उषःकाल होता होता...
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
एकदा युद्धाला तोंड फुटलंय म्हटल्यावर भावनेला जागा नव्हती. आणि इथे तर सगळे एका ध्येयाने झपाटलेले शास्त्रज्ञ होते. त्यामुळेच अगदी ऍटनसुद्धा आपल्या कामात गर्क झाले होते.
"ग्रहणस्पर्श पंधरा मिनिटांपूर्वीच झाला असणार. आपल्या अंदाजापेक्षा थोडा लौकरच. पण सगळ्या अनिश्चितता लक्षात घेतल्या तर आपला अंदाज खूपच बरोबर ठरला असं म्हणायला हवं..." असं म्हणत शीरिनने आपल्या आजूबाजूला पाहिलं, तर तिथे कोणीही नव्हतं. थर्मन मात्र एकटाच खिडकीतून बाहेर बघत उभा होता. शीरिनने त्याला हळूच मागे खेचलं.
"आधीच ऍटन भडकलेले आहेत. या लॅटिमर प्रकरणाने त्यांचा वेळ खाल्ला आणि त्या गोंधळात ग्रहणस्पर्श बघायचा राहिला. आता तू जर त्यांच्या मधेमधे आलास तर मागचापुढचा विचार न करता ते तुला सरळ खिडकीतून खाली फेकून देतील. "
थर्मनने मान डोलावली आणि तो खाली बसला. शीरिन म्हणला,"बापरे थर्मन, तुला तर अगदी थरथरायला होतंय..."
थर्मनने आपल्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवायचा एक क्षीण प्रयत्न केला आणि तो कसनुसं हसला, "मला बरं वाटत नाहीये..."
"तुझं डोकं अजून ठिकाणावर आहे ना?"
"नक्कीच आहे. पण... माझा अजूनही या वेडं होण्यावर विश्वास बसलेला नाहीये. मनापासून तर नाहीच नाही. तुम्हाला सगळ्यांना या अवस्थेची सवय व्हायला निदान दोन महिने तरी मिळाले होते. पण मला हे सगळं आताच कळलंय. मला थोडा वेळ तरी द्या या सगळ्याची सवय करून घ्यायला"
" तुझं म्हणणं बरोबर आहे. बरं मला सांग तुझ्या घरी कोण कोण असतं? आई -वडील? बायको? मुलं? " शीरिनने विचारले.
"तुम्ही छावणीत माझी सोय करण्यासाठी विचारताय ना? पण मी एकटाच आहे. मला फक्त एक बहीण आहे. ती दोन हजार मैलांवर राहते. खरं सांगायचं तर मला तिचा पत्तासुद्धा नीटसा माहीत नाहीये."
"अच्छा! पण तुला छावणीत जायला काय हरकत आहे? तशीही तिथली एक जागा रिकामी आहे कारण मी तिथे थांबलो नाही. तुझं इथे आता काहीच काम नाही आणि तुझ्या रूपाने छावणीत मोलाची भरच पडेल."
"तुम्हाला काय वाटलं मला भीती वाटत्ये? मी एक पत्रकार आहे आणि इथे जे जे काय होईल त्याचा वृत्तांत मला लिहायचा आहे. तो मी लिहीनच."
"बरं! कामावर जाज्वल्य निष्ठा आहे वाटतं तुझी!"
" हो तसं म्हणता येईल. म्हणा हवं तर. पण आता या क्षणी मला दारूची सगळ्यात जास्त गरज आहे. तुम्ही मघाशी संपवलीत त्याच्या निम्मी तरी बाटली असायला हवी. अचानक तो थबकला. शीरिन त्याला कोपरखळ्या मारत होता. "नीट ऐक... तुला काही ऐकू येतंय का?"
