दिवाळी अंक २००९

उषःकाल होता होता...

अदिती

" बरोबर... आता आठवलं मला... काही लोक त्या फेरीदरम्यानच मरण पावले होते ना? ती फेरी बंद केल्यावर असं काहीतरी कानावर येत होतं खरं... "

शीरिनने नकारार्थी मान हलवली. हाताच्या एकाच झटक्याने थर्मनचं म्हणणं उडवून लावत तो म्हणाला, " दोन-तीन लोक मेले. त्याचं काही फार महत्त्व नाही. गेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देऊन गप्प करण्यात आलं. जंगलोर शहराच्या महानगरपालिकेलाही गप्प बसवण्यात आलं. जत्रेच्या संचालकांचं असं म्हणणं होतं, की हृदयावर पडलेला ताण सहन न झाल्यामुळे कमकुवत मनाच्या लोकांच्या बाबतीत असं होऊ शकतं, पण हे लोक त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर त्या फेरीत बसले होते. आणि असं पुन्हा होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जाईल. मग त्यांनी फेरीत जाण्यापूर्वी प्रत्येक माणसाची तपासणी करायला सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून त्यांच्याकडे लोकांची अगदी रीघच लागली. "

"बरं! असं असेल तर... "

"नाही. याला अजून काही बाजू आहेत. काही काही वेळेला लोक त्या फेरीतून पूर्णपणे ठणठणीत अवस्थेत परतायचे. पण नंतर ते कुठल्याच इमारतीत जाऊ शकत नसत. मग ती इमारत राजवाडा असो, ऑफिस असो, झोपडी असो , चित्रपटगृह असो की एखादा तंबू.... "

थर्मन गडबडला. " याचा अर्थ, त्या लोकांना उघड्या मैदानातून कुठल्याही बंदिस्त जागेत जाता येत नव्हतं ? मग ते लोक झोपायचे कुठे? "

"बाहेर जमिनीवर... आकाशाखाली. "

"त्यांना पकडून खोलीत बंद का नाही केलं? "

" केलं ना... पण या लोकांना बळजबरीने एखाद्या खोलीत न्यायचा प्रयत्न केलाच, तर त्यांना एकदम झटका येई. ते हिंसक होत. आणि समोर दिसेल त्या भिंतीवर आपलं डोकं जोरजोरात आपटायला लागत. या लोकांना खोलीत ठेवायचं तर त्यांना बांधून तरी ठेवावं लागे, किंवा झोपेच्या गोळ्या तरी द्याव्या लागत असत."

"ते लोक ठार वेडे झाले असले पाहिजेत. "

"बरोबर. त्या फेरीतल्या दर दहा माणसांपैकी किमान एका माणसाची अशी अवस्था होत असे. मग त्यांनी आम्हा मानसोपचार तज्ज्ञांकडे मदत मागितली. आम्हाला यात एकच उपाय माहीत होता, तो आम्ही त्यांना सांगितला. आम्ही ती फेरी बंद करायला लावली. " शीरिनने आपले हात समोरच्या टेबलावर पसरले.

अखेरीस थर्मनने विचारलं, " या सगळ्या लोकांना नक्की झालं काय होतं? "

"तू मगाशी म्हणालास ना, की अंधारात या भिंती तुझ्यावर चालून येतायत असं तुला वाटत होतं? या लोकांच्या बाबतीत तसंच झालं होतं. आपल्याला अंधाराची भीती वाटते ना, तिला मानसशास्त्रात 'क्लॉस्ट्रोफोबिया' किंवा बंद जागांचं भय असं म्हणतात. आपल्याला अंधाराची भीती वाटते कारण अंधार आणि बंदिस्त जागा यांचा एकमेकांशी अगदीच जवळचा संबंध आहे. त्यामुळे एका गोष्टीबद्दल वाटणाऱ्या भीतीमध्ये दुसऱ्या गोष्टीची भीतीही ओघाने येतेच. "

"पण मग त्या बोगद्यातून बाहेर आलेल्या लोकांचं काय? "

"त्या लोकांना सलग पंधरा मिनिटे अंधारात काढावी लागली होती. दुर्दैवाने त्यांना त्या क्लॉस्ट्रोफिबियाचा परिणाम सहन होऊ शकला नाही. पंधरा मिनिटं प्रकाशिशिवाय काढायला लागणं हा कालावधी पुरेसा मोठा आहे. दोन तीन मिनिटातच तुझी चांगली वाट लागली होती. हो ना? त्या लोकांच्या बाबतीत जे काही झालं , त्याला आम्ही क्लॉस्ट्रोफोबिक फिक्सेशन असं म्हणतो. त्यांच्या मनातली अंधाराबद्दलची भीती आणि बंदिस्त जागांबद्दलची भीती या भावनांनी त्यांच्या मनाचा कायमचा ताबा घेतला होता. फक्त पंधरा मिनिटांच्या अंधाराचा हा असा परिणाम होतो. "

