उषःकाल होता होता...
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
" गेल्या तासाभरात सारोमधल्या किमान वीस लाख लोकांना संप्रदायात सामील व्हायची उपरती झाली आहे. संप्रदायही मोठ्या संख्येने नोंदणी शुल्क आकारून लोकांना सभासदत्व बहाल करत सुटलेला आहे. संप्रदायाला सध्या 'न भूतो न भविष्यति' असे सुगीचे दिवस आलेले आहेत आणि तो आपलं उखळ पांढरं करून घेणार आहे. असो... काय म्हणत होतास तू? "
"हे संप्रदायवाले लोक एका आवर्तनातून पुढच्या आवर्तनात हे बुक ऑफ रिव्हिलेशन्स कसं काय पोचवत असतील? मुळात हा ग्रंथ लिहिलाच कसा गेला? जर सगळी माणसं वेडी होणार असतील, तर हा ग्रंथ लिहायला कुणाचं डोकं ठिकाणावर राहील? म्हणजेच या वेडातून वाचण्याचा काहीतरी उपाय असला पाहिजे. नाहीतर हे कसं काय शक्य आहे? "
शीरिनच्या आवाजात खेद जाणवायला लागला होता. "त्याचं असं आहे, की या गोष्टी प्रत्यक्ष पाहणारे कोणी साक्षीदार नाहीत त्यामुळे काय आणि कसं होतं हे नक्की कळणं कठीणच आहे. पण काही अंदाज नक्कीच बांधता येतात. त्यातल्या त्यात तीन प्रकारच्या माणसांना या तारका-वेडाचा त्रास होत नाही. एक म्हणजे या तारका आजिबात न बघणारे लोक. असे लोक, जे मतिमंद आहेत किंवा कसल्या तरी अमलाखाली असल्यामुळे जे ग्रहणाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बेशुद्ध असतात . पण असे लोक अगदी थोडे असतात आणि त्यांनी काहीही प्रत्यक्ष पाहिलेलं नसल्यामुळे त्यांना साक्षीदार म्हणता येत नाही. अशा लोकांना आपण सोडून देऊ. मग येतात ती सहा वर्षांखालील मुलं. या मुलांसाठी, जगात घडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे एकेक नवलच असतं. या जगाशी जुळवून घेण्याची त्यांची प्रक्रिया सतत सुरू असते. त्यामुळे अंधार आणि तारे अशा गोष्टी त्यांना जगातल्या इतर अनेक चमत्कारांपैकीच एक वाटतात. लक्षात येतंय का तुझ्या? "
थर्मनने मान डोलावली. "हो, पटतंय तुम्ही सांगताय ते."
"तिसरा प्रकार म्हणजे काही रिकाम्या डोक्याची मंडळी. या लोकांची विचारशक्ती इतकी क्षीण असते की फार विचार करणं त्यांना जमत नाही. त्यांना जगाशी काही देणं-घेणं नसतं. अशा बधीर लोकांवर या अंधार-तारे वगैरेंचा फार परिणाम होऊ शकत नाही. अशिक्षित लोक, कष्टाची कामे करणारे लोक किंवा डोक्याने जरा मंद लोक या वर्गात येतात.
या सगळ्यांपैकी लहान मुलांना अशा गोष्टी नीटशा आठवतही नाहीत. त्यांच्या अंधुक आठवणींना या अशा बधीर लोकांच्या चमत्कारिक हकीगतींची जोड दिल्यावर त्यातून हे 'बुक ऑफ रिव्हिलेशन्स' तयार झालं असावं. लहान असताना हा प्रकार आपल्या डोळ्यांनी बघितलेली मुलं, मोठेपणी इतिहासकार वगैरे झाली असतील. त्यांच्या आठवणी आणि या अर्धवट लोकांच्या कहाण्या हेच या ग्रंथाचं मूळ आहे. या मूळ ग्रंथाचं, नंतरच्या आवर्तनांमध्ये पुन्हा-पुन्हा संपादन झालेलं आहे.... "
"तुम्हाला असं तर म्हणायचं नाहीये ना, की जशी आपण गुरुत्वाकर्षणाबद्दलची माहिती पुढच्या आवर्तनातल्या लोकांपर्यंत पोचवणार आहोत, तसाच हा ग्रंथ या लोकांनी एका आवर्तनातून दुसर्या आवर्तनात पोचवला आहे? " थर्मन एकदम उसळून म्हणाला.
