मिंग्रजी, इंग्राठी इ.

'स्टमकमध्ये फूड नसलं की हेड मध्ये पेन होतं' (विद्यापीठ कचेरीतील कर्मचारी)


'मी वॉलच्या बिहाईंड हाईड केलं' (कॉन्ह्वेंट विद्यार्थी)


ही मी स्वतः ऐकलेली वाक्य आहेत.


मराठी बोलताना किती इंग्रजी अथवा बिगरमराठी शब्द वापरले की ती मराठी रहात नाही, व केवळ मराठीची टिंगल रहाते, हे ठरविणं कठिण असल्यामुळे, खरं पाहिलं तर, सर्व मराठी शब्द वापरणे (आणि साधारणपणे व्याकरणाचे नियम पाळून वाक्यरचना करणे) हे एकच उत्तर उरतं.


तरीही, गेल्या एक-दोन शतकांत, मराठीने इंग्रजी व हिंदी भाषेतले अनेक शब्द कुरकुर न करता सामावून घेतले आहेत. त्या शब्दांना मराठी प्रतिशब्द असतानाही (पेन - लेखणी, शर्ट - सदरा इ.), हे शब्द मराठीत रुढ झाले.


गेल्या एक-दोन दशकात मात्र, अशा (मुख्यकरुन तंत्रवैज्ञानिक) शब्दांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे, बोली अथवा लेखी मराठी एकतर फारंच आंग्लबंबाळ वाटते, किंवा पराकोटीच्या मराठी भाषांतरामुळे क्लिष्ट वा कृत्रिम वाटते.


साधारणतः इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय काढताना शब्दश: भाषांतर केलं जातं. त्याऐवजी शब्दाचा आषय पकडणारा मराठी शब्द मिळू शकला, तर ते कदाचित अधिक सुसह्य होईल असं वाटतं.


उदाहर्णार्थ - घर्मशाळा व बहिःस्त्रोत हे दोन शब्द. दुर्दैवाने मला स्वतःला योग्य पर्याय सुचत नसल्यामुळे माझं हे उदाहरण जरा पांगळं आहे. महेशनी जर वरील शब्द वापरले असले तर अजून चांगले पर्याय असूच शकत नाहीत असं म्हणणं वावगं ठरणार नाही (कालंच नेमाड्यांचं 'हूल' अनेक वर्षांनी परत वाचत होतो, गायकवाडच्या लकबीचा हा वाकप्रयोग वापरल्यावर मग लक्षात आला), पण एकवार प्रयत्न करायला हरकत नाही.


इंग्रजी वाक्यांचाही कधी कधी विचित्र अनुवाद होतो, उदा.


Attention! Speedbreaker ahead!


सावधान! गतिरोधक पुढे आहे!


खरं तर -


सावधान! पुढे गतिरोधक आहे!


 असं व्हायला पाहिजे.


चिं. वि. जोश्यांनी असं एक पूर्ण संभाषण लिहून गंमत केल्याचं आठवतं -


'किती आहेत वाजले?' 'आहेत आठ वाजले आत्ता'  इ.