दिवाळी अंक २००९

उषःकाल होता होता...

अदिती

"हो. साधारणपणे गेल्या शतकभरात या सिद्धांताला बऱ्यापैकी मान्यता मिळालेली आहे. पण या संस्कृतींचं हे चक्राकार वागणं हे जरा विचित्रच आहे. हे असं का आहे यामागचं गूढ उकलण्याचे अनेक प्रयत्न होत राहिले आहेत. आपल्याला अशा नऊ संस्कृतींबद्दल खात्रीशीर पुरावे मिळालेले आहेत. अशा आणखीही संस्कृती होत्या असं म्हणायला निश्चित जागा आहे. या सगळ्या संस्कृती साधारण आपल्याइतक्याच विकसित होत्या. गंमत म्हणजे या सर्व संस्कृतींच्या नाशाचं कारण एकच आहे, ते म्हणजे वणवा. हे वणवे कसे आणि का लागले याबद्दल कुठलीच ठोस माहिती मिळत नाही. यातली प्रत्येक संस्कृती अचानक लागलेल्या आगीत जळून भस्मसात होते आणि हे असं का? हे सांगायला काहीच मागे उरत नाही. "

शीरिनचं बोलणं थर्मन अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. तो म्हणाला, " पण सर, आपल्या ग्रहावर अश्मयुगातले लोकही एके काळी रहात होते ना ? "

"हो रहात होते. पण त्या काळातल्या माणसांबद्दल आपल्याला काहीच माहिती मिळत नाही. आपण फक्त एवढाच अंदाज बांधू शकतो की त्या काळचा मानव म्हणजे एप माकडाचंच थोडंसं उत्क्रांत झालेलं एक रूप होतं. त्यामुळे अश्मयुगीन कालखंड विचारात घेतला नाही तरी चालतो. "

" अच्छा! मग पुढे? "

"या सगळ्या घटनांची कारणामीमांसा म्हणून काही गोष्टी सांगितल्या जातात. पण त्या एकाहून एक अद्भुत आणि चमत्कारिक आहेत. काही लोक म्हणतात की आपल्याकडे ठराविक काळाने आगीचा पाऊस पडतो. काही लोक म्हणतात की ठराविक काळानंतर लगाश एखाद्या सूर्याच्या खूप जवळून जात असल्यामुळे असं होतं. काही लोकांच्यामते याहून अघटित आणि कल्पनेच्या पलिकडलं काहीतरी घडतं. पण एक मतप्रवाह असा आहे, जो या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. हा मतप्रवाह शतकानुशतकं चालत आलेला आहे. अगदी अखंडितपणे. "

" संप्रदायाच्या बुक ऑफ रिव्हिलेशन्स मधले 'तारे' ना? त्याच्याबद्दल मला माहीत आहे. "

"अगदी बरोबर! " शीरिन खूश होऊन म्हणाला. " संप्रदायाचं असं म्हणणं आहे, की प्रत्येक दोन हजार पन्नास वर्षांनंतर एकदा लगाश एका अंधाऱ्या गुहेत जातो. मग सगळेच सूर्य दिसेनासे होतात आणि सगळीकडे अंधाराचं राज्य पसरतं. सगळ्या क्षितिजांना गिळून टाकणारा मिट्ट काळोख सगळीकडे पसरतो. त्यानंतर हे तारे प्रकट होतात. ते आले की सगळी मानवजात आपलं स्वत्व गमावून बसते. सगळ्याच माणसांना झपाटून, अगदी पार पिसाटवून टाकणारी वेडाची एकच लाट उसळते आणि तिच्या प्रभावाखाली माणसं आपणच खपून उभं केलेलं जग पार नष्ट करून टाकतात. अर्थात या सगळ्याला ते त्यांच्या धार्मिक संकल्पनांची आणि कथांची डूब दिल्याशिवाय राहत नाहीत पण त्या सगळ्याचं मूळ हे इथे आहे. "

काही क्षण तिथे एकदम शांतता पसरली. शीरिनने एक मोठा श्वास घेतला. आणि तो पुढे बोलू लागला. "आता आपण वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताकडे वळू या. " या सिद्धांताचं नाव सांगताना त्यातल्या एकेका अक्षरावर जोर देऊन त्याचं महत्त्व अधोरेखित केल्यासारखा शीरिन बोलत होता. त्याचं हे बोलणं ऐकल्यावर, खिडकी जवळ उभं राहून बाहेरच्या परिसराचं निरीक्षण करणारे ऍटन मात्र एक तुच्छतादर्शक उद्गार काढून तिथून बाहेर गेले.

ऍटन निघून गेले त्या दिशेकडे दोघं काही काळ बघतच राहिले. थर्मनने विचारलं, " काय झालं? "

" विशेष असं काही नाही. आमच्या लोकांपैकी दोघेजण अजून इथे पोचलेले नाहीत. ते बऱ्याच वेळापूर्वी इथे पोचायला हवे होते. सध्या आमच्याकडे मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे कारण छावणीमध्ये पुरेसे लोक पाठवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. "

"त्या दोघांनी घाबरून पळ नसेल ना काढला? "

" कोण दोघे? फारो आणि यिमो? शक्यच नाही...पण ते दोघं जर अजून तासाभरात परत आले नाहीत, तर इथलं वातावरण बिघडायची शक्यता आहे."

बोलताबोलता शीरिन ताडकन उभा राहिला. " ऍटन इथे नाहीत तेवढ्यात आपला कार्यभाग उरकून घेऊ या.... "

जवळच्या खिडकीपाशी जाऊन तो खाली उकिडवा बसला आणि खिडकीखालच्या खोबणीतून त्याने एक बाटली बाहेर काढली.