शीरिनने आपले खांदे उडवले. " त्यांनी हे नक्की कसं केलं असेल हे महत्त्वाचं नाही. इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे, की जरी हा ग्रंथ सत्यावर आधारित असला, तरी तितपतच त्याचा उपयोग आहे. हा ग्रंथ म्हणजे निर्भेळ सत्य नाही. आता हेच बघ, फारो आणि यिमोचा छपरातून तारे बघण्याचा प्रयोग फसला. का फसला माहीत्ये? "
बोलताबोलता तो ताडकन उठून उभा राहिला. ऍटन घाईघाईने त्याच्याचकडे येत होते. "काय झालंय? " त्याने विचारलं. ऍटननी त्याच्या दंडाला धरून त्याला एका बाजूला घेतलं. त्यांची बोटं त्याच्या दंडामध्ये रुतली होती.
"शू... हळू बोल. आपल्या छावणीमधून आपल्या खाजगी टेलिफोन लाईनवर फोन आला होता. " ते अगदी हळू आवाजात बोलत होते आणि बोलताना त्यांना बरेच कष्ट पडत होते.
"तिकडे काही गडबड नाही ना झाली ? काही संकट वगैरे नाही ना कोसळलं? "शीरिनने गडबडीने विचारलं.
"संकट त्यांच्यावर नाही आलं" सूचकपणे ऍटन म्हणाले. " थोड्या वेळापूर्वीच ते भूमिगत झालेत आणि परवापर्यंत ते दडून राहतील. ते सगळे अगदी सुरक्षित आहेत. पण शीरिन, गावात फार गोंधळ माजलाय. कुणाचाच पायपोस कोणाच्या पायाला उरलेला नाही. ते सगळं कल्पनेच्या पलिकडलं आहे... " त्यांना पुढे बोलवेना.
शीरिन एकदम तुसडेपणाने त्यांना म्हणाला, " मग? त्यात काय विशेष? हे सगळं आणखी अवघड होत जाणार आहे. पण तुम्ही का कापताय असे? तुम्हाला बरं वाटतंय ना? " त्याला काहीतरी संशय आला असावा.
ऍटनचे डोळे संतापाने मोठे झाले. पण क्षणभराने जरा शांत होऊन ते म्हणाले, "तुला माहीत नाहीये. तिकडे संप्रदायवाल्यांनी लोकांना भडकवायला सुरुवात केली आहे.. ते लोकांना पापक्षालन, मुक्ती काय वाट्टेल ते मिळवून देण्याचं कबूल करतायत. त्याचा मोबदला म्हणून आपली वेधशाळा फोडायला सांगतायत ते लोकांना. शीरिन, आता काय करायचं? "
एक क्षण शीरिन कसल्यातरी विचारात गढल्यासारख्या त्याच्या पावलांकडे एकटक बघत होता. मग त्याने आपल्या हनुवटीवर आपलीच मूठ आपटली आणि मग तो एकदम दरडावणीच्या स्वरात म्हणाला, " काय करणार? आपल्या लोकांना यातलं काही कळलं नाहीये ना? "
"नाही. आजिबात नाही. "
"उत्तम. त्यांना काही कळूही देऊ नका. खग्रास ग्रहण लागायला अजून किती वेळ आहे? "
"एखादा तास फार फार तर... "
" आपल्याला हा जुगार खेळावा लागेल. दुसरं काही आपल्या हातात राहिलेलं नाही. एका मोठ्या जमावाचा 'मोर्चा' तयार करायला त्यांना काहीतरी वेळ लागेलच. शिवाय गावातून इथवर पोचायलाही वेळ लागणार. गावापासून इथवर चांगले पाच मैल होतात. "
