दिवाळी अंक २००९

उषःकाल होता होता...

अदिती

"आता आपण अगदी कळीच्या मुद्द्याशी येऊन पोचतो. गेल्या दहा वर्षांमध्ये, गुरुत्त्वाकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे लगाशच्या भ्रमणाचं कोष्टक मांडण्याचं काम पूर्ण झालं. तेव्हा असं लक्षात आलं, की गुरुत्त्वाकर्षणाच्या नियमांप्रमाणे गणिताने दाखवलेली लगाशची कक्षा आणि प्रत्यक्षातली लगाशची कक्षा, यांच्यात काही ताळमेळच नाही. याचं कारण शोधण्यासाठी इतर पाच सूर्यांच्या गुरुत्त्वाकर्षणामुळे लगाशच्या कक्षेत होणारे बदल अगदी काटेकोरपणे विचारात घेतल्यावरही या दोन कक्षांमधली तफावत खूपच जास्त होती. याचा अर्थ अगदी सरळ होता. एक तर आपल्या सिद्धांतामध्ये काहीतरी त्रुटी होती नाहीतर इथे अशी एखादी गोष्ट होती जी आपल्याला पूर्णपणे अज्ञात होती, जिच्यामुळे हे गणित चुकत होतं. "

थर्मन आपल्या जागेवरून उठला आणि शीरिनच्या शेजारी जाऊन उभा राहिला. खिडकीतून बाहेर दूरवर लगाशचं लालसर क्षितिज आणि क्षितिजावर पसरलेल्या जंगलांच्या पार्श्वभूमीवरचे सारो शहरातल्या इमारतींचे आकार दिसत होते. त्याला आता अस्वस्थ वाटायला लागलं. कसल्या तरी अज्ञात भीतीने त्याला घेरायला सुरुवात केली. त्याने आकाशाकडे पाहिलं. बीटा अजूनही आकाशमाथ्यावर एखाद्या पाशवी अमंगळ बिंदूसारखा लालेलाल तळपत होता.

"सर, पुढे काय झालं ते सांगताय ना? " तो हळूच म्हणाला.

"त्यानंतर साधारण एक वर्षभर खगोलशास्त्रज्ञ या रहस्याची उकल करण्यासाठी धडपडत होते. त्यासाठी लोकांनी एकापेक्षा एक तर्क मांडले, अनुमाने काढली, हे सगळं एखाद्या सिद्धांतात बसवण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळेच तर्क एकापेक्षा एक अतर्क्य आणि पटायला अवघड होते. अखेरीस ऍटनना एक कल्पना सुचली. या मुद्द्यावर आपल्या संप्रदायाची मदत घेण्याची. संप्रदायाचे सध्याचे प्रमुख सॉर ५ हे यातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी आम्हाला बरीच माहिती दिली. त्यामुळे हा प्रश्न सुटायला खूपच मदत झाली. आणि एका संपूर्ण नवीन पद्धतीने हा प्रश्न ऍटननी सोडवला. "

"समजा, आपल्या शेजारी असा एखादा ग्रह आहे, जो आपल्याला दिसू शकत नाही. तर? तो ग्रह असल्यामुळे स्वयंप्रकाशी नाही. आपल्या सहा सूर्यांचा प्रकाश परिवर्तित केल्यावरच तो दिसू शकेल. शिवाय, आपला लगाश जसा निळसर खडकांनी बनलेला आहे, तसाच हा ग्रहसुद्धा निळसर खडकांनी बनला असेल, तर आपल्या अवकाशात सतत पडत असलेल्या उजेडाच्या पुरामध्ये तांबड्या आकाशाच्या पार्श्वभूमीवरचा हा अस्पष्ट अंधुक धूसर ग्रह आपल्याला दिसूच शकणार नाही... हो की नाही? "

थर्मनने पटकन एक शीळ घातली. "कसली भन्नाट कल्पना आहे ही.... "

"भन्नाट वाटतंय? मग हे घे.. जर हा ग्रह लगाशभोवती अशा गतीने, अशा कोनात आणि अशा कक्षेमध्ये फिरत असेल की ज्यामुळे लगाशच्या गणिती कक्षेतून भरकटण्याचं गणित सुटेल, तर? तर काय होईल? "

थर्मनने आपली मान जोराने हलवली.