थर्मनच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. " माझा नाही विश्वास बसत यावर... "

"विश्वास बसत नाहीये की विश्वास ठेवायचा धीर होत नाहीये? जरा खिडकीबाहेर बघ काय दिसतंय... " शीरिन आता अगदी दरडावणीच्या सुरात बोलत होता. थर्मनने बाहेर नजर टाकली. पण त्याच्याकडे लक्ष न देता शीरिनने आपलं बोलणं पुढे सुरू ठेवलं.

"समजा आता खिडकीबाहेर काळोख पसरला आहे. अगदी किर्र अंधार. नजर पोचेल तिथवर फक्त काळ्या अंधाराचा अंमल आहे. काळं आकाश आणि अंधाराने गिळून टाकलेला आसमंत. आणि मग हे जे काय 'तारे' आहेत, ते दिसायला लागले आहेत... अशी कल्पना करणं तरी तुला जमेल का?"

"अं .. हो" थर्मन बोलताना अडखळला.

कसल्यातरी आवेशात शीरिनने आपला हात टेबलावर जोरात आपटला. "खोटं बोलतोयस तू. जशा अनंत काळ किंवा अनंत अंतराच्या कल्पना तुझ्या मेंदूसाठी अमूर्त आहेत, तशीच ही कल्पनाही तुझ्यासाठी अमूर्त आहे. या विषयावर गप्पा मारणं सोपं असलं, तरी ही गोष्ट म्हणजे नक्की काय आहे हे तुला समजणं तुझ्या मेंदूच्या कुवतीबाहेरचं आहे. सत्याच्या कणभर जवळ गेलास तर तुला अस्वस्थ वाटायला लागलं. आता जेव्हा पूर्ण सत्याला सामोरं जायची तुझ्यावर वेळ येणार आहे, तेव्हा त्या अवस्थेचा ताळेबंद लावता लावता तुझा मेंदू पुरता भंजाळून जाणार आहे. तुला कायमचं वेड लागणार आहे. ठार वेड. अगदी खात्रीने. "

शीरिनच्या आवाजात एकाएकी अपार खिन्नता आली. " ज्ञानाकडे , सत्याकडे जायची दोन हजार वर्षांची तडफड पुन्हा एकदा वाया जाणार आहे. उद्या लगाशवर धडक्या अवस्थेतलं एकही ठिकाण शिल्लक नसेल. "

जरा भानावर आल्यावर थर्मन म्हणाला, " हे मात्र माझ्या डोक्यावरून गेलं. आकाशात एकही सूर्य शिल्लक नाही म्हणून मला आणि सगळ्याच माणसांना वेड लागेल हे एकवेळ मान्य केलं, तरी सुद्धा, या गोष्टीमुळे शहरंच्या शहरं बेचिराख कशी होतील हे काही आपल्याला समजत नाही. "

शीरिन आता चांगलाच चिडला होता. "मूर्ख माणसा, तुझ्या आजूबाजूला सगळीकडे अंधार पसरल्यावर जिवाच्या करारावर तुला कोणती गोष्ट हवीशी वाटायला लागेल? उजेड! मागचापुढचा विचार न करता प्रकाश मिळवण्यासाठी जे काही सुचेल ते तू करायला लागशील. हो ना? "

"हो लागीन. मग? "

"तुला प्रकाश कसा मिळेल? "

" मला नाही माहीत... "

"जर सूर्याचा प्रकाश मिळत नसेल, तर प्रकाश मिळवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता? "

"ते मला कसं कळणार? "

एव्हाना ते दोघे एकमेकांच्या समोरासमोर, एकमेकांवर चाल करण्याच्या पवित्र्यात उभे होते.

