५१. विवाह!

विवाह या जीवनाच्या केंद्रिय विषयावर समरसून लिहिलंय, मन:पूर्वक वाचा.

विषयप्रवेश करण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट करतो, विवाह हा मानवी जीवनातला अप्रतिम संस्कार आहे. विवाह ही निव्वळ कल्पना आहे हे मी निर्विवादपणे मांडणार असलो तरी कल्पना अफलातून आहे. लग्नाशिवाय मानवी मुलाचं योग्य संगोपन अशक्य आहे, स्वयंपूर्ण व्हायला निसर्गात सर्वाधिक कालावधी लागणारं माणसाचं मूल कुटुंबाशिवाय आयुष्यात उभंच राहू शकणार नाही. अयोग्य संगोपनातून असह्य व्यक्तीगत आणि सामाजिक प्रश्न निर्माण होतात आणि त्याला पाश्चिमात्यांच्या जीवनाचा उडालेला बोजवारा साक्षी आहे. लग्न या संस्काराबद्दल मला नितांत आदर आहे.

खुद्द ओशो आणि असे अनेक विचारवंत जरी लग्नाच्या कितीही विरोधात असले आणि ते नातं अनैसर्गिक मानत असले तरी  मानवी आयुष्याचा जन्म ते मृत्यू असा समग्र विचार केल्यानंतर मी विवाहविरोधी विचारांशी संपूर्ण असहमती दर्शवतो.

विवाहाचा संस्कार कोणत्याही प्रकारे आध्यात्मिक प्रगतीत अडसर नाही आणि तो भौतिक जीवन सुखद करतो फक्त ते नातं, त्या संबंधातली खुमारी कळायला हवी. ज्यांनी संसार अध्यात्मात  अडथळा मानलाय त्यांना संसार जमला नाहीये हे निश्चित आणि अध्यात्म कितपत जमलंय सांगता येत नाही हे मी आज दोन्ही सार्थ करून नि:संशयपणे सांगू शकतो.

या लेखनाचे दोन हेतू आहेत, एक म्हणजे तुम्हा सर्वांना उपयोग व्हावा, या अफलातून नात्याची मजा यावी  आणि दोन, विवाहेच्छुक जे लिव्ह-इनची तकलादू स्वप्न बघतायत आणि मल्टीपल रिलेशन्सच्या मृगजळामागे धावतायत त्यांना वस्तुस्थितीची कल्पना यावी.

तुमच्या 'सध्याच्या वैवाहिक संबंधात' मजा यावी हा माझा हेतू आहे, सेपरेशन ही अत्यंत असह्य गोष्ट आहे आणि एकदा सवय लागली की मग धरसोड वृत्ती तयार होते त्यातनं स्वास्थ्य असंभव आहे.   त्यामुळे तुम्ही तुमच्या धारणा, आतापर्यंतची त्या संबंधातली वाटचाल, तुमचे एकमेकांविषयीचे समज संपूर्णपणे बाजूला ठेवून ज्या प्रामाणिकपणे मी हा लेख लिहिलाय तितक्याच प्रामाणिकपणे हा रंग तुमच्या जीवनात उतरवा आणि जर हा रंग तुमच्या जीवनात आधीच असेल तर तो इतरांशी शेअर  करा अशी इच्छा आहे.
_________________________________
 
पहिली गोष्ट, पारस्परिक आकर्षण हा विवाहाचा प्रमुख पैलू आहे. हे आकर्षण काय आहे याची कारणमीमांसा होऊ शकत नाही. ते दैहिक आहे, मानसिक आहे आणि भावनिकही आहे पण त्यात फक्त एकच गोष्ट नक्कीये की ती ‘संपूर्ण व्यक्ती’ आपल्याला प्रिय आहे! खरं तर आपण एखादी व्यक्ती आपल्याला का आवडते हे मुद्देसूदपणे सांगू शकलो तर ती व्यक्ती केव्हाही न आवडायला लागण्याची शक्यता आहे. हे विश्लेषण न करता येणारं आकर्षण विवाहाचा केंद्रबिंदू आहे.

तुम्ही जर वैचारिक विवाह केला असेल तर वैवाहिक संबंधाची मजा येण्याची शक्यता कमीये कारण तुम्ही कॅलक्युलेटेड डिसीजन घेतलाय, दोघांच्या व्यक्तिमत्त्वातली दरी दूर करणं जरा मुष्किल आहे. अर्थात याला पण उत्तर असेल पण हा पैलू मी तुमचे प्रतिसाद बघून त्यांना उत्तर म्हणून लिहीन.

तर सांगायचा मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमची पत्नी किंवा पती पूर्णपणे स्वीकृत असायला हवी आणि त्या स्वीकृतीचं तुमच्याकडे काहीही कारण नको. हा पूर्णपणे हृदयानं घेतलेला निर्णय हवा, बुद्धीनं नाही, त्यात कोणतीही कारणमीमांसा नको. तुम्ही स्वतःला पूर्णपणे डावावर लावून खेळलेला तो जुगार हवा, इट हॅज टू बी अ मॅडनेस ऑफ अ पर्सन ऑफ मॅच्युरिटी!

