संवाद : डॉ. माधव गाडगीळ
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
पण वनाधारित लघु उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे असंही तुम्ही म्हणता. उद्योग म्हटले की त्याबरोबर प्रदूषण, भ्रष्टाचार, बकालपणा येतोच. वनातून मिळणार्या वस्तूंवर प्रक्रिया करण्यासाठी कारखाने उभे राहिले तर उरलीसुरली जंगलंही धोक्यात येणार नाहीत का?
नाही. मी ज्या वनाधारित प्रकल्पांविषयी बोलतो आहे, ते अगदी साधे आहेत. वनसामुग्रीची साफसफाई करणं, प्रतवारी करणं असे ते प्रदूषण न करणारे प्रकल्प आहेत. वनवासी या गोष्टी नाहीतरी करत असतातच. स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाल्यामुळे त्यांनाही उत्पन्नाचं साधन मिळतं आणि त्यांचं योग्य प्रकारे प्रबोधन केलं तर वन संरक्षणाला मदतच होते.उदा. मध्य प्रदेश, पूर्व महाराष्ट्रातल्या आणि आंध्र प्रदेशातल्या जंगलांत चारोळ्यांचं पीक येतं. त्या चारोळ्यांची सालं काढून त्यांची प्रतवारी केली की चांगला फायदा मिळतो. एक तर कुठे ना कुठे ही प्रक्रिया करण्यासाठीचे उद्योग उभे राहणारच असतात तर ते वनांजवळच का नकोत?
असं आहे, की वनवासी हासुद्धा शेवटी माणूसच आहे. त्यालाही पैसा पाहिजेच. जंगलांचं रक्षण करुन त्याचे आर्थिक हितसंबंध जपले जातील अशी त्याला खात्री पटली की तो ते करणारच. अगदी निश्चित करणार.
म्हणजे एकूण तुमचा माणसांवर विश्वास आहे असं दिसतं...
हो. एकदा माणसांना योग्य आर्थिक मोबदल्याची साधनं मिळाली, की आपोआप दूरदृष्टीने त्या स्रोताचा वापर होतो. त्यामुळे माणसांवर एवढा विश्वास ठेवावा. शेवटी पर्यावरण रक्षणाचं काम सरकार कधीच करत नाही. नॉर्वे, स्वीडनसारख्या देशांमधे , जिथे सामाजिक विषमता कमी आहे तिथे लोक एकत्र येऊन पर्यावरणरक्षणासाठी भरीव कामगिरी करू शकतात असं लक्षात आलं. जपानसारख्या राष्ट्रामधे शिसं असणारं पाणी पोटात गेल्यावर नवजात अर्भकांना जन्मजात व्यंग निर्माण व्हायला लागली. त्या वेळी सर्व जपानी समाजाने एकजुटीने या गोष्टीविरुद्ध काम करायला सुरुवात केली. लोकांच्या पाठबळावर पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांजवळ शिसं असणारं पाणी सोडणार्या आणि एकूणच पर्यावरणाला घातक असे व्यवहार करणार्या संस्थांना पायबंद बसला. याच प्रयत्नांमधून कमीत कमी प्रदूषण करणार्या आणि कमीत कमी इंधन वापरणार्या गाड्या जपानमधे तयार होऊ लागल्या आणि खनिज तेलाच्या टंचाईच्या दिवसात याच गाड्यांना जागतिक स्तरावर मागणी आली. त्यातूनच जपानची अर्थव्यवस्था सुधारली. हे सामान्य माणसांच्या पाठबळामुळेच शक्य झालं आहे.

पर्यावरणाकडे होणार्या अक्षम्य दुर्लक्षामागे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे एक प्रमुख कारण दिसतं. तर ही इच्छाशक्ती वाढण्यासाठी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं?
जसजशी तळागाळातल्या लोकांपर्यंत लोकशाही पोचून ती तिथे चांगली रुजेल तसतशी ही गोष्ट साध्य होईल. माझ्या कर्नाटकातल्या ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांपासून काही खासदारांपर्यंत ओळखी आहेत. पण त्यांच्याशी बोललं तर कळतं की पर्यावरण रक्षणासासाठी काम करायची इच्छा तळागाळातल्या लोकांकडेच जास्त प्रमाणात बघायला मिळते. या लोकांकडे इच्छा आहे, पण काही करण्याचे अधिकार नाहीत. अधिकारांचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे हे मी जे म्हणतो, ते एवढ्यासाठीच. महाराष्ट्रात अण्णा हजारेंचं काम प्रशंसनीय आहे. सत्ता अशा लोकांकडे गेली तर राजकीय इच्छाशक्तीही येईल.
