मुलगी झाली हो !

आजकाल स्त्री भृण हत्या हा विषय फार गाजतो आहे. पूर्वीच्या काळी स्त्री फारशी घराबाहेर पडत नव्हती. त्यामुळे कदाचित ती जास्त सुरक्षित असावी. पण आजची स्त्री तसे करू शकत नाही. तिला बाहेर पडणे अनेक अर्थांनी आवश्यक आहे. त्याच बरोबर बाहेरच्या परिस्थितीला तोंड देणे पण क्रमप्राप्त आहे. या प्रत्येक वेळी कोणीतरी येऊन आपले संरक्षण करेल या भरवशावर तिला बसता येणार नाही. तिला स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे आहे. या एकंदर स्थितीमुळे कदाचित मुलगी नको ही भावना वाढीस लागली असावी. मुलगी म्हणजे डोक्याला ताप. तिची अब्रू म्हणजे काचेचे भांडे वगैरे समजुतींमुळे मुलीच्या जन्मा आधीच तिचा गळा घोटला जात असावा.पण निसर्ग नेहेमीच आपला समतोल राखतो. माणूस कितीही शिकला, त्याने कितीही शोध लावून निसर्गावर ताबा मिळवायचा प्रयत्न केला तरी प्रत्येकच बाबतीत निसर्ग त्याला आपल्या वरचढ होऊ देत नाही. पूर्वी माणसे वेगवेगळ्या आजारांनी मरत होती. माणसाने नवीन नवीन औषधे शोधून काढली. पण तो मृत्यूला जिंकू शकला नाही. आजारातून वाचली तर माणसे अपघाताने मरू लागली. तज्ञांच्या मते एखाद्या वर्षात होणाऱ्या मानवी मृत्यूमध्ये जर पुरूषांची संख्या जास्त असेल तर पुढच्या वर्षी जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये मुलांचे प्रमाण जास्त असते. जर मरणाऱ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त असेल तर पुढच्या वर्षी जन्मणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असते. आता जर मुलगी नको म्हणून स्त्री भृण हत्या होत राहिल्या तर जन्माला येणाऱ्या मुलीच जास्त असतील. मग आपण मुलींची हत्या करून काय मिळवू? त्यापेक्षा मुलींचेही आनंदाने स्वागत करू या. तुम्हाला काय वाटते?