काही वर्जन साँग्ज

हिंदी चित्रपटगीतांपैकी काही गाणी क्वचित कधी आपल्याला परिचित असलेल्या आवाजांपेक्षा वेगळ्या आवाजात ऐकायला मिळतात आणि आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. अश्या गाण्यांना "वर्जन साँग्ज" म्हणतात. पहिले उदाहरण एका बऱ्यापैकी प्रसिद्ध गाण्याचे आहे.  १९४८ साली आलेल्या राज कपूरच्या "आग" चित्रपटातले "देख चांद की ओर" या गाण्याच्या दोन आवृत्या आहेत. रेडिओवर नेहमी लागणारे आणि लोकप्रिय असलेले गाणे सैलेश मुखर्जी आणि शमशाद बेगम यांच्या आवाजात इथे ऐकता येईल, तर हेच चित्रपटातले गाणे इथे ऐकता आणि पाहता येईल. एक गोष्ट सहज लक्षात येते की पुरुष गायक दोन्हीकडे सैलेश मुखर्जीच असला तरी स्त्री गयिका वेगळ्या आहेत. पहिल्यात शमशाद बेगमचा तर चित्रपटातल्या गाण्यात मीना कपूरचा आवाज आहे.

दुसरे उदाहरण एका अगदी प्रसिद्ध गाण्याचे आहे. मन्ना डे आणि लताच्या आवाजातले " चोरी चोरी"चित्रपटातले ये रात भीगी हे गाणे ऐकले आणि पाहिले नसेल असा रसिक विरळाच. पण हेच गाणे ब्रिज भूषण आणि गीता दत्त यांच्याही आवाजात रेकॉर्ड झाले होते. यातला गीता दत्तने गायलेला भाग मला तरी लतापेक्षा सरस वाटला.

नौशाद यांनी संगीत दिलेल्या "आन" चित्रपटातले मोहम्मद रफीने गायलेले मुहब्बत चूमे जिनके हाथ हे गाणे प्रसिद्ध झाले होते पण या गाण्याचे रेकॉर्डिंग हेमंतकुमार च्याही आवाजात झाले होते. तीच गोष्ट "भाभी" चित्रपटातल्या रफीने गायलेल्या "चल उड जा रे पंछी या गाण्याची. याचे  रेकॉर्डिंग तलत मेहमूद च्याही आवाजात झाले होते. गुणवत्तेच्या बाबतीत रफीपेक्षा सरस असूनही हे गाणे चित्रपटात समाविष्ट झाले नाही हे दुर्दैव आहे. नौशाद यांनीच संगीत दिलेल्या "दीवाना" चित्रपटाल्या रफीच्या आवाजातल्या "तस्वीर बनाता हूं तेरी या गाण्याचे रेकॉर्डिंग हबीब वली मोहम्मद यांच्याही आवाजात झाले होते आणि ते चित्रपटात समाविष्ट न झाल्याने आणि कबूल करूनही नौशाद यांनी त्यांच्याकडून दुसरे कुठलेही गीत गाऊन न घेतल्याने ते नौशादवर बरेच नाराज झाल्याचे वाचले.

"परिणीता" या शरच्चंद्र चटोपाध्यायांच्या कादंबरीवर बिमल रॉय यांनी १९५३ मध्ये चित्रपट काढला. त्यातली मन्ना डे याने गायलेले चलि राधे रानी आणि आशा भोसलेने गायलेले गोरे गोरे हाथोंमें ही गाणी थोडीफार गाजली. पण या दोन्ही गाण्यांचे रेकॉर्डिंग गीता दत्तच्या आवाजातही झालेले होते,  उदा. चली राधे रानी-गीता,  गोरे गोरे - गीता , पैकी आशा आणि गीतादत्तच्या गाण्यांमध्ये कमी जास्त ठरवणे कठीण आहे. मला दोन्ही सारखीच आवडली.

आता तांत्रिक दृष्ट्या "वर्जन साँग" नसलेल्या एका गाण्याचे उदाहरण देतो. संगीतकार जयदेव यांनी मीराबाईचे "मैं जानूं नाही" हे भजन " चांदग्रहण आणि आंदोलन दोन वेगळ्या चित्रपटांसाठी अनुक्रमे लता आणि आशा यांच्याकडून गाऊन घेतले. मला आशाचे गाणे जास्त आवडले. पण मुळात असे कशाने झाले असावे याबद्दल माझा अंदाज असा. पहिल्याने लताकडून १९७१ च्या सुमारास  गाऊन घेतले पण 'चांदग्रहण" शेवटपर्यंत निघालाच नाही, त्याची गाणी जयदेवच्या निधनानंतर १० वर्षांनी म्हणजे १९९६ मध्ये रेकॉर्डच्या रुपात प्रसिद्ध झाली. दरम्यान जयदेव यांनी हेच गाणे आशाकडून गाऊन घेतले आणि १९७७ मध्ये आलेल्या" आंदोलन"साठी वापरले.

अशी ही काही वर्जन गाण्यांची गोष्ट. तुम्हालाही ही अप्रसिद्ध गाणी आवडतील अशी अपेक्षा आहे. कोणाला आणखी उदाहरणे माहिती असतील तर तीही ऐकायला आवडतील.

विनायक