"अशा वेळी प्रकाश मिळवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे एखादी गोष्ट जाळायची. तू कधी जंगलात लागलेला वणवा पाहिलायस ? कधी चुलीवर स्वयंपाक केलायस? चुलीतून फक्त उष्णताच नाही मिळत. प्रकाशही मिळतो. अंधारात माणसं प्रकाश मिळवणार आहेत. "

"लाकडं जाळून? "

" लाकडं? लाकडं अशी सहज मिळतात का? लाकडांच्या ऐवजी त्यांच्या हाताला जे जे म्हणून लागेल ते ते सगळं ते जाळत सुटणार आहेत. लगाशवरची प्रत्येक वस्ती पेटणार आहे. "

ते दोघंजण काही क्षण एकमेकांकडे त्वेषाने बघत उभे राहिले. जणू काही ही त्यांच्यातल्या शक्तीचीच परीक्षा होती. पण मग थर्मन मागे हटला. त्याला धाप लागली होती. शेजारच्या खोलीतून अचानक कसलातरी आवाज यायला लागला होता, पण थर्मनच्या तो खिजगणतीतही नव्हता.

शीरिन म्हणाला, " बहुतेक यिमो आणि फारो आलेत. हा यिमोचा आवाज आहे. " शीरिनने आपला आवाज प्रयत्नपूर्वक शांत केला आहे हे कळत होतं. "चल, बघू या काय प्रकार आहे तो.."

"हो चला. " थर्मन म्हणाला. त्याने मनोमन काहीतरी झटकून टाकायचा प्रयत्न केला. वातावरणातला ताण निवळला.

शेजारच्या खोलीतून जोरजोरात संभाषणांचे आवाज येत होते. ते दोघे आत शिरले. त्या खोलीत मधोमध दोन तरुण मुलं उभी होती. त्यांना त्यांचे ओव्हरकोट काढण्याचीही सवड न देता, वेधशाळेतल्या बाकी लोकांनी त्यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या होत्या आणि रणांगणातल्या मुरारबाजीसारखे ते दोघं त्या चौफेर हल्ल्याला तोंड देत होते.

ऍटन एकदम तीरासारखे आत घुसले. जाब विचारावा तसं त्यांनी त्या दोन तरुण मुलांना विचारलं, " कुठे होतात? पत्ता काय तुम्हा दोघांचा? आता फक्त अर्धा तास राहिला आहे आपल्या हातात... काही शुद्ध आहे की नाही? "

फारो २४ एका खुर्चीवर बसला आणि आपले तळहात त्याने जोरात एकमेकांवर घासले. बाहेरच्या गार वाऱ्यातून आल्यामुळे त्याचे गाल लालबुंद झाले होते. तो म्हणाला, " मी आणि यिमो आमचा स्वतःचाच एक लहानसा प्रयोग करून बघत होतो. कृत्रिमरित्या अंधार करून त्यातून ताऱ्यांच्या प्रकाशासारखा प्रकाश पाडता येईल अशी व्यवस्था करून बघायचा आमचा विचार होता. थोडीशी पूर्वकल्पना मिळाली तर बघावी म्हणून आम्ही हा उद्योग केला. "

त्यांच्या आजूबाजूला खुसपूस झाली. ऍटनचे डोळे अचानक चमकले. सावध झाले. "तुम्ही आधी यातलं काहीच मला बोलला नाहीत. कसा काय जमवलात हा प्रयोग तुम्ही? "

"बऱ्याच दिवसांपासून माझ्या आणि यिमोच्या मनात ही कल्पना घोळत होती. आम्ही आमच्या फावल्या वेळात तिच्यावर काम करत होतो. यिमोच्या माहितीत एक जागा होती. शहराच्या जुन्या गावभागात एक एकमजली घर आहे. त्याचं छप्पर एखाद्या घुमटासारखं आहे. तिथे पूर्वी कसलं तरी संग्रहालय होतं बहुतेक. पण ते जाऊ दे. तर ते घर आम्ही विकत घेतलं. "

"तुम्हा दोघांकडे एवढे पैसे कुठून आले? " ऍटननी विचारलं.

"आमच्या खात्यात तेवढे पैसे होते. आम्हाला त्यासाठी २००० दमड्या खर्ची घालाव्या लागल्या. " यिमो ७० म्हणाला. आणि मग स्वतःच कबुलीजबाब दिल्यासारखी त्याने पुस्ती जोडली, " तशीही अजून अर्ध्या तासानी २००० दमड्यांची किंमत २००० कागदाच्या कपट्यांपेक्षा जास्त नसेल ना. "

