महाभारत कथा (१५)

महाभारत कथा (१५)
या प्रदीर्घ लेखातून भीष्म, विदुर, धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक विलक्षण विरोधाभास समोर येतो.
धर्म, निष्ठा, राजकर्तव्य आणि पुत्रप्रेम यांच्या संघर्षात त्यांनी अन्यायाला कितपत विरोध केला?
पांडवांवरील अन्याय दिसत असूनही त्यांनी मौन का स्वीकारले?
कुरुक्षेत्राचा विनाश टाळण्याची संधी असूनही ती का निसटली?
त्यांच्या भूमिकेचा वेध घेणारा विचारप्रवर्तक लेख.

महाभारतामध्ये अनेक प्रभावी व्यक्तिरेखा आहेत त्यामुळे कुणा एकालाच नायक अथवा नायिका म्हणणे दुरापास्त आहे. कथेमध्ये प्रत्येकाचे महत्त्वाचे स्थान आणि योगदान आहे.

पितामह भीष्म -

पितामह भीष्म हे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यांचे मूळ नाव देवव्रत असून ते राजा शंतनू आणि देवी गंगा यांचे पुत्र आहेत. त्यांचे सुरुवातीचे पालन पोषण शिक्षण स्वर्गलोकी झाले अशी कथा सांगतात. त्यांना त्यांच्या मातेकडून इच्छा मरणाचे वरदान झालेले होते. प्रत्यक्ष शिवशंकरांकडून अस्त्रे शस्त्रे प्राप्त करून महापराक्रमी भीष्म अजेय आणि अवध्य होते. पित्याच्या सुखासाठी त्यांनी स्वसुखाचा त्याग केला आणि केलेल्या प्रतिज्ञेचा कधीच भंग केला नाही. अनेक प्रलोभने असूनही त्यांचा निश्चय जराही ढळला नाही. हे सर्व अलौकिक आहे दैवी आहे , सर्वसामान्यांना शक्य होईल असे नाहीच.

सत्यवतीच्या दोघा पुत्रांच्या निधनानंतर भीष्म एकमेव कुरुकुळाचे वंशज होते. वंश सातत्यासाठी सत्यवतीने त्यांना केलेली विनंती त्यांनी मान्य केली नाहीच. असे असूनही त्यांनी हस्तिनापूर साम्राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी नाकारली नाही. विदुर दासीपुत्र असूनही त्यांना राजदरबारात मानाचे स्थान दिले. कुंती आणि माद्रीच्या पुत्रांना पांडव म्हणून स्वीकारले आणि त्यांची सर्व जबाबदारी पूर्ण केली.

त्यांचे औदार्य, निष्ठा, सभ्यता अतुलनीय आणि आदरणीय आहेत. त्याच्या शब्दाला कुरुसभेमध्ये असामान्य मोल होते आणि असे असूनही त्यांनी दुर्योधनाचा अनाचार सहन केला हे विलक्षण वाटते. पांडवांची अवहेलना, त्यांच्यावरचा अन्याय त्यांनी बिनविरोध पाहिला. त्यांच्या साक्षीनेच धर्मराजाशी कपट द्यूत खेळले गेले, त्यांच्या डोळ्यादेखत द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला गेला.

त्यांनी विरोध का केला नसेल? का त्यांच्या विरोधाला सिहासनाधिष्टीत सम्राट धृतराष्ट्राने किंमत दिली नसेल? हे प्रश्न अनुत्तरित आहेत, पण इतिहास हेच सांगतो की कौरव पांडवांमधील कलहप्रसंगी भीष्म नेहमी कौरवांशीच एकनिष्ठ राहिले. अनेक प्रसंग आहेत -- वारणावतामध्ये पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळून मारण्याचा केलेला प्रयत्न, द्रौपदीच्या स्वयंवर प्रसंगी युद्धाचा प्रसंग, वनवासामध्ये पांडवांना लज्जित करण्याचा प्रयत्न, अज्ञातवासामधील पांडवांचा शोध करून त्यांच्यावर सर्व सेनेसह आक्रमण करणे, पांडवांना अर्धे राज्य म्हणून लोकवस्तीस प्रतिकूल परिस्थिती असलेला, हिंस्त्र श्वापदांनी भरलेला खांडववनाचा प्रदेश देणे आणि अखेरचे कुरुक्षेत्रावर लढले गेलेले महायुद्ध, अशा प्रत्येक प्रसंगी भीष्मांनी नेहमीच कौरवांची पाठराखण केली, त्यांनाच मदत केली.

