उषःकाल होता होता...
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
ऍटन आता चिडले होते. "मी त्यांच्याकडे गेलो होतो माहितीची याचना करायला. अशी माहिती, जी संप्रदायाखेरीज दुसरीकडून कुठूनही मिळू शकत नाही. ही माहिती तुम्ही लोकांनी मला दिली याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. या माहितीचा मोबदला म्हणून मी तुमची मतप्रणाली सिद्ध करून द्यायची असं ठरलं होतं. त्याप्रमाणे मी ती दिलीही. "
"बुक ऑफ रिव्हिलेशन्समध्ये लिहिलेल्या गोष्टी स्वयंसिद्ध आहेत. त्या सिद्ध करायची काही गरजच नाही" किंचित गर्वोद्धतपणे लॅटिमर म्हणाला.
" हो, पण त्या गोष्टी स्वयंसिद्ध आहेत त्या फक्त तुमच्या संप्रदायातल्या लोकांसाठी. माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नकोस. तुमच्या मतप्रणालीला विज्ञानाचं पाठबळ मिळवून देईन असं मी कबूल केलं होतं. आणि तसं ते मी दिलं आहे. "
लॅटिमरचे डोळे संतापाने बारीक झाले. त्याच्या मुद्रेवर तुच्छतेचा भाव प्रकट झाला होता. " हो, दिलंत ना! दिलंत तुम्ही पाठबळ. पण ते देतानाही तुम्ही एखाद्या कोल्ह्यासारखा धूर्तपणा केलात. तुमच्या मल्लिनाथीमुळे आमची मतप्रणाली सिद्ध झाली खरी, पण ती अशा पद्धतीनं की तिची गरजच संपुष्टात आली. जगबुडीचा अंधार आणि प्रकट होणारे तारे, यांना तुम्ही एखाद्या नैसर्गिक गोष्टीचं रूप दिलंत आणि त्यांच सगळं धार्मिक महत्त्व संपुष्टात आलं. हा आमच्या देवाचा अपमान आहे. "
"असला तर असला. मी काही मुद्दामून कोणाचा अपमान केलेला नाही. ज्या गोष्टी सत्य आहेत त्या आहेतच. त्या तशाच सांगायला हव्यात... "
"जे तुम्हाला सत्य वाटतंय, त्या खरं म्हणजे थापा आहेत सगळ्या. अगदी शुद्ध फसवणूक आहे ही"
ऍटनने संतापाने आपले पाय जमिनीवर आपटले. "सत्याबित्याबद्दल तुला काय रे ठाऊक ? "
"मला सगळं माहितेय.... " लॅटिमर हे वाक्य असं म्हणाला की जणू काही या घोषणेनंतर कुणी काही बोलूच शकत नाही.
ऍटनचा चेहरा संतापाने जांभळा पडला. बीनायने मध्येच काहीतरी बोलायचा प्रयत्न केला पण त्याला तोंडातून अक्षरही काढू न देता ऍटन एकदम कडाडले, "मग सॉर ५ महाराजांचं काय म्हणणं आहे? त्यांना अजूनही असं वाटतंय का, की जगावर कोसळणाऱ्या संकटातून पसरणार्या वेडाच्या लाटेतून लोकांना वाचवण्यासाठी आम्ही जगाला सावध करतोय ते चुकीचं आहे? आम्ही कोट्यवधी लोकांच्या आत्म्यांना संकटात लोटतो आहोत? जा, जाऊन सांग त्यांना. म्हणावं, आम्हाला आमच्या प्रयत्नांत फारसं यश आलेलं नाहीये. "