" म्हणूनच पैशांचा विचार न करता आम्ही ते घर घेतलं. मग त्यात शक्य तितका चांगला काळोख निर्माण करायला म्हणून आम्ही त्याच्या छतापासून पायापर्यंत काळ्या मखमली कापडाचं एक आवरण तयार केलं. मग आम्ही छपराजवळ मखमलीच्या कापडाला आणि नंतर छपरालाही गोल भोकं पाडली. त्या सगळ्या भोकांवर धातूच्या झडपा बसवल्या. भिंतीवरच्या एका कळीच्या मदतीने त्या झडपांची उघडझाप करायची सोय आम्ही करून घेतली. यासाठी आम्हाला पैसे खर्च करावे लागले. काही सुतार आणि गवंड्यांची मदत घ्यावी लागली. पण अर्थातच पैशाला काहीच किंमत नव्हती आमच्या दृष्टीने. शेवटी आम्ही एक अशी यंत्रणा उभी केली ज्यामुळे आम्हाला त्या घराच्या छपरातून ताऱ्यांच्या प्रकाशासारखा प्रकाश मिळेल. "

एका दमात हे एवढं सगळं बोलल्यावर श्वास घ्यायला तो क्षणभर थांबला. तिथे पसरलेल्या शांततेतून ऍटन म्हणाले, "तुम्हाला असं खाजगी संशोधन करायला परवानगी नाहीये.. "
त्यांचं बोलणं मध्येच थांबवत फारो म्हणाला, " हो आम्हाला माहितेय सर. पण खरं सांगू का? यिमो आणि मी, आम्हाला दोघांनाही सारखं वाटत होतं की अशा प्रकारचा प्रयोग करणं धोकादायक ठरू शकतं. शीरिनचं या बाबतीतलं म्हणणं आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्हाला दोघांनाही वेड लागू शकतं याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे आम्ही दोघांनीच हा धोका पत्करायचा असं आम्ही ठरवलं. जर आम्ही वेड न लागता यातून बाहेर आलो असतो, तर आम्हाला काळोखाच्या परिणामांपासून अलिप्त होण्याचा मार्ग शोधायचा होता. एकदा ते जमलं असतं तर आम्ही तुम्हाला सगळ्यांनाही यात सामील करून घेतलं असतं. पण आम्हाला वाटलं होतं तसं काहीच झालं नाही... "

"का? काय झालं? " -ऍटन.

आता यिमोने बोलायला सुरुवात केली. "आम्ही दारं बंद केली आणि पूर्ण काळोखात जाऊन उभे राहिलो. आमचे डोळे अंधाराला सरावायला जरा वेळ लागला. पूर्ण काळोख फार विचित्र असतो. असं वाटतं की सगळ्या भिंती आणि छपर आपल्याकडे धावत येतायत आपल्याला गिळून टाकायला. पण थोड्या वेळाने आम्हाला ते सरावाचं झालं. मग आम्ही त्या छपरातल्या झडपा उघडल्या. खोलीच्या छपरातून प्रकाशाचे लहानलहान पुंजके चमकायला लागले. "

"मग पुढे? "

"पुढे काहीच नाही. काहीच झालं नाही. हा प्रकार सगळ्यात विचित्र होता. भोकं असलेल्या छपरापेक्ष वेगळं असं तिथे काहीच दिसलं नाही की जाणवलं नाही. आम्ही हा उद्योग बरेच वेळा करून पाहिला. त्यातच आमचा इतका वेळ गेला. पण काहीच घडलं नाही... "

तिथे स्मशानशांतता पसरली. नकळत सर्व नजरा शीरिनकडे वळल्या. तो तोंडाचा आ वासून एका खुर्चीवर स्तब्ध बसला होता.

थर्मनने सर्वात आधी बोलायला सुरुवात केली. "शीरिन, याचा अर्थ काय आणि याचा तुमच्या सगळ्या स्पष्टीकरणावर काय परिणाम होईल हे तुम्हाला कळतंय ना? " त्याच्या चेहऱ्यावरून समाधान आणि आनंद ओसंडून वहात होता.

शीरिनने हाताने त्याला थांबवलं. " एक मिनिट, मला याचा जरा विचार करू दे. " त्याने आपली बोटं मोडली. आणि अचानक त्याने वर पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर कणभरही आश्चर्य दिसत नव्हतं. त्याने बोलायला सुरुवात केली, " बरोबरच आहे... "

पण त्याला आपलं वाक्य पूर्ण करता आलं नाही. त्या इमारतीच्या वरच्या भागातून कसलातरी आवाज आला. बीनाय त्या आवाजाने दचकून एकदम उभा राहिला आणि काय गडबड आहे हे बघायला आवाच्या दिशेने त्याने धाव घेतली. बाकीचे लोकही त्याच्या मागोमाग धावत सुटले.

