स्वयंसुधारणा : नवी सुविधा

पुष्कळांचे मराठी लेखन शुद्धलेखनाचे नियम आपणहोऊनच पाळत असते. पुष्कळजण आपल्या लेखनात शुद्धलेखन नीट सांभाळले जावे ह्यासाठी जागरूक असतात. तरीही घाईगडबडीत म्हणा, मनात आलेले विचार वेगाने उमटवताना म्हणा कित्येक वेळेला माहीत असूनही, इच्छा नसूनही अशा शुद्धलेखनाच्या चुका केवळ अनवधानाने होण्याची शक्यता असते.  अनेकदा अशा चुका केवळ टंकलेखनात काही किरकोळ चुका झाल्याने निर्माण झालेल्या असतात. देवनागरी अक्षरांचे गुंतागुंतीचे आकार लक्षात घेतले तर कित्येक वेळेला अशा चुका होऊनही चटकन नजरेस येण्याची शक्यता नसते. (उदा. नाट्क (नाटक) ह्टणे (हटणे) असे शब्द).

मनोगताची लेखन / संपादन सुविधा दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागल्याचे दिसते. सदस्य मनोगतावर आपले लेखन लिहितानाच नव्हे, तर आपल्या अनुदिनीवर, संकेतस्थळावर, व्यक्तिगत पत्रव्यवहारासाठी,  नियतकालिकांमध्ये अशा निरनिराळ्या संदर्भात लिहिताना मनोगताच्या लेखन/संपादन/शुद्धिचिकित्सा सुविधांचा आत्मविश्वासाने आणि भरंवशाने वापर करताना दिसतात. असे सर्व लिखाण जालावर (आणि एकंदरच समाजामध्ये) आज ना उद्या जाणार असल्याने,  उद्या त्याकडे संदर्भ म्हणून बघितले जायची शक्यता असल्याने ते शुद्धलेखनाच्या नियमानुसार असणे हे अधिकच महत्त्वाचे आहे असे आम्हाला वाटते. नुसते लिहिणे, वाचणे आणि अर्थ समजून घेऊन प्रतिसाद देणे एवढाच मर्यादित उद्देश लक्षात न घेता, असे लिखाण त्रयस्थाला वेळेवर बिनचुकपणे शोधता येणे आणि सापडणे हे उद्देशही लक्षात घेतले तर हे महत्त्व लक्षात यायला वेळ लागणार नाही. (लिहिणारी आणि शोधणारी व्यक्ती प्रमाणित भाषेत लिहीत असेल तर असे शोधणे / सापडणे कितीतरी सुकर होते. )

अशा प्रकारे मनोगताच्या लेखनसुविधेत निर्माण होऊन जालावर जाणारे मराठी अधिकाधिक निर्दोष असण्याची आपली वाढती जबाबदारी ओळखून 'स्वयंसुधारणा' ही सुविधा ह्याच पेचप्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आता मनोगतावर उपलब्ध केलेली आहे. टंकलेखनाच्या अशा होणाऱ्या चुका लेखकाला जास्त प्रयास न पडता आपोआप निस्तरल्या जाव्यात, ह्यासाठी ह्या सुविधेत सोय करण्यात आलेली आहे.

ह्यात वारंवार बदल केले जातील आणि त्यांची माहिती येथे देण्यात येईल. एखादा शब्द बदल न करता हेतुपुरस्सर तसाच लिहायचा असेल तर तेवढ्या शब्दापुरती ही सुविधा निकामी करण्याची सोय ठेवलेली आहे. तसे करण्यसाठी असा शब्द लिहिण्याआधी 'स्वयंसुधारणा' ह्या अगोदरची बरोबरची खूण टिचकी मारून पुसावी. (संपादन सुविधेच्या तळाशी पाहावे. )  मात्र तो शब्द लिहून झाला की पुढच्या शब्दासाठी ती सुविधा पुन्हा आपोआप कार्यान्वित होईल आणि लेखकाला ती पुन्हा सुरू करण्याची चिंता न करता आपले लेखन निर्धोकपणे पुढे चालू ठेवता येईल.