"पण तुम्ही असा प्रयत्न करून मुळातच फार मोठं नुकसान केलंय. आणि आता ही वैज्ञानिक उपकरणं वापरून या प्रकराची माहिती गोळा करण्याचे तुमचे हे सैतानी चाळे तातडीने बंद पाडायला हवे आहेत. ताऱ्यांच्या मर्जीपुढे आपलं काही चालत नाही. आपण ताऱ्यांच्या इच्छेचा मान राखायलाच हवा. मला दुःख फक्त याच गोष्टीचं आहे, की माझ्या वेंधळेपणामुळे तुमच्या या उपकरणांचा नायनाट करायचं काम माझ्या हातून पूर्ण होऊ शकलं नाही"
ऍटन म्हणाले, " त्याचा फारसा उपयोग झाला नसता. कारण आज शेवटच्या क्षणांमध्ये जी काही निरीक्षणं आम्ही नोंदवू ती वगळल्यास आमची सगळी माहिती आमच्या छावणीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे. तिला तुम्ही हात लावू शकणार नाही. " ते खिन्नपणे हसले. " तू अनधिकृतपणे इथे घुसलेला एक घुसखोर आहेस, गुन्हेगार आहेस आणि या सगळ्या वादामध्ये ही गोष्ट विसरून चालणार नाही. "
त्यांच्या मागे उभ्या असलेल्या दोघांजणांकडे वळून ते म्हणाले, "पोलिसांना बोलवा. लौकर "
" ऍटन, अहो तुम्हाला झालंय तरी काय? आपल्याकडे एवढा वेळच नाहीये. हे प्रकरण मला हाताळू द्या... " गर्दीतून पुढे येत शीरिन म्हणाला.
"शीरिन, माकडचेष्टा करायची ही वेळ नव्हे. हे प्रकरण मला माझ्या पद्धतीने हाताळू दे. शिवाय, याच्यासारखंच तुलाही इथे थांबायचं काही कारण नाहीये हे लक्षात ठेव."
शीरिनचा चेहरा वेदनेने पिळवटल्यासारखा झाला. "बीटाचं ग्रहण सुरू व्हायला काही मिनिटंच उरल्येत. आता आपण पोलिसांना कशाला बोलवत बसायचं? ते इथे कधीच पोचू शकणार नाहीयेत. शिवाय हा माणूस इतका शहाणा नक्कीच वाटतो आहे की तो इथे शांत बसेल आणि आणखी काही गडबड करणार नाही. वाटल्यास आपण तशी शपथ घ्यायला लावू या त्याला "
लॅटिमर एकदम म्हणाला, "ते शपथेचं वगैरे काही मला सांगू नका. मी असलं काहीही करणार नाही. तुम्हाला काय हवं ते तुम्ही खुशाल करा. माझ्या शब्दावर विश्वास वगैरे ठेवत बसू नका, कारण माझं इथलं काम पूर्ण करण्यासाठी जी संधी मिळेल ती मी आजिबात वाया घालवणार नाही. खरं तर, तुम्ही पोलिसांना बोलवाच. "
लॅटिमरकडे बघून शीरिन हसला. " तू अगदी दिल्या शब्दाला जागणारा आहेस नाही का! पण असं बघ, की तिकडच्या खिडकीत एक तरूण धट्टाकटा माणूस बसलाय. त्याची पकड पोलादी आहे आणि तो बराच चपळही आहे. शिवाय तोही तुझ्यासारखाच बाहेरचा माणूस आहे. एकदा बीटा-ग्रहण सुरू झालं, की तुझ्यावर नीट लक्ष ठेवण्याशिवाय त्यालाही दुसरा काही उद्योग नाहीये. आणि वयाबरोबर चपळाई जरा कमी झाली असली, तरी एखाद्या माणसाची गठडी वळणं मला मुळीच अवघड नाही. तेव्हा आता बर्या बोलाने मी सांगतो तसं करायचं. "
लॅटिमरने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला. पण शीरिन पुढे म्हणाला, " बीटा-ग्रहणाला सुरुवात झाली, की थर्मन आणि मी तुला घेऊन पलिकडच्या खोलीत जाऊ. तिथे एकही खिडकी नाहीये आणि तिला बाहेरच्या बाजूला एक भलंथोरलं कुलूप पण आहे. हे ग्रहण संपेपर्यंत तुला तिथेच बसायचं आहे. कळलं?"
