दिवाळी अंक २००९

उषःकाल होता होता...

अदिती

बीनायनेही दोन तीन खोल श्वास घेतले. " अं असं काही वाटत तरी नाहीये... "

क्लॉस्ट्रोफोबियाचा नमुना चाखायला मिळाला मला. ओशाळवाण्या स्वरात शीरिन म्हणाला.

"असं होय! माझ्या बाबतीत थोडा वेगळा प्रकार घडला. मला असं वाटायला लागलं की माझी दृष्टी गेली आहे की काय. सगळं इतकं अंधुक अंधुक दिसत होतं. आणि हवाही एकदम गार झाली आहे असंही वाटत होतं. "

" गार वाटतंच आहे. हा भास वगैरे नाहीये. मला तर असं वाटायला लागलंय की माझी पावलं फ्रिजमध्ये ठेवून मी लगाशप्रदक्षिणेला निघालोय, इतके माझे पाय गारठलेत."

"अशा वेळी आपण आपल्या मनाला इकडच्या तिकडच्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवायला हवं. थर्मन, मी तुला मगाशी सांगत होतो ना की फारो आणि यिमोचा तो छपरातून तारे बघण्याचा प्रयोग का फसला... ", शीरिन म्हणाला.

"हो, तुम्ही त्याबद्दल सांगायला सुरुवात केली होतीत. " थर्मन म्हणाला. त्याने आपला एक पाय गुडघ्यात वाकवून त्याच्याभोवती आपल्या दोन्ही हातांची मिठी घातली आणि आपली हनुवटी आपल्या गुडघ्यावर टेकवली.

"हा तर मी असं म्हणत होतो की त्या दोघांनी बुक ऑफ रिव्हिलेशन्सचा शब्दशः अर्थ घेण्याची चूक केली. तारे प्रकट होणे या गोष्टीला इतकं महत्त्व द्यायची काही गरज नव्हती. मला तर असं वाटतंय, की हे तारे-बिरे काही खरे नसणार. पूर्ण काळोखात गेल्यावर माणसाचं मन प्रकाशाशिवाय राहू शकत नाही. त्यामूळेच हे ताऱ्यांचं खूळ निघालं असावं. "

"अच्छा ! थोडक्यात, तुम्हाला असं वाटतंय की हे तारे म्हणजे भ्रमिष्ट झालेल्या लोकांच्या मनाचे खेळ आहेत. याचाच अर्थ, तारे हे वेड लागण्याचं कारण नसून वेड लागल्याचे परिणाम आहेत... मग या बीनायचे फोटो काय कामाचे? "

" त्या फोटोंच्यामुळे तारे बिरे सगळं झूठ आहे हे सिद्ध तरी होईल. किंवा कदाचित याच्या उलटही घडेल. कुणी सांगावं... आता हेच बघ.. "

बीनायने आपली खुर्ची पुढे ओढून घेतली आणि चर्चेत उडी घेतली. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि उत्साह दिसत होता. "बरं झालं तुम्ही दोघं याच विषयावर बोलताहात ते. या तार्‍यांबद्दल ऐकल्यावर माझ्या डोक्यात एक मस्त कल्पना आली आहे. अर्थात ही नुसतीच कल्पना आहे. तिच्यातून जास्त अर्थपूर्ण असं काही निघणार नाही. तुम्हाला सांगू माझी कल्पना? "

हे बोलताना तो थोडासा अडखळल्यासारखा झाला. मग शरिन आपल्या खुर्चीत मागे नीट टेकून बसला आणि म्हणाला, "सांग, मला ऐकायला आवडेल . "

"समजा या विश्वामध्ये आणखीही सूर्य असतील, " बोलता बोलता आपल्याच बोलण्याची लाज वाटून तो जरा थांबला. मग म्हणाला, "म्हणजे... म्हणजे असे सूर्य जे इथून इतके लांब आहेत की दिसू शकत नाहीत... जाऊ दे, माझं हे बोलणं ऐकणार्‍याला असं वाटेल की मी खूप कादंबर्‍या वाचतो की काय... "

"नाही. हे सूर्य जर आपल्यापासून चार प्रकाशवर्षांपे़क्षा जास्त लांब असतील तर त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा आपल्यावर फारसा प्रभाव पडणार नाही आणि आपण गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून त्यांना शोधूही शकणार नाही कारण ते खूप लहान असतील. त्यांची संख्या एक दोन डझन असेल कदाचित. "

थर्मनने एकदम शीळ घातली. " काय भन्नाट कल्पना आहे! एखाद्या रविवारच्या साप्ताहिक पुरवणीसाठी हिच्यावर मस्त लेख होऊ शकतो. आपल्यापासून आठ प्रकाशवर्षे अंतरावर असलेले दोन डझन सूर्य! लोक अगदी वेडे होतील वाचून."

