळेतला टेलिफोटोग्राफर बीनाय २५ याने आपल्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली आणि या संभाषणात उडी घेतली. "सर..., एकूण परिस्थितीकडे बघितलं तर.... "
ऍटननी आपली मान वळवून त्याच्याकडे पाहिलं आणि शुभ्र केसांनी मढलेली आपली भुवई उंचावली . "तू यात पडू नकोस बीनाय. या माणसाला इथे घेऊन येण्यामागे तुझा उद्देश चांगलाच आहे हे मला माहीत आहे. पण आता कुठलाच शिस्तभंग केलेला मला खपणार नाही. "
आता याहून जास्त वेळ गप्प बसण्यात अर्थ नाही हे ओळखून थर्मनने बोलायला सुरुवात केली, "ऍटन साहेब, तुम्ही मला माझं म्हणणं पूर्ण करू दिलंत तर... "
"यंग मॅन, आता तू काहीही जरी म्हणालास तरी गेले दोन महिने तुझ्या स्तंभांमधून आमच्या विरुद्ध तू जे काही गरळ ओकतोयस, ते वाचल्यावर तुझ्या बोलण्याचा काही उपयोग होईलसं मला वाटत नाही. मी आणि माझे सहकारी जगावर येऊन कोसळणाऱ्या भीषण संकटापासून जगाला वाचवण्यासाठी इथे अविश्रांत झटतो आहोत. दुर्दैवाने ते संकट टाळणं आता अशक्यच आहे. आणि तू आमच्याविरुद्ध सगळ्या वर्तमानपत्रांतून युद्ध मांडलं आहेस. आमची यथेच्छ टिंगलटवाळी करून, आमच्या कर्मचाऱ्यांना पार विदूषकच करून टाकलं आहेस तू.. "
ऍटन साहेबांनी टेबलावरून सारो सिटी क्रॉनिकल्स या वर्तमानपत्राचा ताजा अंक हातात घेतला आणि तो थर्मनसमोर नाचवत ते म्हणाले, " उद्दामपणाबद्दल जगप्रसिद्ध असलेल्या तुझ्यासारख्या बातमीदारानेही इथे माझ्यासमोर येण्यापूर्वी दहादा विचार करायला हवा होता. आणि आपल्या वृत्तपत्रांनाही, आज इथे वेधशाळेत काय काय होतंय ते टिपून घ्यायला तुझ्यासारखा माणूसच मिळाला का? " संतापाने ऍटनचा स्फोटच व्हायचा बाकी होता. हातातला वर्तमानपत्राचा अंक जमिनीवर भिरकावून देऊन ऍटन खिडकीजवळ गेले. आपले हात मागे वळवून पाठीजवळ त्यांची एकच घट्ट मूठ करून ते उभे राहिले.
"चालता हो इथून... " अचानक मागे वळून त्यांनी गर्जना केली आणि पुन्हा ते आकाशाकडे बघायला लागले.
त्यांच्या ग्रहाच्या सहा सूर्यांपैकी सर्वात तेजस्वी असलेला सूर्य - गॅमा, आता मावळायला लागला होता. गॅमा एव्हाना फिकुटला होता. त्याचा पिवळट गोल अस्ताचलाच्या क्षितिजरेषेवर हळूहळू अंधुक होत होता. आपण शुद्धीवर असताना, एक शहाणा माणूस म्हणून आपण गॅमाला पुन्हा कधीच पाहू शकणार नाही याची ऍटनना पूर्ण कल्पना होती.
" अं..थांब जरा..... तुला बातमीच हवीये ना? इकडे ये. मी देतो तुला बातमी. " थर्मन अजून आपल्या जागेवरच उभा होता. . हे वाक्य ऐकल्यावर तो हळूच ऍटनच्या शेजारी जाऊन उभा राहिला.
ऍटननी खिडकीबाहेर निर्देश केला. "आपल्या सहा सूर्यांपैकी बीटा एकटाच आता आकाशात उरला आहे. दिसतोय ना? "
हा प्रश्न विचारायची खरं म्हणजे काही गरज नव्हती. बीटा आता आकाशमाथ्यावर पोचला होता. बीटाच्या लाल प्रकाशात सगळा आसमंत लालकेशरी रंगाने नहात होता. मावळतीच्या बाजूने गॅमाचा क्षीण प्रकाश हळूहळू दिसेनासा होत होता. सूर्योच्चाला असल्यामुळे बीटा एखाद्या ठिपक्यासारखा दिसत होता. त्याचा आकार इतका लहान झालेला थर्मनने कधीच पाहिला नव्हता, पण या क्षणी बीटा हाच आकशगोलाचा सार्वभौम सम्राट होता याबद्दल काही वादच नव्हता.