पितामह भीष्मांनी रानावनात राहणाऱ्या कुंतीला तिच्या पुत्रांसह हस्तिनापुरामध्ये येण्यास आमंत्रित केले. हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे कारण तोवर धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन हाच सिंहासनाचा वारस समजला जात होता. युधिष्ठिर आल्यामुळे दुर्योधनाचा हक्क संपुष्टात आला होता आणि गृहकलहांची बीजे रोवली गेली होती.

कौरव, पांडव यांच्यात असलेला गुणात्मक फरक, जन्मांध धृतराष्ट्र आणि डोळ्यांवर पट्टी बांधून राहणाऱ्या गांधारीला समाजात नव्हता किंवा समजून घेण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यांना इतकेच माहिती होते की त्यांचा पुत्रच राज्याचा खरा वारस आहे आणि म्हणून त्यांनी दुर्योधनाच्या कपट कारस्थानांना कधीही विरोध केला नाही. भीष्म, द्रोण, विदुर इत्यादी समंजस राजकारण्यांचा कल पांडवांकडे होता पण त्यांनी कधीच ते व्यक्त केले नाही. असे का केले असेल त्यांनी? याला राजनिष्ठा म्हणायचे? का विरोध करण्याचे धाडस किंवा इच्छा त्यांच्याकडे नव्हती?

पितामह भीष्मांनी दुर्योधनाला कधीही विरोध केला नाही उलट वेळप्रसंगी मदतच केली. कुरुक्षेत्रावर युद्ध झाले तेव्हा कौरवांच्या सैन्याचे नेतृत्व भीष्मांनी केले होते. भीष्म इच्छामरणी होते, युद्धकलेमध्ये पारंगत होते. त्यांच्याकडे अनेक अस्त्रे शस्त्रे होती, ज्यांचा प्रयोग करून त्यांनी पांडवसेनेला भयभीत केले होते. अर्जुनाच्या बाणाने विद्ध होऊन धराशायी झाले तरीही त्यांनी प्राणत्याग केला नाही. अर्जुनाला त्यांनी शरशय्या सिद्ध करण्यास सांगितले आणि त्यांच्यासाठी गंगाजल आणण्यास सांगितले. युद्धसमाप्ती होईपर्यंत ते युद्धवार्ता जाणून घेत होते. हे सारे विलक्षण आहे.

अमात्य विदुर --

भीष्म आणि द्रोणाप्रमाणेच आणखी एका प्रभावशाली व्यक्तिरेखा महाभारतामध्ये आहे ... आमात्य विदुर. विदुर, भीष्म किंवा द्रोणांप्रमाणे योद्धे नव्हते. त्यांचे वर्णन शांत, सुस्वभावी आणि विद्वान असे केले जाते. विदुर हे धृतराष्ट्र आणि पंडू प्रमाणेच व्यास महर्षींचे वंशज होते पण दासीपुत्र असल्याने त्यांनी सिंहासनावर कधीही हक्क सांगितला नाही. धृतराष्ट्राचे सल्लागार म्हणून त्यांना कुरुसभेमध्ये महत्त्वाचे स्थान होते, त्यांनीही दुर्योधनाला कधीही विरोध केला नाही, संकटकाळी पांडवांना साहाय्य मात्र केले होते. एक सज्जन, विद्वान आणि राजनिष्ठ अशीच त्यांची प्रतिमा होती. जन्मांध धृतराष्ट्राचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता आणि हस्तिनापुराच्या राज्यकारभारामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असे. त्यांची कार्यपद्धती विदूरनीती म्हणून प्रसिद्ध आहे .

विदुरांना पांडवांविषयी सहानुभूती होती आणि पांडवांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पांडवांना अर्धे राज्य देण्यात यावे असा सल्ला त्यांनीच धृतराष्ट्राला दिला होता. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन दुर्योधनाला कधीही विरोध केला नाही पण धृतराष्ट्राने विरोध करावा म्हणून त्याला सतत सत्यपरिस्थितीची जाणीव ते करून देत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाहीच. प्रत्यक्ष युद्धात त्यांचा सहभाग नव्हता परंतु ते कौरवांचे मंत्री म्हणून कामकाज करीत राहिले.

