जादू

कधी आपण

उदास असतो

चेहरा रडका

भकास असतो

 

तेव्हढ्यात नेमका

मित्र येतो

आपल्याला काय

झाले पुसतो

 

आपण आपले

गप्प बसतो

आपण सांगायला

तयार नसतो

 

पण मित्र

हुशार असतो

त्याला आपला

गोंधळ दिसतो

तो गालातल्या

गालात हसतो

 

मग म्हणतो;

मला नाही सांगणार?

माझ्याशी

परक्या सारखं वागणार?

 

मग काय?

आभाळ भरून येतं..

डोळ्यांवरचा

बांध तुटतो

संकोचाचा

अंधार फिटतो

आपण सगळं

सांगत सुटतो

 

शव्द ओले

ओले असतात

हृदयातुन

आलेले असतात

 

जादू त्याच्या

शव्दात असते

हळुच निराशा

खुदकन हसते

 

क्षणात सगळे

चित्र बदलते

जसे काही

झालेच नव्हते

 

मन हलकं

हलकं होतं

गिरक्या घेतं

गाऊ लागतं

 

जसं काही

झालंच नव्हतं

 

यातली गम्मत

कळण्यासाठी

अशी मैत्री

व्हावी लागते

 

आणि मित्र

मिळण्यासाठी

जरा वाट

पहावी लागते

 

मैत्री व्हायला

काळवेळ नसते

मैत्री योगायोगाचा

खेळ असते.

 

तुषार जोशी, नागपूर