काय असेल या संपूर्ण स्वीकृतीचं कारण? तर एकच, की त्या व्यक्तीचा सहवास तुम्हाला नेहमी सुखद वाटतो, यू आर ऍबसोल्यूटली कंफर्टेबल इन इच अदर्स कंपनी. तुम्ही दोघं जेव्हा एकमेकांबरोबर असता तेव्हा तुमच्या दोघांचं मिळून एक वेगळं जग तयार झालेलं असतं. सर्व वैवाहिक जीवनाची खुमारी या ‘निर्भार सहवासाच्या’ सुखात आहे. एका अर्थानं तुम्हाला ती आपल्या बरोबर आहे हे जाणवत देखील नाही आणि एका अर्थानं तुमचा आनंद शेअर करायला तुम्ही जर जगातली कोणतीही व्यक्ती निवडायची म्हटली तर पहिला पर्याय तुमची पत्नी असते!

______________________________________

विवाहाला अत्यंत थोर आध्यात्मिक परिमाण आहे. महावीरानं म्हटलंय ‘एनलाइटन्मेंट इज दि अल्टिमेट अनफोल्डमेंट ऑफ सेल्फ! ’ स्वत:ला पूर्णपणे उघडणं म्हणजे साक्षात्कार!

माझ्या अनुभवानं तुमची पत्नी किंवा पती हे या अनफोल्डमेंटचं द्वार आहे, तुम्ही एकमेकांप्रती दैहिक, मानसिक आणि भावनिक तिन्ही अंगांनी निर्वस्त्र होऊ शकता.

काय असावं महावीराच्या या अफलातून व्याखेचं रहस्य? ते असंय की तुम्ही स्वत:ला संपूर्णपणे उघडलंत, ते साहस केलंत तर तुमच्या लक्षात येतं, अरे! आत कुणीच नव्हतं; न तिच्या, न तुमच्या! तुम्ही आकाश होता आणि ही संधी तुम्हा दोघांना समप्रमाणात असते.

जगातल्या प्रत्येक वैवाहिक दु:खाचं फक्त एकच कारण आहे, स्वत:ला स्वत:च्या पती किंवा पत्नीपासनं लपवणं! मग त्या नात्यातली खुमारी संपते, तो सहवास ओझं होतो, माणूस सुखाचा वेध घराबाहेर घ्यायला लागतो. जीवनाची दिशाच बदलते, अनावश्यक कार्यमग्नता, वारसा असेल किंवा सभोवतालची मंडळी तशी असतील तर राजकारण, कधी व्यसनाधीनता तर कुठे विवाहेतर संबंध आणि अगदीच काही नसेल तर आनंदासाठी चुकीचा आध्यात्मिक प्रवास असं आयुष्य होतं. एकमेकांच्या सहवासाचा आनंद जो घरातल्या घरात सौख्य निर्माण करू शकला असता, तो हुकतो.

परस्परांशी ट्यूनिंग जमलेलं जोडपं आणि एक सुरेख संगोपन केलेलं मूल, असं कुटुंब सृजनात्मक जगण्याचे अनेक विकल्प निर्माण करू शकतं. इतकंच नाही तर अशा कुटुंबातून, सर्वांची काळजी घेणारं एकत्रित कुटुंब,  संपन्नता आणि वैश्विक शांततेची शक्यता निर्माण होऊ शकते हा माझा आशावाद आहे.  
______________________________

आता खुद्द वैवाहिक जीवन काय आहे ते पाहू.

वैवाहिक संबंध ही केवळ पारस्परिक मान्यता आहे या एका बोधासरशी त्या नात्यातलं ओझं संपतं! नाऊ ट्राय टू अंडरस्टँड, हे एकदम महत्त्वाचंय, एखादी गोष्ट कल्पना आहे हा बोध सुज्ञ व्यक्तीला दोन पर्याय उपलब्ध करतो. एकतर तो ती गोष्ट अत्यंत सहजपणे पेलू लागतो कारण ती त्याच्या आयुष्याचा अनिवार्य आणि असह्य भाग आहे या भ्रमामुळे त्याला ती जड वाटत असते; ते ओझं उतरून जातं!  एखादी कल्पना केवळ आपल्या मान्यतेमुळे वास्तविकता वाटत होती या बोधासरशी पत्नी परस्त्री होते आणि पती परपुरूष! एकाच क्षणी संबंधातलं ओझं संपतं आणि आकर्षण निर्माण होतं!

वेळ ही वास्तविकता नसून पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे होणारा भास आहे हे समजता क्षणी आपण वेळेचं ओझं सहज पेलू शकतो, वेळेचं टेन्शन राहत नाही, अगदी तसं!

आणि दुसरी गोष्ट, या हलकेपणातून तो त्या नात्याप्रती जास्त जवाबदार होतो, त्याची आपुलकी वाढते!