"कधी ना कधी हा ग्रह आपल्या कुठल्यातरी सूर्याच्या आणि आपल्या मध्ये येईल. " आता शीरिनने उरलेली सगळी बाटली एका घोटात रिकामी केली.

"तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की हा सगळा नुसता तर्क नाहीये. हे सगळं प्रत्यक्षात घडत असलं पाहिजे.... " हताश होऊन एखादं सत्य मान्य करावं तसा थर्मन म्हणाला.

"हो. पण तो ज्या प्रतलामध्ये फिरतो, त्या प्रतलामध्ये फक्त एकच सूर्य आहे. " शीरिनने आकाशमाथ्याकडे बोटाने इशारा केला. "तो सूर्य म्हणजे बीटा. आणि हेही सिद्ध झालेलं आहे, की बीटाचं हे ग्रहण ज्या वेळी होतं, त्या प्रत्येक वेळेला आपल्या आकाशात अशी काही स्थिती असते, की त्या वेळी बीटा एकटाच आपल्या आकाशात असतो. बीटा आपल्यापासून सगळ्यात लांब अंतरावर असतो आणि आपला चंद्र आपल्यापासून सगळ्यात जवळ असतो. या ग्रहणाच्या वेळी चंद्राचा आकाशात दिसणारा व्यास बीटाच्या व्यासाच्या तब्बल सातपट असतो. हे ग्रहण जवळजवळ सहा तास, म्हणजे अर्ध्या दिवसापेक्षाही जास्त वेळ टिकतं. चंद्र बीटाला संपूर्णपणे झाकून टाकतो आणि त्याची सावली लगाशला संपूर्णपणे गिळून टाकते. हे बीटा - ग्रहण प्रत्येक दोन हजार एकोणपन्नास वर्षांनी एकदा होतं. "

थर्मनचा चेहरा आता निर्विकार झाला होता. "हे सगळं मी छापायचंय का? "

शीरिनने मान डोलावली. "हो. हे बीटा - ग्रहण आणखी पाऊण तासात सुरू होईल. मग जगावर अंधाराचं साम्राज्य पसरेल. मग कदाचित हे तारे येतील. मग लोकांना वेड लागेल. आणि मग सगळं संपेल. एक वर्तुळ पूर्ण होईल.... "

शीरिनच्या चेहऱ्यावर चिंता आणि गहन विचार यांच मिश्रण दिसत होतं. त्याच अवस्थेमध्ये त्याने पुढे बोलायला सुरुवात केली. "आम्हाला फक्त दोन महिने मिळाले पूर्वतयारी करण्यासाठी. इथे वेधशाळेत पुरेशी लोकंही नाहीत. शिवाय दोन महिन्यांमध्ये अख्ख्या लगाशला येणाऱ्या आपत्तीपासून वाचवणं, सावध करणं हे खरंच प्रचंड मोठं काम आहे. या कामासाठी कदाचित दोनशे वर्षंसुद्धा कमी पडतील... पण आमची सगळी कागदपत्रं, सगळ्या नोंदी छावणीत ठेवल्या आहेत. शिवाय आज आम्ही या ग्रहणाची छायाचित्रे घेणार आहोत. या चक्राचं पुढचं आवर्तन हे सत्याच्या साथीनेच सुरू व्हायला हवं. असं झालं तरच भावी पिढ्यांना या क्षणाला तोंड देण्यासाठी तयारी करता येईल. पुरेसा वेळ मिळेल. आणि जेव्हा पुढच्या बीटा-ग्रहणाचा दिवस येईल, तेव्हा सगळी मानवजात त्या दिवसासाठी सज्ज असेल..... मला वाटतं हाही तुझ्या लिखाणातला एक मुद्दा असायला हवा. "

खिडकीवरचा पडदा हलला आणि वाऱ्याची एक झुळूक आत आली. थर्मन खिडकीवर रेलून उभा राहिला. वाऱ्याने त्याचे केस भुरूभुरू उडत होते. खिडकीवर ठेवलेल्या त्याच्या हातांवर गडद लाल सूर्यप्रकाश पडला होता. अचानक तो मागे वळला. कसल्या तरी झटक्याने त्याने एकदम विचारलं, "काळोखात असं काय असतं, ज्याने आपल्याला वेड लागेल? "