त्याने खिडकीबाहेर नजर टाकली. शेताच्या चौकोनी तुकड्यांमधून उपनगरामधली मोठीमोठी पांढरी घरं दिसत होती. दूर क्षितिजावर मावळत चाललेल्या बीटाच्या तांबड्या प्रकाशात सारो गाव एखाद्या ठिपक्यासारखं दिसत होतं. खिडकीतून बाहेर बघत बघतच तो म्हणाला, " त्यांना यायला वेळ लागेल. तुम्ही आपलं काम चालूच ठेवा. ते इथे येऊन पोचण्याआधी खग्रास ग्रहण लागू दे अशी प्रार्थना करा... "
आकाशात बीटाचा अर्धा भाग गडप झाला होता. झापड आल्यावर डोळ्याच्या पापण्या मिटत जाव्यात तशी ती काळी रेघ आता वक्र झाली होती. बीटाच्या प्रकाशमान डोळ्यावर जणू काही एखादी तिरकी राक्षसी पापणी मिटत होती. खोलीत काळोख दाटायला लागला होता. सगळंच धूसर व्हायला लागलं होतं. खिडकीतून दिसणार्या शेतांच्या आखीव चौकोनांमध्ये दाटलेली शांतता एकदम त्याला जाणवली. जणू काही सगळं कीटकजगत घाबरून चिडीचूप शांत बसलं होतं.
अचानक त्याच्या कानात कोणीतरी बोलल्याचा आवाज आला आणि तो दचकला. थर्मन त्याला विचारत होता. " काय झालं? सगळं ठीक आहे ना? "
"अं... हो, तू जागेवर जाऊन बस. आपण त्यांच्या वाटेत येतोय. "
ते दोघंही आपल्या जागेवर परत आले. परत आल्यावरही शीरिन बराच वेळ काहीच न बोलता शांत बसला होता. मग त्याने त्याच्या टायची गाठ सैल केली. आपली मान मागेपुढे हलवून पाहिली. पण त्याचा अस्वस्थपणा कमी झाला नाही. अचानक त्याने वर पाहिलं. "तुला गुदमरल्यासारखं होतंय का? "
थर्मनने आपले डोळे मिटून दोन तीन खोल श्वास घेतले. " नाही बुवा... का हो काय झालं? "
"मी जरा जास्तच वेळ खिडकीत उभा होतो. अंधाराचा परिणाम झाला असणार माझ्यावर. गुदमरल्यासारखं वाटणं, श्वासोच्छ्वास करायला त्रास होणं हे क्लॉस्ट्रोफोबियाच्या सुरुवातीच्या काही लक्षणांपैकी एक लक्षण आहे. "
"हम्म. म्हणजे माझ्यावर अजून काही परिणाम झालेला नाहीये ... अरेच्या, हे पाहा कोण आलंय ?"
खिडकीशेजारून बीनाय कोपऱ्यात बसलेल्या या दुक्कलीकडे आला . त्याच्यामुळे खिडकीतून येणारा प्रकाश एकदम अडला. शीरिनने आपले डोळे बारीक करून प्रश्नार्थक नजरेने बीनायकडे पाहिलं. "हॅलो, बीनाय! "
बीनाय आपल्या देहविस्ताराचा भार एका पायावरून दुसर्या पायावर घेत उगीचच हसला. " मी जरा इथे बसलो तर चालेल ना? माझे कॅमेरे जुळवून झालेत आणि आता खग्रास ग्रहण लागेपर्यंत करण्याजोगं काहीच नाहीये माझ्याकडे. " बोलता बोलता त्याने लॅटिमरकडे एक नजर टाकली. पंधरा मिनिटांपूर्वीच लॅटिमरने आपल्या बाहीतून एक कातडी बांधणीचं पुस्तक बाहेर काढलं होतं. पुस्तक उघडून तो एकाग्रतेने काहीतरी वाचत होता.
" हा हरामखोर माणूस काही त्रास तर देत नाहीये ना? "
शीरिनने मान हलवली. त्याने आपले खांदे मागे ओढून घेतले होते आणि सहज श्वासोच्छ्वास करायचा तो प्रयत्न करत होता. "बीनाय, तुला श्वास घ्यायला काही त्रास होत नाहीये ना? "