त्या बाटलीमध्ये एक लाल द्रावण होते. त्याने ती बाटली जोरजोरात हलवल्यावर त्या द्रावणातून बुडबुड्यांची एक मालिका उभी राहिली.

"मला वाटलंच होतं, की ऍटनना अजून या जागेचा पत्ता लागलेला नाही. " बाटली हातात घेऊन शीरिन टेबलापाशी आला. "आपल्याकडे एकच ग्लास आहे त्यामुळे अतिथीचा मान म्हणून तू ग्लासातून पी. मी बाटलीनेच पिणार आहे. "

शीरिनने अगदी काळजीपूर्वक बाटलीतली थोडीशी वारुणी त्या लहानश्या ग्लासामध्ये ओतली. ग्लासाचा आकार बघितल्यावर थर्मनने तक्रारीचा सूर लावायचा प्रयत्न केला, पण शीरिनने केवळ एकाच भेदक कटाक्षाने त्याला गप्प केले.

"बाळ, मोठ्यांचा मान राखलाच पाहिजे... "

एखाद्या जखमेला धक्का बसल्यावर व्हावा तसा चेहरा करून थर्मन पुन्हा आपल्या जागेवर बसला. " जशी आपली आज्ञा, आजोबा.... मग पुढे काय झालं? "

शीरिनने वाईनची बाटली तोंडाला लावून एकापाठोपाठ एक असे मोठे घोट घेतले. पुरेसे मद्य पोटात गेल्यावर आपल्या रुमालाने तोंड पुसून शीरिन पुढे बोलायला लागला."तुला गुरुत्वाकर्षण या विषयाची किती माहिती आहे? "

"अं.. फारसं काही माहिती नाही, पण मी असं ऐकलंय, की हा अगदीच अलिकडे लागलेला शोध आहे त्यामुळे त्याचं स्वरूप संपूर्णपणे आपल्याला अजून कळालेलं नाही. आणि हा शोध नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी करावी लागणारी आकडेमोड इतकी अवघड आहे की ती समजू शकणारी माणसं अख्ख्या लगाशवर फक्त बाराच आहेत म्हणे. "

"छ्या! शुद्ध थापा आहेत या सगळ्या. गुरुत्त्वाकर्षणासाठी लागणाऱ्या सगळ्या बेरजा-वजाबाक्या मी तुला अगदी एका वाक्यात देऊ शकतो. 'गुरुत्त्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धान्त असं सांगतो, की विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचून घेणारं एक असं बल असत. त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानांचा गुणाकार भागिले त्यांच्यातल्या अंतराचा वर्ग हे सूत्र वापरून हे बल नक्की किती आहे ते आपल्याला मोजता येतं. "

"झालं? एवढंच सूत्र? "

" हो एवढी माहिती पुरेशी आहे. हे सूत्र शोधून काढायला आपल्याला चारशे वर्ष लागली. "

"बापरे.. एवढा वेळ कसा काय लागला? तुम्ही सांगताना तर ते बरंच सोपं वाटलं... "

"हम्म... एवढा वेळ लागला कारण सृष्टीचे नियम असे चुटकीसरशी कळत नसतात. ते शिकताना जरी सहज सोपे वाटले, तरी त्यांना अचूक सूत्रात बसवण्यामागे जगभरातल्या अनेक शास्त्रज्ञांची अनेक शतकांची मेहनत असते. चारशे वर्षांपूर्वी जिनॉव्ही फोरायने असा शोधा लावला की अल्फा लगाशभोवती फिरत नसून लगाश अल्फाच्या भोवती फिरतो. तेव्हापासून आपले खगोलशास्त्रज्ञ या गोष्टीवर काम करताहेत. त्या सगळ्यांनी अथक परिश्रम करून आपल्या सहा सूर्यांच्या भ्रमणाचा आलेख काढला. या सहा सूर्यांच्या अवकाशातल्या भ्रमणाचं गणित मांडलं. या गणिताला या लोकांनी अक्षरशः पिंजून काढलं. त्याच्याबद्दल अनेक सिद्धांत मांडले. त्यांची सर्व कसोट्यांवर कसून तपासणी झाली. अनेक मुद्दे मांडले गेले. खोडले गेले. चर्चा झाल्या. नवी गृहितकं जन्माला आली. या सगळ्यातून मांडला गेलेला प्रत्येक नवा सिद्धांत आधीच्या सिद्धंतापेक्षा अधिक अचूक होता. सत्याच्या जवळ जाण्यासाठी चाललेली ही सगळीच धडपड अतिशय जटिल होती. किचकट होती. अवघड होती. "

थर्मनने मान डोलावली. त्याच्या विचारचक्राला गती आली होती. त्या तारेतच त्याने आपला रिकामा ग्लास शीरिनसमोर धरला. नाखुशीनेच शीरिनने लाल वारुणीचे काही थेंब त्याच्या ग्लासात ओतले. त्या बाटलीतून आपण स्वतःही एक घोट घेतल्यावर शीरिन पुढे बोलायला लागला. "शेवटी, या लोकांनी असं सिद्ध करून दाखवलं, की आपल्या सहा सूर्यांचं अवकाशातलं भ्रमण हे पूर्णपणे गुरुत्त्वाकर्षणाच्या वैश्विक नियमाला धरूनच होतं. तो क्षण फार, फार महत्त्वाचा होता. या गोष्टीला आता वीस वर्षं झाली आहेत. "

बोलता बोलता शीरिन उठला. आपल्या हातातली बाटली तशीच धरून तो खिडकीजवळ जाऊन उभा राहिला.