हे थोडं विरोधाभासी वाटेल पण वेळेचं ओझं नाहीसं झाल्यावर तुम्ही जास्त वक्तशीर होता, तुमची कामं वेळेपूर्वीच संपायला लागतात! कारण वेळेचा धसका संपल्यानं उपलब्ध झालेली एनर्जी युनीडायरेक्शनल होऊन कामाकडे लागते! हे देखील तसंच आहे, संसार हलका झाल्यानं तो पेलायला व्यक्ती अधिक सक्षम होते. यू बिकम मोर एफिशियंट इन हँडलींग द रिलेशनशिप! आणि त्या नात्यात मजा येऊ लागल्यानं तुम्ही जास्त जवाबदारीनं ते नातं निभावू लागता!

_________________________________

सार्थक प्रणयाचे तीन पैलू आहेत (माझ्या ‘अर्थ, काम आणि मोक्ष’ या लेखात मी या विषयी सविस्तर लिहिलंय म्हणून पुन्हा लिहीत नाही) पण अत्यंत निर्विवादपणे, एकमेकांविषयीच्या आकर्षणातून निर्माण झालेला पारस्परिक अनुबंध, निर्वेध चित्तदशा आणि दुसऱ्याला सुख देण्याची आस या तीन गोष्टींशिवाय तृप्त करणारा प्रणय अशक्य आहे.

मनाविषयीच्या माझ्या अत्यंत सखोल, विस्तृत आणि सर्वांगीण अभ्यासावरून मी सांगतो की सार्थक प्रणयाला विवाह हे एकमेव उत्तर आहे. ती कमिटमेंट, ती ओढ, तो निर्धास्तपणा, एकमेकांविषयी वाटणाऱ्या कृतज्ञतेतून येणारी ती शेअरींगची उत्कटता दुसऱ्या कोणत्याही संबंधात येऊ शकत नाही.

कुणीही विवाहेतर संबंधाबद्दल कितीही फुशारकी मारली, चित्रपट आणि सिनेसृष्टीत काहीही चित्तवेधक घटना घडल्या आणि दाखवल्या गेल्या, कुणाही प्रतिभावान लेखकानं काहीही वर्णन केलं तरी तो निव्वळ कल्पना विलास आहे, जे घडलं नाही ते दाखवण्याचा तो प्रयत्न आहे.

आणि त्या ही पुढे जाऊन मी सांगीन की कुणाही राजानं कितीही मोठा जनानखाना ठेवला आणि कसाही आणि कितीही शृंगार केला तरी त्याचा प्रणय सार्थक होणार नाही कारण जोपर्यंत राणी एकुलती एक नाही तोपर्यंत राणीसाठी तो प्रणय तृप्तिदायी नाही आणि जो राणीला तृप्त करत नाही तो प्रणय राजाला कदापिही तृप्त करणार नाही!  

सार्थक प्रणय म्हणजे जो दोघांना स्वत:प्रत आणतो, कमालीचं स्वास्थ्य निर्माण करतो आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाचं निरसन झाल्यामुळे समाधीचं सुख देतो असा प्रणय!
______________________________

मी जेव्हा मानवी जीवनाच्या जन्म ते मृत्यू अशा समग्रतेनं केलेल्या विचाराला विवाह हे अत्यंत सौख्यदायी उत्तर आहे असं म्हणतो तेव्हा मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत.

एका परस्परांशी अनुबंध जुळलेल्या जोडप्याच्या सार्थक प्रणयातून जन्मलेलं मूल ही मानवी आयुष्याची अत्यंत विधायक सुरुवात आहे आणि अशा कुटुंबातलं संगोपन हे पुन्हा अहोभाग्य आहे. मृत्यू अनिवार्य आहे पण त्याची तृप्ती, त्याची उत्कटता व्यक्ती किती समाधानानं आणि आनंदात जगली यावर अवलंबून आहे.

तुम्हाला जर आनंदाच्या तिन्ही परिमाणांची (दैहिक म्हणजे दृक, श्राव्य, गंध, स्वाद आणि स्पर्श; मानसिक म्हणजे चित्ताची प्रसन्नता आणि आध्यात्मिक म्हणजे शून्याचा बोध) उपलब्धी संसारातच झाली तर मृत्यू हा परम आनंदाचा सोहळा आहे कारण जे जे म्हणून जगायला आणि भोगायला हवं होतं ते तुमचं जगून आणि भोगून झालंय.  ज्या शरीरानं आपण हे भोगलय, या प्रकट जगाचा आनंदोत्सव अनुभवलाय, ते शरीर लयाला जाईल आणि आपण शांत झोप आल्यावर तिला अविरोध समर्पित होतो  तसं शरीर मृत्यूच्या हवाली करून निसर्गाच्या या अफलातून बुद्धिमत्तेप्रती कृतज्ञ होऊ.  

संजय

 पूर्वप्रकाशन  दुवा क्र. १ 

मेल : दुवा क्र. २