ह्यातल्या चुका, सुधारणा, सुचवणी कृपया येथेच प्रतिसादाच्या स्वरूपात लिहाव्यात.


३१ मार्च २००८ पूर्वी ही सुविधा फक्त संपन्न संपादकातील लेखनापुरती मर्यादित होती; पण आता इतर माहिती भरतानाही स्वयंसुधारक कार्यान्वित केलेला आहे. (काही पानांवर ही सुविधा कार्यान्वित होत नाही हा पेच अद्याप सुटलेला नाही; मात्र अशा घटना तुरळक असल्याने सध्या तिकडे लक्ष दिलेले नाही. )

मे २००८: वर वर्णन केल्याप्रमाणे मनोगताच्या लेखन सुविधेत तयार होणाऱ्या मजकुरात स्वयंसुधारणा करण्याचा प्रयोग यशस्वी झाला खरा, पण इतर ठिकाणांहून घेऊन मनोगतावर चिकटवल्या जाणाऱ्या मजकुराचे काय?

मनोगताप्रमाणे इतर पुष्कळ लेखन-संपादन सुविधा अस्तित्वात आल्या आणि नवनव्या सुविधा अस्तित्वात येत आहेत. मनोगताची लेखनसुविधा मराठी लेखनावर लक्ष केंद्रित करते. इतर सुविधा अधिक विस्तृत क्षेत्राकडे लक्ष्यक्षेत्र म्हणून पाहत असल्याने (सर्व भारतीय भाषा किंवा जगातल्या सर्व भाषा... अशा रीतीने) त्या सुविधांमध्ये एकाहून अनेक भाषांतला मजकूर तयार करणे शक्य होईल अशा प्रकारच्या खुब्या ठेवलेल्या असतात. मात्र लेखकाचे लक्ष सदैव आपल्या मजकुराकडे असल्याने आणि मजकूर सुपूर्त करण्याची निकड असल्याने पुष्कळ वेळा ह्या सर्व गोष्टींचे भान ठेवणे त्याला इच्छा असूनही शक्य होतेच असे नाही. परिणामी अशा प्रकारे एका अर्थाने मराठीसाठी अयोग्य प्रकारची ठेवण चुकीने वापरली जाणे आणि मजकुराचे लेखन मराठी लेखनपद्धतीहून वेगळे होणे अशी शक्यता निर्माण होते. त्यातही असे फरक ढोबळ होत असते तर ते लगोलग लक्षात येऊन त्याचे निवारण करणेही शक्य झाले असते; पण शब्दाचे शेवटी हलंत (मोडलेले पाय), विसर्गाऐवजी विराम (कोलन), अर्ध्या र ऐवजी आडवी रेघ (हायफन) विरामचिन्हांच्या नंतर जागा सुटण्याऐवजी आधी सुटलेली किंवा अजिबात न सुटलेली जागा असे अयोग्य लेखन डोळ्यांना घाईघाईत न दिसल्याने तसेच राहून गेलेले असण्याची शक्यता असते. शिवाय प्रत्येक लेखनसुविधांमध्ये स्वयंसुधारक नसल्याने घाईघाईत अनेक टंकलेखनदोषही अशा मजकुरात तसेच राहून गेलेले असण्याची शक्यता असते.

असा मजकूर मनोगतावर चिकटवताना मनोगताच्या स्वयंसुधारणेच्या आवाक्यात तो न आल्याने त्यात कोठलीही सुधारणा करणे आजवर शक्य होत नव्हते. मात्र सुधारणा आपोआप आणि विनासायास केल्या जाण्याची स्वयंसुधारक सुविधा आता चिकटवलेल्या मजकुरासाठीही कार्यान्वित केलेली आहे. त्यामुळे इतरत्र तयार केलेला मजकूर मनोगतावर चिकटवल्यावर तो स्वयंसुधारणेच्या सुविधेपासून यापुढे वंचित राहणार नाही. (सध्या केवळ इंटरनेट एक्स्प्लोअरर मध्येच आणि तेसुद्धा मजकूर संपादनाच्या खिडक्यांमध्येच हे शक्य झालेले आहे. अधिक प्रयत्न चालू आहेत. )