भारतातील जैवविविधतेला परकीय प्रजातींच्या आक्रमणाचा मोठा धोका आहे असे तुम्ही म्हटलं आहे. हा धोका मोठा म्हणजे किती मोठा आहे?
फारच मोठा धोका आहे हा. पार्थेनियमचं उदाहरण घ्या. अमेरिकन गव्हातून आलेलं हे तण, पण आज केवढी मोठी डोकेदुखी झाली आहे त्याची! अशी इतरही उदाहरणं आहेत. युकॅलिप्टस आहे, जलपर्णी आहे, जट्रोपा आहे...
पण निसर्गात अशा प्रजातींची देवाणघेवाण सुरुच असते असं आपण म्हटलं आहे...
बरोबर आहे ना. पण जेव्हा नैसर्गिकरीत्या अशा प्रजाती एकीकडून दुसरीकडे जातात तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे नैसर्गिक शत्रूही एकीकडून दुसरीकडे जातात. निसर्गात असा समतोल नेहमी राखला जातो. एकदम मोठ्या संख्येने या प्रजाती एकीकडून दुसरीकडे गेल्या आणि त्यांना शत्रूविरहित वातावरण मिळालं तर त्यांची राक्षसी वाढ होते. मग पर्यावरणाचा समतोल ढासळतो.
जैवतंत्रज्ञानाबद्दल आपलं काय मत आहे? जैवतंत्रज्ञानानं विकसित केलेल्या पिकांनी जगाचे अन्नधान्याचे सगळे प्रश्न सुटतील असा या तंत्राचा दावा आहे...
कुठलंही नवं तंत्रज्ञान विकसित होत असताना त्याच्याबद्दल चांगल्याच गोष्टी ऐकायला मिळतात. अणूऊर्जा विकसित झाल्यावर जगाचा ऊर्जेचा प्रश्न सुटलाच असा या शास्त्रातील तज्ज्ञांचाही दावा होता. झालं का तसं ते? जैवतंत्रज्ञानाचंही तसंच आहे. पण जैवतंत्रज्ञानातला धोका आपण लक्षात घेतला पाहिजे. कृत्रिमरीत्या आयात केलेली जनुकं एका प्रजातीतून दुसर्या प्रजातीत संक्रमीत होऊ शकतात. बीटी कॉटनच्या बाबतीत असं होऊ शकेल . शिवाय त्यांचे दुष्परिणाम लगेच कळत नाहीत. म्हणून जैव तंत्रज्ञान धोक्याचं ठरू शकतं.
पश्चिम घाट आणि हिमालय हे जैवविविधतेमधले 'हॉट स्पॉट' आहेत असं म्हणतात. हिमालय फार दूर राहिला, पण पश्चिम घाट आपल्या शेजारीच आहे. अशा ठिकाणचं जैव-वैविध्य वाचवण्यासाठी काय करायला पाहिजे?
मगाशी आपण देवरायांविषयी बोललो. देवराया लोकांनी वाचवल्या आहेत ही चांगली गोष्ट आहे. तसेच प्रयत्न इथेही व्हायला हवेत.
पर्यावरणवादी लोक आणि संघटना पुष्कळ दिसतात. पण या पर्यावरणवाद्यांमध्येही फारसा सुसंवाद किंवा एकमत दिसत नाही. हे असं का?
अहो, व्यक्ती तितक्या प्रकृती! मुळात आपला समाज इतका विषम आहे की त्यामुळे हे मतभेद असायचेच. काही कळीच्या मुद्द्यांवर बाकी सगळ्या पर्यावरणवाद्यांचं एकमत आहे. उदाहरणार्थ, चोरटी वृक्षतोड ताबडतोब थांबवावी, पर्यावरणविषयक गुन्ह्यांबाबतची न्यायप्रक्रिया अधिक गतिमान करावी....
वनरक्षकांना आधुनिक हत्यारे द्यावीत?
हं. या बाबतीत माझं थोडं वेगळं मत आहे. मला वाटतं असं करण्यात धोका आहे. वनरक्षक अशा हत्यारांचा गैरवापर करण्याची शक्यता आपण विचारात घ्यायला हवी.