"उत्तम आहे. तारे प्रकट झाल्यावर नक्की काय होणार हे तुमच्याइतकंच मलाही माहित्ये. जेव्हा हा सगळा गोंधळ संपेल तेव्हा माझी सुटका करायला कोणाचंच डोकं ठिकाणावर नसेल. त्या कपाटात बसून मला गुदमरल्यामुळे मरण येईल किंवा उपासमारीने तरी मरण येईल असंच ना? तुमच्यासारख्या शास्त्रज्ञांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करायची म्हणा... पण असं असलं तरी मी काही तुम्हाला शब्द देणार नाही कारण काही झालं तरी हा माझ्या तत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आता या गोष्टीवर मला मुळीच चर्चा नकोय. "
ऍटनची चलबिचल झाली. ते म्हणाले, "शीरिन, या माणसाला कोंडून ठेवणं म्हणजे .... "
"ऍटन, असं काहीही होणार नाहीये. त्याला कोंडून ठेवायची वेळ आपल्यावर यायची नाही. लॅटिमरने भलतीच हुशारी दाखवून आपल्याला गंडवायचा प्रयत्न केला आहे. पण मी काही प्रमाणपत्र विकत घेऊन सायकोलॉजिस्ट झालेलो नाही. "
त्याने ऍटनना शांत केलं आणि लॅटिमरकडे वळून तो म्हणाला, " तुला खरंच असं वाटलं की तुला उपासमारीनं ठार मारण्याइतका मी जंगली माणूस आहे? मित्रा, मी जर तुला कोंडून ठेवलं, तर तुला काहीच दिसायचं नाही. ना अंधार, ना तारे. मला तुमच्या मतप्रणालीबद्दल फारशी माहिती नसली, तरी एवढं नक्कीच माहिती आहे की तारे प्रकट झाल्यावर तुला अंधारात ठेवणं म्हणजे तुझ्या चिरंतन आत्म्यावर घाव घालण्यासारखं आहे. तू तत्त्वाचा माणूस दिसतोयस, त्यामुळे इथे काही गडबड न करण्याबद्दल तू मला जर वचन दिलंस तर मी तुझ्यावर विश्वस ठेवायला तयार आहे. "
लॅटिमरच्या कपाळावरची शीर तटतटली. मग चरफडत तो म्हणाला, "ठीक आहे. मी वचन देतो. पण तुझ्या या धर्मविरोधी करणीमुळे तू अनंत काळ नरकात सडशील."
शीरिनला उद्देशून अशी शापवाणी उच्चारल्यावर तो तरातरा एका कोपऱ्यातल्या उंच स्टुलाकडे चालता झाला.
"थर्मन, त्याच्या शेजारी जाऊन बस. तशी काही आवश्यकता नाही म्हणा, पण आपली खबरदारी म्हणून... थर्मन? थर्मन! "
थर्मनचा चेहरा फिकुटला होता. बसल्या जागी तो खिळल्यासारखा झाला होता. "ते बघा..." त्याने खिडकीबाहेर बोट दाखवलं. त्याचे हात थरथरत होते आणि आवाजही कापरा झाला होता.
एकजात सगळ्यांनी मान वळवून खिडकीतून बाहेर पाहिलं. एक क्षणभर तिथे तणावपूर्ण शांतता पसरली. सगळेजण डोळे फाडफाडून खिडकीबाहेर पाहत होते.
अडकित्त्याने कातरलेल्या सुपारीसारखी आकाशात बीटाची एक बाजू दिसेनाशी झाली होती. बीटाची कातरली गेलेली बाजू अगदी नखभर सुद्धा नसेल , पण वेधशाळेल्या लोकांना त्यामध्ये पुढच्या सगळ्या अनर्थाची नांदी स्पष्ट दिसली.
एक क्षणभरच लोक त्या चमत्काराकडे बघत राहिले. मग अचानक तिथे एकच गडबड उडाली. आणि अर्ध्या क्षणाच्या आत जो तो पद्धतशीरपणे आपापल्या कामात गढून गेला.