त्यांच्या ग्रहाचं नाव होतं लगाश. लगाशचा सूर्य होता अल्फा, कारण लगाश अल्फभोवती फिरत असे. सध्या अल्फा पार पलिकडच्या गोलार्धात पोचला होता आणि त्यांच्या आकाशातून मावळला होता. त्यांच्या आकाशातले इतर चार सूर्यही सध्या दुसऱ्या गोलार्धात होते आणि म्हणूनच त्यांच्या आकाशातून मावळले होते. हे चार तारे म्हणजे दोन-दोन ताऱ्यांच्या दोन जोड्या होत्या. बीटा हा एक 'रक्त-बटू' किंवा रेड ड्वार्फ प्रकारचा तारा होता. तो अल्फाचा जोडीदार होता आणि सध्या आकाशात अगदी एकटा होता. बीटाच्या लाल प्रकाशात वर आकाशाकडे बघणार्या ऍटनचा चेहरा तांबूस दिसत होता. ऍटन म्हणाले, " आता चार तासांच्या आतच, आपल्या संस्कृतीचा अंत होणार आहे. कारण म्हणजे सध्या बीटा हा एकटाच सूर्य आकाशात उरलेला आहे. जा, हे छाप तुझ्या पेप्रात. पण तू लिहिलेला स्तंभ वाचायला कोणीच शिल्लक असणार नाही. " त्यांच्या चेहऱ्यावर एक खिन्न हसू पसरलं.
"पण समजा, हे चार तास गेले.... पुढचे चार तासही गेले आणि काहीच घडलं नाही, तर काय करायचं? " थर्मनने हळूच विचारलं.
"त्याची चिंता तुला नको. जे घडायचंय ते घडणारच... "
"हो, कबूल आहे. पण असं काहीच घडलं नाही तर.... "
बीनायने दुसऱ्यांदा आपलं तोंड उघडलं. "सर, मला वाटतं तुम्ही त्याचं म्हणणं एकदा ऐकून घ्यावं."
"मि. ऍटन, हा प्रस्ताव आपण मताला टाकू या... " थर्मन म्हणाला.
हे ऐकताच इतका वेळ शांतपणाने काम करणाऱ्या वेधशाळेच्या इतर पाच कर्मचाऱ्यांमध्ये जराशी चलबिचल झाली.
"त्याची काही गरज नाही. " ऍटन ठामपणे म्हणाले. "हा तुझा मित्र इतका आग्रहच करतो आहे, तर मी तुला पाच मिनिटं देतो. त्याच्या वर एक क्षणही मिळणार नाही. " त्यांनी खिशातून पॉकेटवॉच बाहेर काढलं. "बोल काय बोलायचंय ते."
" वा. हे उत्तम झालं. आता मला सांगा, तुम्ही जर इथल्या घटनांचा साक्षीदार म्हणून मला इथे थांबू दिलंत तर असा काय फरक पडणार आहे? जर तुमचा अंदाज बरोबर असेल तर तुमचं भाकित खरं होईलच. त्यावेळी मी इथे असल्यामुळे काही त्रास होणार नाही आणि शिवाय ते खरं ठरलंच तर माझा हा स्तंभ लिहिलाच जाणार नाही. पण समजा, जर तुमच्या भाकिताप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत, तर नेहमीप्रमाणे तुमची टर उडवली जाईल. छी-थू होईल. परिस्थिती बरीच अवघड होऊन जाईल. पण तसं झालंच, तर निंदा करण्याचं हे काम तुम्ही एका मित्रावर सोपवणं हेच शहाणपणाचं ठरणार नाही का?"
" आणि हे दयावंत मित्र कोण? आपण की काय? " ऍटननी खवचटपणे विचारलं.
"हो. मीच" थर्मनने आता जागेवरच फतकल मारली आणि मांडी ठोकली.