अमात्य विदुरांचा राजनीतीवर प्रभाव होता परंतु त्यांनी कधीही सामोरे येऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. दुर्योधनाच्या दुर्वतनावर काही उपाय करता येत नाही असे पाहिल्यावर त्यांनी पांडवांना मदत आणि सल्ला देण्याची जबाबदारी स्वीकारली अर्थात सर्वांसमक्ष नाहीच. पांडवांविषयी सहानुभूती असली तरी युद्धकाळात त्यांनी कौरवांशी प्रतारणा केली नाही हे विशेष. कौरवांच्या राजदरबारात महत्त्वाचे स्थान असूनही शकुनीमामाच्या कपटी कारस्थानांना त्यांनी विरोध केला नाही किंवा त्यांना शकुनीमामाचे वर्चस्व मान्य करावे लागले हे सत्य आहे.

सम्राट धृतराष्ट्र आणि सम्राज्ञी गांधारी --

धृतराष्ट्र आणि गांधारी यासुद्धा महाभारतातील दोन महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळे नाही तर त्यांच्याकडे असलेल्या सत्तेमुळे त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. धृतराष्ट्र खरे तर ज्येष्ठ बंधू .. कुरुकुळाच्या सिंहासनावर त्यांचा प्रथम अधिकार होता. परंतु जन्मांध असल्याने राजा होण्यास ते अयोग्य ठरले आणि कनिष्ठ बंधू असलेल्या पंडूला राज्याभिषेक करण्यात आला होता. हा सल त्यांच्या मनात कायम असेल का? त्यांच्या भविष्यातील वर्तनावरून तसेच दिसून येते.

दुर्दैवाने पंडूराजाला असाध्य अशा व्याधीने त्रासले होते आणि त्यामुळे राज्यत्याग करावा लागला होता. पंडूराजाच्या कारकीर्दीमध्ये हस्तिनापूर राज्य एक प्रबळ सत्ताकेंद्र बनले होते. धृतराष्ट्राला योगायोगाने सत्ता प्राप्तं झाली होती, त्या सत्तेच्या मोहापायीच त्याने दुर्योधनाच्या कारस्थानांकडे दुर्लक्ष केले, त्याच्या अनेक अपराधांना क्षमा केली होती. सत्ता प्राप्त झाल्यांनतर ती स्वपुत्रालाच मिळावी यासाठी त्यांनी सर्वोतोपरी प्रयास केले. ज्येष्ठतेच्या नियमानुसार युधिष्ठिर खरेतर संपूर्ण राज्याचा अधिकारी होता परंतु धृतराष्ट्राला सत्तेचा त्याग करायचा नव्हता,म्हणून त्याने युधिष्ठिराचा हक्क नाकारला. युद्धाच्या आधी शिष्टाईसाठी आलेल्या कृष्णाने म्हणले, अर्धे राज्य सुद्धा नको .. उपजीविकेसाठी राज्यातील पाच गावे द्या. तेव्हा दुर्योधन उद्दामपणे गरजला, पाच गावे काय? सुईच्या अग्रावर मावेल इतकीही जमीन पांडवांना देणार नाही. सिंहासनावरील धृतराष्ट्राने पुत्राच्या निर्णयाला पाठिंबा दिला. धृतराष्ट्राचे आंधळे पुत्रप्रेम हे देखील युद्ध घडण्याचे एक कारण आहे असे म्हणायला हरकत नाही.

धृतराष्ट्र पत्नी गांधारी शिवभक्त होती, तिची पतिनिष्ठा अजोड होती. जन्मांध धृतराष्ट्रांबरोबर संसार करताना तिने तिच्या डोळ्यांवर वस्त्राची पट्टी बांधली होती. जे सुख पती उपभोगू शकत नाही ते सुख पत्नीसाठीसुद्धा त्याज्य आहे असे तिने म्हणले होते. गांधारीची पुत्रासाठीची माया आंधळीच होती, तिने देखील दुर्योधनाच्या अवगुणांकडे, अपराधांकडे दुर्लक्ष केले. त्यानेच सम्राट व्हावे अशी तिची देखील इच्छा होतीच. गांधारी एक स्त्री असूनही द्रौपदीची दरबारात होत असलेली विटंबना थांबविण्याचा तिने प्रयत्न केला नाही हे एक आश्चर्यच आहे. युद्धाच्या अखेरीस तिने श्रीकृष्णाला शाप दिला होता, कारण त्याने गृहकलह घडवून कुरुकुळाचा विनाश घडवला असे तिचे मत होते. तिने शाप दिला, श्रीकृष्णाच्या कुळात देखील कलह निर्माण होईल, निर्वंश होईल. ज्या प्रमाणे तिचा पुत्र दुर्योधनाचा मृत्यू रानावनात, एकाकी अवस्थेत झाला तसेच भाग्य कृष्णाला लाभेल, आणि घडलेही अगदी तसेच ----

***