आपल्या हातातल्या वाईनच्या बाटलीशी विमनस्कपणे चाळा करताकरता शीरिन स्वतःशीच हसला. " यंग मॅन, तू कधी काळोख पाहिलायस का? "

थर्मन मागच्या भिंतीला टेकून उभा राहिला. " नाही. कधीच नाही. पण काळोख कसा असेल याबद्दल कल्पना करणं सोपं आहे.... काळोख म्हणजे.. अं अं " बोलताबोलता तो आपल्या बोटांनी काहीतरी अमूर्त कल्पना पकडायचा प्रयत्न करत असल्यासारखा काही क्षण उभा राहिला. मग एकाएकी त्याचे डोळे चमकले... " काळोख म्हणजे प्रकाशाचा अभाव! एखाद्या गुहेत असतो तसा... "

"तू कधी एखाद्या गुहेत गेला आहेस का? "

" छे... कधीच नाही. "

" मला वाटलंच... परवा मी सहजच एक प्रयत्न करून पाहिला. तसा मी काही फार आत गेलो नव्हतो. मी जिथे उभा होतो तिथून गुहेचं तोंड दिसत होत. गुहेच्या तोंडातून प्रकाशाचं एक वलय दिसत होतं. माझ्या आजूबाजूला अगदी गडद अंधार होता. पण मी फार काळ गुहेमध्ये थांबू शकलो नाही. मी तिथून बाहेर प्रकाशाच्या दिशेने धावत सुटलो. माझ्यासारखा अगडबंब माणूस इतक्या जोरात पळू शकेल असं मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं. "

थर्मनच्या चेहऱ्यावर स्मिताची एक बारीक रेषा उमटली. " मी तुमच्या जागी असतो, तर मी नक्कीच तिथून पळून आलो नसतो. "

शीरिनने वैतागून एकदम थर्मनकडे पाहिलं.. " उगाचच बढाया मारू नकोस. हिंमत असेल, तर तो पडदा लावून टाक आताच्या आता."

" पडदे कशाला लावायचे? जेव्हा आपल्याकडे एकाच वेळी चार - पाच सूर्य तळपत असतात तेव्हा भगभगाट जरा कमी करण्यासाठी म्हणून पडदे लावणं वेगळं. आता आकाशात एकच सूर्य असताना पडदे लावायची गरजच काय? "

" तेच तर बघायचंय ना... ते पडदे लावून घे आणि इकडे येऊन बस. "

"बरं... " असं म्हणत थर्मनने पडदा बंद करायची दोरी ओढली. त्याच्या जवळच्या रुंद खिडकीवरचे पडदे बंद झाले. दांडीवरच्या पितळी कड्या किणकिणल्या. खोलीत काळपट लाल रंगाची आभा पसरली.

थर्मनच्या पावलांचा आवाज खोलीभर घुमला. पण टेबलाकडे जाताना वाटेतच तो एकदम थांबला. " मला काहीच दिसत नाहीये सर... तुम्ही कुठे आहात? "

"हातानी चाचपडावं लागेल तुला. तुझी वाट शोधावी लागेल. " शीरिनने अस्वस्थपणे त्याला सांगितलं.

" सर, मला काहीच दिसत नाहीये... कुठे आहात तुम्ही सर? " थर्मनला धाप लागली होती.

"मग? तुला काय वाटलं होतं? आता असं कर, इकडे ये आणि खुर्चीत बस. " अंधारातून जरा दरडावणीच्या सुरात आज्ञा झाली. अंधारात पावलांचा आवाज घुमला. थांबत थांबत, सावकाशपणे ती पावलं टेबलाच्या दिशेने आली. कोणीतरी खुर्चीवर आदळलं. अंधारातून एक बारीकसा आवाज फुटला.. " हुश्श... पोचलो एकदाचा.... "

"कसा वाटला हा अनुभव तुला? आवडला? "

"छे छे! आजिबातच नाही. मला तर असं वाटतंय की सगळ्या भिंती... सगळ्या भिंती माझ्यावर चालून येतायत... मला दोन्ही हातांनी त्यांना अडवायचंय.. पण मला वेडं झाल्यासारखं वाटत नाहीये... आणि मगाशी वाटणारी अस्वस्थताही आता बरीच कमी झाली आहे. "

" ठीक आहे. आता ते पडदे उघडून टाक"

पुन्हा एकदा अंधारात पावलांचा आवाज घुमला. सावकाश एकेक पाऊल टाकत थर्मन खिडकीशी पोचला. मग पडदा सळसळला.

