ग्राहकांच्या फोन सुविधा सेवांमध्ये मराठीच्या वापराचा आग्रह

हल्ली क्रेडिट कार्ड सारख्या अनेक सेवांसंदर्भात फोनवर संपर्क साधायची वेळ येते. तेव्हा मराठीचा पर्याय देऊ केलेला असतो. मात्र त्याकडे फार लोक वळताना दिसत नाहीत. त्यामुळे तेथे फारसे मराठी भाषक नेमलेले नसतात. मग ताटकळण्याचा काळ १२-१५ मिनिटे सुधा असू शकतो. परिणामी अनेकदा तो नाद सोडला जातो. यासाठी अधिकाधिक लोकांनी मराठीचा पर्याय मागायला हवा.

क्रेडिट कार्ड सारख्या सेवेबाबत बहुतेकदा आधी आपल्या आर्थिक व्यवहाराबाबत -- रक्कम येणे, आली इ. -- माहिती ऐकवतात. त्यात शेकडा दर्शक ''शे'' ऐवजी सरळ ''शंभर'' हा ध्वनिमुद्रित आकडा वापरतात. (उदा. पाचशे रुपये ऐवजी पाच शंभर रुपये) हिंदी - इंग्रजीमध्ये संख्या आणि आकडा दोन्ही अर्थाने ''सौ'' ''हंड्रेड'' येतात. मराठीचे तसे नाही. हे मी अनेकदा तिथल्या ''सेवकांच्या'' लक्षात आणून दिले आहे, पण कदाचित माझा आवाज अत्यल्पमंख्याकी असेल, अजूनही तसेच भयंकर मराठी ऐकू येते. बाकी 'सेवकांचे''  बोल कानी पडलेच तर ते एकेका इंग्रजी वाक्याचे दिव्य भाषांतर असते असेही जाणवते. त्यांना याची जाणीव करून दिली तरी ते ''सांगितले गेले" आहे तसेच बोलतात !

भाषा वापरली की टिकते हे आपण जाणताच. तरी ही सूचना मनावर घ्यावी ही विनंती.