आता थोडं तुमच्या लिखाणाबद्दल. मराठीतून लेखन का करावंसं वाटलं? इतकं रसाळ आणि उपमा - अवतरणांनी समृद्ध लेखन कसं काय करता?
लहानपणापासून संस्कृत, साहित्य यांची आवड होती. बाकी जे. बी. एस. होल्डन सारख्या लेखकांकडून प्रेरणा मिळाली. अमेरिकेत अनेक शास्त्रज्ञ सामान्यजनांसाठी सोप्या भाषेत लिहितात ते पाहून स्फूर्ती मिळाली. पुण्यात आल्यानंतर 'सकाळ' कडून लिहिण्याचे निमंत्रण आले. म्हटलं, प्रयत्न करुन पाहू! मग हळूहळू ते जमतंय असं ध्यानात आलं..
'सकाळ' मधील लेखांचं पुस्तक छापायचा विचार आहे का?
विचार आहे . त्यासाठी काम सुरू आहे.

मराठी भाषेतून विज्ञानविषयक लेखन करताना काय अडचणी येतात? वैज्ञानिक संज्ञांना मराठी प्रतिशब्द शोधताना काही त्रास होतो का?
माझ्या संग्रही मराठीतले काही उत्तम शब्दकोश आहेत. मराठीतून लेखन करताना या शब्दकोशांचा फारच उपयोग होतो. वैज्ञानिक संज्ञा मराठीत आणताना, जर इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द मिळाला नाही तर सोप्या शब्दांमधे ती संज्ञा समजावून देण्याचा मी प्रयत्न करतो. शब्दाला शब्द देण्यापेक्षा वाचणार्याला ती मूळ संकल्पना समजणं हे जास्त महत्त्वाचं आहे.
मराठीमध्ये लेखनाच्या तुमच्या भविष्यकालीन योजना काय आहेत?
सध्या इंटरनेटवर इंग्रजी भाषेत विकिपीडिया या ज्ञानकोशाचा उपक्रम हा अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला गेलेला दिसतो. इंटरनेट नियमित वापरणार्या लोकांनी एकत्र येऊन त्याला आजचं विस्तृत स्वरूप मिळवून दिलेलं आहे . आणि हे काम निश्चित उल्लेखनीय आहे. विकिपीडिया मराठीतही उपलब्ध आहे. पण त्यावर म्हणावी तेवढी माहिती अजून संकलित केली गेलेली नाही. पूर्वी इंटरनेटवर मराठीतून मजकूर टाईप करण्याची सोय उपलब्ध नव्हती. पण आता युनिकोडमुळे फारच चांगली सोय झालेली आहे. त्यामुळे मराठी विकिपीडियामधे वनस्पतीशास्त्राशी संबंधित माहिती साठवण्याचं काम मी सध्या करतो आहे. पण हा जगन्नाथाचा रथ आहे. हे एकट्यादुकट्याचे काम नव्हे. या बाबतीत जितके अभ्यासू, तज्ज्ञ लोक याला हातभार लावतील, तितके बरेच आहे,
विकिपीडियावरील माहिती फारशी विश्वासार्ह नसते, असाही एक समज आहे..
असा समज आहे, ही गोष्ट खरी आहे. काय आहे, विकिपीडियावर माहिती चढवणार्यांमध्ये काही खोडसाळ लोकही असतात. आता मध्ये एका जिवंत माणसाचा विकीवर मृत म्हणून उल्लेख झालेला होता. पण अशा चुका - अनवधानाने झालेल्या किंवा मुद्दाम केलेल्या- सगळ्या कोषांमध्येच असतात. एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका आणि विकिपीडिया यांची अशी एक तुलना केली होती; त्यात या दोघांमध्येही सारख्याच प्रमाणात चुका आढळल्या.
आपले इतर काही छंद वगैरे?
पोहायला जाणे, विज्ञानविषयक वाचन करणे, निसर्गात भटकंती वगैरे. व्यायाम करायला आवडतो.
डॉ. माधव गाडगीळ यांनी आपला बहुमूल्य वेळ ह्या मुलाखतीसाठी दिला आणि जैववैविध्य आणि पर्यावरणविषयक अनेक मुद्यांवर आपले विचार सांगितले ह्याबद्दल अंकसमिती आणि मनोगतींतर्फे त्यांचे मन:पूर्वक आभार.