रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)

मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है ! : ओशो (अष्टावक्र महागीता)

ओशो
__________________________________

मन या जीवनातल्या गहनतम पैलूवरचं हे लेखन तुमच्या समोर मांडताना अतिशय आनंद होतो आहे. विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना  मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील.

अनेकानेक अंगांनी मनाचा सांगोपांग वेध घेण्याचा प्रयत्न या लेखमालेतनं होईल. वेगवेगळ्या सिद्धांचं मनाविषयीचं आकलन, व्यक्तिमत्त्वाची घडण, आपली स्मृती, माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशन, मनाचा कल आणि व्यक्तिगत कौशल्य, संगीत, खेळ, फ्रॉइड आणि इतर दिग्गज मनोतज्ज्ञांचे विचार, मानवी नातेसंबंध, मनाचं हृदयाशी नातं (भावनिक विश्व : आनंद, नैराश्य, न्यूनगंड, अल्झायमर, आत्महत्या वगैरे), मानसिक धारणा, भक्तिमार्ग आणि इतर आध्यात्मिक मार्गातल्या मनापलीकडे नेणार्‍या साधना पद्धती आणि सरते शेवटी मनापासून मुक्ती असा लेखनाचा समग्र आवाका असेल.

____________________________

प्रथम मनाचं अत्यंत उघड स्वरूप समजावून घेऊ.

मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते. श्रवण आणि अवलोकन या दोन संवेदनांनी मानवी आकलनाचा जवळजवळ पंचाण्णव टक्के भाग व्यापल्यानं मन 'ऑडिओ- विज्युअल डिवाइस' आहे. इतर तीन संवेदनांनी (स्पर्श, गंध आणि स्वाद)  मनाचा अत्यंत नगण्य भाग व्यापलेला आहे.

संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते. जेव्हा आपण मनाची प्रक्रिया जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ‘पहिली संवेदना’ हा अत्यंत बेसिक फॅक्टर आहे हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

आजपर्यंत हजारो सिद्धांनी ‘ शांत बसून मनाकडे पाहा’ असा संदेश दिला आहे आणि आजही मनापलीकडे जाण्यासाठी ‘मनाचं तटस्थ अवलोकन’ ही (आध्यात्मिक) जगातली सर्वमान्य साधना मानली जाते. अगदी बुद्धापासून ते जे. कृष्णमूर्तीपर्यंत (इंन्क्लूडिंग ओशो) सर्व ज्ञानमार्गी या साधनेचा पुरस्कार करतात. आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे.

(भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. अर्थात त्याविषयी मी इतक्यात काहीही लिहिणार नाही किंवा त्यासंबंधी प्रश्नही विचारले जाऊ नयेत.)

मनाचं अवलोकन व्यर्थ का आहे हे जाणणं अगत्याचं आहे. कारण मनापासून मुक्ती याचा अर्थ ‘मानसिक प्रक्रियेचं समग्र आकलन’ असा आहे. मुक्त तर आपण ऑलरेडी आहोतच. मनाच्या प्रक्रियेमुळे आपण बंधनात असल्याचा भास होतोय आणि म्हणून मनाची प्रक्रिया जाणणं उपयोगी आहे.

मन हा बायो-कंप्युटर आहे. जशी कंप्युटरची सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी हेड आणि टेल अ‍ॅड्रेसेसनं जोडलेली असतात तशी आपल्या स्मृतीतली सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी निगडित असतात. पण कंप्युटरमधला डेटा निर्वैयक्तिक असल्यानं तो सर्वांसाठी एकाच सलग पद्धतीनं रिट्राइव होतो आणि मन हा प्रत्येकाचा व्यक्तिगत बायो-कंप्युटर असल्यानं कुणाची स्मृती कशी सक्रिय होईल आणि त्याला किती दूर नेईल ते सांगता येत नाही.

मन सक्रिय झाल्याबरोबर आपण स्मृती चक्रात अडकून अनेकानेक गतकालीन प्रसंगातून आणि अनुभवातून फिरायला लागतो. हे इतक्या वेगानं घडतं की सुरुवात नक्की कुठून झाली हे लाखातला एखादाच जाणू शकतो.

मनाचं अवलोकन करताना आपण डोळे मिटून शांत बसलेलो असतो आणि या स्मृतीच्या चलत-चित्रपटात इतके गुंतून जातो की अवलोकन कशासाठी करतोय हेच लक्षात राहत नाही. मग मधून केव्हा तरी आपण कुठेही गेलेलो नाही, जागेवरच बसलो आहोत याचं भान येतं. मग थोडा वेळ शांत वाटतं. त्यानंतर कोणत्या तरी संवेदनेनं पुन्हा स्मृती सक्रिय होते मग पुन्हा आपण भोवर्‍यात सापडतो आणि या कामात बर्‍याच वेळा झोप लागून जाते. जाग आली की झक मारली आणि वेळ घालवला असं वाटायला लागतं. पण इतक्या थोर लोकांनी सांगितलेली साधना व्यर्थ कशी असेल म्हणून लोक रोजरोज ध्यान करत राहतात. त्यांना ज्याम कंटाळा येतो, यांच्या साधनेमुळे बर्‍याच वेळा घरचे वैतागतात (कारण साधनाकालात घरात शांतता लागते) पण सांगणार कुणाला? . शेवटी ते गुरुंना विचारतात आणि गुरू सांगतात ‘साधना कमी पडते आहे, जास्त वेळ बसत चला’. अशी साधना जन्मभर केली तरी काही उपयोग होत नाही कारण साधकाला मनापासून मुक्ती मिळत नाही.

मनाचं अवलोकन करायचा प्रश्न नसून त्याची चक्राकार गती जाणणं महत्त्वाचंय. म्हणजे ‘पहिला विचार कुठून सुरू झाला’ हे विचार मालिका सुरू असताना ‘कुठे तरी मध्ये थांबून बॅक ट्रॅक करणं’ ही खरी प्रोसेस आहे.

ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे. 

हे काम अत्यंत कौशल्याचं आहे पण आता तुम्हाला प्रक्रिया कळल्यानं ते नुसतं सोपंच नाही तर अत्यंत इंटरेस्टिंग झालंय. ज्या क्षणी तुम्ही पहिला विचार जाणाल त्या क्षणी तुम्हाला कोणत्या संवेदनेनं तुमचा पहिला विचार निर्माण झाला ते कळेल. आणि मी संवेदना ही मनाची कारक आहे असं का म्हटलंय ते लक्षात येईल.

जेव्हा तुम्हाला मनाची ही समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्ती अनुभवाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल.

________________________________
‘रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ असं मनाचं अत्यंत कलात्मक वर्णन करणार्‍या  काव्यपंक्तीचं श्रेय अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांना विनम्र अर्पण