बीनाय म्हणाला, "ही फक्त एक कल्पना आहे. मला वाटतं जेंव्हा बीटाला ग्रहण लागेल तेव्हा हे तारे दिसतील. कारण त्यांच्या प्रकाशाला गिळून टाकणारा सूर्यप्रकाश नसेल ना आजूबाजूला. आणि ते इतके लांब असल्यामुळे ते अगदी लहानसे दिसतील. छोट्या छोट्या संगमरवरी ठिपक्यांसारखे. हे संप्रदायवाले लोक म्हणतात की तेव्हा कोट्यवधी तारे दिसतात, पण ही अतिशयोक्ती असावी. या विश्वात असे कोट्यवधी तारे मावतील अशी जागा कुठेच नाही. "

शीरिन आता त्याचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. "तुझ्या बोलण्यात दम आहे. आणि या ठिकाणी अतिशयोक्ती केली जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण आपल्या मनाला पाचाच्या पुढच्या संख्या नेमक्या कळत नाहीत पटकन. त्यामुळे पाचापेक्षा जास्त असलेल्या सगळ्या गोष्टी 'खूप' असतात. आणि भ्रमिष्ट लोकांच्या कथनात या दोन डझन तार्‍यांचे कोट्यवधी तारे झाले असणार. फारच सुरेख कल्पना आहे ही. "

"माझ्या डोक्यात अजून एक मस्त कल्पना आहे," बीनाय म्हणाला. "समजा, असा एखादा ग्रह आहे, ज्याला एकच सूर्य आहे. जर असं झालं तर गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतासाठी लागणारी सगळी आकडेमोड किती सोपी होऊन जाईल पाहा. शिवाय हा ग्रह त्या एकाच सूर्याभोवती व्यवस्थित लंबवर्तुळाकार कक्षेत फिरेल. अशा जगामध्ये गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सिद्ध करत बसावं लागणार नाही. उलट हा सिद्धांत हा एक पायाभूत आणि स्वयंभू नियम म्हणून आपोआप स्वीकारला जाईल. अशा जगातल्या लोकांना दुर्बिणीच्या शोधाच्याही आधी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत माहीत असेल. "

"पण असं जग असणं प्रत्यक्षात शक्य आहे का? "शीरिनला अजूनही शंका होती.

"का नाही? असं जग असणं सहज शक्य आहे. आणि ही गोष्ट गणिताने सिद्ध देखील झाली आहे. अशा जगाला 'एकास एक जग' असं म्हणतात. पण मला त्या जगामागची वैचारिक प्रक्रिया जास्त आवडते. "

" हम्म... भारी कल्पना आहे. पण ही फक्त वैचारिकरीत्याच शक्य असेल असं वाटतंय. ऍबसोल्यूट झीरो किंवा परफेक्ट गॅससारखी.... "

"बरोबर आहे. पण यातली खरी गोम कशात आहे माहितेय का? अशा ग्रहावर जीवसृष्टी असणं शक्य नाही. तिथे पुरेशी उष्णता नसेल, पुरेसा उजेड नसेल, आणि तो ग्रह सूर्याभोवती फिरत असेल तर दिवसाचा अर्धा भाग तिथे संपूर्ण अंधार असेल. सजीवांना जगायला प्रकाशाची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे अशा एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असणं अशक्यच आहे. शिवाय... "

शीरिन अचानक उभा राहिला. त्याची खुर्ची मागच्या मागे कोलमडली. "ऍटननी दिवे आणलेत बाहेर. "

बीनाय बसल्या जागीच अर्धवट मागे वळला. उजेड मिळणार या कल्पनेनेच त्याला हायसं वाटलेलं दिसलं.