"माझ्या स्तंभातून मी जरा वाईट भाषा वापरली असेल कदाचित, पण तुम्हा लोकांना संशयाचा फायदा मिळेल अशी खबरदारी मी नेहमीच घेत आलो आहे. हल्लीचे दिवस हे काही लगाशवरच्या लोकांना 'जगबुडी आली' असा उपदेश करण्याचे दिवस नाहीत हे तुम्हीही मान्य कराल. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, की लोकांचा 'बुक ऑफ रिव्हिलेशन्स' वर आता मुळीच विश्वास उरलेला नाही. आणि तुमच्यासारखे शास्त्रज्ञसुद्धा आपल्या मतांपासून घूमजाव करून सांप्रदायिकांची री ओढायला लागतात तेव्हा तर लगाशकरांचा संताप अगदी अनावर होतो. "
"असं काहीच नाहीये, यंग मॅन.. " त्याला मध्येच थांबवत ऍटन म्हणाले. "आमच्याकडे असलेल्या माहितीपैकी बरीच माहिती जरी संप्रदायाकडून आम्हाला मिळालेली असली, तरी आम्ही काढलेल्या निष्कर्षांचा संप्रदायाच्या भाकडकथांशी काहीही संबंध नाही. सत्य हे नेहमी सत्यच असतं. मठाच्या अद्भुत दैवतशास्त्रामागेही काही प्रमाणात सत्याचा अंश आहे. आम्ही फक्त ते सत्य शोधून काढलं आहे आणि त्यातून गूढरम्य दैवी भाग वगळला आहे. आता तर हे संप्रदायवाले तुझ्यापेक्षाही जास्त द्वेष करतात आमचा. आणि हे मी तुला सांगायची गरज नाही, नाही का?"
" मी तुमचा द्वेष करत नाही. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायचा प्रयत्न करतो आहे की लोक भयंकर चिडलेत. "
"चिडू दे की मग " ऍटन खोचकपणे म्हणाले.
" हो पण उद्याचं काय? "
"उद्या? उद्या उरलेलाच नाहीये ! "
" पण समजा उद्या असलाच तर? आपण असं समजू या की उद्याचा दिवस उजाडणार आहे. तसं झालं तर काय होईल? लोकांच्या मनामध्ये खदखदणारा हा असंतोष आणखी उग्र रूप धारण करेल. आधीच गेले दोन महिने आर्थिक मंदी आहे. गुंतवणूकदारांचा खरं म्हणजे या जगवबुडीवर वगैरे विश्वास नाहीये. पण सावधगिरीचा उपाय म्हणून तेही पैसा गुंतवायला तयार नाहीयेत. सामान्य माणसांना तर यातलं खरंखोटं काहीच ठरवता येत नाहीये, पण सध्या सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेमुळे त्यांनीही आपल्या खरेदीच्या याद्या जराशा गुंडाळूनच ठेवलेल्या आहेत. ही झाली आताची परिस्थिती. एकदा का हा सगळा प्रकार घडून गेला, की सगळे भांडवलदार हात धुवून तुमच्या पाठीमागे लागतील. 'कुणीही उठावं, मनाला येतील ती 'भाकितं' करावीत, आणि आपल्या ग्रहाची अर्थव्यवस्था खुशाल ढवळून काढावी , असे प्रकार कसे चालतील? अशा लोकांना आता आपल्या ग्रहबांधवांनीच योग्य तो धडा शिकवायला नको का?' असा प्रश्न त्यांनी विचारला तर किती मोठा आगडोंब उसळेल याची तुम्हाला कल्पना असेलच. आणि असा प्रश्न ते विचारणारच आहेत हेही लक्षात घ्या सर. "
थर्मनकडे रोखून बघत ऍटन म्हणाले, " मग अशा परिस्थितीतून आम्हाला यशस्वीपणे बाहेर काढण्यासाठी तू नक्की काय करायचं म्हणतोयस? "
थर्मन त्यांच्याकडे बघून हसला. " सर, मी तुमचा पब्लिसिटी एजंट म्हणून काम करीन. हे सगळं प्रकरण नुसत्या टिंगलटवाळीवरच संपावं अशी मी परिस्थितीला एक डूब देईन. सगळीकडून होणारी शेरेबाजी आणि अपमान सहन करणं फारसं सोपं नाही याची मला कल्पना आहे. पण लोकांसमोर आलेली तुमची प्रतिमा दररोज कसलीतरी भाकितं करत सुटणाऱ्या एखाद्या बुवासारखी असेल तर लोक हा प्रकार फारसा गांभिर्याने न घेता सहज हसून सोडून देतील. लोकक्षोभापासून वाचण्यासाठी हे असंच काहीतरी करावं लागेल. आपण असं केलं, तर तुमचीही सुखरूप सुटका होईल. या सगळ्याचा मोबदला म्हणून, हे सगळंच प्रकरण ' कव्हर' करायजी अधिकृत परवानगी फक्त आमच्याच वर्तमानपत्राला मिळावी एवढंच माझं मागणं आहे.