खाऊगिरी - खाऊकट्टे

वेगवेगळ्या गावी / शहरी राहून तिथल्या बऱ्याच खाऊगिरीच्या दुकानांची प्रत्येकाला माहिती असतेच. त्यातल्या त्यात मी बाहेर फार कमी खाणारा व्यक्ती होतो. त्यामुळे बरीचशी ठिकाण मला ठाऊक नाहीत. पण आपल्यापैकी बऱ्याच मनोगतींना माहिती असेल. जर आपण ही सगळी ठिकाणं एका ठिकाणी संग्रहित केली तर ? म्हणजे पुढच्या वेळी कोणाला त्या गावी जायचे असेल तर तिथले खास रेस्टॉरेंट माहिती असल्यास खाण्याची आणखी मजा येईल, नाही का ?

मला आवडलेले काही खाऊकट्टे :-

१. अमरावती :- राजकमल चौकात ३ चांगले रेस्टॉरेंट आहेत. पहिलं नाव म्हणजे किरण चाट सेंटर. इथली चाट एकदम मस्त.

दुसरं म्हणजे गड्डा हॉटेल - हे हॉटेल गड्ड्यात आहे म्हणून त्याचं नाव तसं पडलं. इथला डोसा चांगला असतो.

तिसरं म्हणजे रघुवीर. हे थोडंसं एका बाजूला आहे. चौकातून २~३ मिनिट लागतील. मात्र कधी अमरावतीला गेलात तर इथली दही-कचोरी आणि शेगाव कचोरी खायला विसरू नका.

जयस्तंभ चौकाजवळ "सन्मान हॉटेल/ रेस्टॉरेंट" आहे. इथे थाळी जेवण एकदम छान असते. विशेष म्हणजे हा मनुष्य आग्रह करून वाढतो. असं वाटतं की जसं काही आपण लग्नाच्या पंगतीत जेवतोय  

 याच चौकात साधं घरगुती जेवण हवं असेल तर "शारदा उद्योग मंदिर " आहे.

२. इंदौर :- सराफा बाजार - इथे सगळेच दुकानं रात्री सुरू होतात. चाट, गुलाब जामून आणि फरसाण हे वैशिष्ट्य. बाकी इंदौरचे गरम पोहे सकाळी नास्ता म्हणून झकास.

३. बरेली :- बिकानेरवाला - दही भल्ला बेस्ट. इथे एक त्रिकोणी आकाराचा डोसा मिळतो, तो दुसरीकडे कुठे बघायला नाही मिळाला. तसं बिकानेरवाला बाकी शहरांतसुद्धा आहे, पण बरेलीची चवच वेगळी.

४. मेरठ :- बेगमपुलला "सागररत्ना" आहे, थोडंसं विचारून जावं लागेल कारण हे २~३ मिनिटांचे अंतर आहे. इथला डोसा, पनीरच्या भाज्या एकदम मस्त असतात. इथल्या दोश्याची चव खूपच वेगळी असते.

५. मुंबई :- पार्ले (पूर्व) :- इथे डाफोडिल्स नावाचे रेस्टॉरेंट आहे. तिथला "मलई कोफ्ता" आणि चिकू शेक मला खूप आवडायचा. स्टेशनपासून अंदाजे १०~१५ मिनिट (चालत).

६. पुणे :- जोशी वडेवाले (मनपाजवळ). बाकी कुठेही मला फारसं काही आवडलं नाही. कदाचित मी चुकीच्या जागी गेलो असेल. नाहीतर पुण्यात बरीच चांगली दुकाने आहेत, हे मनोगतावर चर्चिले आहेच.

७. आगाशी - (विरार पासून बहुदा १५~२० किमीवर) इथे बस स्टँडवर एक छोटंसं पोळी-भाजी केंद्र आहे. इथली मटकीची (मोट)उसळ आणि भाकरी चविष्ट आहे.

८. यवतमाळ - दत्त चौकात सत्कार हॉटेल आहे तिथला ढोकळा खूप छान लागतो.

तुम्हाला काही असे खाउकट्टे माहिती असतील तर लिहा इथे. एक चांगला संग्रह होईल.