थर्मनने मान वळवून शीरिन बघत होता तिकडे पाहिलं. आपल्या आजूबाजूला चाललेल्या गडबड गोंधळापासून पूर्णपणे अलिप्त अवस्थेत लॅटिमर एकटक नजरेने खिडकीबाहेर बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसला तरी पिसाट आनंद झळकत होता. तो स्वतःशीच काहीतरी गुणगुणत होता.
"काय म्हणतोय तो? "थर्मनने विचारलं.
"बुक ऑफ रिव्हिलेशन्स चा पाचवा अध्याय म्हणतोय तो. अगदी शांत राहा आणि ऐक. काही बोलू नकोस." शीरिन म्हणाला.
आता लॅटिमरच्या आवाजाला कसलीतरी धार चढली होती. त्याचे बोलणे नीट ऐकू येईल इतपत त्याचा आवाज आता मोठ्याने येत होता. "आणि मग असं झालं, त्या वेळी बीटा एकाकीपणे आकाशावर पहारा देत असताना संक्रमण सुरू झालं. त्यातला अर्धा फेरा झाल्यावर तो एकटाच खंगलेल्या अवस्थेत लगाशवरची आपली थंड नजर तशीच लावून उभा होता. हे दृश्य बघायला गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, चौकाचौकात माणसांचा सागर उसळला होता. सगळ्यांनाच एका अनामिक नैराश्याने ग्रासलं होतं त्यांची मनं सैरभैर झाली होती. वाचा बसलेली होती. आणि ती माणसं बैचैन होऊन तारे प्रकट होण्याची वाट बघत होती. "
"आणि मग भर दुपारी, ट्रिगन शहरामध्ये जमलेल्या लोकांमधून वेंद्रे २ पुढे आला. आणि तिथे जमलेल्या लोकांना म्हणू लागला, "अरे पाप्यांनो, तुम्ही ऋताचा मार्ग सोडून भरकटलेले आहात. आणि आता अंधाराची गुहा तुमच्यासकट सगळ्या लगाशला गिळून टाकायला येत आहे. "
"तेव्हाच अंधाराच्या कराल दाढांनी बीटाला गिळंकृत केले. आणि मग सगळे काही दिसेनासे झाले. आंधळ्या झालेल्या लोकांना हातभर अंतरावरचेही काही दिसेना. त्यांना शेजारील माणसांचे स्पर्श होत होते, श्वास जाणवत होते पण काहीही दिसत नव्हते. "
"आणि त्यानंतर दिव्य संगीताच्या झंकारात अगणित तारे प्रकट झाले. तो अनुभव इतका दिव्य होता की झाडाच्या पानांनीदेखिल आनंदाने टाळ्या वाजवल्या. "
"आणि मग ते सगळे लोक आपलं स्वत्व गमावून बसले. त्यांच्यातली हिंस्र श्वापदं जागी झाली आणि अंधाराने गडप केलेल्या लगाशच्या शहराशहरांमधून, रस्त्यांवरून ती पाशवी शरीरं फिरू लागली. "
"त्या तार्यांमधून एक स्वर्गीय ज्वाळा बाहेर पडली आणि लगाशवर कोसळली. त्या ज्वाळेने जिथे जिथे पाऊल टाकले तिथे तिथे एकच आगडोंब उसळला. अग्निनारायणाने जे समोर दिसेल ते भस्म करायला सुरुवात केली. माणसे, जंगले आणि मानवाच्या कर्तृत्वाची ग्वाही देणार्या इमारती आणि सारं स्थिरचर विश्व आगीच्या लोळांमध्ये कायमचं नष्ट झालं. "
"तरीसुद्धा... "
एकाएकी लॅटिमरचा आवाज बदलला. त्याने खिडकीबाहेर लावलेली आपली एकटक नजर कणभरही हलवली नव्हती. पण आपल्यावर रोखलेल्या दोन नजरा त्याला जाणवल्या होत्या. श्वाससुद्धा न घेता त्याची बोलण्याची पद्धत एकदम बदलून गेली. बुचकळ्यात पडलेला थर्मन त्याच्याकडे डोळे विस्फारून बघतच राहिला. आता त्याचे शब्द कळतील न कळतील असे अस्पष्ट येत होते. त्याच्या आवाजाच्या चढउतार करण्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी बदल झाला. आणि क्षणभरात त्याचं बोलणं कमालीचं अगम्य होऊन गेलं.