आपल्या दोन्ही हातांमध्ये मिळून सहा सळ्या घेऊन ऍटन येत होते. प्रत्येक सळई साधारण बोटभर जाडीची आणि फूटभर उंचीची होती. खिडकीजवळ बसलेल्या या तिघांच्या खांद्यावरून पलिकडे आपल्या सहकार्‍यांकडे बघत ऍटन म्हणाले, " चला, सगळे आपापल्या कामाला लागा. शीरिन, इकडे ये आणि मला मदत कर."

शीरिन धावतच त्यांच्या जवळ गेला आणि त्यांच्या हातातल्या सळया घेऊन त्याने भराभरा भिंतीवर बसवलेल्या शमादानांमध्ये एकेक सळई खोचून टाकली. मग, जणू काही देवाच्या पूजेतलं एखादं विशेष कार्य करावं, तशाच श्रद्धेने त्याने एका काडेपेटीतून एक काडी बाहेर काढली. थरथरत्या हाताने ती पेटवली आणि ऍटनकडे दिली. ती काडी एका सळईच्या टोकाशी असलेल्या वातीजवळ नेऊन ती वात पेटवण्याचे प्रयत्न ऍटननी सुरू केले. थोड्याच वेळात ती वात फर्रकन पेटली आणि ऍटनचा चेहरा उजळून निघाला. आजूबाजूच्या लोकांनीउत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. ही ज्योत जवळजवळ सहा इंच उंच होती. थोड्याच वेळात अशा सहा वातींच्या प्रकाशात ती खोली उजळून निघाली. पण हा प्रकाश फिका होता. झपाट्याने नाहीशा होणार्‍या सूर्यप्रकाशापेक्षाही फिका होता. दिव्यांच्या ज्योती कसलेकसले आवाज करत होत्या. भिंतींवर चित्रविचित्र आकारांच्या सावल्या नाचत होत्या. ज्योतींमधूनही काजळी बाहेर पडत होती. त्या खोलीतलं वातावरण एखाद्या भटारखान्यासारखं झालं होतं. पण असं असलं तरी त्या ज्योती पिवळा प्रकाश देत जळत होत्या. चार साडेचार तास कमी कमी होत जाणार्‍या बीटाच्या प्रकाशापेक्षा या पिवळ्या प्रकाशात काहीतरी वेगळेपण नक्कीच होतं. त्यामुळे अगदी लॅटिमरनेसुद्धा आपलं पुस्तकात खुपसलेलं डोकं बाहेर काढून कौतुकाने त्या दिव्यांकडे पाहिलं.

त्या ज्योतीतून बाहेर पडणार्‍या काजळीची पर्वा न करता शीरिनने आपले हात एका दिव्याजवळ धरून शेकले आणि तो स्वतःशीच पुटपुटला, " पिवळा रंग इतका सुंदर दिसतो हे माझ्या कधी लक्षातच आलं नव्हतं... "

थर्मनने मात्र त्या दिव्यांच्या वासामुळे तोंड वाकडं केलं होतं. " कसले आहेत ते दिवे? "

"लाकूड आहे ते... "

"शक्यच नाही. त्यांच्या टोकाकडे तर नुसतीच काजळी आहे आणि तिथे खरं तर काहीच जळत नाहीये. शिवाय ती ज्योत नुसतीच अधांतरी जळल्यासारखी दिसतेय. "

"तीच तर मजा आहे. कृत्रिमरित्या उजेड पडण्यासाठी आम्ही शोधलेलं हे एक अफलातून उपकरण आहे. पाणवनस्पतींची खोडं उन्हात खडखडीत वाळवून घ्यायची आणि मग प्राण्यांच्या चरबीत बुडवून काढायची. असा दिवा पेटवला की त्यातली चरबी जळते. अगदी हळूहळू. हा दिवा साधारण अर्धा तास जाईल. आपल्या सारो विद्यापिठातल्या एका मुलाने हा शोध लावला. आम्ही असे खूप दिवे तयार केलेत पण त्यातले जवळजवळ सगळे छावणीत पाठवून दिलेत. आणि हे थोडेसे दिवे इथे ठेवले आहेत. "