पुढच्या गोष्टी एकामागोमाग एक इतक्या त्वरेने घडल्या की बास! वरच्या घुमटामध्ये मोठ्यामोठ्या फोटोग्राफिक प्लेटसचे तुकडे इतस्ततः पडले होते. एक माणूस ओणव्याने वाकून त्या प्लेट्स जवळ काहीतरी करत होता. हा प्रकार पाहताक्षणी संतापाने बीनायने एकदम धाव घेतली आणि त्याच्या गळ्यावर एक जबरदस्त पोलादी पकड घेतली. तोवर बाकीचे लोकही तिथे येऊन पोचले. आणि मग एकामागोमाग एक लोकांनी येऊन त्या माणसाला धरलं. झटापटीचे आवाज आले आणि अर्धा डझन माणासांनी त्या घुसखोराला जणू काही गिळून टाकलं.

ऍटन सगळ्यात शेवटी आले. दम खात ते म्हणाले, "सोडा त्याला. "

नाखुशीनंच त्या लोकांनी घुसखोराला सोडलं. त्याला दम लागला होता. त्याचे कपडे फाटले होते आणि त्याच्या कपाळावर जखम झाली होती. इतर लोकांनी त्याचे दोन्ही हात धरून त्याला उभं केलं. त्या घुसखोराने लांब दाढी राखलेली होती. तिला विशिष्ट कोनात वळवलेलं होतं. ही दाढी म्हणजे संप्रदायाची खूण होती. बीनायने त्याची गचांडी धरली आणि त्याला जोरजोराने हलवलं.

"काय रे कुत्र्या, या फोटोग्राफिक प्लेटसशी काय करत होतास तू? तुला काय वाटलं? ... "

" मला नकोच आहेत तुमच्या प्लेटस. त्या चुकून पडल्या खाली... " संप्रदायी म्हणाला.

तो पलिकडे ठेवलेल्या कॅमेऱ्यांकडे जळजळीत नजरेने बघत होता. तो कुठे पाहतो आहे हे लक्षात आल्यावर बीनाय आणखी संतापला. "अच्छा ... बच्चमजी, हे कॅमेरे नष्ट करायचा डाव होता काय तुझा! तसं असेल तर तुझ्या हातून फोटोग्राफिक प्लेटस फुटल्या हे तुझं सुदैवच म्हणायला हवं. जर का तू एकाही कॅमेऱ्याला हात जरी लावला असतास ना, तर मी तुझे हाल हाल करून तुला ठार मारलं असतं. पण हरकत नाही..." असं म्हणत त्याने आपल्या हाताची मूठ वळली आणि त्याच्या चेहऱ्याच्या दिशेने उगारली.

ऍटननी त्याच्या बाहीला धरलं. "पुरे, बीनाय. बास झालं. सोड त्याला "

बीनाय संतापाने थरथरत काही क्षण तसाच उभा राहिला . अखेर त्याने आपला उगारलेला हात खाली घेतला. त्याला बाजूला करून ऍटन स्वतः त्याच्या समोर उभे राहिले. "तू लॅटिमर आहेस ना? "

त्या घुसखोराने कमरेत झुकून अभिवादन केलं पण त्यात नम्रतेपेक्षा गुर्मीचा ताठाच अधिक होता. मग आपल्या कमरेजवळ लावलेल्या बिल्ल्याकडे निर्देश करून तो म्हणाला, " हो मीच लॅटिमर२५, लॉर्ड सॉर ५ यांचा उजवा हात. "

"गेल्या आठवड्यात जेंव्हा लॉर्ड सॉर इथे आले होते तेव्हा त्यांच्यासोबत तूही आला होतास. बरोबर?

लॅटिमरने पुन्हा एकदा कमरेत झुकून अभिवादन केले.

"हम्म... काय हवंय तुला? "

" मला हवी असलेली गोष्ट तुम्ही आपणहून राजीखुशीने मला देऊ शकणार नाही."

"तुला सॉर५ यांनी पाठवलंय का? की तुझा तूच आलायस? "

"या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. "

"तू एकटाच आलायस की अजून काही लोक येऊ घातलेत? "

"याही प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. "

ऍटननी आपल्या घड्याळाकडे एक नजर टाकली आणि तेम्हणाले, " आता या घडीला सॉरसाहेबांना काय हवंय माझ्याकडून? ठरल्याप्रमाणे सगळ्या अटी तर मी यापूर्वीच पूर्ण केल्या आहेत. "

लॅटिमर नुसताच हसला. काहीच बोलला नाही.