"त्याने त्यांच्या मूळ भाषेतल्या ग्रंथातल्या ओळी म्हणायला सुरुवात केलेली दिसत्ये. याच भाषेत बुक ऑफ रिव्हिलेश्न्स लिहिलेलं आहे. " शीरिन हलकेच हसला.
"अच्छा! पण हे झालं एवढं पुरे झालं. आता मला बरं वाटतंय. " थर्मनने आपले विस्कटलेले केस हातानेच सरखे केले. आता त्याचे हात आजिबात थरथरत नव्हते.
"खरं की काय! " शीरिनला आश्चर्य वाटलं.
"हो. मगाशी मी एकदम गडबडून गेलो होतो. तुमचे अंदाज, गुरुत्त्वाकर्षण आणि हे ग्रहण हे सगळं एका दमात पाहिल्यावर मला काही कळेनासंच झालं होतं. पण हे पठण ऐकून बरं वाटलं. " त्याने बोटानेच लॅटिमरकडे निर्देश केला. "मी लहान असताना माझी दाई हे सगळं म्हणायची. तिचं बोलणं मी नेहमी हसण्यावारी नेलं आहे. आता या सगळ्या गोष्टींना भिऊन राहण्याची मला आजिबात इच्छा नाहीये. पण ही चांगली मनस्थिती अशीच रहायला हवी असेल, तर सध्या या खिडकीकडे दुर्लक्षच केलेलं बरं नाही का? " हे शेवटचं वाक्य तो अगदी उसनं अवसान आणून म्हणाला.
"हो पण त्या आधी तुला आपला आवाज कमी करायला हवा... यंत्रात खुपसलेलं आपलं डोकं बाहेर काढून ऍटन आता तुझ्याकडेच पहात होते. त्यांनी नुसत्या नजरेनेच तुला ठार केलं असतं असं मला वाटायला लागलं... "
थर्मनने जीभ चावली... " अरे! आपल्या म्हातारबुवांना मी विसरूनच गेलो होतो. " आवाज होणार नाही अशा बेताने त्याने आपली खुर्ची उचलली आणि तिचं तोंड दुसरीकडे वळवलं. खुर्चीवर बसण्यापूर्वी त्याने एकदाच मागे वळून पाहिलं आणि तो म्हणाला, "मला सारखं असं वाटतंय, की या तारका-वेडाचा काही परिणामच होणार नाही अशी काहीतरी युक्ती असणार... "
शीरिन काहीच बोलला नाही. बीटा आता आकाशमाथ्यावरून खाली सरकला होता. खिडकीतून आत येणार्या त्याच्या रक्तवर्णी प्रकाशाने खिडकीची चौकट उजळून निघाली होती. हळूहळू तिरक्या होऊ लागलेल्या किरणांचा एक कवडसा शीरिनच्या मांडीवर पडला होता. मावळतीचं सूतोवाच करणार्या त्या कवडशाकडे तो काही वेळ तसाच बघत बसला. जरा वेळाने कसल्या तरी तंद्रीतून खडबडून जागा झाल्यासारखा तो एकदम खाली वाकला आणि थेट सूर्याकडेच त्याने बघायला सुरुवात केली. बीटाच्या एका बाजूला मगाशी दिसत असलेली काळी पाकळी आता एक तृतियांश बीटाएवढी झाली होती. क्षणभर शीरिनचा थरकाप झाला आहे असंच वाटलं. पण मग तो ताठ उभा राहिला. आता त्याचा चेहरा मघापेक्षा बराच फिकुटवाणा दिसायला लागला होता. ओशाळं हसत त्याने आपलीही खुर्ची वळवून घेतली.