थर्मनने पडद्याची दोरी ओढली. पडदा सरसरत मागे सरकल्याचा आवाज झाला. तो आवाज कुठल्याही सिंफनीपेक्षाही अधिक कर्णमधुर होता... आणि मग खोली पुन्हा एकदा तांबड्या प्रकाशाने नाहून निघाली.

थर्मनने खिडकीबाहेर तेजाने तळपणाऱ्या सूर्याकडे एक विजयी कटाक्ष टाकला. शीरिनने आपल्या हाताने कपाळावर आलेला घाम पुसला आणि तो म्हणाला, "एका अंधाऱ्या खोलीतच आपली ही अवस्था झाली.... "

"पण हे सगळं अगदीच असह्य वाटलं नाही.... " थर्मन पुटपुटला.

"हम्म्म एखाद्या खोलीत हे इतकं असह्य वाटणार नाही. पण तू कधी जंगलोरच्या शताब्दी-जत्रेमध्ये गेलायस का? "

"नाही... मला तिथे जायला जमलंच नाही. फक्त एका जत्रेसाठी सहा हजार मैल लांब जाणं माझ्या जिवावर आलं. "

" मी गेलो होतो. तुला माहितीये का? तिथल्या ऍम्यूझमेंट पार्कमध्ये एक जादूचा बोगदा होता. जत्रा सुरू झाल्यापासून पहिला एक महिनाभर तर त्याने लोकप्रियतेचे सगळे उच्चांक मोडले होते... "

"हो. मी ऐकलंय त्याच्याबद्दल... पण नंतर त्या बोगद्यावरून काहीतरी वाद झाला होता ना? "

"वाद असा नाही झाला... पण कुरबुरी झाल्या. अर्थातच त्यांच्यावर पडदा पाडला गेला . तो जो बोगदा होता, त्याची गंमत माहितीये तुला? एक किलोमीटर लांबीचा साधा बोगद्यासारखा बोगदा होता तो. पण त्याच्या आत एकही दिवा नव्हता. तिथे जाणाऱ्यांना एका टप नसलेल्या डब्यामध्ये बसवलं जात असे. एका टोकाकडून निघालं की पलिकडच्या टोकाला जायला पंधरा मिनिटे लागायची. सलग पंधरा मिनिटे मिट्ट काळोखातून प्रवास करायची ती फेरी तुफान लोकप्रिय झाली. पण नंतर ती बंद करावी लागली. "

"लोकप्रिय झाली? "

" साधीसुधी नाही. अमाप लोकप्रिय झाली. गंमत म्हणून एखाद्या भीतिदायक गोष्टीला सामोरं जाण्यामध्ये एक प्रकारचा थरार असतो. जन्माला आल्यापासून माणसाला कळत-नकळत तीन प्रकारच्या गोष्टींबद्दल भय वाटत असतं. ती त्याची सहजप्रवृत्ती असते. मोठ्या आवाजाचं भय, धडपडण्याचं भय आणि अंधाराचं भय. एखाद्याची मजा करायची असेल तर अचानक त्याच्या समोर जाऊन मोठा आवाज केला जातो तो याचमुळे. अनपेक्षितपणे मोठ्ठा आवाज कानावर आदळला की दचकायला होतं आणि समोरच्याला हसू येतं. आपल्याला एखाद्या रोलरकोस्टरमध्ये बसायला आवडतं तेही याचमुळे. जादूचा बोगदा इतका लोकप्रिय होण्यामागेही हेच कारण होतं..... आणि बोगद्यातल्या फेऱ्या बंद होण्यामागेही हेच कारण होतं. लोक भीतीने थरकाप झालेल्या, अर्धमेल्या अवस्थेमध्ये बोगद्यातून बाहेर यायला लागले. आणि तरीही पैसे भरून हा थरार अनुभवण्यासाठी धडपडणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती. "